राजू बाविस्कर
खान्देशातील चोपडा तालुक्यातील लासूर हे माझं गाव… अगदी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं… मांग, महार, भिल्ल आणि पावरा अशा अनेक जातींनी विभागलेल्या लोकांचं जगणं आणि त्यांची चिमुकली स्वप्नं इथल्या झोपड्यांमध्ये विखुरलेली… याच वस्तीत आमचीदेखील झोपडी होती. ‘ठोक्यांचे लासूर’ या नावाने आता ती ओळखली जाते.

या गावाची वतनदारी माझ्या वडिलांना मिळालेली. वतनदार हा शब्द ऐकायला वजनदार वाटत असला, तरी तसं काहीच नव्हतं. ही प्रतिष्ठा फक्त मांग समाजापुरती. महार वतने ज्या काळात बंद झाली, तेव्हाच मांग समाजाने गावागावांत ही वतनदारी सुरू केली असणार. पण यामुळे आमच्या समाजाची शैक्षणिक प्रगती खुंटत गेली. कारण वतनदारांचे काम काय होते, तर नेमून दिलेल्या गल्लीत कुत्री-मांजर मेली की त्यांच्या पायाला दोरी बांधायची, फरफटत नेऊन गावाला दुर्गंधी येणार नाही इतक्या लांब टाकून द्यायची. गावाबाहेर नेऊन गुरेढोरे फाडायची नि चांभारवाड्यात नेऊन चामडे विकायचे. नेमून दिलेल्या गल्लीत अमावास्या आणि दोन वेळची भाकरी मागायची. मर्तिकाच्या ठिकाणी डफडी वाजवायची. एकामागून एक वारशाने पुढली पिढी वतनदारीच्या या कामांच्या चक्रात शिक्षणापासून दूर दूर जात राहिली.

काही वाईट माणसं सोडली तर माणसाला माणूस म्हणून आपलं करणार्‍या माणसांचं ते गाव होतं. गावच्या बाजारपट्ट्यात धर्मशाळेच्या ओट्यावर माझी आई सांगायची- ‘‘सटवाईने त्या वेळी काय लिहिलं असेल हे मी शोधणार नाही, पण बाबासाहेबांनी दाखविलेल्या रस्त्यावर डोळे उघडे ठेवून शिक्षणाच्या वाटेने चालताना लिहितं केलं आणि इथपर्यंत येता आलं ही गोष्ट त्यापेक्षाही माझ्यासाठी जास्त मोलाची.’’ जन्म कुठं व्हावा हे जरी आपल्या हातात नसलं, तरी एकाच जन्मात योग्य शिक्षणानं पुनर्जन्म घेता येतो, हे मात्र निश्चित. लासूरमधल्या आमच्या आख्ख्या कुटुंबासाठीच शिक्षणाचा मार्ग समृद्धीकडे, प्रगतीकडे नेणारा ठरला. ‘कचरू बाबूराव बाविस्कर’ हे भावाचं नाव पहिलीच्या हजेरीपटावर दाखल झालं. इयत्तेगणिक पुढे सरकत गेलं. घरातला तो सर्वांत मोठा. गावात वडिलांसोबत दवंडी देण्यापासून गुरे फोडण्यापर्यंत सारी कामे करायचा. आमच्या तालुक्यात आणि त्या वस्तीत मांग समाजातील पहिला बी.ए, डीएड बनण्याचा मान त्याने मिळविला. त्याच्या उत्तीर्ण होण्याने आमचं गावात सन्मानाने पाऊल पडत असल्याचं सगळीकडून जाणवत होतं. मीदेखील शिकत होतो. अनेक माणसांच्या मदतीने आणि प्रेमाने..

(जिथं जिथं पोटाचे प्रश्न जन्मापासून बैलासारखे खुंट्याला बांधून ठेवतात; तिथं तिथं शाळेचा रस्ताच डोळ्यापुढे अंधूक होऊन जातो. त्यामुळे पोटाच्या अवतीभोवती फेर्‍या घालतच गरिबी पिढ्यान्पिढ्यांचे आयुष्य मारून टाकते. त्यांची फारशी तक्रारही नसते कुणाविषयी. द्वेषही नसतो. गरिबीतली माणसं गरिबीचा सडका वास स्वत: अनुभवत, तो दुसर्‍यांना त्रासदायक होणार नाही, याची काळजी घेत त्या वासातच घरादारात आपलं आयुष्य संपवत जातात.)

