scorecardresearch

Premium

पुनर्वसनाच्या कळा

भूकंपाआधी प्रत्येक घरातील बाई स्वयंपाक आटोपून १२-१ वाजता शेताला जायची. नव्या गावापासून शेतं दहा-बारा कि.मी. अंतरावर गेल्यामुळे आता कोणीही शेतात जाऊ शकत नाही.’’

life in killari after thirty years of earthquake
२०२३ मधील किल्लारीतील घरं व गल्ली

अतुल देऊळगावकर

किल्लारीचा भूकंप ही संपूर्ण जगासाठी आणि भारतासाठी पहिली लक्षवेधी आपत्ती होती. त्याआधी अशा संकटांमध्ये शासन केवळ मदत करी. पण शासन थेट पुनर्वसनात उतरण्याची ती पहिलीच घटना होती. या अनुभवानंतर आपत्तींच्या बाबतीत देशातील प्रशासन यंत्रणा अधिक गंभीर आणि कार्यक्षम बनली. आपत्ती व्यवस्थापनासाठी ही दुर्घटना वळणबिंदू ठरली. आज तीस वर्षांनंतर हा पुनर्वसित भाग आणि तिथल्या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाची स्थिती काय आहे?

navi mumbai water supply, navi mumbai municipal corporation no control on water distribution, water intake from morbe dam
नवी मुंबई : मोरबे धरणातून पाण्याचा वारेमाप उपसा अन् मनमानी वितरणामुळे पालिकेचे जल नियोजन विस्कळीत
real estate agents, agricultural lands in uran, farmers in uran, agents forcing farmers to sell land in uran
उरणच्या शेतजमिनीवर दलालांचा डोळा, शिवडी-न्हावाशेवा पूल, नव्या रेल्वेमुळे जमीन विक्रीला जोर
Tirgrahi Yog 2023 in Kanya
येत्या दोन दिवसात त्रिग्रही योग बनल्याने ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? सूर्य-बुध-मंगळदेवाच्या कृपने वाढू शकतो बँक बॅलन्स
Guru And Rahu Yuti
३० ऑक्टोबरपासून सिंहसह ‘या’ राशींना मिळेल अपार धन? राहू अन् गुरुची अशुभ युती संपल्याने येऊ शकतात सुखाचे दिवस

 ‘‘आपत्ती हा आपला दृष्टिकोन व्यापक करण्यासाठीचा संकेत आहे. अन्यथा आपण सदैव फुटकळ बाबींमध्येच गुंतून राहत असतो.’’ – पंडित जवाहरलाल नेहरू

‘‘म्हनाया गेलं तर नगाला नग बराबर हाय. कवा बी वाटलं नव्हतं, येवडं घरात हाय. गाव बी मोटंलट झालंय. पर कशातबी जीव लागंना. अजूकबी घर आपलं वाटंना. आपलं सोताचं घर असून त्ये काही जीव लावंना. भाइर गेलं तर गाव बी येगळंच वाटतंया. आपलं वाटंना. काय तर हरपलंय. कसं सांगावं? गावातबी करमंना. येकूनमेकांशी भेटनं-बोलनं हुईना. आदी भांडनं ऱ्हायचे. श्या द्याचे. पर श्यानपन सांगनारेबी व्हते, आयकनारेबी व्हते. इसरनारे व्हते. समद्या परकारचे मानसं व्हते. पर त्ये गावपन व्हतं. गनगोत समदं आपलं हाय, जीव लावत्येत. पारावर बसा, देवळात बसा, कुटं बी बसा, मानसं दिसत व्हती. जाताळा येताळा धा-वीस मानसावांशी बोलल्याबगर म्होरं जात येत नव्हतं. कुनाचं कसं चाललंय, काय नड हाय समजित व्हतं. उदार-उसनं घ्येवं. पुना जमंल तसं द्येवं. असलं चालत व्हतं. पर आता नीट शेरावाणी जालंय. कुनाला बी टैम न्हायी. बोलाया येळ न्हायी. जवानकवा त्ये मोबायल! अडीअडचन बोलाया यीना. कुनी गेलं तरबी समजंना. गावात लैट हाय. टीवी हाय. रसता हाय. पर समदं काय असून आपलं नसल्यावानी वाटत ऱ्हातंय. कायबी मना, गाव गावंच वाटंना गेलंय.’’

