कौस्तुभ विकास आमटे
साधनाताई आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ५ मे रोजी होईल. समाजाच्या परिघाबाहेर फेकल्या गेलेल्या उपेक्षितांचा शोध घेत त्यांच्या सशक्तीकरणाचा वसा त्यांनी आयुष्यभर चालविला. बाबा आमटे यांच्यासह १९४९ साली त्यांनी रोवलेल्या ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या सेवाभावी संस्थारूपी बीजाचा आज डौलदार वृक्ष कसा झाला, यासह साधनाताईंचे नातवाच्या नजरेतून शब्दचित्र…

माझा जन्म १९७७ चा. लहानपणच्या आठवणी तशा धूसर आहेत, पण काही प्रसंग मनावर कायमचे कोरले गेले आहेत. माझी आई, म्हणजे डॉ. भारती विकास आमटे, मानेच्या आणि पाठीच्या आजाराने बरेचदा त्रस्त असे. त्यातच १९८१ मध्ये जन्मलेल्या माझ्या धाकट्या बहिणीच्या, शीतलच्या दोन्ही पायांना जन्मानंतर पहिल्याच वर्षात काही महिन्यांसाठी प्लास्टर घालावे लागले होते.

एकीकडे आनंदवनाचा दोन वेळचा दवाखाना आणि दुसरीकडे शीतलचे आजारपण, यात आईची खूप ओढाताण व्हायची. अशा वेळी माझा मुक्काम हक्काने आजीकडे असायचा. रात्री आजीच्या दंडाला घट्ट पकडून, तिच्या कुशीत रामायण-महाभारताच्या गोष्टी ऐकत झोपणे, हा माझा रोजचा ‘रात्र-क्रम’ होता. त्यात माझा हट्ट असा की, तिचा दंड मला ‘थंड’च लागायला हवा! एक दंड गरम झाला की मी तिला कूस बदलायला लावून दुसरा दंड पकडत असे.

उन्हाळ्यात तर मी हट्टाने तिला तिच्या दंडांना बर्फ लावायला लावायचो आणि तीही माझ्यासाठी ते निमूटपणे करत असे. कधी ताप आला की रात्र-रात्र जागून कपाळावर बर्फाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवणारी आणि अंग ओल्या टॉवेलने पुसणारी आजी मला आजही लख्ख आठवते. रात्री तिच्याजवळ झोपण्यापासून ते सकाळी तिने करून दिलेली कॉफी पिण्यापर्यंतचा वेळ फक्त माझा असायचा. मी दूध पीत नसे, म्हणून ती दुधात चमचाभर नेसकॉफी घालून मला ‘रंगीत दूध’ द्यायची. त्या प्रेमापोटीच मला बिनसाखरेच्या कडू कॉफीची सवय लागली ती कायमची! पुढे माझा मोठा भाऊ दिगंत चौथीपासून आनंदवनात राहायला आला आणि हा रात्र-क्रम आम्हा दोघांचा झाला.

पण ही माया फक्त आम्हा सख्ख्या नातवांपुरती मर्यादित नव्हती. आनंदवनातल्या ‘गोकुळ’ प्रकल्पातील अनाथ नातू-नातींसाठी ती हक्काची सावली आणि खर्‍या अर्थाने ‘नाथ’ होती. या तान्हुल्यांची दुखणीखुपणी निस्तरताना, दिवाळी-सणवाराला त्यांना स्वत:च्या हाताने अभ्यंगस्नान घालून औक्षण करताना किंवा त्यांच्या आहाराची काटेकोर काळजी घेताना, तिच्यातल्या उत्कट मायेचा आणि मातृत्वाचा झरा अखंड वाहत असे. तिचे हे मातृत्व केवळ रक्ताच्या नात्यात अडकलेले नव्हते; पोरक्या जीवांना हक्काने कुशीत घेणारे तिचे हे ‘विश्वमातृत्व’ खर्‍या अर्थाने वंदनीय होते.