पाचवी, सहावीत असताना गावात लग्नघरी भिंतींवर शाईने चित्र काढायचो. दुकानाचे साइनबोर्ड रंगवायचो आणि वाद्य वाजवायचो. यामुळे शाळेत आमच्या वर्गात प्रथम येणार्‍या मुलाला गावात जास्त कोणी ओळखायचं नाही, पण मला मात्र आख्खं गाव ओळखायचं. माझ्या वडिलांनी बॅण्ड तयार करायचं मनावर घेतलेलं. ट्रम्पेट आणि क्लेरोनेट वाजविणार्‍या निष्णात कलाकाराला बिदागी देऊन आणलं आणि ‘माझ्या दोन्ही पोरांना कारागीर बनव इतरांना काहीही शिकवले तरी चालेल.’ असा चलाख सल्ला दिला. सहा जणांचा बॅण्ड तयार झाला. वडिलांनी मला ट्रम्पेट आणि मोठ्या भावाला क्लेरोनेट शिकण्याचा आग्रह केला. कारण गावात स्वत:चा आधी बॅण्डच नव्हता. वडिलांनी मात्र गावात बॅण्ड वाजवून दिवाळी मागायचं पक्कं केलेलं. मग आम्ही सगळे सुरुवातीला रडत-पडत, बिघडत वाजवत राहिलो. वाजवायचं शिकून दिवाळी उत्तम मिळविण्यात आम्हाला यश आलं. मग लग्नसराईत बॅण्डला सुपार्‍यादेखील मिळू लागल्या. पोळ्यात बैलशर्यतीला डफडी वाजविण्याची कसरत आणि वाजवायच्या सगळ्या ठिकाणी आम्ही हजर असू.

हायस्कूलमध्ये माझे कलाशिक्षक आर. टी. पवार सर यांच्या शाब्बासकीनं चित्रकलेचं मूळ शोधत हात हळूहळू पुढे घडत गेला. चित्रकलेत डिप्लोमा- डिग्री करून मी आधी नोकरी घेऊन पोटापाण्याचा प्रश्न संपवला. कारण पोटाची भूक थांबली नाही तर कोणत्याही कलेची योग्य निर्मिती बाहेर येणं कठीण. मी नोकरीला लागल्यावरही काही वर्षे बॅण्ड वाजवला. रात्रीच्या चौरीभवरीला कधी वाजवायला गेलो की हमखास गावात राहणारी बहीण, भाची, भिलनीबाया, महारवाड्यातल्या मायाबहिणी लग्नघराच्या बायांच्या आडोशाला होऊन तेथील भांडी घासताना दिसायच्या. त्यांना त्या बदल्यात उरलेलं अन्न मिळायचं. त्या त्यांच्या टोपलीत, लुगड्याच्या पदरात घेताना मी पाहायचो. तो पदर मला कधीही विसरता येणार नाही, अजूनही मी तशाच बाया लग्नघरी भांडी घासताना पाहतो. भावानं घराला दाखविलेल्या शिक्षणाच्या उजेडानं आणि शिकल्यामुळे गावातून बाहेर पडू शकलो हा माझ्यातला झालेला बदल.

भारतात कलावंताला त्याच्या कलेवर नीट जीवन जगता येणं कठीण आहे. त्यासाठी चार चित्रं पोटासाठी आणि चार स्वत:साठी अशी काढावी लागतात. पोटाची भूक थांबली की माणूस कलेत बंड पुकारतो. माझाही पोटापाण्याचा प्रश्न सुटला होता म्हणून मला चित्रांशी युद्ध पुकारता आलं. कोणत्याही कलेत कलावंताने कलेशी आयुष्यभर युद्ध पुकारलं पाहिजे; तसंच माझं आजही चित्रकलेशी युद्ध सुरू आहे. त्यात येत असतात गावगाड्यातील कष्टाने पिळलेली माणसं, गुरंढोरं, कुत्रीमांजरी पोटाची भूक भागवण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या गावाबाहेरच्या वस्त्या. चिंतेला सोबत घेऊन रात्री दारिद्य्राने झोपणारी माणसं, वेदनेने पाठीचं कातडं सोलून काढणारा रोज उगवणारा दिवस, हे सर्व चित्रात उतरत होतं. गावात पाहिलेलं, वाडीवस्त्यांमध्ये अनुभवलेलं सगळंच चित्रांमधून स्पष्ट होत होतं.

