‘लोकरंग’मधील (५ एप्रिल) राजू बाविस्कर यांचा ‘चित्रभाषेकडून शब्दांकडे’ हा लेख वाचल्यावर मला प्रकर्षाने आठवण झाली ती अजीज लखनवीच्या गाजलेल्या शायरीची. ‘तुफाके जदसे बचके निकलना नही कमाल, मौजो में गर्क होके उभरना है कमाल’ खानदेशातील चोपडा तालुक्यातील लासूर हे राजू बाविस्कर यांचे जन्मगाव. हे थेट सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे. अनेक आवश्यक सुविधांची आजही तिथे वानवा आहे. समाजाने उपेक्षिलेल्या काही ज्ञाती इथे आपल्या झोपड्या बांधून राहतात. अठरा विसे दारिद्र्य आणि अनंत अडचणी पाचवीलाच पुजलेल्या… त्यात यांना गावकीचे पारंपरिक काम म्हणजे कुत्र्या-मांजरासारखे मेलेले प्राणी ओढत नेऊन गावाबाहेर टाकणे… आणि त्यापेक्षा मोठे प्राणी गुरेढोरे फाडून त्यांचे कातडे चर्मकार बंधंूना नेऊन देणे. सहाजिकच याचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होई. अशा प्रतिकूलतेत घडलेले राजू बाविस्कर म्हणजे सकारात्मक विचारसरणीचा आदर्श वस्तुपाठच आहे. चित्रकला त्यांच्या रक्तातच- जी जपताना त्यांनी आपल्यातील संवेदनशील माणूसही सजग ठेवला. पुढे चांगली आणि गुणग्राहक माणसे भेटत राहिली. यात त्यांच्या मातोश्री खूप महत्त्वाच्या. तिला सटवाईच्या रेषांपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मूलगामी वाटले. अनुभवातून ताऊनसुलाखून निघालेल्या त्यांच्या शब्दांची साहित्य अकादमीस दखल घ्यावी लागली हा विलक्षण सुखावणारा योग. त्यांचा जीवनपट हा युवा पिढीस दीपस्तंभच आहे. –अशोक आफळे, कोल्हापूर

उत्तम लेख

‘लोकरंग’मधील (५ एप्रिल) राजू बाविस्कर यांचा ‘चित्रभाषेकडून शब्दांकडे’ हा लेख प्रचंड आवडला. कारण चित्रकलाही माझ्या जवळचा विषय आहे. मी मुंबईत बर्‍याच कलाकारांनी रेखाटलेली चित्रे संग्रहालयात जाऊन बघितली आहेत. काही चित्रे तर एवढी बोलकी असतात की, त्यांना बघूनच कळते ते त्या चित्राला काय सांगायचे आहे. चित्रकला ही एक देवाची देणगी आहे. प्रत्येकाला ती अवगत करता येत नाही. मला अजूनही आठवते, मी शाळेत असताना आमचे चित्रकला शिकवणारे शिक्षक आम्हाला निसर्गातील चित्र काढण्यास डोंगर-दर्‍यांत घेऊन जात. – नामदेव गणपत राव, नवीन पनवेल</p>

अनोखे स्वागत

‘लोकरंग’मधील (१२ एप्रिल) ‘बालमैफल’ मध्ये ‘गुण घेईन आवडी’ या सदरात मेघना जोशी यांनी ‘संयमी पांढरा चाफा’ या लेखात मुलांना फार छान माहिती दिली आहे. त्यामध्ये मी अजून एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, या पांढर्‍या चाफ्याच्या फुलांची माळ गुढीपाडव्याला गुढीला घातली जाते. हिंदू धर्मामध्ये चाफा हा पवित्र मानला जातो. तसेच बाली- इंडोनेशियामध्ये पर्यटकांचे स्वागत या सफेद चाफ्याच्या माळेने केले जाते. – अनिल कुळकर्णी, सिंधुदुर्ग

डोळे पाणावणारा संघर्ष

‘लोकरंग’मधील (५ एप्रिल) राजू बाविस्कर यांचा ‘चित्रभाषेकडून शब्दांकडे’ हा आत्मकथनपर डोळ्यात पाणी आणणारा  लेख एक कलाशिक्षिका म्हणून मनाला फार भावला. एक चित्रकार, कलाशिक्षक त्याच्या खडतर, संघर्षमय जीवनाचे वास्तव चित्रण त्याच्या लेखणीतून ‘काळ्या निळ्या रेषा’ पुस्तकातून प्रथमत:च मांडतो आणि त्याच्या या पहिल्याच पुस्तकाला ‘साहित्य अकादमी’च्या पुरस्काराने गौरविले जाते, ही अतिशय स्तुत्य आणि अभिमानास्पद बाब आहे. प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून जग निर्माण करत या स्पर्धेच्या युगात आपल्याजवळील कला- कौशल्याने स्वत:ला सिद्ध करत राजू बाविस्कर यांनी घेतलेल्या त्यांच्या प्रामाणिक मनाचं आणि स्वकष्टाचं हे फळ आहे. एका कलाशिक्षकाने साहित्य क्षेत्रात मिळवलेला हा मानाचा पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी आहे, – कामिनी प्रसाद पवार, नाशिक

