सुभाष अवचट

रेखाचित्र : अन्वर हुसेन

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?

स्वयम्च्या शोधाचे चक्र सतत भोवती फिरत आले आहे. त्यात खंड पडणार नाही. स्वत: ‘मी’च्या शोधात तत्त्वज्ञाने, वाङ्मय, शास्त्रही भटकत आले आहे. मी कोण आहे? माझ्यात कोण आहे? मग दुसरा कोण आहे? One’s own person हे या शोधाचे सूत्र राहत आले आहे. त्याच्या वेगवेगळ्या दर्शनाची चिकित्सा संतांनी, तत्त्वज्ञांनी, कवी- लेखकांनी आपापल्या परीने केली आहेत. पण त्याच्या मूळ रूपाचा अंदाज येत नाही. मायाजालाप्रमाणे हे जाळे सोडवले गेले नाही.

व्यक्तीचा मुळातला स्वभाव गुण, वृत्ती, खरा चेहरा, आतला भाव, स्वत:ची आयडेंटीटी, बॉडी इमेज, सेल्फ एस्टीम, परफॉर्मन्स आणि भीतीची प्रश्नचिन्हे यात फिरत असतात. त्यात ‘हे माझे आहे!’ या घोषवाक्याचे प्रतिध्वनीही गुंतलेले असतात. काही हुशार, चाणाक्ष माणसं या वादातून अंग बाहेर काढतात. हे प्रचंड न सुटणारे शब्दकोडे आहे हे त्यांच्या लक्षात येते आणि ‘आहे या विश्वात गुणगुणत आयुष्य कंठावे’ हे ते स्वीकारतात. कोणी संगीतात, लेखनात, प्रयोगशाळेत, पटांगणात, कुणी बॉलीवूडमध्ये तर कोणी क्लबमध्ये, नाही तर शरीरसुखात, व्यापारात आपले मार्ग शोधतो. वृद्धत्व, आजारपण, दारिद्य्र, मृत्यू त्यांचा पाठलाग करीत असतोच. त्याप्रमाणे ‘मी कोण आहे?’ यावरचा कशिदार नाजूक पडदा हटत नाही हे ओघाने आलेच. ज्ञानी, अज्ञानी माणसांचे हे हलते संसार असतात.

सेल्फ – अथवा स्वयम् या विचारांच्या शोधाला चेहरा असतो का? का हे विचारांचे प्रतिबिंब असते? शरीराला चेहरा असतो. त्याला ठेवण, रंग असतो. बहुतेक त्यात बालपण, तारुण्य आणि वृद्धत्वाचे ऋतू येतात. भावनांनी आपण त्यांना रूप देतो आणि जो तो आपापल्या चेहऱ्यावर- तो जसा असेल तसा त्यावर प्रेम करतो. पण चिरफाड केल्यावर म्हणतात, खरा चेहरा कोणता असतो! खरं तर स्वत:चा चेहरा स्वत:ला दिसत नाही. ते आरशातले, पाण्यातले प्रतिबिंब असते. किंवा कोणी सांगितले की जाणवते, मी सुंदर दिसते. मी हँडसम दिसतो. माझ्या चेहऱ्यावर लोक भाळतात. तोपर्यंत स्त:ला स्वत:च्या चेहऱ्याची खात्री देता येत नाही.

