scorecardresearch

आगामी : रावबहादूर द. ब. पारसनीस जागतिक दर्जाचे महाराष्ट्रीय इतिहासकार

दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांचं चरित्र आणि कार्य याविषयीचा ग्रंथ प्रकाशित होत आहे, त्याचं स्वागत करायला हवं.

आगामी : रावबहादूर द. ब. पारसनीस जागतिक दर्जाचे महाराष्ट्रीय इतिहासकार
रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस – चरित्र व कार्य’

रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मदिनानिमित्त  ‘रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस – चरित्र व कार्य’ हा डॉ. सुरेंद्र पारसनीस यांनी संपादित केलेला ग्रंथ आज (२७ नोव्हेंबर)  प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने पुस्तकाला श्रद्धा कुंभोजकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील संपादित अंश.

एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या संधिकालात ऐतिहासिक साधनांना उजेडात आणून त्यांचं संस्थात्मक पद्धतीनं जतन करून, शिवाय स्वतंत्र दृष्टीने साधार इतिहासलेखन करणारे दत्तात्रेय बळवंत पारसनीस (१८७०-१९२६) हे एक जागतिक दर्जाचे महाराष्ट्रीय इतिहासकार होते. त्यांनी पुढील शब्दांत आपली इतिहासविषयक दृष्टी स्पष्ट केली आहे.

‘‘.. ग्रंथांत प्रमाणावांचून कोणतीही गोष्ट लिहिलेली नाहीं. परंतु इतिहास किंवा चरित्रवर्णनांत कल्पनाशक्तीची मुळीच मदत न घेतां, नुसती शुष्क हकीकत दाखल करावी, आणि त्यांत शब्दसौष्ठव, भाषालंकार अथवा वर्णनचमत्कार वगैरे कांहीं नसावे, असा उद्देश असेल, तर तो आम्हांस मान्य नाहीं. इतिहास म्हणजे मेकालेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे काव्य आणि तत्त्वज्ञान ह्यंचे मिश्रण होय. अर्थात् या मिश्रणाचे साहाय्य घेतल्यावांचून कोणतेही ऐतिहासिक चरित्र हृदयंगम आणि सुरस वठणार नाहीं. ह्यप्रमाणे पाहिले असतां, चरित्रग्रंथामध्ये वर्णनात्मक व कल्पनाप्रचुर लेखनशैली कां ठेवूं नये हें समजत नाहीं. अस्सल माहितीच्या आधारें, सत्यास न सोडितां, वाटेल त्या तऱ्हेनें चरित्रग्रंथास रमणीयत्व प्राप्त होईल अशी भाषाशैली ठेवणें हे प्रत्येक ग्रंथकाराचे अवश्य कर्तव्य आहे.’’

इंग्रजी साम्राज्यावरून सूर्य न मावळण्याच्या काळात इंग्रजांसोबत आवश्यक तिथे सहकार्य करून, त्यांच्या गुणांची प्रशंसा आणि दोषांचीही चिकित्सा करून, स्वत:च्या इतिहासदृष्टीबाबत जाणीवपूर्वक भूमिका मांडणाऱ्या द. ब. पारसनीस यांनी मध्ययुगीन भारताबाबत आधुनिक काळात जे इतिहासलेखन झालं, त्यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मदिनानिमित्त त्यांचं चरित्र आणि कार्य यांना उजाळा देणारा ग्रंथ त्यांचे नातू डॉ. सुरेंद्र पारसनीस हे प्रकाशित करत आहेत याबाबत कृतज्ञता वाटते.

ऐतिहासिक घटनांना आणि अर्थातच इतिहासकारांच्या कार्यालाही आपापल्या काळाच्या मर्यादा असतात याबाबतची सहृदय जाणीव ठेवून त्यांच्या कामाला समजून घेणारी माणसं आज दुर्मीळ होत आहेत. आजच्या कसोटय़ा वापरून गतकालीन व्यक्तींच्या कार्याची अवहेलना करणारी मंडळी खूप आहेत; पण रावबहादूर पारसनीस यांसारख्या तत्त्वज्ञ इतिहासकाराचं काम समजून घेण्यासाठी इतिहासविषयक सहृदयतेची गरज आहे. ही सहृदयता डॉ. सुरेंद्र पारसनीस यांनी या प्रकाशनासाठी घेतलेल्या कष्टांतून जाणवते.

