scorecardresearch

‘अकादमीस्टां’चा आत्मशोध.. : बाहुल्यांच्या खेळाची खेळी..

डोळय़ांसमोर घडलेलं हे अशाच एका अस्वस्थ अवस्थेत लिहिलं गेलं. त्याला काहीही फॅार्म वगैरे नव्हता. ती कादंबरी नव्हती की कविताही नव्हती.

‘अकादमीस्टां’चा आत्मशोध.. : बाहुल्यांच्या खेळाची खेळी..
प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या  ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रवीण दशरथ बांदेकर 

प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या  ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला, युवा पुरस्कारासाठी पवन नालट यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ या काव्यसंग्रहाला आणि अनुवादासाठी प्रमोद मुजुमदार यांच्या ‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या ग्रंथाला नुकतेच  साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. यामुळे वाचकांचे या पुस्तकांबद्दलचे कुतूहल वाढलेले असताना या कादंबरीचा निर्मिती प्रदेश, कवितांची भूमी आणि अनुवादाची प्रक्रिया यांवर या तिघा ‘अकादमीस्टां’चा आत्मशोध.. या कलाकृतींची नव्याने ओळख करून देणारा..

परशा ठाकरविषयी कधी तरी उडत उडत कानांवर आलेलं, तीच कदाचित माझ्या कादंबरीची सुरुवात असू शकते. तेव्हाच कधी तरी हे बीज मनात रुजायला सुरुवात झाली असावी. ‘चाळेगत’ लिहीत असतानाही हे बीज तसंच निपचित पडून होतं. मागाहून मग ‘चाळेगत’ प्रकाशित व्हायच्या आधी नव्या कादंबरीच्या लेखनाला सुरुवात झाली होती. अर्थात तेव्हा शीर्षक वगैरे काही ठरलं नव्हतं. काय लिहायचंय, काय लिहितोय, हे सगळंच तसं धूसर होतं. काही तरी तात्कालिक निमित्त झालं होतं. कदाचित कसलंसं स्वप्न वगैरे पडलं असावं किंवा कदाचित माझ्या आसपासच्या दुनियेत काही तरी खळबळ माजवणारं घडलं असावं. त्यामुळे अस्वस्थ होऊन काही तरी लिहू लागलो असेन. आता निश्चित असं काहीच सांगता यायचं नाही; पण ते जे काही लिहिलं ते एखाद्या काळय़ाकुट्ट स्वप्नासारखंच काही तरी होतं.

 ती सुरुवात होती, ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कालपरवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या माझ्या कादंबरीच्या लेखनप्रक्रियेची. पहिल्या कादंबरीनं पुरेपूर दमवल्यावर पुन्हा कधी आपण कादंबरीच्या वाटेला जाऊ असं वाटत नव्हतं; पण मालवणीतल्या त्या म्हणीसारखंच झालं होतं- भरल्या शेतात तोंड घालायला सवाकलेल्या ढोराला आवरणं कठीण असतं. अगदी तसंच कादंबरी लिहिणाऱ्याचंही असावं.  मग रोजच्या जगण्यातल्या बारक्यासारक्या गोष्टींतही कादंबरी खुणावत राहते. पात्रं दिसत राहतात. उजव्या सोंडेच्या बाहुल्यांकडे वळताना माझंही असंच काहीसं झालं असावं. माझ्या घरातली माणसं, माझे मित्र, माझे पूर्वज, इतकंच काय, मी वाचलेली आणि मनात रुतून बसलेली पुस्तकं, त्यातली पात्रं आणि त्यांचे लेखकही माझ्या या नव्या कादंबरीत घुसायला उत्सुक झाले होते. त्यातूनच मग माझी गोव्याकडची एक लांबची मोगा आजी – तिच्याविषयीच्या सगळय़ा दंतकथांसह किंवा पोर्तुगीज लेखक ज्युझे सारामागू त्याच्या ‘ब्लाइंडनेस’सारख्या कादंबरीतल्या पात्रांसहित या कादंबरीत रिंघले होते. हे इतकं असं सगळं असलं तरी प्रत्यक्षात कादंबरी लिहायलाच हवी असं वाटायला याहीपेक्षा काही तरी जोरकस कारण घडून आलं होतं. त्याविषयीही थोडं बोलणं भाग आहे.   

 शिमग्याच्या दिवसांत आमच्याकडे , कोकण आणि गोव्याकडे कृष्ण, राधा, मारुती, शंकर अशा देवाबिवांची सोंगं काढून, तोंडं रंगवून, पोरं शबय मागत घरोघर फिरतात. काही जण राधाकृष्णांचा, गोमूचा, गवळणींचा नाच करीत फिरतात. दशावतारी नाटकांतून एक संकासुर असतो. तोही या शिमग्यात यांच्यात सामील झालेला दिसतो. ही तशी कैक वर्षांची परंपरा. कित्येक पिढय़ांपास्नं चालत आलेली; पण गेल्या काही वर्षांत अचानक काय झालेलं कोण जाणे. काही लोकांना हे खटकू लागलं होतं. यामुळे आपल्या पवित्र देवादिकांची विटंबना होऊ लागली आहे, आपल्या भावना दुखावल्या जातायत, असा काही तरी त्यांना साक्षात्कार होऊ लागला होता. याच संस्कृतिरक्षकांकडून मग या अशा पोरांना वेचून ठोकून काढणं सुरू झालं होतं.

 म्हटलं तर, हे असं काही तरी त्या दरम्यानच्या दिवसांत माझ्या आसपास घडलं होतं. राधेचं सोंग काढून नाचणारा बालपणापासूनचा माझा एक दोस्त होता. परश्या ठाकर नावाचा. (हे कादंबरीत वापरलेलं नाव.) अधूनमधून दशावतारी नाटकांतूनही तो स्त्री भूमिका करायचा. स्त्री वेशात तो हुबेहूब एखाद्या स्त्रीसारखाच दिसायचा. चटकन कुणाचा विश्वासही बसू नये इतकं बाईपण अंगात भिनवून घेऊन वावरायचा; पण राधेचं सोंग घेऊन फिरणाऱ्या याच परश्याच्या पाठीची चामडी लोळवली गेली होती. भेदरलेल्या  परशानं अंथरूण धरलं. त्याच्या म्हातारा- म्हातारीनंही या गोष्टीमुळे हाय खाल्ली. पुढे मग अशा गोष्टींचा शेवट जसा नेहमी होत असतो तसाच झाला होता. परश्याच्या  कुटुंबाची वाताहत झाली होती.

डोळय़ांसमोर घडलेलं हे अशाच एका अस्वस्थ अवस्थेत लिहिलं गेलं. त्याला काहीही फॅार्म वगैरे नव्हता. ती कादंबरी नव्हती की कविताही नव्हती. डायरी नव्हती की आणखीन काही. ते फक्त स्वत:ला छळणाऱ्या या काही गोष्टींपासून सुटका करून घेणं होतं. हाताला लिहिण्याचं एक जादाचं बोट फुटलेला माझ्यासारखा माणूस दुसरं तरी आणखीन काय करू शकतो?

मग या आकार नसलेल्या लिखाणाला आकार द्यायची प्रक्रिया मनातल्या मनात सुरू झाली. आधी लिहिलेली काळय़ा दिवसांची स्वप्नंही त्यात कशी मुरवता येतील याचा विचार सुरू झाला. ‘चाळेगत’च्या वेळी काही विशिष्ट अशी आशयसूत्रे मनात होती. ती अत्यंत ढोबळ आणि सहज-स्पष्ट अशी होती. म्हणजे आपल्या आसपास घडणाऱ्या या आणि अंतिमत: आपल्याशी संबंधित अशा काही राजकीय वा सामाजिक घटना. त्यांतून ज्यांचं जगणं दिवसेंदिवस मुश्कील होत जातंय असे आपल्या भागातले मच्छीमार व शेतकऱ्यांसारखे भूमिपुत्र. असं सगळं पृष्ठस्तरावर लख्खपणे दिसत होतं. हे सगळं कादंबरीच्या फॉर्ममध्ये कसं बसवता येईल हाच एक प्रश्न त्या वेळी सतावत असायचा. रूढ पद्धतीनं कथानक वगैरे सांगत पुढे जाणंही करून पाहिलं होतं. पहिले दोन ड्राफ्ट्स त्याच पद्धतीचे होते; पण ते माझे मलाच समाधानकारक वाटत नव्हते. आपल्याला जे काही सांगायचं आहे ते अशा गोष्टीच्या स्वरूपात जर सांगता येत असेल, तर त्यासाठी कादंबरीच कशाला हवी, असंही वाटू लागलं होतं. ही अशी आपण जी गोष्ट सांगतोय ती आजकाल कॅमेऱ्याचं माध्यम उपलब्ध आहे, ते वापरून कुणीही यापेक्षा अधिक प्रभावीपणे सिनेमा वा टीव्ही मालिकेमधून सांगू शकतो. जे कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळय़ाला दिसू शकते तेच पुन्हा कादंबरीसारख्या माध्यमातून का सांगावं, हा विचार मला छळत राहिला होता. त्यामुळे शेवटी एका क्षणी मी हे सगळे बाद करून नव्याने या कादंबरीची मांडणी करायची ठरवली. जे आपल्या मनात आहे, ते तसंच्या तसं विस्कळीत रूपात मांडता येईल का, हा विचार यातूनच सुरू झाला. त्याला जोड मिळाली ती आमच्याकडे दक्षिण कोकणात प्रचलित असलेल्या दशावतारी लोकनाटय़ातील संकासुराच्या खेळाची. कादंबरीच्या रूपबंधासाठी मला दशावताराचे हे आविष्कार तंत्र आपल्याला खूप मदत करू शकेल असं वाटलं. त्याअनुषंगाने मग पुन्हा दोन-तीन वेळा उलटसुलट खर्डे केल्यावर ‘चाळेगत’च्या आताच्या अंतिम रूपापर्यंत पोहोचता आलं होतं; पण ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्यां’च्या वेळी मला जाणवणारे प्रश्न आधीच्यापेक्षा आणखीन वेगळे होते. मी नव्या कादंबरीसंदर्भात विचार करताना नेहमीच ‘चाळेगत’चं एक दडपण जाणवत असायचं. आपल्याला चाळेगत पार्ट टू लिहायची नाहीये. हे जे काही लिहू ते आधीच्यापेक्षा अधिक कॉम्पॅक्ट आणि समकालीन वास्तवाचे अधिक सूक्ष्म कंगोरे शोधणारं असलं पाहिजे, असं वाटत असायचं. अर्थात हे नवं लेखन करत असतानाही ‘चाळेगत’प्रमाणेच आपल्याला सरळ थेट रेषेत जाणारी गोष्ट टाळूनच पुढे जायचं आहे हेही मनात होतंच. ती तर माझी कादंबरी लेखनाविषयीची धारणाच बनली होती. आपल्याला हे असंच काही तरी लिहायचं आहे, ज्यावर कुणाला सहजासहजी सिनेमा वगैरे बनवता येता नये. सिनेमापेक्षाही वेगळं काही तरी तंत्र कादंबरीचं असलं पाहिजे, सिनेमाला जे सांगणं, दाखवणं अशक्य आहे, ते कादंबरीला सांगता यायला पाहिजे, कादंबरी हे माध्यम अशा तऱ्हेनेच आपल्याला वापरता यायला हवं आहे, असं मी स्वत:लाच सतत बजावत असायचो. हे असं कादंबरीत शिरून आपल्याला छळत असलेल्या प्रश्नांना भिडणं सुरू असतानाच मग कधी तरी माझ्या मदतीला ज्युझे सारामागो हा पोर्तुगीज लेखक आला. त्याच्या ‘ब्लाइंडनेस’ या कादंबरीनं मला झपाटून टाकलं होतं. सारामागोचं बोट धरून त्याच्या मागोमाग मग हारुकी मुराकामी हा जपानी लेखकही आला. असे अनेक लेखक, कवी. हे सगळेच माझ्या कादंबरीत जाऊन बसले. काही जण म्हणजे आपल्या ‘कोसला’च्या पांडुरंग सांगवीकरसारखे वगैरे आधीपासूनच तिथे होते. बाकी मग काही खऱ्या दुनियेतले काही फिक्शनल रूपं धारण करून माझ्या अवतीभवती वावरू लागले होते.  बाहुल्यांचे खेळ करणाऱ्या परश्या ठाकर नावाच्या माझ्या मित्राच्या गोष्टीने कादंबरीची सुरुवात झाली होती. ठाकरांकडे असलेल्या या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचा आकृतिबंध मला या कादंबरीसाठी योग्य वाटला. लिहिता लिहिता आपसूकच सगळं होत गेलं, हे एका टप्प्यावर असताना जाणवलं. याच दरम्यान कॉम्रेड गोिवदराव पानसरे यांची हत्या झाली. सावंतवाडीमध्ये आम्ही त्यांच्याच पुढाकारातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन घेतलं होतं. त्यानिमित्ताने पानसरे अण्णांशी खूप निकटचा संबंध आला होता. त्यांच्या जगण्याचे आणि विचारांचे किती तरी पैलू अगदी जवळून निरखता आले होते, अनुभवता आले होते. त्यांनी ‘चाळेगत’ वाचली होती. त्यावरून आमच्या चर्चाही झाल्या होत्या. मी त्यांना माझ्या नव्या कादंबरीच्या रूपरेषेविषयी सांगितलं होतं. कडव्या धर्मरक्षक संस्थांच्या छुप्या सांस्कृतिक राजकारणात सामान्य माणसं कशी हरवत चालली आहेत, याविषयी काही तरी लिहावं असं धूसरपणे जे काही तेव्हा डोक्यात होतं, त्या अनुषंगाने देवादिकांची सोंगं काढणाऱ्या या परश्या ठाकराच्या निमित्ताने मी लिहायला सुरुवात केली होती. त्याविषयी प्रामुख्याने मी त्यांच्याशी बोललो होतो. एकदा चर्चेत बोलताना कॉम्रेड पानसरे अण्णा सहज बोलून गेले, ‘‘आपल्या सगळय़ांनाच विस्मरण होऊ लागलंय. माझी नक्की भूमिका काय आहे आणि मी काय करतोय, कुणी मला हे असं बहकवत नेऊन माझ्या भूमिकेचा विसर पाडलाय, हेच आपल्याला कळेनासं झालं आहे.’’ मला हे खूप महत्त्वाचं वाटलं. माझ्या डोक्यात चाललेल्या खळबळीला पुढे घेऊन जायला मदत करणारं असंच हे काही तरी होतं याची जाणीव मला झाली. त्यातून पुढे मग सारामागोच्या ‘ब्लाइंडनेस’मधली एकामागून एक सगळी माणसं आंधळी होत जाण्याची सिच्युएशन आणि आपल्याला या काळातील स्वतच्या आयडेंटिटीचं होऊ लागलेलं विस्मरण याविषयीची सूत्रं यांची सरमिसळ सुरू झाली. कादंबरी आता या दिशेने वाटचाल करू लागली होती. बाहेर दिवसेंदिवस संकुचित अस्मितांचं राजकारण, त्यापायी भल्या भल्यांची होत असलेली कुचंबणा, बुद्धिजीवींचं अधिकाधिक आत्मकेंद्रित होत जाणं, छोटय़ा छोटय़ा वरकरणी किरकोळ वाटाव्यात अशा गोष्टींतूनही जाणवणारी असहिष्णु वागण्याची दहशत, असं सगळं अंगावर येत होतं. लिहिणाऱ्याची अस्वस्थता वाढवावी असंच काही तरी हे होतं. या सगळय़ा गोष्टी कळत नकळत नव्या कादंबरीत वेगवेगळय़ा पद्धतीनं सामावल्या जाऊ लागल्या होत्या. या अनुषंगाने आता या कादंबरीच्या मध्यवर्ती सूत्राविषयी बोलता येईल असं वाटत होतं.

