‘महाभारत : संघर्ष आणि समन्वय’ हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. महाभारतावर आधारित असे बरेचसे लेखन- जसे इरावती कर्वे यांचे ‘युगान्त’, दुर्गा भागवत यांचे ‘व्यासपर्व’, दाजी पणशीकरांचे ‘महाभारत-एक सुडाचा प्रवास’ इत्यादी- असूनही, पुन्हा एकदा रवींद्र गोडबोले यांचे हे पुस्तक वाचायलाच हवे असे आहे. ‘महाभारत’ हा भारतीय मनांनी गेली कित्येक शतके परंपरेने सांभाळलेला गौरवशाली वारसा आहे. त्यातील कित्येक कथा, आख्यानके, पात्रे, प्रसंग अनेकांना स्फूर्ती देत राहिली आहेत. त्यावर रचना होत राहिलेल्या आहेत आणि पुन:पुन्हा वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून त्यावर वेगवेगळे भाष्यही होत राहिले आहे. गोडबोले यांनी एका नव्या, वेगळ्या अंगाने महाभारताची चिकित्सा केली आहे.
महाभारताच्या शेवटी असलेले व्यासवचन गोडबोले यांनी आपल्या विवेचनाच्या केंद्रस्थानी घेतलेले आहे.
‘उध्र्वबाहुर्विरौम्यष: न च कश्चित शृणोति मां।
धर्मादर्थश्च कामश्च स धर्म: किं न सेव्यते॥’
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ. त्यातल्या ‘धर्म’ या पुरुषार्थातच अर्थ आणि काम हेही समाविष्ट आहेत. धर्म, अर्थ आणि काम यांचा वेगवेगळा विचार करणे चुकीचे आहे असे महर्षी व्यासांना सांगायचे आहे. गोडबोले यांना महाभारत वाचताना असे सतत जाणवत गेले आहे की, ‘या तीन पुरुषार्थाचे उचित संतुलन साधणे कोणालाच जमले नव्हते.’ त्यामुळे ते म्हणातात, ‘म्हणूनच महाभारत धर्मगं्रथ राहत नाही, इतिहासापुरते त्याचे स्वरूप मर्यादित होत नाही. तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र यांचे प्रचंड संकलन वाचूनही एक निश्चित असा बोध हा ग्रंथ देऊ शकत नाही. तर धर्मार्थकामाचे संतुलन जाणू आणि ठेवू न शकणाऱ्या मानवजातीची अमर शोकांतिका म्हणून तो आपल्यासमोर उभा राहतो.’
गोडबोले यांनी संस्कृतमधून हा ग्रंथ वाचून त्यातील कथाभागाचे मार्मिक विश्लेषण केले आहे. ते करताना त्यांनी महाभारताच्या अठरा पर्वापैकी पहिली नऊ पर्वे विचारात घेतली आहेत. महाभारतातील ‘संघर्ष’ त्यांना प्रामुख्याने उलगडून दाखवायचा आहे. त्यामुळे ‘आदिपर्व’ ते ‘शल्यपर्व’ म्हणजेच कुरूंच्या घराण्याच्या वंशावळीपासून दुयरेधनाला भीमाने ठार केले व त्याच्या मृतदेहाची, त्याचे मस्तक पायाने रगडत विटंबना केली त्या प्रसंगापर्यंतचा कथाभाग त्यांनी विश्लेषणासाठी निवडला आहे. हे विश्लेषण करीत असताना त्यांनी वेळोवेळी महाभारतात आलेल्या ‘धर्म’विषयक संकल्पनेची व त्या त्या प्रसंगी ‘धर्म’ या शब्दाला असणाऱ्या अर्थच्छटांची चर्चा केली आहे. आज आपल्याला ‘हिंदुधर्म’ हा शब्द वेगवेगळ्या संदर्भात ऐकू येतो. तथापि प्राचीन काळी हा शब्द वा ही संकल्पना कशा प्रकारे वापरली जात होती त्याचे सविस्तर विश्लेषण लेखकाने केले आहे. महाभारताची कथा अनेक शतके मौखिक परंपरेने समाजात प्रसारित होत होती. द्वैपायनाने शुकाला, नारदाने देवांना, शुकाने गंधर्व, यक्ष, राक्षसांना हा ग्रंथ ‘ऐकवला’ असल्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. (येथे मला व्यासमुनी महाभारत सांगत आहेत आणि श्रीगणेश ती कथा लिहून घेत आहेत असे चित्र आठवते!) महाभारतकाली ‘धर्माचे स्वरूप पूर्णपणे मौखिक होते. लेखनकलाच अस्तित्वात नसल्यामुळे कोणत्याही