आनंदवन आणि संस्थेचे इतर प्रकल्प म्हणजे कुष्ठपीडित, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी, अनाथ, परित्यक्ता, दुर्बलमनस्क, अशा २५०० बांधवांचे एक अवाढव्य विस्तारित कुटुंब. जिथे एवढे मोठे कुटुंब असते, तिथे कुरबुरी आणि मतभेद ओघाने येतातच. या कुरबुरींचे रूपांतर कधीही लढाईत होऊ नये, यासाठी वेळेत न्यायनिवाडा करावा लागे. मुले-मुली, बाया-माणसे अत्यंत हक्काने त्यांच्या ‘साधना-ताई’, ‘साधना-आई’ किंवा ‘साधना-आजी’कडे येत. ताईंनी दिलेला निवाडा म्हणजे अंतिम न्याय अशी सर्वांची श्रद्धा होती.

हा निवाडा कधी साधा, तर कधी उग्र असे. किरकोळ वादात, पुन्हा न भांडण्याची शपथ देणे, चुकीबद्दल देवळात हार-नारळ अर्पण करून माफी मागायला लावणे, असा साधा न्याय असे. पण कुणी महिलांची किंवा मुलींची छेड काढण्यासारखी गंभीर चूक केली, तर आजी प्रसंगी त्याच्या कानाखाली जाळ काढायलाही मागेपुढे पाहत नसे. लोक न्यायनिवाड्यासाठी तुलनेने मवाळ आजीकडेच जाणे पसंत करत, कारण जहाल बाबांपुढे जाणे म्हणजे एक अग्निदिव्यच असायचे! चूक करेल त्याला कठोर शासन आणि पश्चात्ताप करेल त्याला तितकीच क्षमा, असा तिचा हा ‘रोकठोक न्याय’ आणि ‘कडक शिस्त’ संस्थेचा भक्कम कणा बनून राहिली.

हे सगळे बघत आणि अनुभवत आमची तिसरी पिढी मोठी होत होती. आजीच्या कृतीतून माणुसकीचे जे धडे आम्ही गिरवले, ते कायमचे मनावर ठसले आहेत. ऐंशीच्या दशकातील मार्च महिन्यातली एका होळीची आठवण आहे. होळी आणि पोळ्याला संस्थेच्या सर्व प्रकल्पांतील निवासी बांधव, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांसाठी पुरणपोळीचे जेवण असते. त्या वर्षी मार्चमध्ये खूप कडक ऊन होते. आनंदवनात बांधकामे सुरू असल्याने बाहेरची काही मजूर कुटुंबे तिथे मुक्कामाला होती. त्यांचे आई-वडील राबत असताना त्यांची पोरे-बाळे उन्हात गरम रेतीच्या ढिगावर खेळत होती. सण असल्याने आमची सामूहिक पंगत सकाळी १० ऐवजी दुपारी १२.३० ला बसली.

आचार्‍यांनी गरम पुरणपोळ्या वाढायला सुरुवात करणार, तोच आजी हरी नावाच्या आचार्‍यावर कडाडली, ‘‘हरी, तुला लाज वाटत नाही का?’’ हरी घाबरून म्हणाला, ‘‘ताई, काय झालं?’’ आजी संतप्त होत म्हणाली, ‘‘अरे, बाहेर त्या गरम रेतीवर बसलेली पोरे आणि राबणारे त्यांचे आईवडील तुला दिसत नाहीत का? सणावाराच्या दिवशी तरी स्वत: जेवण्याआधी तुम्हाला त्यांची आठवण होऊ नये? जा, आधी या पुरणपोळ्या आणि भजी त्यांना डब्यातून देऊन ये. तू परत आल्यावरच ही पंगत सुरू होईल.’’ सगळी पंगत चिडीचूप झाली. हरीने मजुरांना जेवण पोहोचवले आणि २० मिनिटांनी परत आल्यावरच आमचे जेवण सुरू झाले.