हेही वाचा >>> दुष्काळाआधीची चिंता..

भूकंपग्रस्त गावातील मध्यमवयीन आणि वृद्धांच्या मनातील भावना अशीच आहे. त्यांना आपलं घरच आपलं वाटत नाही. आपलं गाव परक्यासारखं व अनोळखी वाटतंय. तीस वर्षांपूर्वी आलेल्या भूकंपानंतर केलेल्या ‘पुनर्वसना’तून तयार केलेल्या वस्तींनी सुमारे बावीस हजार घरांना आतून तुटलेपणा दिला आहे.

किल्लारीतील संगीता भोसले यांचे पती संजय व धाकटी मुलगी शोभा भूकंपात दगावले. त्या स्वत: दहा फूट मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या होत्या. चार महिने सोलापुरातील जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यावर त्यांना काठी घेऊन चालणं शक्य झालं. त्यानंतर त्यांच्या हक्काची जमिनीतील वाटणी मिळू नये यासाठी सासरकडून तऱ्हतऱ्हेचे अडथळे चालू झाले. भाऊबंदकीतील दमदाटी आणि धमक्यांनी बेजार पंचवीस वर्षांच्या संगीताबाईंनी माहेर गाठलं. लातूरच्या ‘नारी प्रबोधन मंच’ संस्थेने त्यांना शिवणयंत्र घेऊन दिलं. त्यामुळे त्यांनी शिवणकाम करत दीड वर्षांच्या संजयला वाढवलं. तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने खेटे घालून तीन वर्षांनंतर घराचा तर वीस वर्ष उलटल्यावर तीन एकर जमिनीचा ताबा मिळवला. त्यांचं घर हा भिकार बांधकामाचा नमुना आहे. ‘वन बेडरूम- किचन’ धाटणीच्या खोल्यांच्या छताचं काँक्रीट निघून गेल्यानं सळय़ा उघडय़ा पडल्या आणि गंजून गेल्या आहेत. पावसाळय़ात छताखाली प्लास्टिक धरायचं आणि त्याखाली टोपल्या व बादल्यात पाणी गोळा करायचं, असा खटाटोप करत जगावं लागतंय. (किल्लारीतील बांधकामाचा ‘दर्जा’ असाच होता. हे बांधकाम करतानाच गावकरी वेळोवेळी लक्षात आणून देत होते. ‘गुणवत्ता नियंत्रण- क्वालिटी कंट्रोल’ करणारे प्रशासन व कंत्राटदार यांच्यातील नातं ‘मधुर’ होतं. किल्लारीच नव्हे तर अनेक गावांत अशी अवस्था आहे.) संजय उत्तम शेती करतो. त्यामुळे त्याला मुली सांगून येत नव्हत्या. आता वयाची बत्तीशी गाठल्यावर त्याचं लग्न ठरलं तेव्हा घराची जमेल तेवढी डागडुजी चालू केली आहे. नवीन गावाबद्दल त्या म्हणतात, ‘‘आदी गावात समदे एकुनमेकांला भेटत व्हते. आता शेजारी येगळेच. गाव लइच मोटं जालं. मानसं भेटनं कटीन. शहरावानी समदे सदान् कदा दारं लावून बसतेत. कुनी उसनं मागंना. देनंघेनं नाय न् कायबी नाय. तेच्यानं मनं फाकत गेलेत. कोनीबी कुनाला इचारना, पुसंना. समदे आपल्याच नादात. बोलायचं जालं तर मोबाइल.’’

वीस वर्षांपासून द्राक्षबागेत छाटणी, खुरपणी, वेचणी अशी कामे करणाऱ्या सुनीता बाभळसुरे म्हणाल्या, ‘‘शेत गाठायचं म्हनलं तर जायला ईस रुपये आन् यायलाबी तेवडेच. मालकाला हा खरचं उचलावा लागतो.’’ शेतमजूर सरूबाई हुरमुंजे सांगतात, ‘‘अदुगर समदं गाव पायी चलता येत व्हतं. दवाखाना, शाळा कुटंबी जाता येत व्हतं. आता फटफटी नसता रिक्शा असल्याबिगर भागत नाही. गावात राहून बी गाटीभेटी न्हाइत.’’

चाळीस वर्षांपासून द्राक्षाची बाग सांभाळणाऱ्या कर्तबगार शेतकरी कांताबाई सावंत म्हणाल्या, ‘‘भूकंपाआधी प्रत्येक घरातील बाई स्वयंपाक आटोपून १२-१ वाजता शेताला जायची. नव्या गावापासून शेतं दहा-बारा कि.मी. अंतरावर गेल्यामुळे आता कोणीही शेतात जाऊ शकत नाही.’’

हेही वाचा >>> उद्योग यशोगाथेचे अल्पसंख्य लाभार्थी..

जगभरातील अनेक स्थलांतरितांना नवीन ठिकाणी येऊन पडल्यावर जुन्या खुणा न दिसण्यामुळे यातना होतात. किल्लारी परिसरातील भूकंप पुनर्वसितदेखील तशाच वेदना सहन करत आहेत. जुन्या घरातील व गावातील स्पेस ही वर्षांनुवर्षे त्यांच्या सवयीची होती. त्या स्पेसमध्ये सुरक्षित ऊब होती. त्या घराशी व गावाशी जडलेलं जैविक व भावनिक नातं हा त्यांच्या जगण्याचा आधार होता. तो एकाएकी निखळून पडला. त्यांना नवीन घरातील स्पेस आपलीशी वाटत नाही आणि घराबाहेर पडल्यावर एका नजरेत दिसणारं गाव गायब होऊन तिथे दिसणारी ‘कॉलनी’ खुपत राहते. घरोब्याची व जवळिकीची नाती राहिली नाहीत, हे मनात सलत राहतंय. त्यांची अशा नव्या जगाशी नाळ जुळतच नाही. सामाजिक जीवन अनेकांना अस्वस्थ करतंय, हे पाहणाऱ्याला सतत जाणवत राहतं. हे सारं त्यांना व्यक्त करता येत नाही, मात्र त्यांची जैविक लय (बायो ऱ्हिदम) बिघडल्याची बेचैनी दिसते.

सास्तुरची अवस्थाही अशीच आहे. तिथले सामाजिक कार्यकर्ते दिवंगत असिफ मुल्ला ‘मन:स्थिती’ कवितेत म्हणतात,

ना चैतन्य मनाला,

ना राहिली श्रमशक्ती,

उरली फक्त

उद्ध्वस्त मन:स्थिती

हे पाहताना वास्तुतत्त्वज्ञ लॉरी बेकर यांचा आर्जवी आग्रह आठवत होता, ‘‘फुलांच्या पाकळय़ा उलगडत जाव्यात तसं गाव फुलत जातं. घरांची व गावाची रचना ही शेतीसंस्कृतीला साजेशीच असणं आवश्यक आहे.’’ तसं केलं नाही तर..

शासनानं, किल्लारी गावाची रचना करताना एक हजार गाळे असणारं व्यापारी संकुल बांधून दिलं. तिथे कोणीही दुकान वा सेवा व्यवसाय चालवत नाही. ते ओकंबोकं दिसतं. सगळी दुकानं रस्त्याच्या बाजूला आली. अतिक्रमण हाच जणू इथला रिवाज झाला आहे.

पंचाहत्तरीतील ज्येष्ठ डॉ. अशोक पोतदार सांगतात, ‘‘याच किल्लारीमध्ये शिक्षक, बँक कर्मचारी, व्यापारी व शेतकरी सगळे एकत्र येऊन गणेशोत्सवात व्याख्यानं व नाटकांचं आयोजन करत. शेतीतील नव्या प्रयोगांसाठी शिबिरं होत. शेतीवर आधारलेल्या सेवा व व्यापार होता. तो पायाच ढासळून गेला. तरुण मुलांना शेतीत काम करायची लाज वाटते आणि नोकरी मिळत नाही. त्यामुळे तरुणांची ऊर्जा ही नको तिथं वाया जात आहे. व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलं आहे. प्रत्येक घरात निदान एक तरी मोटारसायकल आहे. शेतात मजुरांना ने-आण करावी आणि फावल्या वेळात पान व चहाच्या टपऱ्यांवर चकाटय़ा पिटत बसावं, असा असंख्य तरुणांचा दिनक्रम आहे. बाकी, ‘टाइमपास’ करण्यासाठी हातात मोबाइल असतोच. मैदानाऐवजी ‘पबजी’ व ‘टिकटॉक’सारखे खेळ सर्रास चालू असतात. परिणामी आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. तरुणांमध्ये कर्करोगाचं प्रमाण लक्षणीय आहे.’’