समयोचित लेख

‘लोकरंग’मधील (१२ एप्रिल) राहुल सरवटे यांचा ‘फुलेवाद आणि हिंदू आत्मभान’ हा लेख वाचला. हा लेख केवळ ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेणारा नसून, तो महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीतील एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकणारा आहे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांच्या विचारांचे जे विविध पदर उलगडत गेले, त्याचे लेखक सरवटे यांनी केलेले विश्लेषण आजच्या सामाजिक-राजकीय वातावरणात अत्यंत समयोचित ठरते.

महात्मा जोतिराव फुले हे केवळ एका जातीचे किंवा एका विशिष्ट भूभागाचे नेते नव्हते, तर ते एका नव्या मानवी संस्कृतीचे निर्माते होते. त्यांच्या ‘सत्यशोधक’ विचारांचा पाया ‘सत्य’ आणि ‘विवेक’ यांवर आधारलेला होता. लेखात नमूद केल्याप्रमाणे, फुलेंनी मांडलेली ‘गुलामगिरी’ ही केवळ शारीरिक नसून ती प्रामुख्याने मानसिक आणि धार्मिक गुलामगिरी होती. या गुलामगिरीच्या जोखडातून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. मात्र, फुलेंच्या निधनानंतरच्या कालखंडात या विचारांचा जो प्रवास झाला, त्यामध्ये ‘ब्राह्मणविरोध’ आणि ‘हिंदू आत्मभान’ या दोन परस्परविरोधी वाटणार्‍या संकल्पनांची जी सरमिसळ झाली, ती लेखकाने अत्यंत तटस्थपणे मांडली आहे.

आजच्या काळात जेव्हा आपण ‘हिंदू आत्मभाना’बद्दल बोलतो, तेव्हा त्यात अनेकदा संकुचितपणा आणि परधर्मीयांचा द्वेष डोकावताना दिसतो. पण राहुल सरवटे यांचा हा लेख वाचताना जाणवते की, महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेले ‘आत्मभान’ हे पूर्णपणे वेगळे होते.

फुलेंनी मांडलेला ‘निर्मिका’चा विचार हा कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ईश्वराशी संवाद साधण्याचा अधिकार देणारा होता.

हा विचार खर्‍या अर्थाने लोकशाहीवादी आणि समतावादी होता. जर आजचे हिंदू आत्मभान हे केवळ धार्मिक कर्मकांडांपुरते किंवा श्रेष्ठत्वाच्या भावनेपुरते मर्यादित असेल, तर ते फुलेंच्या ‘सत्यशोधक’ विचारांशी विसंगत ठरते. – प्रवीण नारायणराव डोईबळे, अंबरनाथ

समतोल विवेचन

‘लोकरंग’मधील (१२ एप्रिल) राहुल सरवटे यांचा ‘फुलेवाद आणि हिंदू आत्मभान’ हा लेख समतोल विवेचन या दृष्टीने चांगला वाटला. सध्याच्या काळात किंवा वातावरणात ब्राह्मणांना विरोध करण्याचे कारण उरलेले नाही. उच्चवर्णीय समाजाचे ‘कसब’येथे असेपर्यंत ‘भारत माझा देश आहे…’ ने सुरू होणारी प्रतिज्ञा आपण पुटपुटत आहोत असे दाखवत परदेशी जाऊन स्थायिक होण्याची खटपट करत राहणे एवढेच दिसते. ब्राह्मणेतर समाजाच्या दृष्टीनेदेखील ब्राह्मण नगण्यच ठरत आहेत, त्यामुळे फुले विचारातला तो भागदेखील आता कालबाह्य किंवा अप्रस्तुत ठरत आहे. बाकी कुसुमाग्रज यांच्या ‘अखेर कमाई’ कवितेत महात्मा गांधींच्या तोंडी घातलेल्या ‘माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेरीतील भिंती’ या उद्गारात भूतकाळातील सर्व महामानवांची व्यथा व्यक्त झाली आहे आणि शताब्दी सोहळ्यांपुरतेच त्यांचे महत्त्व. – गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर