चाळीस वर्षांनंतर..

‘सात सक्कं त्रेचाळीस’ या किरण नगरकर यांच्या कादंबरीला या वर्षी ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने तिची क्लासिक आवृत्ती शब्द पब्लिकेशन काढत असून त्याचे प्रकाशन १५ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्ताने किरण नगरकर यांनी लिहिलेल्या मनोगताचा संपादित अंश..

‘सात सक्कं त्रेचाळीस’ या किरण नगरकर यांच्या कादंबरीला या वर्षी ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने तिची क्लासिक आवृत्ती शब्द पब्लिकेशन काढत असून त्याचे प्रकाशन १५ सप्टेंबर रोजी होत आहे. त्यानिमित्ताने किरण नगरकर यांनी लिहिलेल्या मनोगताचा संपादित अंश..
१९६६ साली मी मुंबई विद्यापीठात एम. ए. करत असताना माझी ओळख दिलीप चित्रे यांच्याशी झाली. ‘The Moon Had To Be Mended’या माझ्या गोष्टीचा दिलीपने अनुवाद केला आणि त्याच्या वडिलांच्या ‘अभिरुची’ मासिकात छापला. नंतर एका संध्याकाळी बोलता बोलता दिलीप मला म्हणाला की, ‘अभिरुची’च्या पुढच्या अंकाचं संपादन त्याच्या वडिलांनी त्याच्यावर सोपवलं आहे. मी घरी आलो आणि मराठीमध्ये लिहिलेली माझी पहिली आणि शेवटची गोष्ट ‘तो’ लिहिली. दुसऱ्या दिवशी मी ‘तो परत पिऊन आलेला..’ या वाक्याने ‘सातं सक्कं..’ची सुरुवात केली. किती पानांची कादंबरी होणार याची मला बिल्कुल कल्पना नव्हती; पण सुमारे एक-तृतीयांश लिहिल्यानंतर दिलीपने ती ‘अभिरुची’मध्ये छापली. कादंबरीतलंच एक वाक्य उचलून त्याने नामकरणविधी पार पाडला.
सतराशे विघ्नं पार करेपर्यंत सहा का सात र्वष लागली. शेवटी ‘मौज’ने कादंबरी प्रकाशित केली. श्री. पु. भागवत माझे संपादक. त्यांची नजर अचूक. संपादन कशाशी खातात हे श्रीपुंकडून शिकावं. कधी कधी एखाद्या शब्दाची किंवा वाक्याची जागा बदलून दुसरीकडे ठेवल्याने किती फरक पडतो, हे त्यांनी मला दाखवलं. मला भीती वाटायची, की लैंगिक गोष्टींचा माझा उघडपणा त्यांना रुचणार नाही. पण या शंकेस वास्तवात आधार कधीच मिळाला नाही.
प्रकाशित झाल्यावर ‘सात सक्कं..’ला जर कोणाचा पाठिंबा मिळाला असेल, तर ते माझे दोन आधारस्तंभ- रा. भा. पाटणकर आणि मे. पुं. रेगे यांचा. पाटणकरांनी मला एम. ए.ला दोन र्वष शिकवलं. मे. पुं.नी कधीच नाही. पण दोघे माझे गुरू.
रेगेंबरोबर बोलायला मी क्वचित धजायचो. इतका थोर विचारवंत, इतकी मेहनत घेणारा, इतका अहंकाररहित, इतका गुणी फिलॉसॉफर मिळणं कठीण. त्यांची दोन वाक्यं मी कधी विसरणार नाही. ‘‘अरे किरण, तुला हे समजायला हवं की, Students learn despite their teachers’’ आणि दुसरं, ‘‘विषयामध्ये गती नसते तेव्हा भाषेला दुबरेध करायची गरज भासते.’’
मी एम. ए. करत असताना एकदा पाटणकर म्हणाले, ‘‘भाषा तुम्ही कराल तेवढी समृद्ध.’’ मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला वाटतं की, ‘सात सक्कं..’चा सरांच्या या विधानाशी निकटचा संबंध असणार. साहित्याबद्दल व भाषेबद्दल माझे आजतागायत जे दृष्टिकोण आहेत त्यावर पाटणकरांचा पगडा आहे, हे निश्चित.
प्रत्येक लेखक आपली वाट शोधतो आणि प्रत्येकाचे स्वत:करिता असलेले आंतरिक नियम असतात. उद्याचं मला माहीत नाही; परंतु आजपर्यंतच्या माझ्या लिखाणाच्या बाबतीत मला स्वत:ला आत्मभानापासून वेगळं करता येत नाही. तत्त्वज्ञान, सोशिऑलॉजी, संशोधन किंवा पेंटिंग हे माझे विषय नाहीत. माझा पिंड गोष्टी सांगणाऱ्याचा. माझ्या मते, गोष्टकार हा फक्त एक जबरदस्त संवेदनशील माध्यम असतो. अहंपणा आणि गोष्टीचा छत्तीसचा आकडा. कादंबरीतली पात्रं, त्यांच्या आयुष्याचा प्रवाह, एकमेकांच्या संबंधांची गुंतागुंत आणि प्रवासाच्या शेवटी ते कुठे पोहोचतात, याच्या बाहेरचं सगळं संपूर्ण असंबद्ध. जेवढय़ा निष्ठेने लेखक आपल्या comfort zone मध्ये बसणाऱ्या वर्तुळातल्या व्यक्तींना उभं करू शकतो, तेवढय़ाच तीव्रतेने जर तो अगदी प्रतिकूल पात्रांशी वाचकांचा परिचय करू शकला आणि त्यांना खऱ्याखुऱ्या हाडामांसाचा बनवू शकला, तरच त्याला सलाम करण्यात अर्थ आहे. पात्रांशी इमानदारीने वागाल तरच ती जिवंत निपजतील; नाही तर ती कठपुतळीच राहतील.
हे सांगणे न लगे, की माझ्या काल्पनिक जगात content dictates form and style, tone and pitch. भाषेची निवड तसंच कादंबरीचा घाट हे सगळं पात्रांवर आणि प्रसंगांवर अवलंबून. या चौकटीत लक्ष वेधण्यासाठी सनसनाटी लिखाण करणे, मी किती हुशार आहे, हे प्रदर्शित करण्याकरिता शब्दखेळ वा कादंबरीसाठी केलेला रीसर्च, कारण असो वा नसो- घुसडायचा, या सगळ्यासाठी माझ्या लेखनकायद्यात जागा नाही.
‘सात सक्कं..’बद्दल बोलताना एक मुद्दा तरी निर्विवाद आहे. कथानकामध्ये सतत सिनेमाच्या टेक्निक्स दिसतात. आमच्या घरातले सिनेमा क्वचितच बघायचे. जे मी पाहिले ते प्रामुख्याने हॉलीवूडचे. हिंदी नाहीच. १९५० आणि ६० च्या दशकात थोडय़ाफार प्रमाणात हॉलीवूडच्या सिनेमात जम्पकट्स आणि फ्लॅशबॅक्स वापरायचे. पण सिनेमाचा घाट एका वेगळ्याच तऱ्हेने बदलला तो म्हणजे- आलेहांद्रो गोंझालेस इन्यारितूच्या ‘आमोरेस पेरॉस’ या मेक्सिकन चित्रपटाने. तीन समांतर कथानकं घ्या आणि त्यांना ट्रॅफिक लाइट्स चालत नसलेल्या मेक्सिको शहराच्या रस्त्यांवर सोडा. अर्थात ट्रॅफिक पोलीससुद्धा गायब. अशा परिस्थितीत ट्रॅफिक रूल्स गेले खड्डय़ात. तीन कथानकांची रेस सुरू आहे. तीन गाडय़ा तुफान गतीने पुढे-मागे न बघता, उजवं-डावं याकडे दुर्लक्ष करत आत-बाहेर, बाहेर-आत करत अगदी ‘फिनिश’ लाइनपर्यंत पोहोचतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. त्या बेसुमार अस्ताव्यस्त स्थितीत प्रत्येक हालचाल, प्रत्येक घटना आणि प्रत्येक छटा स्क्रिप्ट रायटर आणि दिग्दर्शकाने कोरिओग्रॅफ केलेली.. आणि म्हणूनच जेव्हा या तीन गोष्टींच्या इंटरकनेक्शन्स कळतात, तेव्हा सगळा उलगडा होतो आणि पाहणाऱ्याला एक आगळाच अनुभव येतो.
‘सात सक्कं..’ १९६७ ते ७४ पर्यंत लिहिली गेली. म्हणजे ‘आमोरेस पेरॉस’च्या ३० र्वष अगोदर. कादंबरीत तीन नाही, १० ते ११ समांतर कथानकं ट्रॅफिक पोलीस आणि ट्रॅफिक लाइट्सच्या शिवाय पुढे चालली आहेत. कदाचित यामुळे ४० वर्षांपूर्वी पहिल्या दोन वा तीन प्रकरणांनंतर काही वाचक मंडळींना ही कादंबरी कठीण गेली असेल. ४० वर्षांनंतरच्या पिढीला सिनेमाच्या अनेक पद्धती, भाषा, तंत्रं अंगवळणी पडली आहेत. या मंडळींचं आणि ‘सात सक्कं..’चं किती जमतंय, हे बघू या.
एक तर ही कादंबरी आहे की नाही, याबद्दल समीक्षकांनी बरीच चर्चा केलेली. सर्वात कटकटीची गोष्ट म्हणजे अनेक कथानकांची गुंतागुंत. सरळ अथपासून इतिपर्यंत नगरकरांना गोष्ट लिहिता येत नाही का? दुसरं म्हणजे, भाषा मराठीच आहे की नाही, हा आणखीन एक प्रश्न. (भाषेच्या संदर्भात जयवंत दळवींनी मारलेला टोला माझा सर्वात लाडका. ‘ललित’ मासिकामधल्या ‘ठणठणपाळ’मध्ये त्यांनी प्रश्न उभा केला होता.. ‘आम्ही असं ऐकतो की, नगरकरांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’चा इंग्रजीमध्ये अनुवाद होत आहे. अहो, पण अनुवाद पहिल्यांदा मराठीमध्ये नको का करायला?’) ‘सात सक्कं..’ची भाषा वेगळी आहे, हा मुद्दा अनेकांनी मांडला आहे. या भाषेला आणि तंत्रांना तुम्ही परत का नाही वापरत, असं मला बऱ्याच वेळा विचारलं जातं. एखादी गोष्ट अथवा स्टाईल यशस्वी ठरली म्हणून तिला परत परत वापरण्यात मला रस नाही. प्रत्येक कादंबरीच्या मागण्या वेगळ्या; तेव्हा तिचा घाट आणि भाषा वेगळ्या असणारच.
प्रयोगासाठी प्रयोग करण्यामध्ये मला तथ्य वाटत नाही आणि रसही नाही. परंतु हेही तितकंच खरं आहे की, ज्या प्रयोगातून काहीतरी महत्त्वाचं हाती येतं, तशा प्रयोगांची सगळ्याच क्षेत्रांत गरज असते. मुंबई ही एक रिंगवाली वा पाच रिंगवालीसुद्धा सर्कस नाहीये. ती वीस, तीस, पन्नास रिंगवाली सर्कस आहे. Chaos is itls element and it thrives on it. या मॅड, सतत अ‍ॅड्रिनालिनवर जगणाऱ्या शहराला माझ्या कादंबरीत उतरवायचा माझा यत्न होता आणि म्हणूनच मला वेगळ्या तंत्राची गरज भासली. पहिल्या पानापासूनच कुशंक सगळं काही ‘तू’ या व्यक्तीला सांगतोय, हे बरंच पुढे लक्षात येतं. आयरनी अशी की, ‘तू’ त्याच्या आयुष्यातून केव्हाच नाहीशी झाल्येय. एखादी व्यक्ती बेपत्ता झाली म्हणून आपण तिच्याशी बोलणं थोडंच थांबवतो?
कुठलीही कलाकृती बारकाईने बघितल्यावर अथवा वाचल्यावर ‘ती भिकार आहे, ताप देणारी आहे, न वाचलेली बरी किंवा उत्कृष्ट आहे,’ हे सांगणं टीकाकाराचं कर्तव्य. या सूक्ष्म वाचनाच्या जोरावरच तो सांगू शकतो की, कादंबरी कशाबद्दल आहे? तिचा गर्भ, दृष्टिकोण आणि आशय काय? पण तो ही मतं का किंवा कशाच्या जोरावर मांडतो आहे, हे स्वच्छ, सुलभ भाषेत सांगणं हा त्याचा धर्म आहे. समीक्षा करताना तुम्ही सौंदर्यशास्त्रातील कोणती परिमाणं वापरता आहात, हे स्पष्ट करायलाच पाहिजे. परंतु सगळा पुरावा लेखकाने वापरलेल्या शब्दात, वाक्यात, कलाकृतीच्या घाटात आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे सगळं काही त्या एका कादंबरीच्या चौकटीत बसतं ते. बऱ्याच वेळा समीक्षकाने रिव्ह्य़ू केलेली कादंबरी आणि लेखकाने लिहिलेली कादंबरी ही दोन वेगळी पुस्तकं आहेत का, असा प्रश्न पडतो. कादंबरी दुबरेध असेल तर एखाद् वेळी वेगवेगळे समीक्षक निरनिराळे निष्कर्ष काढू शकतात. पण कित्येकदा समीक्षकाने कादंबरी चोख न वाचल्यामुळे बऱ्याच गैर तर्काना मुभा मिळते.
‘सात सक्कं’मध्ये अनेक भयानक, ट्रॅजिक, हतबल प्रसंग आहेत. त्याकाळच्या अनेक समीक्षकांनी त्यामुळे कादंबरी ं’्रील्लं३्रल्ल बद्दल आहे, असा दावा केला. ‘सात सक्कं..’ अशी एकांगी कादंबरी आहे, की समीक्षकाचा दृष्टिकोण एकांगी आहे, हे अर्थात वाचकाला ठरवावं लागेल. पण पुस्तकातल्या शब्दांचा, प्रसंगांचा पुरावा काय दाखवतोय, हे सर्वात महत्त्वाचं. कित्येक प्रसंग अगदी दिलखुलास हसवतात का? काही प्रसंग इतके भयंकर असले तरी काळ्याशार विनोदामुळे तोल सांभाळणं कठीण जातं का? कुशंक सगळा तपशील नोंद करताना त्याच्या चेहऱ्यावरची रेषा हलत नाही; परंतु तो कोणाची री ओढतो आहे, हे वाचकाच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. एवढंच नाही, कुशंक अत्यंत हावरा माणूस आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण तो संपूर्ण जगू पाहतो. जगण्याची त्याची हाव इतकी जबरदस्त आहे, की कधी कधी तो अमानुष वाटतो का? प्रश्न असा आहे, कोणाचं जीवन संपूर्ण सुसंगत असतं? माणूस म्हटला की contradictions आणि परस्परविरोधी तपशिलाशिवाय दुसरं काही सापडायचं नाही.
‘सात सक्कं’च्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर तीन अवतरणं दिली होती, हे बऱ्याच समीक्षकांना खटकलं. नगरकरांनी कसं स्वत:चं घोडं पुढे दौडवण्याचा प्रयत्न केला आहे याबद्दल मला त्यांनी धारेवर धरलं. ‘नाव किरण आणि आव सूर्याचा!’ असा एका समीक्षकाने दावा केला.
गमतीची गोष्ट अशी की, पुस्तक छापायला घेतलं तेव्हा श्री. पु. मला म्हणाले होते,‘ कव्हर रंगीत असायला हरकत नाही.’ मी ताबडतोब माझा मित्र अरुण कोलटकर याला ही चांगली खबर दिली आणि त्याला ‘सात सक्कं..’चं मुखपृष्ठ तयार करायची विनंती केली. दुर्दैवाने सगळं काम झाल्यावर श्री. पु. म्हणाले की, रंगीत कव्हरसाठी पैसे नाहीत. म्हणून मुखपृष्ठ टायपोग्राफिकल करायचा निर्णय घेतला गेला आणि मला रा. भा. पाटणकर, मे. पुं. रेगे आणि भाऊ पाध्येंकडे धाव घ्यावी लागली. पुस्तकाचे समीक्षक पुढे पानंच्या पानं हुज्जत घालत बसले- ‘सात सक्कं..’ हा कुठच्या तऱ्हेचा प्राणी आहे? तिच्यात कथानकाचे सूत्र नाही. कादंबरी आहे, लघुकथांचा संग्रह आहे, की अगदी वेगळा हायब्रिड प्रकार आहे? हा प्राणी काय सांगू पाहतोय? भाषेचा वापर, विनोदाची जात, फॉर्म हे सगळं दुय्यम आणि फालतू. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेबल. ते चिकटवल्याशिवाय पुढचं पाऊल घेणं अशक्य. आता प्रश्न असा आहे की, समीक्षा कादंबरीबद्दल असावी का ब्लर्ब्सबद्दल? तिच्या लेबलवर का तिच्या आशयाबद्दल आणि तिच्या अंतरंगाबद्दल? अर्थात या सगळ्या समीक्षकांनी मला बुचकळ्यात पाडलं, त्यात काही नवल नाही. आनंदाची गोष्ट एवढीच, की अरुणचं टायपोग्राफिकल कव्हर ४० वर्षांनंतरदेखील तितकंच ताजं आणि प्रभावी आहे.
‘सात सक्कं..’मध्ये आत्मचरित्राचे अंश नक्कीच आहेत. (कुठच्या कादंबरीत नसतात?) पण एका बाबतीत माझं नशीब जोरावर होतं. पहिल्या कादंबरीपासूनच मी भरपूर खोटं बोलायला लागलो होतो. माझा खोटेपणा मनाची पकड घेतो का? तो किती परिणामकारक आहे? मुद्दा असा आहे की, मी किती उत्कृष्ट खोटारडा आहे, हे फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे. जादूगाराच्या पोतडीमधून- म्हणजेच कल्पनाशक्तीतून ज्या बायकांना, पुरुषांना आणि मुलांना मी उभे करतो, त्यांच्या हृदयांचे ठोके ऐकू येतात का? ते तुमच्या-माझ्यासारखे धडपडत, कडमडत स्वत:ला सावरतात का? ते कधी कधी आपण करतो आहोत ते बरोबर नाही, हे जाणूनही तेच करत राहतात का? कधी ते संपूर्ण हताश होऊन जीवनाचा पसारा आटपायचा विचार करतात का? त्यांच्या प्रेमात, रागात, द्वेषात, कोतेपणात आणि चांगुलपणात भरपूर माणुसकीचा अनुभव येतो की नाही, याचा निर्णय ‘सात सक्कं..’चे वाचकच घेऊ  शकतील.    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आगामी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Saat sakkam trechalis by kiran nagarkar after fourty years

Next Story
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची : मातीचे डाग पायावर घेऊन वावरणारा साहित्यिक
ताज्या बातम्या