किल्लारीत गेल्यावर नजरेत भरतात त्या ठिकठिकाणी चाललेल्या पानटपऱ्या! ‘बत्तीस हजार लोकसंख्येच्या किल्लारीत सुमारे नऊशे पानटपऱ्यांतून दररोज साडेतीन ते चार लाख रुपयांची सुपारीची विक्री होत असावी,’ असा अनेक जणांचा अंदाज आहे. जुन्या गावात एकच परवानाधारक मद्यविक्री हॉटेल होते. आता त्यांची संख्या चौदा झाली असून देशी मद्य विकणारी अधिकृत दुकाने तीन आहेत.

ऐंशीव्या वर्षीही उत्साहाने डोळय़ात तेल घालून द्राक्षाची प्रत्येक वेल जपणारे भानुदास सावंत म्हणतात, ‘‘भूकंपाआधी म्हातारे देवळात व तरणे शेतात असायचे. आता उलट अवस्था झालीय. म्हातारे शेतात अन् तरुण सप्ताहात – देवळात असतात. एक-दोन देवळं होती तिथं आता पंधरा झाली. सगळय़ा जातींची देवळं तयार झाली. कीर्तन-भजनं वाढली. त्यावरचा खर्चही वाढला. वीस-तीस लाख खर्च होतात. खर्चाची स्पर्धा होते. कीर्तनकार फॉर्च्युनर गाडीनं तर कोणी विमानानं येतात. लाखांची मानधनं घेतात. झगमगाट मोठा होतो. त्यात आपलेपणा आणि भक्ती किती? असे प्रश्न पडतात.’’

कुठल्याही शहराप्रमाणे किल्लारी- सास्तूर- नारंगवाडी- कवठा या रस्त्याला खेटलेल्या मोठय़ा गावांत सण-समारंभांचा दणका वाढला आहे. बारसं, लग्न, डोहाळजेवण ते तेरावा कोणताही ‘इव्हेंट’ शहरी वळणाचा झाला आहे. त्यामुळे छायाचित्रण, रोषणाई, मंडप, कानफाडू ध्वनियंत्रणा, ब्युटी पार्लर व केशकर्तनालये आदी सेवांची तेजी चालू आहे.

हेही वाचा >>> आदर्श व्यक्ती, बुलंद गायिका

व्हंताळ गावचे ख्यातनाम लेखक डॉ. शेषराव मोहिते म्हणतात, ‘‘रस्त्यालगतच्या बाजारपेठी गावांत पैसा सहज खेळतो आणि तिथं पैशालाच मान असतो. किल्लारी-सास्तूर ही गावं आधीपासूनच बिलंदर होती. रस्त्यापासून दूर असलेल्या व शेतीवर अवलंबून असणाऱ्या गावांत लोकांना कष्ट करावेच लागतात.’’

एकूण भूकंपग्रस्त गावांपैकी मोजक्या गावांत उत्तम साहचर्य आहे, यावर विविध वयोगटांतील लोकांचं एकमत होतं. उमरगा तालुक्यातील व्हंताळ आणि औसा तालुक्यातील माळकोंडजी या गावांचं वेगळेपण न सांगताही सहज दिसून येतं.

व्हंताळ हे दीड हजार वस्तीचं गाव, आसपासच्या गावांना मजूर पुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध होतं. कष्ट हेच गावकऱ्यांचं भांडवल होतं. गरिबी हेच वरदान असणाऱ्या या गावात रस्तेसुद्धा धड नव्हते. १९९७ ला पुनर्वसनात घरं बांधून झाली. याच गावचे प्रा. दत्ता भोसले निवृत्तीनंतर कायमस्वरूपी वास्तव्यास आले. त्यांचे घनिष्ठ मित्र डॉ. मोहिते यांच्या चकरा नियमित होत्या. त्यामुळे ते गावकऱ्यांशी सतत संपर्कात होते. मुख्य म्हणजे गावकरीही त्यांच्या सल्ल्याचा मान ठेवत. या दोन प्राध्यापकांनी गावातील पोरांना पाठबळ देऊन ग्रामपंचायत तरुणांच्या ताब्यात दिली. या तरुणांनी येणाऱ्या विकासनिधीचा उत्तम वापर केला. सौरपटल लावून पथदिव्यांची सोय केली. प्रत्येक घरासाठी शोषखड्डा करून सांडपाणी जमिनीत मुरवलं. त्यामुळे डास गायब झाले व घरासभोवती परसबाग फोफावली. बचतगटांना प्रोत्साहन देऊन त्यांची संख्या वाढवली व घरोघर दुभती जनावरं आली. दोन दुग्धशाळा चालू करून गावातील दररोजचं दूध उत्पादन एक हजार लिटरवर नेलं. शेतातील कामे, विहीर असो वा रस्ता, सर्व कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर होतो. ही संधी पाहून तरुण ट्रॅक्टर घेऊ लागले. आजमितीला व्हंताळमध्ये चाळीस ट्रॅक्टर आहेत. रोजगारासाठी आसपासच्या गावांतील मजूर इकडे येतात. ग्रामपंचायतीचे सदस्य व ज्येष्ठ नागरिक मिळून विद्यालय व ग्रंथालयाकडे लक्ष देतात. मुलामुलींना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत करतात. तिथं व्यसनाधीनता नगण्य आहे.