 ‘चाळेगत’मध्ये मी जागतिकीकरणानंतरच्या काळात होऊ लागलेल्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मूल्यऱ्हासाविषयी प्रामुख्याने लिहिलं होतं. नव्या व्यवस्थेमध्ये कोकणासारख्या एका विशिष्ट भूप्रदेशातील सर्वसामान्य शेतकरी व मच्छीमारांची होऊ लागलेली फरफट या लेखनाच्या केंद्रस्थानी होती. ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीमध्ये ढोबळमानाने बोलायचं झालं तर, आजच्या दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या वेगवेगळय़ा अस्मितांमुळे निर्माण होत जाणारे प्रश्न मी चर्चेला घेण्याचा प्रयत्न केला आहे. जात, धर्म, संस्कृती अशा वेगवेगळय़ा गटातटांत आपला समाज विभागला जात आहे. प्रत्येक गटाला आपापली ओळख या संकुचित कोंडाळय़ाच्या पलीकडे जाऊन विस्तारावी असं वाटण्याजोगं वातावरण आसपास दिसत नाहीये. यातूनच एकमेकांविषयीची तुच्छता, अनादर, अविश्वास, द्वेष, असहिष्णुता अशा गोष्टी वेगाने वाढत चालल्या आहेत. याहून भयंकर म्हणजे ज्या बुद्धिजीवींनी, लेखक, कलावंत, विचारवंत यांनी आपापल्या माध्यमांचा अचूक वापर करून समाजाला दिशा दाखवली पाहिजे, तेही या बाबतीत एक तर प्रचंड उदासीन आहेत किंवा त्यांना आपल्या माध्यमाच्या सामर्थ्यांचे विस्मरण होताना दिसत आहे. यातून जी काही एक प्रकारची कॅऑटिक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे, त्याविषयीही ही कादंबरी बोलू पाहते आहे; पण याचा अर्थ या कादंबरीचं हेच एक मध्यवर्ती आशयसूत्र आहे असं काही नेमकेपणाने मात्र म्हणता येणार नाही. कारण वर्तमान जगण्याशी संबंधित अनेक छोटय़ा छोटय़ा सूत्रांमध्ये विखुरलेली आणि आशयाच्या अनेक शक्यता मांडण्याचा प्रयत्न करणारी ही कादंबरी आहे. तरीही तिला एकत्र बांधून ठेवणारे सूत्र कादंबरीत सापडू शकते. जगत असताना आपण निभावून नेत असलेली आपली ओळख – आपली आयडेंटिटी हरवत जाण्याच्या किंवा इतर अनेक आयडेंटिटीजमध्ये सरमिसळ होत जाण्याच्या या काळात बुद्धिजीवी वर्गाचं होत असलेलं स्खलन या कादंबरीच्या गाभ्याशी आहे. स्थितीशील प्रवृत्तींविरुद्ध संघर्ष करण्याऐवजी या वर्गाने सहेतुक स्वीकारलेल्या विस्मरणाचे भयावह परिणाम आसपास आपण अनुभवतोच आहोत. 

 ‘चाळेगत’प्रमाणेच ही कादंबरीदेखील तिच्या एकात एक मिसळलेल्या आशयसूत्रांइतकीच तिच्यातील तंत्र-निवेदनातील प्रयोग, फॉर्मची मोडतोड यामुळेही चर्चेत आली आहे.  कादंबरीमधून गोष्ट सांगितली जावी का, असा एक प्रश्न ‘चाळेगत’मधील मध्यवर्ती पात्र असलेल्या निवेदकाला पडला होता. इथेही तो प्रश्न अध्याहृत होताच. एक लेखक म्हणून कादंबरीच्या संदर्भात व्यक्तिश: मला स्वत:लाच छळणारा हा प्रश्न आहे. ही कादंबरी लिहितानाही गोष्ट असावी का, असलीच तर तिचे स्वरूप काय असावे, तिला कशा पद्धतीने कथन केले जावे, असे काही प्रश्न डोक्यात होते. त्या अनुषंगाने मांडणी करत असताना निवेदनाचे काही प्रयोग झाले असणे शक्य आहे; पण त्यामुळे मला जे काही सांगायचे आहे ते सुटू नये, त्यात बाधा येऊ नये ही काळजी घ्यावी लागत होतीच. ‘चाळेगत’मधील निवेदन तंत्रे आणि रूपबंधापेक्षा या कादंबरीमधील निवेदन तंत्रे, रूपबंध वेगळा आहे, हे मात्र नक्की. चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांचे खेळ कोकणात आजही ठाकर या समाजातले लोककलाकार करीत असतात. या कादंबरीतील एक मध्यवर्ती पात्र हे या समाजातील असल्याने आणि त्याची कादंबरीतील पार्श्वभूमीही तशा प्रकारचे खेळ करणाऱ्यांपैकी असल्याने आपोआपच या कादंबरीमध्ये चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचा रूपबंध वापरला गेला.

  सुरुवातीला म्हटलंय तसं, पोर्तुगीज भाषेतला लेखक ज्युझे सारामागो, जपानचा हारुकी मुराकामी असे काही लेखक वा त्यांच्या कलाकृतींमधील पात्रे या कादंबरीत पात्रे म्हणून येतात. मराठी वा अन्य भारतीय भाषांतीलही काही लेखक-कवी यात भेटतील; पण ही पात्रे म्हणजे प्रत्यक्षातीलच ते लेखक, कवी वगैरे असं काही म्हणता येणार नाही. या कादंबरीतील अन्य मध्यवर्ती पात्रांच्या मानसिकतेशी निगडित असलेली अशी ही पात्रे असू शकतात. काही लेखक, कवी हे बुद्धिजीवी, विचार करू शकणाऱ्या आणि संवेदनशील वर्गसमूहाचे प्रतिनिधी म्हणूनही यात वापरलेले आहेत. अशा लोकांचं स्खलन, त्यांना झालेलं विस्मरण हा या कादंबरीतील निवेदकापुढील (आणि अर्थातच गर्भित लेखकापुढीलही) चिंतेचा विषय आहे. 

 ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या शीर्षकाचा नेमका अर्थ काय, असाही एक प्रश्न अनेकांना पडू शकतो. पहिलं म्हणजे, कादंबरी वाचून वाचकांनीच या शीर्षकातून त्यांना हवे ते अर्थ घ्यावेत असं मला वाटत होतं. लेखकालाच अभिप्रेत असलेल्या अर्थामध्ये वाचकांनी समाधान मानू नये, असं मी मानतो. फक्त एक सांगता येईल, यातल्या बाहुल्यांचा एक संदर्भ कोकणातल्या चित्रकथी आणि कळसूत्री भावल्यांच्या पारंपरिक खेळाशी जोडलेला आहे, पण ते तितकंच. या बाहुल्या म्हणजे त्याच बाहुल्या असं मात्र मी म्हणणार नाही. या बाहुल्या सोंड असलेल्या किंवा सोंडेचा आभास असलेल्या आहेत. त्यांची सोंडही उजवीकडे झुकलेली आहे. सोंड आणि उजवं असणं या दोन्ही गोष्टी आपल्या सांस्कृतिक व सामाजिक परिप्रेक्ष्यात पुरेशा बोलक्या आहेत. त्यांविषयी फार काही स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. कादंबरी वाचत असतानाच या सगळय़ा प्रकारच्या बाहुल्या वाचकांना भेटत जातात. वेगवेगळय़ा तुकडय़ा- तुकडय़ांतून यातला खेळ वाचकांनीच शोधून काढून खेळायचा आहे. लेखकाला काय म्हणायचे आहे ते आपल्या परीने समजून घ्यायचे आहे. कादंबरी बिट्विन द लाइन्स वाचत जात आपला स्वत:चा अन्वयार्थ लावायचा आहे. मराठी वाचकांच्या साक्षरतेवर माझा विश्वास आहे.

 पुरस्कारानंतर मराठी वाचकांच्या साक्षरतेवरचा विश्वास नक्कीच काही अंशी तरी दृढ व्हायला मदत झाली आहे. कादंबरी लिहीत असतानाच कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली होती. त्यांच्याशी केलेल्या चर्चा, त्यांच्या आठवणी यांना उजाळा देण्यासाठी ही कादंबरी त्यांनाच अर्पण करावीशी वाटली. या कादंबरीचे कच्चे खर्डे माझे समकालीन असलेले सन्मित्र जयंत पवार व कविता महाजन यांनी वाचून काही सूचना केल्या होत्या. त्या दोघांचंही अकाली जाणं मला नेहमीच अस्वस्थ करीत राहतं. मराठीची परंपरा एकरेषीय व अ-पासून ज्ञ-पर्यंत सरळसोट लिहिलेलं वाचन करण्याची आहे. तरीदेखील या कादंबरीतील इतक्या वेगवेगळय़ा दिशांनी जाणारे निवेदन, वाचकांच्या क्षमतेवर विसंबून लोंबकळती सोडलेली आशयसूत्रे, फिक्शनमधल्या पात्रांचे उपयोजन, अशा सगळं दमछाक करणाऱ्या गोष्टी आपले वाचक समजून घेतायत ही गोष्ट मला दिलासादायक वाटते आहे. लिहिणाऱ्याच्या आसपासचं वर्तमान कितीही बिघडत चाललं असलं तरी लिहिणाऱ्याची उमेद शिल्लक राहावी असंही खूप काही आपल्याकडे शिल्लक आहे हे नक्की.

samwadpravin@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 01:15 IST

संबंधित बातम्या