डॉ. योगिनी सातारकर-पांडे 
‘धूसर झालं नसतं गाव’ (२०१३) या युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त संग्रहानंतर प्रकाशित झालेल्या रवि कोरडे यांचा संग्रह म्हणजे ‘भुंड्या डोंगरांचे दिवस’. ‘माणूसपणाच्या फांद्याशिवार भर’, ‘भुंड्या डोंगरांचे दिवस’, ‘कंदिलाची काळजी काढताना’, ‘हुसकावलेली माणसं’ आणि ‘खडकांना असू दे पाझर कायम’ या पाच विभागातून एकूण ५५ कविता या संग्रहात आहेत.

स्वयंपूर्ण खेडी आणि खाऊन-पिऊन सुखी असणारी खेड्यातील माणसे हे निव्वळ स्वप्न होते की काय असे वाटायला लावणारे हे वर्तमान. त्यामुळेच गाई-म्हशी, डोंगर, पक्षी असे निसर्गाचे आश्वस्त करणारे चित्र या कवितेत नाही, तर शेती, गुरे आणि उत्पन्नाच्या तुटपुंज्या सामग्रीवर दिवस मागे सारणारी अतिसामान्य अशी माणसे यात आहेत. अभावाचे हे दिवस ही परिणीती आहे ती झपाट्याने बदलत गेलेल्या पर्यावरणाची आणि असंवेदनशील होत गेलेल्या माणसाच्या वर्तन बदलाची. मुळातच माणसाच्या अपरिमित हव्यासाने पार केलेली परिसिमा आणि त्यातून घडलेले अनिष्ट बदल यांनी कोणताही चेहरा नसणार्या माणसांवर खोलवर केलेले अमीट परिणाम अस्वस्थ करणारे आहेत.

‘गहू विकून / बाजरीच्या भाकरीवर काढलेस दिवस/ भाजीपाला मोकळा केला बाजारदिवशी / पाणीदार वरणात कुटके भिजवून’ या ओळींतून हे वास्तव सामोर येते. अवर्षण, जेसीबी, कोर्टकचेर्या, लिलाव, टोवर, विकासाचा महापूर वाढते शहरीकरण या फेर्यातून पापभीरू शेतकर्याला समृद्धी महामार्ग, सातबारा, रेशन, कृषी कार्ड, योजनाच्या घोषण हे काहीही वाचवू शकत नाही हे या कविता अधोरेखित करतात. तसेच निर्ढावलेल्या अमानवी व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर थकलेल्या, असहाय्य, शेतकरी, कष्टकरी श्रामिकाचा चेहरा उजागर करतात. भाकरीचे चित्र धूसर होत जाणारे हे दिवस माणसाला माणसांपासून दूर नेणारे आहेत, नातेसंबंधांची वीण उसविणारे आहेत- जे शेताशेतात बांध घालतात आणि तरुणांना खेड्यापासून शहराच्या रस्त्याकडे नेतात.

‘सरकताहेत बांध शहराच्या दिशेने / भरणार नाहीत कणसं शिवारात / तुझ्या संमती शिवायचा झालेला / तुझ्या हिरवाईचा लिलाव / हे शहर धावतंय तुझ्या दिशेनं/ ’ जमिनीपासून पाय अधांतरी करण्याची तयारी करणार्या शेतकर्याच्या मागे असणार्या परिवाराचे करुण चित्र आणि त्यातून उभे राहणारे भीषण प्रश्न ही याच वास्तवाची दुसरी बाजू आहे जी ही कविता मुखर करते.

अर्थात, सभोवतालात होणारे भौतिक बदल माणसाच्या मानसिक, भावनिक बदलास कारण ठरतात हे कवीला ठाऊक आहे. त्यामुळेच सामान्य माणसाच्या बाह्यरूपापेक्षा त्यांच्या अंतरंगात डोकावत त्यांचे दैनंदिन, भावनिक, मानसिक कल्लोळ, आशा-अपेक्षा, वंचना आणि नात्यातील बहुपेडी अस्तित्वाचा तळठाव घेण्याची इच्छा या कवितांमधून समोर येते.

