– प्रिया धारूररकर
वास्तविक आणि काल्पनिक अशा दोन स्तरांवर चालणार्या अनेक गोष्टी एकत्र येतात. अनेक गोष्टी असल्यामुळे अर्थातच पात्रंही अनेक प्रकारची, जी आपापल्या वेगवेगळ्या स्वभावांना घेऊन येतात. स्वाभाविकपणे वावरतात. वेढे वळसे घेत, वळणवळणाने एक वीण तयार करतात. काळानुरूप घडणार्या असंख्य घटना, सामाजिक तसेच व्यक्तिगत संघर्ष व्यामिश्र भावासह उकल करत जातात. तसं एक अर्थपूर्ण कोलाज हळूहळू तयार होत जातं. आणि आपल्याला सुरुवातीला गोंधळात टाकणारी पण एक अर्थपूर्ण अशी ‘स स र’ ही कादंबरी तिच्या विश्वात वाचकाला घेऊन जाते.
अनेक पात्रं, त्यांचं व्यक्तिमत्त्व समजूत घेत त्यांना अस्तित्व बहाल करणं… आशयाला आपल्या मनोव्यापारातून कादंबरीच्या रूपाने अभिव्यक्त करत जाणं हे तसं खरं तर अवघड. ‘स स र’ म्हणजे सई सरिता रत्ना! नायिकाप्रधान अशा या कादंबरीत तिघीही अगदी स्वतंत्र, तरीही त्यांच्यात असणारा एक बंध आणि या तिघींभोवती फिरणारं पूर्ण कथानक. त्याग, समर्पण, धैर्य, हळवं आणि तेवढंच उत्कट प्रेम आणि त्याचबरोबर असणारं सामाजिक भान हेसुद्धा अधोरेखित करणारं असं कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. कादंबरीच्या अवकाशात सातत्याने असंख्य घटना घडत राहतात. या घटना वाचकाच्या मनात उत्सुकता निर्माण करतात आणि लेखकाची भाषा चित्रदर्शी असल्यामुळे कथेतील वर्णन वाचकाच्या मनात चित्रांकित होत जातं. वाचक त्या त्या वातावरणाशी समरस होऊ लागतो. कादंबरीत येणारं आदिवासी आणि मेळघाटचं वर्णन, तिथं घडणारे नाट्यमय प्रसंग वाचकालाही वेगळा अनुभव देतात. त्यांची संस्कृती समजून घ्यायला भाग पाडतात.
ही कादंबरी आदिवासींच्या जगण्यावर, राजकारणावर, समाजकारणावरसुद्धा भाष्य करते. विषमतेवर बोलते. जगणं मरणं, जगण्यातली उद्विग्नता, फोलपणा आणि जगण्यातली इतिकर्तव्यताही बारकाव्यानिशी मांडत जाते.
बैरागड, हरीसाल, सेमाडोह, अतिदुर्गम चेथर असा पाडा, धारणी, चिखलदरा या भागातील कोरकू आदिवासींचं जगणं अतिशय सुरेख पद्धतीने लेखकानं मांडलं आहे. इथं गुलमोहराच्या साक्षीनं वाहणारी तापीनदीदेखील आहे. कादंबरीसाठी लेखकाने मेळघाटच्या दुर्गम भागात काही काळ राहून आदिवासींची सगळी संस्कृती समजून घेतली आहे. त्यांचं जगणं अनुभवलंय- जे कादंबरीत सहजपणे उतरलं आहे. हे खरंच विशेष आहे. कादंबरीचा नायक सारंग जेव्हा या जंगलात एका आदिवासी स्त्रीचा फोटो काढत असतो तेव्हा ती म्हणते, ‘‘हमारा क्या फोटू निकालता, हमारे जंगल का फोटू निकालो,’’ अनपढ अशा त्या बाईच्या तोंडून नकळत बाहेर पडलेलं तिथल्या जंगलाबद्दलचं- जल, जंगल, जमीन यावर प्रेम दिसून येतं.
या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे यात येणारे तपशील. एका सत्याचा मागोवा घेत कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र शब्दांच्या माध्यमातून आविष्कारित होत जातं. सई, सरिता, रत्ना यांच्याइतकीच ही कादंबरी धनराज देशमुख, शंकर यांचीही आहे. देशमुख वाड्याची, खारकर आळीचीही आहे. मानवी स्वभावात आढळणार्या चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींचीही आहे. यात तरुण वयातलं कोवळं प्रेम आहे, आदिवासींचं निरातिशय असणं आहे.
सामाजिक कार्य करणार्या व्यक्तींचं चित्रणही आहे, समजूतदार शहाणपण आहे. जेवढं वर्णन मेळघाटातलं आहे तेवढंच शहरी भागातलंही आहे. इथं गुन्हेगारी विश्वदेखील आहे. शौर्य, धैर्य, स्फूर्ती रहस्यमयता, शृंगार, दु:ख एकूणच नवरसांनी भरलेली अशी ही कादंबरी आहे. आणि या कादंबरीतला सस्पेन्ससुद्धा उत्कंठावर्धक आहे. नात्याचे उलगडणारे बंध नक्कीच मोहक आहेत. त्यामुळे ही कादंबरी कौटुंबिकसुद्धा आहे. प्रवाही आणि तेवढीच संवादी असणार्या या कादंबरीत मात्र काही वेळेस वर्णनाची लांबी थोडी जास्ती वाटते. काही संवाद अनाठायी वाटतात. ती जर लेखकाला कमी करता आली असती, काही अनावश्यक संवाद टाळता आले असते तर आत्ता जेवढी वेधक ही कादंबरी आहे कदाचित अजून जास्त ती कादंबरी चित्तवेधक झाली असती.
‘स स र’, मनोहर मंडवाले
मिहाना पब्लिकेशन्स,
पाने- ४०८, किंमत- ५५० रुपये.