या माध्यमातून दुसर्‍या माध्यमात व्यक्त होणं हे मला वाटतं तितकं सोपं नव्हतं. मी ज्या शाळेत कलाशिक्षक म्हणून रुजू झालो त्याच शाळेत कवी नीळकंठ महाजन इंग्रजी विषयासाठी होते. त्यांच्यामुळे साहित्यिक नियतकालिकं, मराठीतील उत्तम दिवाळी अंक आणि महाराष्ट्रभरातील अनेक कवी-लेखकांच्या भेटी होत गेल्या. या सहवासातून चांगली पुस्तकं माझ्या हाती आली. त्यातूनच थोडंफार लिहिण्या-वाचनाचा प्रवास सुरू झाला. जळगावमधील महानोर दादा, नेमाडे दादा, रंगकर्मी शंभू पाटील, लोकमतचे विजय बाविस्कर, श्रीकांत देशमुख, अशोक कोतवाल अशी खूप माणसं एक दुसर्‍याच्या कलेला प्रोत्साहन देणारी भेटली. मला वाटतं ही कलेबरोबर माणूस होण्याची प्रक्रिया असते. ती घडत गेली.

मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये २०१८ ला माझं चित्र प्रदर्शन होतं. त्यानिमित्ताने ‘युगवाणी’चे संपादक प्रफुल्ल शिलेदार प्रदर्शन बघण्यासाठी आले. त्यांना माझ्या चित्रांत वेदनेची खोलपर्यंत गेलेली सल दिसत होती; आणि माझ्या बोलण्यातूनही त्यांना थोडाफार माझा भूतकाळ जाणवला असेल. त्यानंतर शेगावच्या माझ्या चित्रप्रदर्शनात ते म्हणाले, ‘‘राजू, तू हे सारंच लिहून काढ. युगवाणीच्या अंकात आपण घेऊयात. जशी तू गोष्ट सांगतो तसंच लिहून काढ…’’ असं बरंच लिहिण्याबाबत सांगत त्यांनी मला तयार केलं. माझं बोट धरत लिहिण्याच्या पायवाटेवर त्यांनी आणून सोडलं. पहिल्यांदा युगवाणीच्या अंकातून ‘काळ्या निळ्या रेषां’चा काही भाग वाचकांपर्यंत पोहोचला. सुधीर रसाळ सरांनी या अंकातून ही प्रकरणे वाचून ‘राजहंस प्रकाशना’च्या दिलीप माजगावकर यांच्यापर्यंत पोहोचवली. तिथून या ‘काळ्या निळ्या रेषा’ पुस्तक स्वरूपात बाहेर आल्या.