शेकडो वर्षांपूर्वी व्यापारासाठी समुद्रातून गलबते केरळच्या किनाऱ्यावर लागली. त्यात अरब, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रजही आले. त्या धाडसी एक्स्पिडेशनमध्ये वास्को-द-गामा हा प्रसिद्ध आहे. केरळच्या मसाल्यांच्या व्यापारासाठी हे सगळे नाविक वारा, वादळे, लाटांशी झुंजत आले होते. व्यापार करण्यासाठी राजाची परवानगी लागत असे. हे व्यापारी राजाला खूश करण्यासाठी नानाविध नजराणे त्याच्या दरबारात आणत असत. राजा खूश झाला की ही परवानगी मिळत असे. एका व्यापाऱ्याने राजासाठी एक आरसा आणला. हा पहिलाच आरसा भारतात आला असावा. राजा-राणीने स्वत:चा चेहरा प्रथम आरशात पाहिला. तोपर्यंत पाण्यातल्या प्रतिबिंब अथवा धातूच्या चकाकी दिलेल्या थाळ्यातल्या प्रतिबिंबावर खूश राहावे लागायचे. आरशाची ही करामत आहे. तुम्ही कसे दिसता याचा आभास तो तयार करतो. त्याच्यासमोर स्त्रियांचे साजशृंगार चालतात. या आभासांनी दुनिया बदलली. त्याच्यासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीला तो आभास नाराज करीत नाही. प्रतिबिंब कसेही दिसले तरी त्या व्यक्तीला ते सुंदर दिसते. हा मनातल्या सेल्फ अझम्प्शन्सचा प्रताप असतो. गाढवाचं पिल्लू किती गोड दिसतं. नानाविध रंगरूप लाभलेल्या पक्ष्यांना कोठे कळते की ते किती सुंदर दिसतात? त्यांच्यासमोर आरसा धरला तर ते आरशाला चोची मारत बसतात. या प्रतिबिंबात गरिबी, श्रीमंती, कुरूप, सौंदर्य असे भेदभाव नष्ट होतात. प्रतिबिंब समोरच्या व्यक्तीला दिलासा देते. चेहरा सुंदर बनवण्याचे शास्त्र प्रगत आहे. शरीर सुंदर राखण्यासाठी नानाविध आहार, व्यायाम, कपडेही दररोज मार्केटमध्ये येतात. दर मिनिटाला स्टाइल बदलते. काळे केस सोनेरी बनवतात. उंच दिसायला हाय हिल्स, भुवया, ओठ, नाक, दुरुस्त करून मिळतात. प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. त्यालाही काही हरकत नाही. पण स्वत:च्या शरीरातला चेहरा किंवा तुम्ही कोण आहात, याची उत्तरे या मेक-अपच्या थरात लपून जातात.

फोटोग्राफी सुरू होण्याआधीचा हा एक काळ होता. अठराशे तीस साली फ्रान्समध्ये पहिल्यांदा फोटोग्राफीचा शोध लागला. त्या अगोदरच्या काळात सरंजामशाही होती. राजे, श्रीमंत व्यापारी यांची मक्तेदारी होती. देखणे घुमट असलेल्या मोठय़ा हवेल्या, चर्चेस, जडजवाहीर, भरजरी कपडे, रत्नजडित हत्यारे, उमदे घोडे, पर्शियन गालिचे, बेल्जियम झुंबरे, महालाभोवतीची बागेतली कारंजी असा नेटक्या थाटाचा हा काळ होता. त्यामध्ये महालामध्ये सजावटीसाठी युद्ध, शिकारी, समुद्रातील आरमारे अशी पेंटिंग्जही वापरली जायची. त्यात तेथेही ‘मी’ चा अवतार घुसला. त्यांना स्वत:च्या राण्या, मुले, घोडे, पाळीव कुत्रे अथवा शिकार करून पेंढा भरून ठेवलेल्या वाघ-काळवीटांचे पुतळे भिंतीवर लटकवायची इच्छा झाली. येथेच पोट्र्रेटस् आणि पोट्र्रेट आर्टिस्टचे युग सुरू झाले. या पोट्र्रेटची मागणी म्हणजे त्या व्यक्तीचे हुबेहूब चित्रण. एवढेच नाहीतर, त्याचा चेहरा अधिक रुबाबदार करण्याची मागणी असायची. त्याचा पेहेराव, त्यावरची सूक्ष्म कलाकुसर, त्याचे पोत, रंग, दागिन्यांची डिझाइन्स, त्यातले हिरे, माणके, पाचू, मोत्यांची कलाकुसर, लहान मुलांचे ड्रेस, त्यांच्या लोकरीच्या टोप्या, पाळीव कुत्र्यांचे छाटून विंचरलेले केस, पाठीमागे हातात फळांची ताटे घेऊन उभ्या असलेल्या दासी.. एवढे डिटेल्स करायला असत. प्रत्यक्ष समोर उभे राहून राजाची मर्जी राखून पेंट करायला महिनोन् महिने लागायचे. त्यामुळे तशी शिक्षणपद्धती सुरू झाली. मास्टरच्या हाताखाली अनेक स्टुडंट काम करायचे. त्यातही कोणी दागिने तर कोणी अंगवस्त्र पेंट करण्यात तरबेज व्हायचा. मुख्य मास्टर हा फक्त चेहरा रंगवायचा. त्यातही त्याची खास शैली असायची. त्या काळात अशी लाखो पोट्र्रेटस् तयार झाली. चित्रकारांची ती उपजीविका होती. या पेंटिंग लावण्यामागे त्या सरंजामशहाचे वैभव, ताकद, श्रीमंती, घराण्याची परंपरा दिसायची. त्यात दुसरी शाखाही होती. ती म्हणजे राजकीय महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे होय. त्यांची चित्रे कोर्ट-दरबारी अथवा सार्वजनिक महत्त्वाच्या कार्यालयात लावली जायची. त्यात युद्ध, विजय संपादून घरी आलेल्या सैनिकांचा उत्सव अशा घटनांचीही चित्रे रंगवली जायची. त्याचा दुसरा भाग म्हणजे डॉक्युमेंटशन होतो. युरोपातली बखर ही चित्रांतून पेंट केली गेली. ती पाहताना आपण थक्क होतो. त्यात मेमरीने कधी प्रत्यक्ष समोर बसून चितारलेले, त्यातली मांडणी, कसब, त्यातल्या प्रकाशाचा खेळ, डिटेल्स पाहता हजारो चित्रकारांचे योगदान लक्षात येते. असे असले तरी ही चित्रे त्यांची असाइन्मेंट होती. त्यात त्यांचे कसब होते. पण स्वत:ची प्रतिभा नव्हती. It was a given thought!त्यांच्या स्वत:च्या प्रतिभेने व्यक्त केलेली चित्रे बाहेर यायला पुढचा अधिक काळ जाणार होता. खोल व व्यापक विचार केला की मुळात ‘स्वत:’चा गौरव किंवा स्वत:भोवती निर्माण झालेले आभास या चित्रांत उतरवले गेले. तोही एक जमाना होता. तोही पुढे जातोच. पण वृत्ती तशीच राहते. आजच्या हॉलमध्ये स्वत:चे, फॅमिलीचे फोटो लावण्याची हौस अजूनही आहे, राहणारही!

या रेनेसान्स पिरीयडमध्ये चाललेल्या या कामाची गती आपोआप बदलत गेली. काळानुसार त्यात सॅच्युरेशन येत गेले. अशा वेळी क्रिएटिव्हिटी उफाळून बाहेर येते. बदल हा काळाचा महिमा आहे. तसाच कलाकारांच्या प्रतिभेचादेखील. त्यामुळे इंप्रेशनिस्ट, सर्रिअ‍ॅलिस्टिक, मॉडर्न पॉप आर्ट असे सुंदर ईझम जगाला मिळाले. काळाप्रमाणे अधिक मिळत राहतीलच. या ईझमच्या शर्यतीच्या पुढे जाणे आलेच. बदल आणि गती हे जीवनाचे ब्रीद वाक्य आहे. थांबला तो संपला, हे माझ्या ओतूरच्या छोटय़ा शाळेचे ब्रीद वाक्य होते. ते कळायला अनेक वर्षे लोटली. आताच्या चित्रकलेचे स्वरूप ‘पर्सनल’ एक्सप्रेशन झाले आहे. मागच्या पिढय़ांनी एवढे काम करून ठेवले आहे की शेवटी ते तोडून नवीन करून दाखविण्यासाठी पर्सनल दृष्टिकोनाकडेच जग वळले. डिमांड आणि सप्लाय अशा कठीण काळातून कला बाहेर पडली. पण ती बदलताना या प्रतिभावान चित्रकारांना वैयक्तिक छंदातून बाहेर पडावे लागले. तेथेच हा प्रश्न पुन्हा उभा राहतो. तो हा की- मी कोण आहे? मला काय सांगायचं आहे? इथेच स्वयम्चा शोध सुरू झाला. त्यांनी व्यक्त केलेली चित्रे, काव्य, वाङ्मय, नाटय़, शिल्प ही कर्मठ समाजाला धक्का देणारी होती. ती पचनी पडायला अवघड होती. पण ती कलेतल्या प्रवाहाची गरज होती. त्यामुळे आर्थिक संकटाला त्यांना तोंड द्यावे लागले. समाजात वैचारिक बैठक तयार व्हायलाही बराच काळ जावा लागतो. व्हिन्सेंट व्हानगो या महान कलाकाराचे केवळ एक चित्र त्याच्या आयुष्यात विकले गेले. गरिबी आणि डिप्रेशनने त्याचे आयुष्य संपले. त्याच्या पिढीतले- जे आज त्यांच्या पेंटिंग्जच्या किमती अब्जावधी आहेत ते मात्र अल्पायुषी राहिले. पण जाताना त्यांनी त्यांच्या माध्यमातून जगाला नवीन दृष्टी दिली.

