‘लोकरंग’ (२४ ऑक्टोबर) मधील ‘महानायक आणि आपण’ हा दत्तप्रसाद दाभोळकर आणि पंकज घाटे यांचा ‘सावरकरांच्या समाजधारणा ’ हे दोन्ही लेख वाचले. आपल्या फायद्यासाठी राजकारणी महापुरुषांना संकुचित चौकटीत जखडून ठेवतात. केवळ त्यांना सोयीचा असणारा महापुरुषांचा काही मर्यादित भागच जनसामान्यांपुढे वारंवार ठेवला जातो. त्यामुळे मूलत: व्यापक भूमिका असणारे महापुरुष एका ठरावीक वर्गाच्या, विचारधारेच्या किंवा पक्षाच्या दावणीला बांधले जातात. सावरकरांना केवळ आक्रमक हिंदुत्ववादी ठरविले गेल्याने त्यांचे जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, विज्ञानवाद, भाषाशुद्धीचे कार्य जनतेपुढे येतच नाही. देशाची फाळणी टाळण्यासाठी, अखंड हिंदुस्थानवाद्यांनी ठोस भूमिका का घेतली नाही, हाही प्रश्न आहेच. केवळ गांधींना फाळणीचे खलनायकत्व देण्यासाठीच हे सारे सुरू आहे. गांधीजींना मारून त्यांचे विचार मात्र मारता आलेले नाहीत. उलट जगभर गांधीविचार अभ्यासले जात आहेत. तेव्हा महात्मा गांधी, सावरकर यांना वस्तुनिष्ठपणे समजून घेण्याची गरज आहे.
– विवेक गुणवंतराव चव्हाण,




शहापूर, ठाणे
महानायकांच्या विचारांचे राजकारण नको
‘लोकरंग’ (२४ ऑक्टोबर) मधील दत्तप्रसाद दाभोळकर लिखित ‘महानायक आणि आपण’ हा सावरकरांवरील लेख वाचला. १९११ पर्यंतचे सुरुवातीचे सावरकर हे हिंदू-मुस्लीम एकतेचे समर्थक होते. त्याचे पुरावे म्हणून ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकात त्यांनी मुस्लीम एकतेचे गोडवे गायले आहेत; पण १९२४ नंतर अंदमानातून बाहेर पडल्यानंतर मात्र त्यांचे विचार पूर्णपणे १८० अंशांतून बरोबर उलट फिरले. ते मुस्लीमद्वेष्टे होऊन हिंदुत्ववादी झाले. म्हणूनच अंदमानात जाण्यापूर्वीचे सावरकर जर स्वातंत्र्यवीर असतील तर अंदमानातून बाहेर पडलेले सावरकर मात्र स्वातंत्र्याचे शत्रू होते, असे नाइलाजाने म्हणावेसे वाटते. त्यांचे संकुचित हिंदुत्व, गांधीजींबद्दल त्यांच्यासारख्या भाषाप्रभूने खालच्या पातळीत केलेली टीका आणि काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढय़ाला विरोध करण्याची वृत्ती पाहून प्र. के. अत्रे यांनी १४ सप्टेंबर १९४१च्या ‘नवयुग’मध्ये ‘सावरकर : स्वातंत्र्यवीर की स्वातंत्र्याचे शत्रू’ असा एक लेखही लिहिला होता.
‘विज्ञाननिष्ठ निबंध’, ‘क्ष किरणे’ ही त्यांची पुस्तके त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारी आहेत. जरी त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा हिंदुत्वाच्या संकुचित मर्यादेत बंदिस्त असला तरी त्यांनी लिहिलेले वैज्ञानिक विचार आपण नाकारू शकत नाही. सावरकरांचे वैज्ञानिक विचार खरंच विचारात घेण्यासारखे आहेत. पण जे सावरकरांना फक्त माफीवीर समजतात ते मात्र त्यांच्या वैज्ञानिक विचारांना मुकतात.
सावरकरांची वैज्ञानिक मांडणी ही जरी जातीयतेमुळे हिंदूंमध्ये माजलेल्या दुफळीला विरोध करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र व्हावे, या हिंदुत्वाच्या परिप्रेक्षात बंदिस्त असली तरी त्यांनी केलेली अंधश्रद्धांच्या विरोधातील कारणमीमांसा आपण नाकारू शकत नाही.
विरोधी माणसाचे विचार पटवून घ्यायचेच नाही असे जर आपले म्हणणे असेल तर सावरकरांचे अंध अनुयायी आणि स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे यात फरक तो काय? आपला सावरकरांच्या विचारांशी मतभेद असू शकतो इतपत ठीक आहे; पण त्यांनी जी वैज्ञानिक विचारसरणी मांडली आहे ती वाचल्यावर मर्यादित अर्थाने का होईना, पण सावरकरांच्या विचारातला तो भाग आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही, हे नक्की. तसेही त्यांच्या वैज्ञानिक विचारसरणीकडे दुर्लक्ष करून सावरकरभक्तांनी सावरकरांचा पराभव केलाच आहे. एकुणात काय तर नुसतेच महामानवांच्या विचारांचे सोयीचे राजकारण करून काहीही साध्य होणार नसते. उलट झालेच तर नुकसानच होते. कारण त्या महामानवाला आपण आपल्या पातळीवर आणून कुपमंडूक बनवत असतो.
– जगदीश काबरे, नवी मुंबई.
लेख संदर्भ.. २४ ऑक्टोबरच्या ‘लोकरंग’मधील ‘महानायक आणि आपण’ या दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या लेखात दयेच्या अर्जाविषयीचा संदर्भ मदन पाटील यांच्या ‘अकथित सावरकर’ या पुस्तकात असून, त्रावणकोर कोचीतल्या महाराजांविषयीचा संदर्भ द. न. गोखले यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य’ या पुस्तकात आहे.