सोनल धर्माधिकारी
बेंगळूरु येथील श्रुती साह आणि हर्ष स्नेहांशू या तरुणांनी तीन वर्षांपूर्वी तिथल्या ‘कबन पार्क’ या परिसरामध्ये वाचनकेंद्री उपक्रम राबवला. त्याला ‘कबन रीड्स’ असे नाव दिले. त्यानंतर जगातील तब्बल ७२ शहरे या उपक्रमाने जोडली गेली. बेंगळूरु या शहरापुरताच तो राहिला नाही. मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, कोची, गोवा, अहमदाबाद, सुरत, विजयवाडा, अहमदाबाद, पुद्दूचेरी, श्रीनगर, कटक, नागपूर, गुवाहाटी, शिलाँग, जयपूर आदी शहरांपासून गोव्यातदेखील तो सुरू झाला. क्वालालंपूर, अॅम्स्टरडॅम, मेलबर्न, लंडन, दुबई, पॅरिस, जोहान्सबर्ग, सिएटल, बोस्टन, न्यू यॉर्क या शहरांतही हा जागेच्या नावासह ‘रीड्स’ जोडणारा ग्रंथप्रेमींचा कट्टा आता फोफावतोय. ‘जेनझी’ पिढीलाही वाचनात सहभागी करून घेणाऱ्या नव्या वाचनवाटांसह वेगवेगळ्या स्थानिक पुढाकाराविषयी…
म्हणजे फक्त पुस्तक आणि वाचक यांचा आपापसात असलेला एकांत. पुस्तक कागदाचे असो, ई-रीडरवरचे किंवा ऑडिओ बुक, वाचक आपल्या आजूबाजूच्या दुनियेला विसरून त्यात हरवून जातो. वाचन होता होता मग त्यावर आपसूक विचार, चिंतन आणि अखेर जाणीव निर्माण होते. पण हे सगळे घडायला मुळात आधी फक्त वाचनासाठी म्हणून एक हक्काचा कोपरा लागतो. केवळ जागेचाच नाही, तर वेळेचा आणि वातावरणाचा एक पूरक अवकाश. असा हा हक्काचा वाचन अवकाश एकत्र येऊन घडवण्याचे व्रत म्हणजे ‘पुणे रीड्स’ हा सायलेंट रीडिंग उपक्रम.
२०२३ साली साधारण वर्षाच्या सुरुवातीला बेंगळूरु येथे हर्ष आणि श्रुती या दोघांनी हा उपक्रम पहिल्यांदा राबवला. तेथील ‘कबन पार्क’ या भव्य बोटॅनिकल गार्डनमध्ये ते अनेकदा जात असत. तिथल्या शांत आणि मोकळ्या वातावरणात वाचनाची अगदी तंद्री लागते हे त्यांना लक्षात आले. म्हणून इन्स्टाग्राम या समाजमध्यमावरून इतर वाचकांना देखील या विकांती वाचनासाठी येण्याचे त्यांनी आवाहन केले. बघता बघता दहाचे शंभर वाचक कधी झाले, कळलेदेखील नाही! या उपक्रमाचे यश समाजमाध्यमांत ‘व्हायरल’ झाले आणि प्रत्येक शहरातील उत्साही वाचकांनी हर्ष आणि श्रुतीशी संपर्क साधून, आपापल्या शहरात हा उपक्रम करण्याची तयारी दाखवली. त्या दोघांनी सगळ्यांना प्रोत्साहन देत, आपापल्या शहराचे नाव आणि पुढे ‘रीड्स’ हा शब्द जोडून स्वतंत्रपणे उपक्रम राबवायला प्रेरणा दिली. पुण्यात हा उपक्रम सुरू करण्याची तयारी अदिती चौहान, अदिती कापडी आणि मी दाखवली. एरंडवणे भागातील कमला नेहरू पार्क ही बाग सर्वांच्या सोयीने ठरली. मे महिना संपता संपता ‘पुणे रीड्स’ची सुरुवात झाली.
‘सायलेंट रीडिंग’ म्हणजे ठरलेल्या वेळेत आपापले पुस्तक घेऊन शांतपणे, चर्चा न करता, केवळ वाचन करणे. एखाद्या ग्रंथालयात जसे वाचन होते त्याप्रमाणेच. परंतु सध्या ग्रंथालयांची संख्या कमी होत चालली आहे. अनेकांना घरी सोयीची जागा किंवा वाचनासाठीची शांतता- एकाग्रता मिळत नाही. शिवाय कॅफे, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी वाचायचे झाल्यास पैसे मोजावे लागतात. या उपक्रमाच्या काही मूलभूत विचारांपैकी एक म्हणजे, प्रत्येकाला वाचनासाठी शांत, मोकळ्या आणि मोफत अशा सार्वजनिक ठिकाणी जागा मिळणे. पुस्तकदेखील आपले आपणच आणायचे असते.
तशा अर्थी यात कोणतीही अधिकची आर्थिक गुंतवणूक नाही. ठरलेल्या वेळेत, म्हणजेच प्रत्येक शनिवारी सकाळी ८ ते ११ या तीन तासात कधीही यावे, बसून वाचावे आणि कधीही निघावे, असे अनौपचारिक स्वरूप. कोणतीही नोंदणी, शुल्क किंवा वाचनाच्या बाबतीत बंधन नाही. दहा मिनिटे वाचा किंवा सलग तीन तास… वाचन हीच एक मुख्य अट! जाणीवपूर्वक असे स्वरूप ठेवण्यामागे विचार हाच आहे, की ज्यांना वाचनाची आवड आहे, पण वेळ नाही… सवय होती, पण सुटली आहे. किंवा नव्याने वाचनाची सवय हळूहळू निर्माण करायची आहे त्यांना ते सहज शक्य व्हावे. शुल्क, प्रवेश किंवा इतर अडचणींमुळे कोणीही परावृत्त होऊ नये.