त्या काळाच्या गरजेने चित्रकलेत दोन मार्ग पडले. एक म्हणजे ‘पोट्र्रेट’ हा विषय, दुसरा म्हणजे निसर्ग चित्र, धार्मिक विषय, अथवा फळे, फुले, पाने यांचे स्टील लाइफ होय. यादवी युद्धांनी परिस्थिती बदलली गेली. राजे-रजवाडे, व्यापारी यांच्या समृद्धीला उतरती कळा आली. तशीच सहजपणे या पोट्र्रेटच्या मागणीवर त्याचा परिणाम झाला. उरलेसुरले पोट्र्रेट आर्टिस्ट, उपजीविकेसाठी इतर देशात प्रवास करू लागले. काही भारतात राजे-रजवाडे, संस्थानांकडे येऊन थडकले. चित्रकारांचा पोट्र्रेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आहे तसे चितारण्याची त्यांची सवय आता तुटू लागली आणि मला काय वाटते, मला काय दिसते.. असे वैचारिक मंथन सुरू झाले! समोरची व्यक्ती कशी दिसते यापेक्षा आतल्या त्याच्या वृत्तीचा शोध घेण्यास सुरुवात झाली. मला काय भावते! ही शोधाची प्रक्रिया होती. इतर शाखांमध्येही हाच शोध अखंड चालू आहे. भारतीय परंपरेत तर खोलवर पाळेमुळे रुतली आहेत.

हिमालयातल्या गुहा, प्रार्थना, धार्मिकतेने चालणारे रस्ते, निरनिराळे तांत्रिक अघोरी पंथ, संतांची मवाळ भावातीत ध्याने, उपवासाचे प्रयोग, शरीरावर केलेले शास्त्रीय प्रयोग, संभोगातून समाधीकडे जाणारा एक विचार, तत्त्वज्ञानाच्या ग्रंथातले मांडलेले तात्त्विक विचार अशा पुराणातल्या मांडलेल्या पद्धतीचे खोदकाम सुरू झाले. याच शोधाचे प्रयोग चित्रकलेत आले, झाले, त्यापैकी एक म्हणजे ‘सेल्फ पोट्र्रेट’ होय.