लिहीत असताना मी पूर्ण वर्षभर माझ्या बालपणाच्या भूतकाळात, मनाने गावाकडे जाऊन पोहोचलो. रात्र चाटूनपुसून खाणार्‍या झोपड्यांमधून येणार्‍या खोकलण्याचा आवाज आतून मलाच खात होता. आमच्यासारखी आतड्यांना, भुकेला पीळ मारणार्‍या अनेक कुटुंबातील सोबत जगणारी मुलं, बाई-माणसं एखाद्या चित्रपटासारखी समोर दिसायला लागली. ते लिखाणातून व्यक्त होताना काही ठिकाणी डोळ्यात पाणी आल्याने थांबलो. ही होती माझी दुधमाय, मोठी बहीण नबा, बोलण्यात दरारा असणारी धाडसवान आई. ज्याचं बोट धरून मी शिक्षणाच्या मार्गाने पुढे आलो. ते माझे मोठे भाऊ(दादा), विमल मावशी अशा खूप पात्रांनी मला लिहिताना हळवं केलं. किती मोठी होती ही एक दुसर्‍यांना जागवणारी माणसं. कालूचाचा गावात कुल्फी विकायचा. पण नुसती कुल्फी विकण्याइतपतच त्याचं काम वस्तीसाठी नव्हतं. हा चाचा लहान पोरांची भांडणंही सोडवायचा. त्याने कुल्फीचे छोटे झालेले डब्यातले तुकडे हातांवर ठेवले की भांडणं थांबायची. आठवणीने तो उरलेले हे कुल्फीचे तुकडे गावाबाहेर दोन कि.मी. अंतरावर असलेल्या भिलतीत येऊन आम्हा नागड्या हुगळ्या पोरांना वाटे आणि मग तालुक्यावर जायचा. कुठं मोजावं या माणसाचं माणूस असण्याचं प्रेम! तसेच अन्यायाचे चटकेही जगताना सोबत होतेच. तो विद्रोहदेखील संयतपणे यात आहेच, पण त्यापेक्षा चांगल्या माणसांची पेरणी मी माझ्या आत केली, त्याचंच हळूहळू झाड होत गेलं. बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या वाटेनं चालताना डोळे उघडे ठेवून चालणं शिकता आलं आणि अण्णाभाऊंच्या साहित्यानं माझ्या आत एकाच जन्मात लिखाणाचा पुनर्जन्म झाला. खरं तर मी हाडाचा चित्रकार. चित्रांच्या माध्यमातूनच माझं जगणं आणि माझा भवताल मी चितारत गेलो. पण चित्रात जे उतरवता आलं नाही, ज्या गोष्टींनी मला अस्वस्थ केलं त्यांना शब्दबद्ध करता आलं. माझ्या सार्‍या भवतालातील माणसांना घेऊन आलेला लिखाणाचा हा पहिलाच प्रयत्न या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडता आला.

माझ्या पुस्तकातील अनेक पात्रं खरं तर आजही गावात, तालुक्याच्या ठिकाणी जिवंत आहेत. काही एक-दोन वर्षांपूर्वीच वारलीत. हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद मला जितका झाला त्याहीपेक्षा हा त्या सर्व पात्रांचा सन्मान आहे ज्यांनी लहानपणी दारिद्य्राच्या खोल दरीतून मला त्याचं बोट धरून वर येण्याचा आधार दिला. त्या आधाराने हळूहळू मीच समृद्ध होत गेलो. म्हणून हा साहित्य अकादमीचा पुरस्कार त्या सर्व वंचित माणसांचा आहे. साहित्य अकादमीच्या निवड समितीचे आभार कितीही वेळ मानले तरी ते कमी पडतील. सर्वच वाचकांनी पुस्तकावर प्रेम केलं, त्यामुळे माझ्यापेक्षा हे पुस्तक तुमचंच झालंय, असं मला वाटतं.

आज मी लिहिलेलं माझं जगणं साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंत पोहेचलं, पण माझे भाऊबंद अजूनही त्यातून बाहेर निघण्याची वाट पाहत, त्याच जगण्याच्या चक्रात अडकलेले आहेत, ही जाणीव सतत माझ्या मनाला टोचत असते.  

गाव गहाण ठेवण्याची गोष्ट…

आमच्या आजोबांच्या तालुक्यावर काही गल्ल्या वतनदारीच्या होत्या. आजोबांकडे तालुक्याला लागून ११ खेड्यांची वतनदारी होती. वडील त्यांच्या तरुणपणात तालुक्यावर दुसर्‍याच्या बॅण्डमध्ये वाजवायचे. पण नंतर नंतर गावकामामुळे त्यांना शक्य होत नव्हतं. इतर मांग वडिलांना म्हणायचे एकतर गावकाम कर नाहीतर बॅण्ड वाजव. वडील बॅण्डचे चांगले कारागीर. त्यामुळं ते प्रत्येक लग्नसराईत बॅण्डच्या आठवणीत गुंतून असायचे. मी दुसरीचा वर्ग सोडून दोन वर्षं झाली. तेव्हा आईनेच पुढाकार घेऊन चोपडा तालुक्यातील दोन गल्ल्या राम आखाडू थोरात या नातेवाईकाकडे सातशे रुपयांत गहाण ठेवल्या. आझाद चौकाच्या मांग वाड्यातून ताराचंद थोरात यांच्याकडून सहाशे रुपयात सहा माणसांचा बॅण्ड विकत घेतला. वडिलांचं स्वत:चा बॅण्ड बनविण्याचं स्वप्न पूर्ण झालं. गाव गहाण ठेवणं म्हणजे जिभेच्या कागदावर लिहिली जाणारी व्यवहाराबाबत इमानदारीची गोष्ट. एक वेळा शब्द दिला तो दिला, त्या गल्ल्यांमध्ये त्या दिवसांपासून अमावास्या, ग्रहण ज्यांना गाव गहाण दिलं त्यांनाच मागायला मिळायचे. त्या गल्ल्यांमधील साफसफाई तेच करायचे. गाव गहाण ठेवून वडिलांनी बॅण्ड विकत घेतला तो वडिलांनी, मोठा भाऊ, मी मिळून हळूहळू शाळा शिकत वाजवत २० ते २५ माणसांचा मोठा बॅण्ड केला.