तिचा हाच अलिखित नियम आनंदवनात येणार्‍या बड्या पाहुण्यांसाठीही असायचा. आनंदवनात येणार्‍या कोणत्याही मंत्र्याच्या, आमदाराच्या किंवा उच्चपदस्थ अधिकार्‍याच्या ताफ्यासोबत असलेल्या पोलीसदादांना- तायांना आणि ड्रायव्हर मंडळींना आधी चहा-सरबत दिले जावे, हा तिचा दंडक होता. स्वत:च्या आधी कर्मचार्‍यांची होणारी सरबराई पाहून मोठे अधिकारी चक्रावून जात, पण प्रत्यक्ष साधनाताईंपुढे बोलण्याची कुणाची हिंमत नसायची. कोणत्याही तत्त्वज्ञानाचा आधार न घेता, श्रमिकांच्या भुकेला पहिला मान देणारी तिची ही ‘कृतिशील करुणा’ आणि ‘माणुसकीची प्राथमिकता’ आम्हाला आयुष्याचा सर्वांत मोठा धडा शिकवून गेली.

आजीने रुजवलेला आणखी एक ‘अन्न-संस्कार’ तिच्या पश्चातही कसा जिवंत आहे, याची प्रचीती देणारा एक प्रसंग २०१३ मध्ये घडला. महारोगी सेवा समितीचे पुणेस्थित आप्त डॉ. मंदार परांजपे हे २३ मे रोजी आनंदवनातून नागपूर स्टेशनला जाण्यासाठी ऐन दुपारी २ च्या सुमारास निघाले. संस्थेची अशी परंपरा आहे की, पाहुणा परतीच्या प्रवासाला निघाला की त्याला सोबत शिदोरी (बटाट्याची भाजी-पोळी किंवा पराठे) दिली जाते. पण त्या दिवशी डॉ. परांजपे यांना शिदोरी दिली गेली नाही.

ते वाटेत सतत विचार करत होते, ‘ताई-बाबांच्या पश्चात संस्थेचा संस्कार बदलला का?’ हा विचार त्यांना अतीव दु:ख देत होता. पण दीड तासाने त्यांची गाडी नागपूरजवळील ‘अशोकवन’ प्रकल्पाजवळ थांबली. तिथे आमचा एक कार्यकर्ता हातात ताजी भाजी-पोळीची शिदोरी घेऊन उभा होता. तो म्हणाला, ‘‘भाऊ, सध्या ऊन जास्तच तापून राहिलं आहे. सकाळीच भाजी केली तर ती खराब होईल, म्हणून आनंदवनातून फोन आला होता की तुम्ही तिथून निघाले की इथे ताजी भाजी-पोळी बनवून, पंख्याखाली थंड करून डब्यात भरावी.’’ हे ऐकून डॉ. परांजपे भारावून गेले. पाहुण्यांचा विसर न पडू देणारे तिचे हे निरलस आदरातिथ्य आणि तिच्या पश्चातही कार्यकर्त्यांच्या रक्तात भिनलेले तिचे हे संस्कार तिच्या चिरंतन अस्तित्वाची साक्ष देतात.

बाबांचे जीवन म्हणजे एक अखंड झंझावात होता. ८० च्या दशकात, ‘भारत-जोडो’ सायकल अभियाने आणि पेटलेल्या पंजाबात शांतता मोहिमेसाठी केलेल्या वार्‍या, यात बाबा पूर्णपणे व्यापलेले होते. अशा वेळी संस्थेच्या सर्व प्रकल्पांची जबाबदारी आजीने अत्यंत समर्थपणे पेलली. पण १९९० च्या मार्च महिन्यात बाबांनी अचानक नर्मदा आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि ते थेट नर्मदाकिनारी एका छोट्या झोपडीत वास्तव्याला गेले. आजीला किंवा घरात कुणालाच याची पूर्वकल्पना नव्हती. पण आजीने कुठलीही तक्रार न करता आपली अटल साथ कायम ठेवली.

पुढील १२ वर्षे, बाबा आनंदवनात परतेपर्यंत, तिची ‘आनंदवन- नर्मदा- आनंदवन’ ही ८५०-९०० किमीची खडतर वारी बसचे धक्के खात अखंड सुरू राहिली. आम्ही सुट्टीत त्यांना भेटायला तिथे जायचो. तिथे देशभरातून येणार्‍या कार्यकर्त्यांची सतत रेलचेल असे आणि आजीचा पूर्ण वेळ त्यांचे हवे-नको पाहण्यातच जायचा. आम्हाला राग यायचा, पण आजी म्हणायची, ‘‘पाहा मेल्यांनो ते किती कष्ट करतात!’’

आंदोलनातील महिला कार्यकर्त्यांच्या केसांना तेल लावणे, त्यांच्या उवा काढणे आणि स्वत: शुद्ध शाकाहारी व सामिष आहाराचा प्रचंड तिटकारा असूनही, आंदोलनातील एका क्षयरोगग्रस्त कार्यकर्त्याला स्वत: रोज चार अंड्यांचे ऑम्लेट करून खाऊ घालणे, हे तिने अत्यंत समाधानाने केले. आपल्या मुलांचे, सुनांचे किंवा संस्थेतील कार्यकर्त्यांचे बाबांनी आणि आजीने कधी तोंड भरून कौतुक केले नसेल, पण दुसर्‍या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना, आंदोलनजीवींना मात्र त्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. संस्थेतून त्यांनी कधीच एक पैसा मानधन घेतले नाही.

कोल्हापूरच्या कोरगावकर ट्रस्टकडून त्यांना महिना १० रुपये (जे नंतर २०० रुपये झाले) मानधन मिळत असे. त्यातून साठवलेली पुंजी त्यांनी इतर स्वयंसेवी संस्थांना आणि आंदोलनांतील कार्यकर्त्यांना सर्वतोपरी देऊ केली. महारोगी सेवा समिती स्वत: आर्थिक अडचणीत असतानाही त्यांनी दात्यांपुढे इतर संस्थांसाठीच झोळी पसरली. आज मागे वळून पाहताना खंत याची वाटते की, यांतील कुणीही आजी-बाबांबद्दल कृतज्ञतेचा तसूभरही उल्लेख केला नाही किंवा महारोगी सेवा समितीच्या कार्याबद्दल चार चांगले शब्द काढले नाहीत! पण आजीला या मानपानाचे कधीच सोयरसुतक नव्हते.

कोणत्याही पावतीची अपेक्षा न ठेवता, केवळ मातृत्वाच्या अथांग प्रेमापोटी तिची निष्काम ‘कर्मसाधना’ प्रसिद्धीच्या प्रकाशापासून दूर, निमूटपणे आणि अखंड सुरूच राहिली. स्वत:च्या आवडी-निवडी आणि तत्त्वांना बाजूला सारून, समोरच्याच्या गरजेसाठी स्वत:ला राबवणारे तिचे हे समर्पण, निष्काम कर्म आणि फळाची कसलीही अपेक्षा न ठेवणारी तिची प्रसिद्धिपराङ्मुखता खरोखरच थक्क करणारी होती.

नागपूरच्या एका सनातनी, धार्मिक आणि वेदशास्त्रसंपन्न घरात जन्मलेली इंदू कृष्णराव घुले जेव्हा लग्न होऊन आनंदवनात आली; तेव्हा तिने ते सगळे जुने संदर्भ कायमचे मागे सोडले. जेव्हा तिने आणि बाबांनी १९५१ मध्ये महारोगी सेवा समितीचा पहिला प्रकल्प ‘आनंदवना’ची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा त्यांच्यासोबत फक्त सहा कुष्ठरोगी, एक लंगडी गाय आणि खिशात रोख चौदा रुपये होते. या चौदा रुपयांच्या भांडवलावर त्यांनी उघड्या माळरानातील आपल्या शून्यातून सुरू होणार्‍या संसाराचा श्रीगणेशा केला.

बाबांच्या वादळी जीवनाशी समरस होताना ती कधी फरपटत गेली नाही, उलट तिने हे ‘बवंडर’ कह्यात तर आणलेच; त्याला दिशा देण्याचे बिकट कामही तिने केले. बाबा मुलखाचे कर्मकांडविरोधी, तर आजी श्रावणात शंकराला एक लक्ष बेलाचा अभिषेक करणारी निस्सीम भाविक. पण या दोन टोकांच्या विचारधारांचा त्यांच्या संसारात कधीच संघर्ष झाला नाही. कारण बाबांना पक्के माहीत होते की, आजीचे उपासतापास आणि पूजाअर्चा स्वत:साठी नसून केवळ इतरांच्या भल्यासाठी आहेत. वेदनेला जात, पात, धर्म, पंथ, कूळ काहीही नसते. ‘सहसंवेदना’ हाच तिचा व बाबांचा धर्मही आणि सर्व काही.

गंमत बघा, तिच्या वाहनाचा सारथी म्हणजे इनायतखान पठाण नावाचा कुष्ठमुक्त व्यक्ती. हा पठाण मुस्लीम तर वाहनाचा वाहक, कुष्ठमुक्त सोनेराव हा ख्रिश्चन. तरी ते दोघेही प्रवासात बेलाचे झाड दिसल्यास थांबून आजीच्या पूजेसाठी आवर्जून बेल खुडून आणत! सर्व जाती- पाती- धर्म- पंथांना सामावून घेणारी तिची विशाल ‘सहिष्णुता’ ही तिच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.

आज महारोगी सेवा समिती आजीची हीच विशाल माया, तिचा रोखठोक न्याय, माणुसकीला दिलेली प्राथमिकता, निरलस आदरातिथ्य, निष्काम कर्म आणि प्रसिद्धिपराङ्मुख वृत्ती ही अमोल शिदोरी सोबतीला घेऊनच वाटचाल करत आहे. तिच्या याच मूल्यांचा वसा आणि वारसा घेऊन, तिच्या या जन्मशताब्दीपूर्ती वर्षात संस्थेच्या कार्याला आता नवे आयाम जोडले गेले आहेत. मनोविकारग्रस्त बांधवांसाठी उपचार आणि मानसिक आधाराची गरज असलेल्या बांधवांसाठी समुपदेशनाचे कार्य संस्थेत नव्याने सुरू झाले आहे.

याशिवाय, जून २०२५ मध्ये श्रमतीर्थ (सोमनाथ) प्रकल्पात, ताडोबाच्या जंगलाला लागून असलेल्या दुर्गम गावखेड्यांतील अत्यंत गरीब आणि शाळेत जाण्यासाठी सुरक्षित साधन नसलेल्या २५ मुलींसाठी एक निवासी वसतिगृह सुरू केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षात या वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी परिसरातील १०० पेक्षा जास्त मुली इच्छुक आहेत. त्यांपैकी, यंदा आणिक २५ मुलींनाच प्रवेश देता येणार असला, तरी लवकरच पायाभूत सुविधांची उभारणी करून या सर्व जणींना सामावून घेण्याचा आमचा मानस आहे. परवा ५ मे ला, आजीच्या जन्मशताब्दीच्या दिवशी या वसतिगृहाचे नामकरण ‘ओजस्विनी’ असे करण्यात येणार आहे. वंचित मुलींना शिक्षणाची वाट आणि सुरक्षित निवार्‍याची ऊब देणे, हीच आजीच्या वात्सल्याला आणि तिच्या कृतिशील वारशाला दिलेली सर्वांत सार्थ आदरांजली ठरेल.

आजीचे आयुष्य म्हणजे अकर्मक करुणेला फाटा देऊन आणि ‘प्लॅन’, ‘व्हिजन’, ‘मिशन’सारख्या जडशीळ शब्दांचा कोणताही डोलारा न उभारता, निमूटपणे निरंतर कर्म करत राहण्याचा एक प्रदीर्घ महायज्ञ होता. समाजाच्या परिघाबाहेर फेकल्या गेलेल्या उपेक्षितांचा शोध घेणे, त्यांच्या सशक्तीकरणाचा वसा पुढे चालवणे आणि नवनव्या आव्हानांना भिडण्याची तीव्र लालसा बाळगणे, या त्रिसूत्रीतच आजीच्या जीवनाचे सार आणि तिची खरी शिकवण सामावलेली आहे. तिची ही नीतिमूल्ये, आचार, विचार आणि शिस्तीचा वारसा सोबत बाळगत महारोगी सेवा समिती इथूनपुढेही वाटचाल करत राहील, हा ठाम विश्वास आजीच्या या जन्मशताब्दीनिमित्ताने मला द्यावासा वाटतो. तिच्या पावलांवर पाऊल ठेवून सुरू असलेल्या माणुसकीच्या या ‘पगडंडी’वरील सफरीत आपणही पांथस्थ म्हणून सामील व्हावे. आपले स्वागत आहे!

पूर्ण वेळ कार्यकर्ता

महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)

kaustubh.amte@maharogiswasamiti.org