आपल्या ‘सेल्फ’चे पोट्र्रेट करताना सारी दडपणे, नियम गळून पडले. मी मला असा दिसतो किंवा माझ्यात मी असा आहे. त्यामुळे छातीठोकपणे कलेतले आत्तापर्यंत जखडलेले विचार, कर्मठ दृष्टीला ते सामोरे उभे राहिले. टीकाकार तरी काय बोलणार? कळत नकळत हे चित्रकार आपल्या मनात लपलेल्या स्वयम्चे प्रयोग स्वत:च्याच चेहऱ्याच्या इमेजवर करू लागले. त्यामागे अध्यात्मातला एक रेशमी धागा होता. जगातल्या अनेक नामवंत चित्रकारांनी आपल्या स्टुडिओत हे प्रयोग सेल्फ पोट्र्रेटमध्ये केले. व्हिन्सेंट व्हानगो, पिकासो, दाली, मातीस, रेब्राँ, फिदा काहेलो.. अशी मोठी यादी आहे. व्हानगोची गोष्ट मजेशीर आहे. अठराशे शहाऐंशीच्या सुमारास त्याने पॅरिसमध्ये पंचवीसपेक्षा जास्त सेल्फ पोट्र्रेटस् केली. त्याला मॉडेल्सला द्यायला पैसे नव्हते. त्याने पुढेही सेल्फ पोट्र्रेट केली. ते करताना सहजता होती. सेल्फ पोट्र्रेट करता करता तुमच्यात लपलेली अनोखी स्टाइल जन्माला येते. जगातल्या या अनेक चित्रकारांची ही पोट्र्रेट पाहिली आणि त्यांची प्रसिद्ध पेंटिंग्ज पाहिली की जाणवते- त्यांना ही स्टाइल, हा विचार त्यांच्या सेल्फ पोट्र्रेटमध्येच सापडला आहे. म्युझियममध्ये ही सेल्फ पोट्र्रेट जपून ठेवलेली आहेत. त्यात जर नीट पाहिले तर जाणवते, स्वत:ला शोधण्याचे, जुने विचार तोडण्याचे प्रयोग, धडपड, त्यातून निर्माण झालेले अलौकिक काम किंवा स्वत:तल्या ‘मी’ ला शोधण्याची मुळंच दिसतात. प्रत्येक अस्सल कलाकाराला एक भीती असते की, स्वत:च्या प्रतिभेच्या जाळ्यात तो अडकतो की काय? एखादी स्टाइल, विषयाचे पेंटिंग प्रसिद्ध झाले, आर्थिक संपन्नता मिळाली की मानवी स्वभावाप्रमाणे त्याच चित्रांचे तो रिपिटेशन करतो. दुर्दैवाने याच रिपिटेशनच्या जाळ्यात अनेक चित्रकार संपले. अलिप्त होणे आणि स्वत:ला निरखणे झाले तरच या जाळ्यातून कठोर निश्चय, काम, विचार यांमुळे तो तरून जातो. हे चित्रकार योगीच असावेत. ते मोहात पडले नाहीत. अंतिम टप्प्यापर्यंत ते झगडतच राहिले. त्यांना ‘सेल्फ पोट्र्रेट’ ही प्रयोगशाळाच सापडली. व्यावसायिक पोट्र्रेट आणि सेल्फ पोट्र्रेट यांमध्ये हाच फरक आहे. बंधनाच्या भिंती त्यांनी पाडल्या आणि स्वत:ला मुक्त केले. सेल्फ पोट्र्रेट करताना मांडणी, रंगसंगती, लाइकनेस, साइज ही जुनी कहाणी नसते; त्यात स्वत:चे, विचारांच्या शोधाचे, नवीन दृष्टीचे मंथन असते. हे प्रयोग तो स्वत:वरच करत आला आहे. ही वाट त्यांना मिळाली. त्यावर ते चालत राहिले. सेल्फ पोट्र्रेट हा अजब मंत्र म्हणावा लागेल. त्यात  वन्स ओन पर्सन शोधण्याची खुबी आहे. मोकळा रस्ता आहे. कदाचित तो डेस्टिनेशनला पोहचलाही, अन्यथा तो चुकीचा मार्ग तर नाही हे म्युझियममध्ये त्यांची ही प्रयोगशील पोट्र्रेट पहाताना जाणवतं.

आता सेल्फीचं युग आले आहे. ती सेल्फ पोट्र्रेट आहेत का? त्यांना तो दर्जा द्यायचा का? हा वाद चालू आहे. सेल्फीचं आयुष्य क्षणभर असते. ते सेल्फी बदलता येतात, वगैरे चर्चेचे गुऱ्हाळ चालू राहील. एक लक्षात ठेवायलाच हवे, माणसाला चेहऱ्याचा नाद आहे. सेल्फ पोट्र्रेटमधला फरक लक्षात ठेवायला हवा. या पेंटर्सनी स्वत:चे चेहरे पेंट केलेले नाहीत. स्वत:ला शोधायचा त्यांचा हा मनस्वी प्रयोग होता. मी कोण आहे? माझ्यात दुसरा कोण आहे? या जगातल्या मानवजातीला पडलेल्या क्लिष्ट प्रश्नांना त्यांनी कलात्मक रूप दिले. त्यांचे आभारच मानायला हवेत. या चक्रातल्या शोधातली ही त्यांची सेल्फ पोट्र्रेट जगाला त्यांनी दिलेली अलौकिक भेट तर आहेच, पण ती बघताना तुमच्यातले तुम्ही कोण आहात हा विचार करायला प्रवृत्त करणारी ताकदही आहे.

Subhash.awchat @ gmail.com