जगवणारी दूधमाय…

आईला मुलं व्हायची. पण घरात अत्यंत दारिद्र्य असल्यानं ती कुपोषणानं मरत. आईला मात्र सारखं वाटायचं की आपल्या दुधातच काहीतरी खोट आहे. आमच्या झोपडीच्या रांगेतच गावाच्या उकिरड्याजवळ वडार मावशीचं घर होतं. त्यांच्याकडे चाळीस, पन्नास डुकरं होती. त्यांची लहान बहीण तालुक्यावर असायची. तिला सर्व ‘मारवाडीन’ म्हणून ओळखायचे. ती बाळंतपणासाठी आमच्या गावी मोठ्या बहिणीकडे आली होती. ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच दिवशी त्या वडार मारवाडीन मावशीलाही मुलगा झाला. ती पाचव्या-सहाव्या दिवशी आईजवळ येऊन बसायची. आईची चांगली मैत्रीण बनलेली. गावातून वडिलांनी मागून आणलेले भाकरीचे तुकडे, चटणी-मिरची तिच्याबरोबरीनं आई वाटून खायची. आई तिला म्हणाली, ‘‘माझ्या दूधातच काहीतरी खोट आहे, म्हणून मला झालेली मुलं वाचत नाहीत. तू जर याला दूध पाजलं, तर कदाचित हा वाचेल. तुझे खूप उपकार होतील बाई.’’ मग त्या दिवसापासून ती मारवाडीन मावशी तिच्या मुलालाही दूध पाजायची आणि उकिरड्यावर इकडे तिकडे फिरणार्‍या डुकरांवर लक्ष ठेवीत मलाही! ती भरपूर दिवस आमच्याच गावाला होती. नंतर नंतर ती तालुक्यातून आमच्या गावी यायची. प्रत्येक वेळी मला खाऊ आणायची. परत जायला लागली की मी तिच्या बरोबर जाण्यासाठी तिच्या मागे लागायचो. जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा मुलं मला ‘दोन मायचा’ म्हणून चिडवायचे. मी जेव्हा तालुक्यावर जायचो तेव्हा हमखास तिला थाळनेर दरवाज्याकडे भेटायला जायचो. मी नोकरीला लागलो तेव्हा तिला आईनं साडी घेतली होती. ती चोळी घालायची नाही. मला मला लहानपणी सारखं वाटायचं तिने चोळी घातली पाहिजे, कारण मीही तिला आईसारखाच बघायचो. माझं लग्न झालं तेव्हा ती आली होती. तिच्या मुलाचं नावही तिने बापू ठेवलं होतं, तेचं माझंदेखील होतं. प्रेमाची व्याख्या प्राण्यांपासून ते मानवापर्यंत ‘आई’ नावानं सुरू होते. त्यात जन्म देणारी आणि संगोपन करणारी, असा काही फरक नसतो. जाती धर्माच्या कोणत्याच फटीत न अडकता कोणत्याही जाती धर्माची दूधमाय मिळायची. आपण खूप मोठा बदल घडविण्याच्या भानगडीत आपलंच काहीतरी हरवलं का, असा प्रश्न मी स्वत:लाच आता करीत असतो.

baviskar.raju1@gmail.com