‘माळात कोंडलेलं’ माळकोंडजी या साडेसतरा एकरावर वसलेल्या गावाला पुनर्वसनानंतर अडुसष्ट एकर जागा लाभली. ‘इफिकॉर’(द इव्हँजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया कमिशन ऑन रिलीफ) या संस्थेने या गावातील ३५८ घरं बांधून दिली. गावाचा आराखडा करताना सर्व गावकऱ्यांशी बोलून शेजारधर्म जपणारी रचना निवडली. आता या गावात ३६ चौक असून आतील रस्ते बैलगाडी व मोटारी जाऊ शकतील इतके मोठे झाले. प्रत्येक गल्लीला सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी जागा मिळाली. ‘इफिकॉर’ने रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली. पुढे गावकऱ्यांनी त्यात भर घातली. सध्या चारशे घरं व तीन हजार लोकसंख्या असलेल्या माळकोंडजीत सुमारे तीन हजार झाडं आहेत. त्यात आंबा, नारळ, चिंच, लिंबू, चिकू, गुलमोहर, कडुनिंब व पिंपळ आदी आहेत. घराला कुंपण व आतमध्ये अवजारे, धान्य ठेवण्यासाठी प्रशस्त जागा मिळाली. त्यामुळे गावकरी खूश आहेत. प्रत्येक घरात काळानुसार वाढ होत गेली.

हेही वाचा >>> अवघड काळावरचे सिनेमे नंतरच येतात..

‘जातिभेद अमंगळ’ हा वारकरी संप्रदायाचा वसा घराघरांतून जपल्यामुळे या गावात पूर्वीपासूनच जातीयतेला थारा नसल्याने एकोपा होता. तो पुढील पिढय़ांनीही जपला आहे. वडाच्या पारावर, ग्रामपंचायतीसमोर, ठिकठिकाणच्या कट्टय़ांवर गप्पा मारत बसलेले लोक पाहण्याचा दुर्मीळ आनंद इथे मिळतो.

लातूर नगर परिषदेच्या शिवछत्रपती ग्रंथालयाचे माजी ग्रंथपाल व ग्रंथालय प्रसार चळवळीचे खंदे कार्यकर्ते पांडुरंग अडसुळे हे याच गावचे आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे भूकंपग्रस्त परिसरात पाच ग्रंथालये निघाली. माळकोंडजीमधील ‘गोपाळबुवा सार्वजनिक वाचनालया’त पंधरा हजार पुस्तके आहेत. पंधरा वर्तमानपत्रे व पंचवीस नियतकालिके व दिवाळी अंक वाचण्यासाठी वाचक येत असतात. स्पर्धा परीक्षेसाठी नवनवीन पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी अडसुळे प्रयत्नशील असतात. त्यांच्यामुळेच नामवंत साहित्यिक अशा आडगावाला भेट देतात. हे पाहून ग्रामस्थही त्यांना मनापासून साथ देतात. ग्रामपंचायत उत्तम वाचकाचा बक्षीस देऊन गौरव करते. इयत्ता सातवीपर्यंतच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेचं विद्यालय, तर आठवी ते दहावीसाठी ‘संत गोपाळबुवा विद्यालय आहे. या दोन्ही शाळांमध्ये उत्तम सुविधा असून शिक्षकांचा आदर केला जातो.

गावातील सौहार्दपूर्ण वातावरणामुळे पूर्ण गावाचा कायापालट झाला. प्रत्येक घराचं उत्पन्न वाढलं. घरासमोर गाडी आली. पीतांबर कांबळे, संजय कुलकर्णी, सूरज विभुते व वैजनाथ भालेकर आदी मंडळींना ‘प्रत्येक घराचं उत्पन्न चौपटीनं वाढलं असावं’ असं वाटतं. गावात मद्यालय नाही व व्यसनांचं प्रमाणही कमी आहे.

लॉरी बेकर यांनी बाणेगावाचा आराखडा जुन्या गावरचनेप्रमाणे ठेवला होता. त्यांना वगळल्यावर गावात काही काळ असंतोष होता. तो विरून जावा यासाठी केरळमधील बलाढय़ वृत्तपत्राने गावातील पंच व इतर म्होरके यांची तिरुपती यात्रा घडवली. दिल्लीत पंतप्रधान नरसिंह राव यांच्या हस्ते मोजक्या गावकऱ्यांना घराच्या चाव्या देऊन हस्तांतरण केलं. काळाच्या ओघात बऱ्या-वाईट गोष्टींचा विसर पडतोच. आता तीस वर्षांनतर गाव कसं वाटतं हे विचारल्यावर संजय डोलारे म्हणाले, ‘‘भूकंपानंतर लोकांनी भरभरून मदत दिली. आमच्या गरजेपेक्षा जादाच मदत मिळाली. ते बघून आम्ही माजलो. आम्हाला कोणाचीच गरज नाही, असं शहरी वागू लागलो. आता तर गावातले थोरमोठे कोणी राहिले नाहीत. गावाला धाक असणारे वडीलधारे आवश्यक असतात. अडीनडीला सल्ला देणारं, योग्य न्यायनिवाडा करणारं असावं लागतंय. ते नसल्यानं सगळे उंडारल्यागत झालेत. कोणी दादागिरीला टोकत नाही. भल्याला नमस्कार करत नाहीत. जो तो आपल्याच घरापुरतं, फार झालं तर जातीपुरतं बघतो. गावाचा विचारच नाही.’’

बाणेगाव असो वा इतर कोणतंही गाव, तिथल्या सार्वजनिक जागा या क्वचितच सर्वाच्या वाटय़ाला येतात. धान्य वाळवण्यासाठी, गुरं बांधण्यासाठी, वाहन ठेवण्यासाठी दवाखाने वा अन्य जागा उपयोगात येतात.

बाणेगाव येथील एक एकल महिला जगण्यासाठी धडपडतेय. तिने सार्वजनिक वाचनालय चालवण्यासाठी प्रशासनकडून इमारत मिळवली. अनेकांकडून पुस्तकं मिळवली तर नासधूस व दमदाटी करून तिचा छळ चालू आहे. तिला तिच्या घरातून हाकलण्याचे प्रयत्न झाले. त्या म्हणतात, ‘भावकीतलेच लोक िहसक असल्यावर करणार तरी काय?’

हेही वाचा >>> बांगलादेश आणि स्थलांतर : नव्या उत्तरांचा शोध..

किल्लारीजवळील गुबाळ गावात ‘जिओडेसिक डोम’मध्ये रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. खोल्या नाहीत, कप्पे-कोनाडे नाहीत (ते भाग्य कुठल्याही गावाला नाही), जेमतेम एक इंच जाडीच्या डोममध्ये थंडीत हुडहुडी काकडा भरतो तर उन्हाळय़ात भट्टी! लिंबाळा दाऊव मंगरूळमध्ये जागेवर रचलेल्या (कास्ट इन सिटू) दोन इंच जाडीच्या भिंतीमध्येही असेच हाल आहेत. रेबे चिंचोलीत पूर्वरचित भिंत व छताची जुळवणी करून ‘हायटेक’ घरं बांधली. डॉ. आर्यानी त्याच वेळी केलेले भाकीत तंतोतंत खरे ठरले. तंत्रज्ञान आधुनिक असल्याने सगळे प्रश्न आपोआप सुटत नाहीत. पावलोपावली काळजी घ्यावी लागते. तेव्हा क्युरिंग ठीक न झाल्याने सांध्यांवर व इतर ठिकाणी भेगा गेल्या. पावसाळय़ात भरपूर पाणी गळू लागले. दुरुस्तीसाठी अर्ज-विनंत्या सतत करूनही कोणी फिरकलं नाही. या घरांचा विस्तार व डागडुजी करणे सामान्यांच्या कुवतीबाहेरचे आहे. दुसरीकडे पुनर्वसित गावे ही अवाढव्य झाली असून ग्रामपंचायतीला विजेचे देयक देणे, तसेच रस्ता व पाणी योजना यांची देखभाल करणे शक्य होत नाही.

आधी गावं नदीलगतची होती तेव्हा ३०-४० फूट खोलीच्या विहिरींवर भागत होतं. विंधनविहिरीला १०० फुटाला पाणी लागत होतं. आता खडकावर गावं आली. नगदी पिकं वाढत गेली. पाण्यासाठी ३०० ते ५०० फूट खोल जावं लागतं.

आता भूकंपग्रस्त परिसरातील सगळी गावं व घरं सारखीच वाटतात. या घरात भिंती काळय़ा होतात म्हणून चूल बाहेर पत्र्यात आली. दैनंदिन व्यवहार तिथेच चालतात. नवीन घराभोवती पत्रे ठोकून जुन्या घरासारखी ‘स्पेस’ तयार केली. हे जाणणारे बेकर म्हणाले होते, ‘‘आपला शेतकरी खोल्यांमध्ये जगत नाही. मोकळी जागा, अंगण, परसात त्यांचा जास्त वावर असतो. बहुतेक व्यवहार तिथे होतात. अशीच घररचना ते मनाने स्वीकारतील.’’ बेकर यांची पुरेपूर उपेक्षा केल्यामुळे पुनर्वसनातले घर ही एक आकर्षक, शोभेची कोठी झाली. शेतीचे सामान, धान्य ठेवायला जागा नाही. शौचालय आहे, पण मलनिस्सारणाची व्यवस्था नाही. विचार न करता घाईघाईने शेतकऱ्यांना शहरी घरे दिल्याची ही निष्पत्ती! याला गावातल्या भाषेत म्हणतात ‘असून अडचण नसून खोळंबा’. उपयोगिता हा वास्तुकलेचा मूलभूत निकष लावला तर ही घरे निरर्थक ठरतात. सरकारी गृह योजनेत यांत्रिक, चैतन्यहीन घरांचीच निर्मिती होते. बेकर, डॉ. आनंद स्वरूप आर्यासारखे द्रष्टे हेच सांगत होते. किल्लारी अनुभवातून गुजरात, तमिळनाडू व ओरिसा सरकारांनी गावांच्या स्थलांतराची मागणी काळाच्या ओघात विरून जाऊ दिली. आपत्तीग्रस्तांना तयार घर न देता बांधकाम प्रक्रियेत सामील करून घेतलं. त्यामुळे ते ‘सरकारी’ न होता ‘लोकांचे’ प्रकल्प झाले.

कुठल्याही आपत्तीनंतर अनेक संस्था सर्वसामान्य लोकांकडून देणग्या गोळा करून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा सपाटा लावतात; परंतु त्याचा काटेकोर हिशोब लोकांपुढे सादर केला जात नाही. जनतेचा पैसा काटकसरीने वापरून उत्तम पुनवर्सन करण्याचा पारदर्शक प्रामाणिकपणा आढळत नाही. अल्पखर्ची बांधकामाचा ध्यास घेणारी देणगीदार संस्था सापडत नाही. उलट त्यांची उधळमाधळ व ऐश सहज डोळय़ात भरते. त्यामुळे कुणावर विश्वास टाकून निधी द्यावा, हा प्रश्न सार्वत्रिक होत आहे. ‘किल्लारी’ पुनर्वसनात एक गाव बांधून देणाऱ्या संस्थेने जमा केलेला निधी स्वत:च वापरल्याचा संशय लोकांना आला. संस्थेने दाद दिली नाही तेव्हा केरळमधील दात्यांनी एकत्र येऊन थेट न्यायालयाचे दार ठोठावत हिशोब मागितला. इतर अनेक संस्थांचे प्रसिद्धीसाठीचे ‘व्यवहार’ कोणाच्याही लक्षात येण्यासारखे होते. याबाबत राज्य प्रशासनानं काही पावलं उचलली असती तर देणग्या गोळा करणाऱ्या मोठमोठय़ा संस्थांना वळण लागलं असतं.

