scorecardresearch

समजा, कोणी तुमच्या थोबाडीत मारली तर?

सध्या सभोवतालचं वातावरण द्वेष, धर्माधता, सूड यांनी पार गढुळलं आहे. तुम्ही कुणाची खोडी काढा वा काढू नका; तुमची खोडी काढली जाणारच नाही असं नाही. मग आपण काय करायचं. गप्प बसायचं? की प्रतिकार करायचा?

रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ
सध्या सभोवतालचं वातावरण द्वेष, धर्माधता, सूड यांनी पार गढुळलं आहे. तुम्ही कुणाची खोडी काढा वा काढू नका; तुमची खोडी काढली जाणारच नाही असं नाही. मग आपण काय करायचं. गप्प बसायचं? की प्रतिकार करायचा?
गोष्ट बरीच जुनी आहे. माझ्या किशोरवयातली. कुठून कुठून मिळतील ते जुनेपाने दिवाळी अंक, जीर्ण पुस्तकं जमवून त्यांची पारायण करण्याचे ते दिवस. त्यातलं बरंच काही तेव्हा समजतही नव्हतं. पण ते काळजात रुतून बसलं खोलवर. त्याचे अर्थ नंतर कळायला लागले. ते आकळणं ही तर आणखी अलीकडची बाब.
तेव्हा पुलंचा एक लेख वाचनात आला होता. त्याचं शीर्षक होतं- ‘समजा, कोणी तुमच्या थोबाडीत मारली तर?’ नंतर प्रयत्न करून, अनेकांना विचारूनही तो लेख मला सापडला नाही. मी तो अजूनही शोधतो आहे. तो सापडला तर त्याच्या हजारो प्रती काढून वाटाव्यात, त्याच्या पारायणाचे जाहीर कार्यक्रम करावे असं माझ्या मनात आहे. असं काय होतं त्या लेखात?
आता आठवतं ते असं : पहाटे उठून व्यायाम करणं, शरीर कमावणं हा पुलंना कधीच न जमलेला प्रकार. पण त्यांचे काही सन्मित्र त्यांना त्यासाठी भरीला घालतात. ते विचारतात, ‘‘समजा, रस्त्याने चालताना कोणी तुमच्या थोबाडीत मारली तर?’’ पुलं म्हणतात, ‘‘पण कोणी असं करेलच कशाला? मी जर त्याचं काही बिघडवलं नसेल तर तो माझ्या वाटेला जाईल कशाला?’’ पण सन्मित्र आपला हेका सोडत नाहीत. ‘‘पण असं घडलंच तर? मग तुम्ही काय निमूटपणे त्याचा मार खाल? चारचौघांत होणारी बेइज्जती सहन कराल?’’ ‘‘अहो, पण अशी वेळ कशाला येईल? माझ्यासारख्याला कोणी आडवा जाईल तरी कशाला? त्याला काय मिळणार त्यातून?’’ पुलं आपला बचाव करताना म्हणाले.
‘‘आपण इथेच तर मार खातो! आपण इतरांना आपल्यासारखे सज्जन समजतो. पण ते तसे नसतात. ते मुळातच खुनशी स्वभावाचे.. तुमच्याशी गोड गोड बोलतील, पण केव्हा वार करतील याचा नेम नाही. आतापर्यंत असंच घडत गेलंय. सज्जन म्हणूनच पराभूत झालेत. ते काही नाही, तुम्ही शक्तीची उपासना केलीच पाहिजे.. म्हणजे कोणी आपल्या वाटेला जाण्यापूर्वी दहादा विचार करील. त्याने तसा प्रयत्न केलाच, तर तो हात कलम करण्याची ताकद असेल तुमच्या बाहूंमध्ये.’’
पुलं आपल्या ‘बाहूं’कडे एक नजर टाकतात. कलम पकडण्याची ताकद असणाऱ्या त्या बाहूंमध्ये कोणाचा तरी हात ‘कलम’ करण्याची ताकद नाही, हे त्यांना माहीत असतं. पण तरीही कोणी उगाचच आपल्याला रस्त्याने जाता-येता थोबाडीत मारेल व त्यासाठी आपण ‘सज्ज’ असावं, ही कल्पना त्यांना फारशी रुचत नाही. मग ते सामूहिक बलसाधनेच्या मार्गाने न जाता पहाटे धावायला जाणं वगैरे निरुपद्रवी प्रकार करून पाहतात. भलत्या वेळी गजर झाल्याने बेरात्री धावायला गेलेल्या पुलंना पोलिसाने पकडणं, सकाळी साहेब येईपर्यंत पोलीस ठाण्यात अडकवून ठेवणं, मग भल्या सकाळी बिनबाह्यंचं बनियन व ढगळ हाफ पँट घातलेल्या पुलंनी मेन रोडने घरी परतणं, चार चार फास्ट ट्रेन सोडून देऊनही ज्यांचं दर्शन दुर्लभ होतं अशा ‘कॉलेज क्वीन्स’नी त्यांना त्या अवतारात पाहणं.. असा बराच मनोरंजक मसाला त्या लेखात होता.
