scorecardresearch

पडसाद : औषधाचे कौतुक की जाहिरात?

आज भारतात १८ वर्षांची मिसरूड फुटलेली मुले ते ७०-८० वयाचे वयस्कर या गोळीचे ग्राहक आहेत.

‘पंचविशी व्हायग्राची!’ (लोकरंग, २७ मार्च) या लेखात एका औषधी गोळीची जन्मकथा मांडली आहे. हे औषध लैंगिक समस्या दूर करणारे असल्याने या औषधाचे गुणदोष तसेच त्यावेळचे समाजधुरीण आणि धर्ममरतडांच्या प्रतिक्रिया, या औषधाचा प्रचार आणि प्रसिद्धी इत्यादी घडामोडींची माहिती दिली आहे. पण गेली पंचवीस वर्षे लैंगिक समस्या निवारण करणाऱ्या तज्ज्ञांचे जे आक्षेप आहेत, त्याची दखल या लेखात घ्यायला हवी होती, जी घेतली गेलेली नाहीये. ही गोळी अमेरिकेत डॉक्टरांच्या लेखी चिठ्ठीशिवाय मिळत नाही. ही गोळी सतत घेऊ नये, तसेच ५० मिली पेक्षा अधिक मात्रेत घेऊ नये असे तज्ज्ञ सांगतात. आज भारतात १८ वर्षांची मिसरूड फुटलेली मुले ते ७०-८० वयाचे वयस्कर या गोळीचे ग्राहक आहेत. या गोळीमुळे लैंगिक समस्या आणि जीवनातील लैंगिकतेबद्दलची चर्चा सुरू झाली हे खरं; पण ही सुधारणा हिमनगाच्या दिसणाऱ्या टोकाएवढी आहे. एक तर आपल्याकडे रीतसर लैंगिक शिक्षण दिले जात नाही. सुशिक्षित वर्गातही योग्य माहितीचा अभाव दिसून येतो. तसेच विविध कारणांमुळे असलेल्या गैरसमजुतींचे दडपण. त्यामुळे एकुणात तिसऱ्या हिश्शापेक्षा जास्त स्त्रिया व पुरुषांचे वैवाहिक जीवन समस्याग्रस्त असल्याचे आढळते. अशी वस्तुस्थिती असताना या गोळीचे सर्व माध्यमांतून ‘क्रांतिकारी गोळी’ असे विशेषण लावून गोडवे गायले जात आहेत. पण त्याचवेळी या गोळीची औषध म्हणून जी काटेकोर माहिती द्यायला हवी, तिचा मात्र यात अभावच दिसून येतो.

यशवंत विसपुते, कोपरगाव, अहमदनगर

वैचारिक आदानप्रदान व्हावे!

‘निकड.. संवादाधिष्ठित समाजाची!’ (लोकरंग- २४ एप्रिल) हा डॉ. सदानंद मोरे यांचा लेख वाचला. वाचताना सद्य:स्थितीत काय चालले आहे याची दु:खद जाणीव झाली. एकेकाळी राज्यात व देशातही अनेक विषयांवर वैचारिक स्वरूपाच्या चर्चा होत. त्यात अभ्यासक, विचारवंत भाग घेत. वृत्तपत्रांतून त्याचे वृत्तान्त येत. भाषणे, व्याख्यानमाला, चर्चा, परिसंवाद या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असे. आता कुठल्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर वा विषयांवर चर्चा होतात का? आणि समजा झाल्या, तरी  सहभागी व्यक्तींकडून आपापल्या राजकीय फायद्यासाठी या चर्चामध्ये अनावश्यक आरडाओरडा आणि आक्रस्ताळीपणा केला जातो. संबंधित विषयांचा अभ्यास करण्याऐवजी टीव्ही चॅनेल्सवर ओरडून बोलणे सोपे असते. त्यातही जातपात, विचारसरणी, पक्ष अशी विभागणी झाल्याने मोकळी चर्चा अवघड असते. किमान आता तरी यासंदर्भात वैचारिक आदानप्रदान व्हावे व त्यातून चांगले वातावरण निर्माण व्हावे, ही अपेक्षा आहे.

 प्र. मु. काळे, सातपूर, नाशिक

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Readers reaction on lokrang article zws 70

ताज्या बातम्या