हेही वाचा >>> आयात-निर्भर आपण..

पुनर्वसित गावांतील सामाजिक-आर्थिक वातावरण कसं व का आहे? या गावांवर देशाच्या व राज्याच्या आर्थिक धोरणाचे कसे परिणाम झाले आहेत? घरोघरी वाहनं तसंच छोटा, मध्यम व मोठा पडदामय जीवन यामुळे कसे बदल झाले? अशा अनेक बाजूंनी सामाजिक संशोधन करता आलं तर तीस वर्षांपूर्वी आपण काय केलं? त्यातून काय साध्य झालं? याचा सारासार विचार केला तर त्याच त्या छोटय़ा व महाकाय चुका पुन:पुन्हा होणार नाहीत. आपत्तींनी बेजार झालेल्यांना ‘पुनर्वसन’ हे रोगापेक्षा जालीम औषध वाटू नये.

किल्लारीचा भूकंप ही संपूर्ण जगासाठी आणि भारतासाठी पहिली लक्षवेधी आपत्ती ठरली होती. तेव्हा खासगी दूरचित्रवाहिन्या व भ्रमणध्वनी अवतरले नव्हते तरीही थेट दूरभाष्य (एस.टी.डी.) आणि फॅक्समुळे जग जवळ आलंच होतं. ‘बी.बी.सी.’, ‘न्यू यॉर्क टाइम्स’पासून सर्व वृत्तपत्रांनी दुसऱ्या दिवशी भयाण विध्वंसाची मुख्य बातमी केली. त्यामुळे जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. (त्यानंतर आपत्ती पर्यटन ही नित्याची बाब झाली.) अमेरिका, इंग्लंड, जपान, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड या देशांनी औषधे, तंबू, ब्लँकेट, खाद्यपदार्थ पाठवले. जागतिक बँकेला पुनर्वसनात सहभागी व्हावेसे वाटले. डेहराडून, रायपूरपासून कोलकात्यापर्यंतचे असंख्य तरुण मदतीसाठी धावून आले. ‘किल्लारी भूकंप’ हा स्वतंत्र भारतातील आपत्ती व्यवस्थापनाचा वळणबिंदू ठरला. त्याआधीच्या आपत्तींमध्ये शासन केवळ मदत देऊन मोकळे होत असे. शासन थेट पुनर्वसनात उतरण्याची ती पहिलीच घटना होती. त्यामुळे आपत्तीग्रस्त हे लाभार्थी होऊ लागले. ‘किल्लारी’च्या अनुभवानंतर आपत्तींच्या बाबतीत देशातील प्रशासन यंत्रणा अधिक गंभीर व कार्यक्षम होत गेली.

भूकंपग्रस्तांची सुटका, मदत व तात्पुरते पुनर्वसन या कार्याचा वेग व गुणवत्ता प्रशंसनीय होती. त्या काळात स्वयंसेवी संस्थांनीही झोकून देऊन काम केले. खरा कस लागतो तो दीर्घकालीन पुनर्वसनात! तिथे आपले सार्वजनिक अपयश अतिशय ठसठशीतपणे जाणवते. देशातील सर्व क्षेत्रांतील व सर्व स्तरांतील लोकांना आपत्तीग्रस्तांसाठी काही करण्याची आटोकाट इच्छा होती. आर्थिक व बौद्धिक संपदा दोन्हीही मदतीस तयार होत्या. यातून एक नमुनेदार व आदर्श पुनर्निर्माण करण्याची संधी हाताशी आली होती. ती महाराष्ट्राने गमावली. या उत्तुंग अपयशात राजकीय, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रं हे सर्व घटक जबाबदार असले, तरी त्या त्या क्षेत्रांतील नेतृत्वाचेच ते कर्तृत्व आहे. ‘किल्लारी पुनर्वसना’कडे बारकाईने पाहिलं तरच तो वास्तव प्रतिमा दाखवणारा आरसा होऊ शकतो. एरवी सामान्यकाळात आपण जसे वागतो तसेच प्रतिबिंब दिसते, आपत्तीच्या काळात सारेच मोठे (मॅग्निफाय) दिसते, एवढेच. atul.deulgaonkar@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rehabilitation status and socio cultural environment after thirty years of killari earthquake zws

First published on: 24-09-2023 at 01:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×