ज्ञानाची- माहितीची- धर्माची- अधिकृत आणि मान्यताप्राप्त प्रत उपलब्ध होणे शक्य नव्हते,’ त्या वेळी ‘धर्म’ या शब्दाबरोबरच आपद्धर्म आणि लोकांना पटणारी- जनरीत- म्हणजे ‘लोकतंत्र’ हेही महत्त्वाचे मानले जात. तसेच ‘धर्म’ ही संकल्पनाही व्यापक होती. सत्यवती ही आपली सावत्र आई कुवारपणी माता झाली होती आणि व्यास हा तिचा पुत्र होता हे ऐकूनही भीष्माला ती ‘धर्मभ्रष्ट,’ ‘पतिता’ वाटली नाही. व्यासाला अम्बिका आणि अम्बालिका यांच्या ठिकाणी नियोगाने पुत्र निर्माण करण्याला निमंत्रित करणे ‘धर्मसंमत’ होते. लोकसंख्या वाढवण्याची गरज असलेल्या तत्कालीन समाजात वेगवेगळ्या प्रकारे वारस जन्माला घालता येत होता. म्हणजेच लैंगिक संबंधाबद्दल उदार भूमिका घेतली जात होती, पितरांचे ऋण फेडण्यासाठी पुत्र निर्माण झाला पाहिजे असे धर्म सांगत होता.
महाभारताचे कथानक उलगडून दाखवताना गोडबोले यांनी परंपरेने चालत आलेली कथा किंवा त्यांनी आधाराला घेतलेली संहिता जशीच्या तशी स्वीकारलेली नाही. किंबहुना प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मनात प्रश्न उभे राहतात व ते त्यांची तर्कशुद्ध उत्तरे शोधीत राहतात. उदाहरणार्थ, पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पांडूने आपल्या भार्याकडून नियोगाने पुत्रप्राप्ती करून घेतली तरीही तो परत हास्तिनापुरात का परतला नाही? किंवा किंदम ऋषीच्या शापामुळे पांडूला स्त्रीसंग वज्र्य होता हे जसेच्या तसे स्वीकारण्याऐवजी पांडूला हृदयाची व्याधी असावी असा अंदाज ते व्यक्त करतात. गोडबोले यांनी महाभारतकथा तर्काच्या निकषावर घासून घेतलेली आहे. महाभारतातील अनेक प्रसंग प्रक्षिप्त आहेत हे त्यांनी आग्रहाने सांगितलेले आहे. व त्यासंबंधी ठिकठिकाणी उदाहरणे देऊन चर्चाही केली आहे.
महाभारत हा ग्रंथ इसवी सन पूर्व ५००च्याही आधी अस्तित्वात होता आणि त्यात सातत्याने भर पडून त्यातील श्लोकसंख्या वाढत गेली हे विद्वानांनी मान्य केलेले आहे. तथापि कथानकातील मूळ भाग कोणता व त्यात मागाहून पडलेली भर कोणती हे ठरवताना ‘कृष्णाच्या देवत्वाचे, त्याच्या अलौकिक सामर्थ्यांचे वर्णन, दैवी चमत्कार, राक्षसांची मायावी शक्ती, देवतांनी आणि ऋषीमुनींनी दिलेले शाप आणि वर हजारो हत्ती, घोडे, रथ, सर्वसंहारक ब्रह्मास्त्र आणि इतर जादूई अस्त्रे अशा प्रकारचा भाग, काल्पनिक, प्रक्षिप्त’ म्हणून त्यांनी वगळला आहेच, पण त्याशिवाय, ‘ब्राह्मणांचा मोठेपणा, बडेजाव आणि सामथ्र्य सांगणारा भागही माझ्या मते प्रक्षिप्त होता.’ कारण, ‘महाभारत ही क्षत्रिय घराण्यांची कहाणी आहे.’ प्रक्षिप्त भाग ठरवण्यासाठी गोडबोले यांनी महाभारतातील श्लोकांच्याच संगतीचा आधार घेतला आहे. त्यामुळे, कृष्णाला पूर्ण पुरुष, परमेश्वरी अवतार मानला जाऊ लागल्यानंतर त्याने केलेल्या चमत्कारांच्या कथा समाविष्ट केल्या गेल्या असाव्यात असे ते म्हणतात. तसेच महाभारतातील विसंगत, अतिशयोक्त किंवा कल्पनाविलास असणारी विधानेही त्यांनी मान्य केलेली नाहीत. उदाहरणार्थ द्यूताच्या प्रसंगात शकुनीने जरासंधाच्या हाडांपासून केलेले फासे वापरले ही दंतकथा आहे असे ते मानतात. गोडबोले यांनी द्यूताच्या खेळाचे (या द्यूताला महाभारतकारांनी ‘सहृद्द्यूत’ – मित्रत्वाच्या भावनेने मांडला गेलेला जुगार असे नाव दिले