निखिलेश चित्रे
आपण जेव्हा सातत्याने लिहीत जातो, तेव्हा आपल्याला त्यातल्या खाचाखोचा कळत जातात. लिहिण्याची पूर्वअट म्हणजे वाचन आहे, हे मी मुद्दाम इथे अधोरेखित करू इच्छितो. न वाचलेला लेखक किंवा न वाचून मोठा झालेला लेखक ही गोष्ट जगातल्या फक्त एकाच भाषेत शक्य आहे, ती म्हणजे मराठी. त्याव्यतिरिक्त जगात कोणतीही अशी भाषा नाही, ज्यामध्ये लेखक वाचत नाही आणि तो मोठा लेखक म्हणून मान्यता पावू शकतो. जेव्हा आपण चौफेर वाचत जातो तेव्हा आपल्याला लक्षात येते की आपण चाकाचा दुसऱ्यांदा शोध लावायला जात नाही. आपल्याला कळते की आपण काहीतरी लिहू पाहतोय. भन्नाट सुचलेले असते, पण आपल्याला माहिती असते की हे याहून चांगले आधी कुणीतरी लिहून ठेवले आहे. त्यामुळे ते तशा प्रकारे न लिहिता वेगळ्या प्रकारे लिहिण्याची आपली सवय हळूहळू तयार होते.
वाचनामुळे तुम्हाला लेखनाचे विशिष्ट भान येते. तुमची जाणीव लेखनाच्या अंगाने विकसित होत जाते. आपण ज्या भाषेत आणि परंपरेत लेखन करतो, त्यांचे भान तुमच्यात आपोआप रुजत जाते. ‘वाचते लेखक’ होणे किंवा असणे हे त्यासाठी आवश्यक आहे. ही बोलून दाखवायची गरज नाही, इतकी सहज गोष्ट आहे. जो दुसऱ्याचे वाचत नाही, त्याने आपले कुणी वाचेल अशी अपेक्षाही करू नये. वाचन तुम्ही पचवलेत, तर तुमच्या पद्धतीने ते कसेही व्यक्त करू शकता. कुणी डायरी लिहील, कुणी निबंध-कथा लेख. कुणी रोजच्या जगण्यातल्या प्रसंगावर सादर होईल. अशा लिहिण्यातूनच स्वत:चे लेखनाचे मार्ग सापडत जाऊ शकतात. सिनेमा समीक्षण मी सातत्याने नाही लिहिले. तेव्हा सिनेमाची असोशी होती. निकड वाटत गेली तेव्हा त्यावर लिहीत गेलो. आपल्याला आवडलेल्या चित्रपटांबद्दल आपल्या परिचितांना, आप्तांना, आपल्या भाषेतील वाचकांना कळविण्याची गरज म्हणून त्यावर लिहिले. पुढे असा एक टप्पा आला की अकथनात्मक लेखनापेक्षा वेगळे सांगावेसे वाटायला लागले. काही प्रतिमा जाणिवेत तीव्रतेने प्रतीत व्हायला लागल्या. स्वप्न आणि वास्तव यांतील अनुभवांची सरमिसळ व्हायला लागली. मग स्वप्न आणि वास्तव यांच्या सीमेवरच्या आठवणींचा वापर आपण कथेत केला तर काय होईल, हे पडताळून पाहताना मी कथा लिहू लागलो. त्यात मला मजा यायला लागली. म्हणून मी एक सूत्र, पात्रांचा अवकाश घेऊन गोष्टी लिहिल्या.