याचा अनुभव गेली दोन वर्षं सलग, प्रत्येक शनिवारी सकाळी आम्हाला आला आहे. ऊन असो किंवा पाऊस, एकही शनिवार न चुकवता, किमान पंधरा- वीस वाचक येऊ लागले आणि येतच राहिले. कधी हा आकडा चाळीस -पंचेचाळीसपर्यंत पोहोचला! पण या उपक्रमाचे यश अशा आकड्यांमध्ये मोजण्यासारखे नाही. प्रत्येक वेळी किमान एक तरी वाचक मला इथे येऊन खूप आनंद झाला, असे म्हणतो. त्या भावनेत सारे यश सामावले आहे.
एकट्याने, पण समूहात एकत्र येऊन वाचन करणे हा या उपक्रमाचा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच याला ‘बुक क्लब’ न म्हणता आम्ही ‘रीडिंग कम्युनिटी’ म्हणतो. आधी एकाग्र चित्ताने आपापला वाचनाचा आनंद घेता येतो. मग इतरांची नवनवीन पुस्तके कळत जातात. त्यावर नंतर स्वतंत्रपणे भेटून चर्चा होते. त्यातून समविचारी मित्र मिळतात, हा प्रवास आम्ही अनुभवला आहे.
एकेकटे वाचताना आपल्याला आवडेल फक्त तेवढेच आपण वाचत राहतो; परंतु इथे आजूबाजूला आपल्यासारखीच चोखंदळ मंडळी काय वाचताहेत हे कळते. त्यामुळे पुस्तकांचे नवे पर्याय सुचत जातात. आपल्याच आजूबाजूला माझ्यासारखे वाचणारे कितीतरी आहेत, मी एकटा/ एकटी नाही, हेच बघून इथल्या प्रत्येकाला आनंद होतो. ज्यांनी आयुष्यभर ग्रंथसमृद्ध वातावरण अनुभवले अशांना हे आश्चर्याचे वाटते. पण आपल्यासारखी ग्रंथांची आवड-निवड असलेला समाज, समूह प्रत्येकाला आपोआप लाभतोच असे नाही. वाचनाच्या बाबतीत तो मिळावा म्हणून आम्ही ‘पुणे रीड्स’ची आयोजक मंडळी नेहमीच आग्रही आहोत.
‘रीड्स’ उपक्रम आज जगभर अनेक शहरांत पसरलाय. पुण्यातून उठून वाचक जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तिथेही एक रीडिंग कम्युनिटी त्याला आपलेसे करायला सज्ज असेल. हा परिवार असाच नेहमी वाढत राहो, आपल्यातल्या वाचकाशी आमची लवकरच भेट होवो हीच इच्छा.
पुण्या-मुंबईतील मार्ग….
मोबाइल हा आपण कितीतरी वेळा अनावश्यक गोष्टींसाठी पाहतो. त्याचा वापर हाती आहे म्हणून, खिशात विसावलाय म्हणून येणाऱ्या सततच्या ‘नोटिफिकेशन्स’ना पडताळण्यासाठी होतो. नव्वद टक्क्यांहून अधिक काळ त्या अत्यावश्यक नसतातच. तरीही आपल्याला व्यसन लागल्यासारखे तो आपण हाताळतो. याची जाणीव करून देण्यासाठीच मुंबईत ‘वांद्रे ड्स, जुहू रीड्स, पवई रीड्स , संजय गांधी नॅशनल पार्क (एसजीएनपी) रीड्स, दक्षिण मुंबईतील (साऊथ मुंबई) सोबो रीड्स हे उपक्रम बेंगळूरुमधील ‘कबन रीड्स’च्या धर्तीवर सुरू झाले.
दक्षिण मुंबईतील टाटा गार्डन येथे दिवंगत उद्याोगपती रतन टाटा आणि तरुण पुस्तकप्रेमी शंतनू नायडू यांच्या पुढाकाराने आठवड्याअखेरीस भरणाऱ्या वाचन सोहळ्यांमध्ये ग्रंथासमवेत असलेल्या काळात मोबाइल बंद ठेवणे ही नोंदणीपूर्व अट असते. या पार्कमधील वाचनात एकाच विषयावर वाचणाऱ्यांमध्ये मैत्री आणि पुस्तकलेखकांच्या नावांचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणावर होते. समाजमाध्यमावर ‘वाचनवेडा’ हा पुस्तकप्रेमींचा कट्टा बनविणारा अभिनेता विनम्र भाबल तसेच कोथरूडमधील डहाणूकर कॉलनीमधील ‘पुस्तकविश्व’चे नवनाथ जगताप हे पुण्यामधील पार्कांमध्ये वाचनविषयक उपक्रम वर्षभर राबवितात. मोहिनी आणि सतीश खोत यांनी २००१ पासून ‘पुणे बुक क्लब’ सुरू केला. आता ‘झुम कॉल’सह विविध देशांतील वाचकांशी जोडला गेला. महिन्यातील दोन रविवार दुपारी तो ऑनलाइन भरतो. याच आठवड्यात या उपक्रमाने पंचवीस वर्षे पूर्ण केली.
sonal.dharma@gmail.com