इंग्रजांच्या राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणामुळे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रामधल्या जनतेपुढे आपण नक्की कसे आहोत आणि कसं असायला हवं याबाबत जो संभ्रम निर्माण झाला होता, त्यातून वाट काढताना अनेकांनी इतिहासाची मदत घेतली. गतकालातील माणसं आणि तेव्हाच्या घडामोडींमधून आजच्या प्रश्नांची उत्तरं मिळवताना ‘आपण त्यांच्या समान व्हावे हाच सांपडे बोध खरा’ असा इतिहासाकडे पाहण्याचा बोधवादी दृष्टिकोन अनेकांनी अंगीकारल्यामुळे इतिहासलेखन आणि वाचन मोठय़ा प्रमाणात घडत होतं. अशा वेळी पारसनीस यांनी लिहिलेल्या इतिहासांमधून त्यांनी जो बोध जनतेसमोर ठेवला, त्यातून त्यांची इतिहासविषयक आणि समकालीन वास्तवाबाबतचीही दृष्टी लक्षात येते.

इतिहासाच्या साधनांचे संशोधक म्हणून पारसनीस यांचं महत्त्वाचं योगदान हे की, त्यांनी प्रयत्नपूर्वक जमा केलेली अनेक कागदपत्रं ‘भारतवर्ष’, ‘महाराष्ट्र कोकीळ’ आणि ‘इतिहास संग्रह’ या नियतकालिकांच्या माध्यमातून संशोधक आणि वाचकांसाठी खुली केली. संशोधनाच्या साधनांच्या बाबतीतला हा खुलेपणा पारसनीस यांच्या पद्धतिशास्त्रीय नैतिकतेचा आणि मानवकेंद्री आधुनिक विचारांचा दाखला म्हणून पाहावा लागेल. पूर्वसुरींनी कष्ट घेऊन जमवलेल्या इतिहासाच्या साधनांचा असा मुक्तद्वार वापर करू देण्याची उदारता आजही अनेकांना अंगीकारता येत नाही.

त्यांचं दुसरं महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे त्यांनी राणी लक्ष्मीबाई आणि बायजाबाई शिंदे यांची चरित्रे  लिहिली आणि अहिल्याबाई होळकरांच्या चरित्रलेखनाला अत्यावश्यक अशा महेश्वर दरबारच्या बातमीपत्रांचा संग्रह त्यांनी संपादन करून अनेक खंडांच्या रूपात उपलब्ध करून दिला. यामागे केवळ पुरुषी क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या स्त्रियांचं गुणवर्णन करण्याचा मर्यादित हेतू नव्हता हे पारसनीस यांनी स्वत:च नोंदवून ठेवलं आहे. ते म्हणतात, ‘‘.. त्यांची उज्ज्वल चरित्रे किंवा गुणमहिमा आमच्या नेत्रांसमोर नसल्यामुळे त्यांचे सद्गुण, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची कर्तृत्वशक्ती ह्यांविषयी आमच्या मनांत यित्कचितही प्रकाश पडत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीं ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हती’ असला अनुदार विचार मनांत ठाम बसून, त्यांना बंद्या गुलामाप्रमाणे वागविण्याची स्वाभाविक प्रवृत्ति पडली आहे. त्याकारणाने त्यांच्या शिक्षणाबद्दल व उन्नतीबद्दल निष्काळजीपणा उत्पन्न होऊन आमच्या संसाररथाचे एक चक्र अगदी लुळे पडले आहे व समाजाची व राष्ट्राची फार हानि झाली आहे. म्हणजे, पर्यायेंकरून, चरित्रप्रकाशनाच्या योगाने उत्तम गुणांचे प्रतिबिंब मनावर चांगल्या रीतीने उमटून, सत्कृत्याविषयी प्रेरणा-सद्गुण आणि सत्कृत्याविषयी आसक्ति ही उत्पन्न होऊन स्त्रीपुरुषांस जो अप्रतिम लाभ व्हावयाचा तो आमच्या देशांत चरित्रप्रकाशनाच्या अभावामुळें अगदी नाहीसा झाला आहे..’’

स्त्रियांबाबत सन्मानाचा अभाव असल्यामुळे केवळ स्त्रियांचंच नाही, तर संपूर्ण समाजाचं नुकसान होतं, ते सुधारण्यासाठी ऐतिहासिक चरित्र हे एक आयुध म्हणून वापरता येईल याचं भान इतिहासकार पारसनीस यांना होतं.

