‘लोकरंग’मधील ‘नव्या वाचनवाटा’ (७ डिसेंबर) अंतर्गत ‘कोलाहलवजा ग्रंथसंगत’ हा चिन्मय गवाणकर यांचा लेख वाचला आणि मनाला भुरळ पडली. कारण आज वाचनसंस्कृती लोप पावत आहे अशी भावना व्यक्त होत आहे. ‘वाचनयज्ञ’ अविरत सुरू आहे हे वाचून मला खूप आनंद झाला. ‘वाचाल तर वाचाल’ या घोषवाक्याची विरार वसईकरांनी चांगलीच नोंद घेतली आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक न दिसता मोबाइल दिसतात. परंतु अशा उपक्रमामुळे मोबाइलचे महत्त्व कमी होऊन पुस्तकांचे महत्त्व वाढेल.
मोबाइलच्या अतिवापरामुळे पुढीच्या पिढीचे डोळे आणि मेंदू यावर मोबाइलमुळे वाईट परिणाम होऊ शकतो, असे एका सर्वेक्षणात सांगितले आहे. हे टाळण्यासाठी वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे साठ वर्षांच्या आजी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीसाठी शिकत आहेत ही खरोखरच कौतुक करण्याची बाब आहे. वाचनसंस्कृती टिकली तरच देशाचे भवितव्य चांगले घडू शकेल.
- उज्ज्वला मालाडकर
आजोबांची आठवण झाली
‘लोकरंग’मधील (२३ नोव्हेंबर) गिरीश कुबेर यांच्या ‘स्नेहचित्रे… अन्यथा’ या सदरातील ‘ती. रा. रा.’ हा लेख वाचताना जुन्या सातारा भागातून फेरफटका मारत आहोत असेच वाटले. आता खूप बदल झाले आहेत. लेखाच्या सुरुवातीपासूनच लेखकाचा देव यांच्याशी काय संबंध असेल हा विचार मनात घोळत असताना लेखाच्या शेवटी त्याचे उत्तर मिळाले. हा लेख एकदम भारी वाटला. लेख वाचून मलाही माझ्या आजोबांची आठवण झाली. बहुतेक असे आजी-आजोबा असणे आणि त्यांचे तसे प्रेम मिळणे ही आताची शेवटची पिढी असेल. या सदरातील आधीचेही आर. आर. पाटील, पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश आमटे, मनोहर पर्रिकर, काकोडकर, गोविंदराव तळवलकर, सरदेसाई या सगळ्या महान व्यक्तींचे व्यक्तिचित्रण खूप छान पद्धतीने मांडले आहे.
- शरद पवार, सातारा