विपरीत वर्तमान तोलून धरण्याचे वा किमान त्याला रोज सामोरे जाण्याचे आत्मिक बळ या चेहराविहीन माणसांना प्राप्त होते ते त्यांच्या पारदर्शी, खर्या जगण्यातून आणि निस्सीम अशा श्रद्धेतून. ही श्रद्धा आहे सावळ्या विठुरायाबद्दलची जी कोणत्याही परिस्थितीत कमी होत नाही. ‘कोणत्याही सुखाच्या वा अवघड वेळी तुझ्या मुखातून येत राहिले/ अभंग / काळाचाच एक शाश्वत भाग बनून / ’ या ओळी वारकरी परंपरेचे प्रत्यंतर देणार्या आहेत. कीर्तन, प्रवचन, नामस्मरण यातून आत्मिक बळ गाठीशी बांधत येणार्या अवघड काळाचा सामना हे गोरगरीब जीव करत राहतात. तरीही सुखाचे प्रतिबिंब असणार्या विठूच्या वाटेची भूल पडलेल्या शेतकरी वडिलांना ताकाला फोडणी देत ढकलावे लागणारे दिवस, शेवटची तयारी करायला लागणारा, भाकरींच्या बागा फुलविणार्या भावाला अग्निडाग देऊन कीर्तनाला उभे राहणारा भाऊ, जातीच्या नसलेल्या भाकरीवर वाढलेले आयुष्य आणि यासोबतच दांभिकता आणि विरोधाभासाने भरलेला असा हा कठीण काळ समोर उभा ठाकला आहे याची टोचरी जाणीव विचारप्रवण करते.

स्त्रिया आणि स्त्रियांच्या असण्याचे विविध संदर्भ या कवितांमधून आलेले आहेत. विविध नातेसंबंधांनी आणि कोणत्याही नात्याशिवाय अनाम अशा ्त्रिरया या कवितेत आहेत. आयुष्यभर कष्ट उपसत राहणारी मायाळू नातेसंबंध जोपासणारी आई, अचानक नाहीशी होणारी मुलगी, परित्यक्ता, शिक्षण मुकलेली बहीण, अन्साबाई, पिशवीभर गोष्टी घेऊन येणारी माहेरवाशीण अशा ्त्रिरया या समाजातील ्त्रिरयांच्या प्रतिनिधी म्हणून यात येतात. लग्न करून सावलीत मिसळून गेलेली जोडीदारीण घरावर सावली धरते, पण हे सुख सगळ्यांच्या वाट्याला येत नाही याची जाणीव कवीला आहे.

नैतिक- अनैतिक, नैतिकतेची चर्चा अर्थहीन ठरवीक माहेरचा रस्ता खंदून टाकल्या गेलेली माई, अक्का, शहरे एका पिशवीत घालून दिव्याची तेलवात होऊन येणारी माहेरवाशीन, शब्दांचा विस्फोट करत विचार घरातल्या बायांच्या बाजूने उभी राहणारी बाई या ्त्रिरया स्त्री जीवनाचे बहुविध आयाम उलगडतात. कष्ट, सोशिकता, माया, घरादाराला बांधून ठेवणे, काळजी घेणे या गोष्टी अविरत करणार्या ्त्रिरयांच्या वाट्याला वयात खूप अंतर असणार्या माणसाशी नाईलाजाने बांधले जाणे, सासर माहेरातील नातेसंबंधातील ताणतणाव, होणारी ओढाताण, सासुरवास, जाच याचे विदारक अनुभव, ग्रामीण भागातील वास्तवात नवर्याच्या संपून जाण्याची धास्ती असणे, शहरात जाण्याने आई-मुलगा यात पडलेले भौगोलिक अंतर सोसणे, पिढ्यातील ताणतणाव झेलणे समकाळातही चुकलेले नाही. अर्थवाही आणि नेमक्या प्रतिमा हा या कवितेचा विशेष आहे.

‘भुंड्या डोंगराचे दिवस’,

रवी कोरडे, तुला प्रकाशन,

पाने- ११२, किंमत- २५० रुपये

usatarkarpandeyogini@gmail.com