असे अनेक धमाल किस्से सांगून लेखाच्या अखेरीस पुलं पुन्हा समेवर येतात. कोणीतरी आपल्या थोबाडीत मारेल असं भय मनात बाळगून स्वसंरक्षणाच्या नावाखाली आपणही आक्रमक व्हावं, दुसऱ्याच्या मनात भय निर्माण करण्यासाठी बलोपासना करावी, हे आपल्याला जमत नाही. हे पुरेसं खरं नाही, हे त्यांना उमगतं. मुळात दंडात बेटकुळी दिसावी यासाठी पहाटे उठणं हेच त्यांना मंजूर नाही. माझ्या लाडक्या साखरझोपेतून मला उठवण्याची ताकद फक्त मल्लिकार्जुन मन्सूर, बडे गुलाम अली खांसाहेब, बेगम अख्तर अशा भूलोकीच्या गंधर्वानाच आहे; कोणाच्या दहशतीला नाही असं ते ठासून सांगतात. कोणाचंही नाव न घेता मनामनांत ‘आपण विरुद्ध ते’ अशी विभागणी करणाऱ्या, ‘ते’ खुनशी आहेत, केव्हाही आपल्यावर हल्ला करतील म्हणून आपण सज्ज होऊ या आणि आधीच हल्ला करून त्यांना नियंत्रणात ठेवू या,’ असा विचार पसरविणाऱ्या लोकांचं पितळ ते उघडं पाडतात. हृदय जोडणारं प्रेम, तसंच मनाला भेदाभेद व पाíथवता यापलीकडे नेण्याची कलेची शक्ती ही दंडातील बेटकुळीपेक्षा श्रेष्ठ ताकद आहे, असं ते अगदी सहजतेने सांगतात. कोणत्याही चांगल्या कलाकृतीप्रमाणे ते अतिशय अलवारपणे हा संस्कार वाचकाच्या मनावर करतात.
मला स्वत:ला कलेच्या या शक्तीचा प्रत्यय आला आहे. किशोरावस्थेत असताना माझ्यावरही ‘त्याचा हात उठण्यापूर्वीच कलम करून टाकू’ या विचारधारेचा जबरदस्त पगडा होता. आमच्या घरात तेव्हा अंडंही चालत नसे. पण शत्रूच्या शिबिरावरून ‘त्यांच्या’सारखं बलशाली होण्यासाठी आपण मांसाहार केला पाहिजे असं मी ठरवलं होतं. लुटूपुटीच्या लढाईत ‘त्यांच्या’वर तुटून पडताना मला विलक्षण आनंद होत असे. मिशांसोबत मते फुटण्याच्या वयात मात्र मी अलगद त्या विचारांपासून दूर गेलो. सत्तरच्या दशकातील अस्वस्थता, नव्या विचारांचे मित्र, बाबा आमटेंचे शिबीर अशा घटकांसोबत या लेखाचा व अशा साहित्याचा माझ्या मनावर झालेला खोल संस्कार त्याला कारणीभूत होता. याचं भान मला तेव्हा नाही, पण आता नक्कीच आलेलं आहे.
आता तर माझ्याभोवती दंडातल्या बेटकुळ्या दाखवणाऱ्यांची अख्खी फौज उभी आहे. प्रत्येक जण भयग्रस्त आहे. त्यामुळे सारेच दंड फुरफुरत आहेत. मी कधीकाळी कोणत्यातरी युद्धाचं वर्णन वाचलं होतं. युद्धापूर्वी हत्ती, घोडे आक्रमणासाठी इतके आतुर झाले होते की त्यांनी उडवलेल्या धुळीमुळे सारा आसमंत माखून गेला होता. सारं काही धूसर धूसर झालं होतं. कोण आपला, कोण शत्रू हेच समजेनासं झालं होतं. आता समोर येईल त्याच्यावर वार करायला हवा एवढाच भाव प्रत्येक योद्धय़ाच्या मनात जागत होता. मला आता तसंच काहीसं वाटतं आहे. सगळीकडे इतका धुरळा उडतो आहे की मागचं-पुढचं सारं दिसेनासं झालं आहे. फक्त समोरच्यावर तुटून पडायला हवं, एवढंच लोकांना समजतं आहे. ‘जगाचं काहीही होवो.. मी माझ्या, माझ्या कुटुंबाच्या, जातीच्या, धर्माच्या, देशाच्या स्वार्थाचाच फक्त विचार करायला हवा, आणि हीच ‘चाणक्य’नीती आहे, आज टिकून राहायला हाच एक मार्ग आहे..’ असं सर्वत्र बिंबवलं जातंय. मला भीती वाटते की, लवकरच परधर्मातील हिरो-हिरोईनवर प्रेम करण्यावर बंदी घातली जाईल. परजातीतील लेखकांची पुस्तकं कोणी वाचणार नाही. एकेकाळी आपल्याकडे हिंदू जिमखाना, पारशी जिमखाना अशा धर्मवार क्रिकेट टीम्स होत्या व त्यांचे पंचरंगी सामने खेळविले जात. उद्या जात-धर्म-रंग यांच्यानुसार टीम ठरवून त्यांच्यात आयपीएलचे सामने खेळवले जातील. पण प्रत्येक सामन्याच्या वेळी युद्धसमान परिस्थिती निर्माण होईल, त्याचं काय? सभोवतालचा धुरळा खाली बसवून वातावरण स्वच्छ करण्याची शक्ती आहे तरी कशात, या विचाराने मी भांबावून गेलो आहे.