सी. ए. किंकैड यांनी पारसनीस यांच्या मदतीनं इंग्रजीतून मराठय़ांच्या इतिहासाचे तीन खंड लिहिले आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं ते प्रकाशित केले. इंग्रजी साम्राज्याचा अभिमान बाळगून भारतीयांच्या ऐतिहासिक साधनांना आणि इतिहासविषयक जाणिवांना क्षुद्र न लेखता, त्यांचाही सहज स्वीकार करत हे लेखन केलं गेलं होतं. त्यामध्ये इथल्या ऐतिहासिक साधनांचे गुणदोषही उतरणं स्वाभाविक होतं. मराठी भाषेतल्या अनेक साधनांचं इंग्रजी भाषांतर पारसनीस यांनी केल्यामुळे अनेक ऐतिहासिक घडामोडींबाबत स्थानिक समाजाचा दृष्टिकोन इंग्रजी वाचकांसमोर मांडला गेला. त्यात रामदासांच्या चमत्कारांसारख्या काही अनैतिहासिक गोष्टीही होत्या हे खरं आहे, पण निदान मराठी समाजमनाचं प्रतिबिंब या इतिहासात पडलं होतं आणि त्यात पारसनीस यांचं योगदान होतं हे नक्की.

रावबहादूर पारसनीस यांचं सर्वाधिक महत्त्वाचं योगदान म्हणजे अनैतिहासिक गोष्टींचा प्रतिवाद करून सत्य घटनांना शक्य तितक्या विवेकनिष्ठेनं आणि धैर्यानं समाजापुढे मांडण्याचं.  हे इतिहासकाराचं आद्यकर्तव्य पारसनीस यांनी पार पाडलं. ‘झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाई साहेब यांचे चरित्र’ या चरित्राद्वारे त्यांनी अनैतिहासिक मांडणीचा प्रतिवाद केला. १८९० मध्ये पुण्यातील वसंतोत्सवात पंडित वसंतराव नावाच्या माणसानं झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल एक रसाळ व्याख्यान दिलं. अशा स्वरूपाच्या रसाळ व्याख्यानांमध्ये असतो, त्याचप्रमाणे या व्याख्यानात सत्याचा अंश फार कमी होता. तरीही ‘केसरी’त त्या व्याख्यानाच्या वृत्तांताला सकारात्मक प्रसिद्धी दिली गेली. ती वाचून राणी लक्ष्मीबाई यांचे दत्तकपुत्र दामोदर यांनी व्यथित होऊन ‘केसरी’त तात्काळ एक पत्र लिहिलं आणि व्याख्यात्याचं खंडन केलं. या प्रकारात ‘केसरी’नं आणि संबंधित वक्त्यानंही जाहीर माफी मागितली. परंतु त्यामुळेच पारसनीस यांच्यासारख्या इतिहासकाराला राणी लक्ष्मीबाई यांचं चरित्र लिहिण्याची गरज तीव्रतेनं जाणवली. त्यांनी नोंदविल्यानुसार लोकहितवादींनीही त्यांना याच सुमारास अहिल्याबाई आणि लक्ष्मीबाई यांची चरित्रं लिहून काढण्याचा प्रेमळ आग्रह केला. यामुळे दामोदर यांच्यासह लक्ष्मीबाईंच्या अनेक नातेवाईकांच्या मुलाखती घेऊन, त्याला इंग्रज आणि एतद्देशीय वृत्तांतांच्या अभ्यासाची जोड देऊन पारसनीस यांनी चार वर्षांत लक्ष्मीबाईंचं चरित्र प्रकाशित केलं. इतिहासलेखनासाठी मौखिक साधनांचं महत्त्व नाकारलं जात असे अशा काळात त्यांनी या नातेवाईकांच्या मुलाखती घेऊन आपलं चरित्र सिद्ध केलं हीदेखील असामान्य आणि त्या काळाच्या पुढची गोष्ट होती.

 ‘केसरी’ला या चरित्राला अग्रलेखातून दाद द्यावी लागली. आपण छापलेल्या वृत्ताच्या सत्यासत्यतेची जबाबदारी घेणारी पत्रकारिता आज स्वप्नवत् वाटते. लोकमान्यतेच्या शिखरावर असणाऱ्या वसंतोत्सवातल्या भाषणातून दिसलेलं राणी लक्ष्मीबाईंबाबतचं अज्ञान दूर करण्यासाठी अखंड परिश्रमातून त्यांचं चरित्र साकारणाऱ्या इतिहासकार पारसनीस यांनी दीघरेद्योगाचा आणि सत्यनिष्ठेचा मानदंड पुढच्या पिढय़ांसाठी उभा केला. अनेक अंगांनी इतिहासाच्या अभ्यासक्षेत्राला समृद्ध करणाऱ्या दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांचं चरित्र आणि कार्य याविषयीचा ग्रंथ प्रकाशित होत आहे, त्याचं स्वागत करायला हवं.

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 01:02 IST

संबंधित बातम्या