आहे.) स्वरूप समजावून सांगितले आहे. (सविस्तर पाहा : पृ. १२१-१२९) द्यूत प्रसंगी युधिष्ठिराने लावलेले पण व त्यातील वर्णनही अतिशयोक्त म्हणून प्रक्षिप्त आहे असे त्यांनी सांगितले आहे. या द्यूत प्रसंगातील थरारक नाटय़, या प्रसंगी अनावर झालेल्या भावनांचे उत्कट आविष्कार समाज मानसाला संमोहित आणि संवेदनशील मनाला अस्वस्थ करून सोडतात हे अगदी खरे आहे. याच प्रसंगात द्रौपदीला पणाला लावण्याचे आव्हान शकुनी देतो, परंतु हे आव्हान घेऊन खरे तर शकुनीने कौरवांसमोर पेचच निर्माण केले. (पृ. १४३) या प्रसंगामुळेही महाभारतकारांच्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन आपल्याला घडते. या प्रसंगी युधिष्ठिराचे द्रौपदीच्या रूपाचे व गुणसंपदेचे वर्णन करणारे जे श्लोक आहेत ते रुचिहीन आणि प्रसंगाला अनुचित वाटल्याने प्रक्षिप्त म्हणून वगळावेत असे त्यांचे मत आहे. द्रोपदीला सभेत खेचून आणल्यानंतर तिने सभेला उद्देशून विचारलेल्या प्रश्नाचे (युधिष्ठिराने मला पणावर लावण्याआधी स्वत:ला पणाला लावून तो जर हरला असेल तर मला पणावर लावणे बेकायदेशीर ठरते, असे असताना मी कोणत्या धर्मानुसार दासी ठरते?) या सर्व प्रसंगाची, त्यातील संभाषणांची विकर्ण, कण आदींच्या भाषणांची सविस्तर चिकित्सा गोडबोले यांनी केली आहे. द्रौपदीचे वस्त्रहरण आणि त्या वेळी तिला पुरवली गेलेली वस्त्रे. दु:शासनाचे रक्त पिण्याची भीमाची प्रतिज्ञा हा सारा भाग प्रक्षिप्त आहे कारण पुढे विदूर आणि भीष्म यांनी केलेल्या भाषणात या साऱ्या गोष्टींचा उल्लेख येत नाही असे त्यांचे प्रतिपादन आहे. या नाटय़मय प्रसंगाचे, त्या वेळी उपस्थित असणाऱ्या उन्मत्त कौरवांचे, कर्णाचे, बहुसंख्य सभासदांच्या मौनाचे विश्लेषण गोडबोले यांनी समर्थपणे केलेले आहे. द्रौपदीने केलेल्या भाषणानंतर भीष्माने, ‘तुझ्या प्रश्नाचे योग्य उत्तर युधिष्ठीरच देऊ शकेल’ असे जे वक्तव्य केले त्यातील गर्भित सूचनेसंबंधीचेही त्यांचे भाष्य मुळातून वाचण्यासारखे आहे. (पाहा : पृ. १५०-१६०)
गोडबोले यांचे विश्लेषण मूळ श्लोकांच्या आधारे, श्लोकांतील शब्दांचे अर्थ ध्यानात घेऊन केलेले आणि अत्यंत तर्कशुद्ध आहे. त्यामुळे ‘व्यासपर्व’ किंवा ‘युगान्त’ तसेच महाभारतावरील इतर ललित साहित्यातील विवेचन वाचताना क्वचितच येणारा बौद्धिक आनंद हे विश्लेषण वाचताना मिळत राहतो. महाभारताची कथा, त्यांतील अनेक प्रसंग परिचित असूनही त्यासंबंधीचे हे विश्लेषण वाचताना नवा दृष्टिकोनही मिळत जातो. उदाहरणार्थ, द्यूतात पांडवांचे राज्य दुयरेधनाने जिंकून घेतले तो अधर्म होताच, परंतु ‘बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास’ ही अट युधिष्ठिराने मान्य करणे हाही अधर्मच होता. वनवासात भीम युधिष्ठिराला सांगतो, ‘धर्माचे अतिरेकी आचरण करणारा पुरुष धर्मामुळेच दुबळा होतो आणि स्वत:च स्वत:च्या धर्मार्थाचा नाश करतो.’ गोडबोले याच संदर्भात पुढे लिहितात, ‘पुरुषाचे धैर्य नष्ट करून टाकणाऱ्या अहंकाराची ही एक वेगळीच जात महाभारतकारांनी मांडली आहे. या अहंकाराचा उगम जर एखाद्या आदर्शवादात (आयडियॉलॉजी) असेल तर माणूस.. विचारपूर्वक उद्दाम होतो.’ मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकलो असतो तर हे घडले नसते अशी कबुली देणारा युधिष्ठीर गोडबोले यांनी उभा केला आहे.
बारा वर्षांचा वनवास संपवून पांडव एक वर्ष विराटाकडे अज्ञातवासात घालवतात, अज्ञातवासाच्या शेवटच्या कालात सुशर्मा विराटाचे गोधन पळवतो तेव्हाच्या प्रसंगी भिन्न वेशातल्या पांडवांनाही युद्धात भाग घ्यावा लागतो. दुसरीकडून कौरवांचेही आक्रमण होते त्या वेळी बृहन्नडेच्या वेशातला अर्जुन उत्तराच्या मदतीसाठी रणभूमीकडे निघतो. या वेळी अज्ञातवासाचे वर्ष पूर्ण झाले होते का या प्रश्नाच्या संदर्भात गोडबोले यांनी महाभारतकाली कालगणना कशी केली जात असेल याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. (पाहा : १९४-२००)
गोडबोले यांनी महाभारताचे हे विश्लेषण अतिशय तटस्थपणे केलेले आहे. काही प्रकरणांच्या प्रारंभी त्यांनी लोकमान्य टिळकांनी १९०५ साली केसरीच्या अग्रलेखांतून महाभारताची वैशिष्टय़े दाखवून दिली होती, त्यातले निवडक उतारे घेतले आहेत. ‘महाकाव्यातील प्रतिनायक.. नायकाच्या तोडीचेच असल्याखेरीज काव्यांतील कथानकास उदात्त रूप येत नाही’ असे सांगून टिळकांनी दुयरेधन या पात्राची वैशिष्टय़े दाखवीत. ‘त्याच्याबद्दल वाचकांच्या मनात एक प्रकारची सहानुभूती उत्पन्न होते’- असे लिहिले होते. प्रस्तुत ग्रंथातले नववे प्रकरण ‘दुयरेधनाचा मृत्यू’ आहे. शल्यपर्वात आलेल्या संबंधित अध्यायांची चिकित्सा करून त्यातील काही विसंगती गोडबोले यांनी लक्षात आणून दिल्या आहेत. युद्धाच्या अखेरच्या घटकेला ‘युधिष्ठिराला शरण जाऊन जीव आणि राज्य वाचवण्यातच शहाणपण आहे’ असा कृपाचार्याने दुयरेधनाला सल्ला दिला, त्यावर दुयरेधनाने दिलेले उत्तर क्षत्रियांच्या मूल्यांवर प्रकाश टाकणारे आहे. त्याच्या बोलण्यात मृत्यूबद्दलचे भय नाही तसा शत्रूविषयीचा तिरस्कारही नाही. केवळ दुयरेधनच नव्हे तर धृतराष्ट्र, कर्ण, विकर्ण, गांधारी, भीष्म, विदूर, द्रोण या इतर व्यक्तिमत्त्वांचे अंतरंगही गोडबोले यांनी सविस्तर उकलून दाखवले आहे. धारदार, चिकित्सक, विचक्षण वृत्तीने त्यांनी महाभारतातील संघर्षांचा शोध घेतलेला आहे. आवश्यक तेथे तत्कालीन मानवी वर्तन वा धोरणे आजदेखील अनेक बाबतींत दृष्टीस पडतात, त्या संबंधीचे भाष्यही त्यांनी केले आहे. (उदा. पाहा : पृ. ८२-८४, पृ. ३०२-३०३)
प्रस्तुत ग्रंथाच्या शेवटी ‘सनातन धर्माचे स्वरूप’ हे प्रकरण आहे. महाभारतात ‘धर्म’ या शब्दाचा वारंवार उल्लेख होतो. ‘सनातन धर्म’ हा हल्ली आपल्याकडे (विशेषत: हिंदूंच्या) भावनांना आवाहन करताना व इतरांना त्याची आठवण करून देताना वापरण्यात येणारा शब्द आहे. तो वापरणारे त्याचा संपूर्ण व सर्वागीण अर्थ कधीही स्पष्ट करीत नाहीत. ती एक ‘ब्लँकेट टर्म’ आहे. प्रस्तुत प्रकरणात महाभारतकाली या ‘धर्मा’ची व्याप्ती केवढी होती याचा सविस्तर ऊहापोह गोडबोले यांनी केलेला आहे. प्रथम त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे ती म्हणजे, ‘या धर्माचा एका सर्व शक्तिमान ईश्वराशी किंवा अनेक देवदेवतांशी संबंध लावता येत नाही. हिंदू तत्त्वज्ञानात सर्व शक्तिमान ईश्वराऐवजी ‘परब्रह्म’ ही संकल्पना येते. हे परब्रह्म निर्गुण, निराकार असते, स्खलनशील मानवाला आधार देण्याची, पाप्यांना शिक्षा आणि पुण्यवानांना पारितोषिके देण्याची जबाबदारी स्वीकारीत नाही. देवदेवतांचे अधिकारक्षेत्र अगदी मर्यादित असते..’ (अधिक पाहा : पृ. ३०७-३२५) हा सनातन धर्म मौखिक स्वरूपात वेगवेगळ्या प्रदेशांत प्रसारित होत गेला. धर्माचे गहन गूढ रूप समजून घेण्यासाठी कोणत्याही एका स्मृतीचे वचन-शब्द प्रमाण मानता येत नाहीत असा आपल्या पूर्वजांचा दावा होता.
या प्राचीन-सनातन-धर्माचे महाभारतकालीन स्वरूप कसे होते याची सविस्तर मांडणी गोडबोले यांनी केली आहे. शिकार करणाऱ्या भटक्या रानटी टोळ्यांपासून स्थिर, कृषिप्रधान समाजव्यवस्थेकडे वाटचाल केलेल्या समाजाच्या नियमनाची उत्क्रांती कशी होत गेली असावी याचा इतिहास सनातन धर्माने नोंदवून ठेवला होता हे कळून घेताना सनातन धर्माचा बागुलबुवा उभा करून समाजाची दिशाभूल कशी केली जाते याचेही भान येते. इंग्रजांच्या आगमनानंतर समाजाच्या धर्म-अर्थ-कामामध्ये कशी उलथापालथ होऊ लागली होती याचेही ईषत् दर्शन त्यांनी श्री. म. माटे यांच्या ‘चित्रपट’ या आत्मचरित्रात केलेल्या विवेचनाच्या आधारे घडवले आहे.
‘महाभारत-संघर्ष आणि समन्वय’ हे महाभारताचे नव्या दृष्टीने केलेले पुनर्वाचन आहे. महाभारताचे मूळ कथानक कोण्या एका पक्षाची बाजू घेऊन लिहिलेले नाही हे या विवेचनावरून समजत जाते. महाभारतातील व्यक्तींची मानसिकता, त्यांची मूल्ये, त्यांच्या जपणुकीसाठी त्यांना करावा लागलेला संघर्ष या सर्वाचे मूलगामी, यथातथ्य, महाभारताच्या संहितेचा प्रत्यक्ष आधार घेऊन केलेले हे विवेचन महाभारताचा उत्कृष्ट प्रत्यय घडवते. महाभारतातली अनेक वर्णने प्रक्षिप्त वाटतात हे त्यांनी साधार पटवून दिलेले आहे. या कथानकाची अभिजातता आणि त्यातील प्रतिभाविलासाचे सुंदर आणि रेखीव स्वरूप मांडणारा हा गं्रथ ओघवत्या परिणामकारक, भारदस्त निवेदनामुळेही कमालीचा वाचनीय झालेला आहे. या ग्रंथाच्या ‘आसपास’ वरील पाषाणात कोरलेली शिल्पेही फार सुंदर आहेत.
‘महाभारत : संघर्ष आणि समन्वय’- रवींद्र गोडबोले, देशमुख आणि कंपनी, पुणे, पृष्ठे- ३४४, मूल्य- ६०० रुपये.                                  

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा