‘लोकरंग’मधील (७ नोव्हेंबर) डॉ. मंगला आठलेकर यांचा ‘पुरस्कार अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी’ हे परखड नेत्रांजनी लेखन वाचले. ‘राजकारणी लोकांनी मिरवण्यापलीकडे रस घेतला नाही आणि साहित्यिक राजकारण खेळू लागले’ हे बोचरे सत्य खूप काही सांगून जाते.  ‘आम्ही उपकृत करतो, तुम्ही आश्रितासारखे गांडुळी, कणाहीन जीवन जगा!’ असे नकळत बिंबवले जात आहे. कोणताही पुरस्कार मिळविण्यासाठी मॅनेजरियल स्किल लागते हे प्रकाशाएवढे सत्य आहे. असो. शेवटी ‘कालाय तस्मै नम:’ हेच खरे!

मधुकर घारपुरे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

लेखाची दुसरी बाजू..

डॉ. मंगला आठलेकर यांचा ‘पुरस्कार अन् अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी’ या लेखाची दुसरी बाजू मांडणे आवश्यक आहे. त्यातील विवेचनाचा हा प्रतिवाद नव्हे, हे प्रारंभीच स्पष्ट करतो. ‘म. सा. प.च्या पुरस्काराच्या रकमेचा आकडा लाखाच्या घरात नसेल, तरीही तो खऱ्या अर्थाने लेखकाचा सन्मान आहे’ या विधानातील पूर्वार्धाची खरोखर काही आवश्यकता नव्हती. कोणत्याही पुरस्काराची रक्कम महत्त्वाची नसतेच.  लेखक हा लिहिताना एकटा आणि असामान्य असला तरी प्रतिभेचा संचार किंवा आवेश संपला की तो इतरांसारखाच संसारी, व्यवहारी असतो हे विसरून चालणार नाही. त्यालादेखील (आणि त्याच्या कुटुंबीयांनाही!) पुरस्काराच्या रकमेचा आकडय़ांचे अजिबात महत्त्व वाटत नसेल, हे म्हणणे वास्तवाला धरून होणार नाही. प्रकाशकाने देऊ केलेल्या रॉयल्टीची रक्कम त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या लेखनगुणांपेक्षा अधिक महत्त्वाची वाटणारच.

राहता राहिला मुद्दा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचा! त्याही बाबतीत परत तो सामान्य माणूस असतो, हेच लक्षात घ्या. त्याने सरकारी पुरस्कारासाठी अर्ज करावा, असे कुटुंबीय आणि प्रकाशक म्हणत असताना त्यांना दुखवून लेखकाने बाणेदारपणा दाखवावा, ही अपेक्षा अवास्तव नाही काय? डॉ. आठलेकर यांच्या भाषणातील ‘स्वत:विषयी साहित्यिकांचे भ्रम प्रथम दूर झाले पाहिजेत’ हेच विधान मी वेगळ्या परिप्रेक्ष्यातून मांडतो आहे. आगरकर, लोकहितवादी वगैरे असामान्यांची उदाहरणे देऊन सर्व लेखकांनी त्यांच्यासारखे व्हावे, हे म्हणणे बरोबर नाही. लेखनाला सुरुवात करताना आपल्या आत काय दडलेले आहे, ते कागदावर कितपत उमटणार, बाहेर येणार हे त्याला ठाऊक असतेच असे नाही. लिहिता लिहिता तो असामान्य निर्मितीच्या दिशेने जात असतो. स्वान्त: सुखाय चाललेल्या त्याच्या व्यवहाराला प्रकाशकाच्या साहाय्याने वाचकांसमोर येण्याची त्याची आस लेखन आकर्षक बनवण्याचा यत्न करत असते. पुरस्कार, साहित्य संमेलन आणि अगदी शेवटी अक्षर वाङ्मयात आपल्या लेखनाची गणना होणे हे सगळे स्वप्न खुणावत असते. या सगळ्यावर सामाजिक, राजकीय इ. वर्तमानाचेही सावट असते. त्यावर आपल्या मगदुराप्रमाणे तो कधी मात करतो, तर कधी त्याच्या दबावाखाली झुकतो. या धडपडीमागे भ्रमदेखील असतातच. त्याचे भ्रामक रूप त्यालाही हळूहळू कळत जाते. याकडे सहानुभूतीने पाहिले पाहिजे हे मला सांगायचे आहे. मी लेखक किंवा समीक्षक नाही, पण सहृदय वाचक म्हणून मला झालेले हे आकलन मांडले, एवढेच!

गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर, मुंबई

हिंदूंच्या परंपरांनाच विरोध का?

‘लोकरंग’मधील (७ नोव्हेंबर) ‘तुम बिलकूल हम जैसे निकले..’ हा लेख वाचला. त्यात म्हटले आहे त्याप्रमाणे धार्मिक कट्टरता अयोग्यच! पण आपल्या देशात नेहरूयुगापासून जो मुस्लीम लांगूलचालनाचा प्रकार चालू आहे आणि पर्यायाने हिंदूंची गळचेपी होत आहे तीही अयोग्यच म्हणावी लागेल. प्रत्येक भाषा परभाषीय शब्दांचा स्वीकार करून समृद्ध होत असते. त्यामुळे ‘आंबा बर्फी’सारख्या शब्दांना विरोध हा अतिरेकच म्हणावा लागेल. पण तथाकथित पुरोगामी (अगदी स्व. दाभोलकरही) हिंदूंच्या परंपरांना विरोध करतात; पण अशाच इतरधर्मीयांच्या  अंधश्रद्धेबद्दल चकार शब्द काढत नाहीत, हा हिंदू धर्मावर अन्याय नाही काय? संस्कृत शिक्षणाला विरोध करणारे मदरशांबद्दल मूग गिळून बसतात, हे योग्य आहे काय? त्यामुळे आपल्या सनातन हिंदू धर्माचे रक्षण करणे आवश्यक आहे, हेही मान्य व्हावे. पण त्याबाबतीत अतिरेकही नसावा.                                                                                                                                               

रमेश नारायण वेदक                                                  

फक्त एका बाजूची मांडणी

गेल्या काही वर्षांपासून मी ‘लोकसत्ता’चा नियमित वाचक आहे आणि या काळातील माझे निरीक्षण असे आहे की, ‘लोकसत्ता’ फक्त एकच बाजू मांडतो. सध्या चालू असलेलं ‘जश्न-ए-रिवाज आणि टिकली प्रकरण’ यासंबंधी विरोधी बाजूची मतंही मांडायला जागा दिली. अगदी समोरच्या बाजूची ‘टिकली एवढी अक्कल’ या भाषेलाही जागा दिली गेली. परंतु हा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांचं म्हणणं नेमकं काय हे आधी पाहायला नको का? जेणेकरून दोन्ही बाजू समजून घेऊन आम्हा सामान्य लोकांना कुणाबरोबर उभे राहायचे हे ठरवता येईल.

तुषार गायकर, नवी मुंबई</strong>