एकेकाळी ही शक्ती ज्यांच्यात होती, त्यांच्या डोळ्यांतही खूपसे धूलिकण गेले आहेत असं दिसतं. त्यातले काहीजण आपल्या जीर्ण गढय़ांच्या मालकी हक्कासाठी परस्परांशी लढताहेत. काहीजण आपले सरदार, सनिक आपल्याशी एकनिष्ठ नाहीत, या संशयाने त्यांना एकदाचे शत्रुपक्षात लोटण्यासाठी आतुर झाले आहेत. काहीजण वैचारिक स्पष्टता येण्यासाठी रणभूमीवरच ध्यान लावून बसले आहेत. त्यांना समजेल अशा भाषेत गीता सांगितली जात नाही तोवर ते हाती शस्त्र धरणार नाहीत असा त्यांचा निश्चय आहे.
युद्ध महाभारताचं असो की किलगाचं- ते संपल्यावर लोक (काही काळ तरी!) शहाणे होतात, त्यांना युद्धाचं वैयथ्र्य जाणवतं, हे खरं. पण अकारण युद्ध किंवा यादवीत आपण आणि आपल्यासारखे लाखो हकनाक बळी जाऊ नयेत यासाठी माझ्यासारख्या सामान्य माणसानं करावं तरी काय? द्वेषाची ही आग विझवू शकेल असं सामर्थ्य दिग्गज लेखकांच्या लेखणीत, किशोरीताई, बेगम अख्तर, लता, रफी, किशोर अशांच्या स्वर्गीय आवाजात आहे. कबीर, तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी यांच्या संतत्वात आहे. परंतु इतरांना त्यासाठी काहीच करता येणार नाही का?
मी मघाशी पुलंच्या लेखाचं पारायण करण्याबद्दल बोलत होतो. आजही या देशात पोथ्यांची पारायणं होतात. चांगल्या सिनेमांना लोक गर्दी करतात. मुलांना गोष्ट सांगणारी अ‍ॅप्स, पुस्तकं, कार्टून नेटवर्क धडाक्यानं खपतात. एकूण काय, की लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांना अजूनही गोष्टी ऐकायला आवडतं. मग आपल्याला जमेल त्या प्रकारे, ऐकतील त्यांना गोष्टी सांगायला काय हरकत आहे? गोष्ट- दु:खाचं मूळ शोधण्यासाठी घरदार सोडणाऱ्या सिद्धार्थाची, युद्ध जिंकल्यावर शोक करणाऱ्या अशोकाची, दुसऱ्यांच्या मुक्तीसाठी सुळावर जाणाऱ्या येशू ख्रिस्ताची, प्रेमदिवाण्या मीरेची, मोगल महालात राहून कृष्णाला पुजणाऱ्या जोधेची व तिच्यावरील अकबराच्या प्रेमाची, बायकोवरील प्रेमासाठी डोंगर खोदून रस्ता बनविणाऱ्या दशरथ माझीची, शेजारच्या लेकरांना आपलं मानणाऱ्या आयाबायांची, कोणत्याही बाहुबलाला लाजवणाऱ्या हिरकणीच्या मनोबलाची.. जमेल त्या सूर-तालात, गद्य-पद्यात, चाचरत्या, खडय़ा बोलात प्रेम, आशा, सूर्यप्रकाश यांच्या गोष्टी सांगायला काय हरकत आहे, मी म्हणतो.
wravindrarp@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ravindra rukmini pandharinath article author suppose hits atmosphere hatred bigotry revenge amy

ताज्या बातम्या