scorecardresearch

सलोख्याच्या वाटेवर सन्मान

धार्मिक विद्वेषाने अस्वस्थ झालेल्या सबा नक्वी यांचे ‘इन गुड फेथ’ हे पुस्तक म्हणजे देशातील जनसामान्यांच्या सहिष्णू शहाणपणाचा पुरावा वाटला.

सलोख्याच्या वाटेवर सन्मान
प्रमोद मुजुमदार यांच्या ‘सलोख्याचे प्रदेश

प्रमोद मुजुमदार 

सामाजिक चळवळीशी संबंधित असल्यामुळे विविध स्तरावर विविध भाषिक लोकांशी संवाद करणे अपरिहार्य बनले. त्यातूनच अनुवाद-भाषांतर या सगळय़ाची सुरुवात कधीतरी १९८३-८४ साली झाली असावी. नेमकं आठवायचं तर १९८३ च्या अखेरीस कधीतरी जॉन नाथन हा कंत्राटी कामगार नायट्रिक अ‍ॅसिड प्लांटमध्ये भगव्या-पिवळय़ा रंगाचा नॉक्स वायू शरीरात घुसल्यामुळे मृत्यू पावला होता. नॉक्समुळे नेमके काय होते? हे तोवर आम्हा आरसीएफमधील कोणालाच फारसे माहीत नव्हते. आमचे कॉम्रेड विजय कान्हेरे तेव्हा व्यावसायिक आरोग्य आणि कारखान्यातील कामाच्या परिस्थितीचे प्रश्न या विषयावर काम करत होते. त्यांनी सांगितले की, ‘वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने रासायनिक पदार्थाचा मानवी शरीरावर होणारा घातक परिणाम या विषयावर एक कोश प्रसिद्ध केला आहे. त्यातील माहितीनुसार, नॉक्स म्हणजे नायट्रोजनची ऑक्साईड्स मिश्रित हवा नाका वाटे शरीरात गेली तर अतिशय तीव्र प्रमाणात फुफ्फुसांच्या वायुकोशांवर घातक परिणाम करते. जॉन नाथनच्या फुप्फुसात घुसलेल्या नाक्सने त्याचे वायुकोश निकामी केले. तिथे भोकं पडली होती. त्यामुळे जॉनचा मृत्यू ओढवला. ही सारीच माहिती धक्कादायक होती. मुख्य म्हणजे आपल्या फुप्फुसांचे काय? असा प्रश्न आम्हा सगळय़ांनाच पडला होता. त्यासाठी प्रथम हे नॉक्सचे ‘विषारी रहस्य’ सर्वाना सांगायला हवे. त्यासाठी डब्ल्यूएचओच्या ‘रासायनिक परिणामांच्या कोशातील’ माहिती नीटपणे लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. धडपड करून आणि अनेक डॉक्टरांकडून समजून घेऊन आम्ही मराठीत एक पत्रक बनवले. आरसीएफमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगार-कर्मचाऱ्यांपर्यंत ते पोहोचवले. परिणाम चांगला झाला. त्यातूनच पुढे रासायनिक कारखान्यातील धोकादायक परिस्थितीचे प्रश्न पुढे आले. केवळ इंग्रजीत उपलब्ध तांत्रिक आणि वैद्यकीय माहिती नीटपणे लोकांपर्यंत पोहोचवणे, हे एक मग आवश्यक कर्तव्यच बनले. आरसीएफ किंवा सार्वजनिक उद्योगात कामगार चळवळीत देशातील बहुभाषिक कामगार काम करत असतात. त्यामुळे युनियनची पत्रके (याला काही साहित्यिक मूल्य असते असे मानले जात नाही) संवादी, सोप्या भाषेत प्रभावीपणे प्रसिद्ध करण्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे अनुवाद तोही नेमका करण्याला विशेष महत्त्व होते. हळूहळू अंगवळणी पडत गेले.

आणखी एक आठवण. १९८४ च्या अखेरीस भोपाळमधील युनियन कार्बाइडमध्ये एम.आय.सी. (मिक) नावाच्या घातक वायूची गळती होऊन हजारो नागरिक मारले गेले. या घटनेनंतर पाच-सहा दिवसातच लोकविज्ञान संघटनेच्या गटाबरोबर भोपाळला गेलो होतो. तोपर्यंत युनियन कार्बाइडच्या कामगार संघटनेशी संपर्क साधला गेला नव्हता. बरीच शोधाशोध करून त्या युनियनच्या सेक्रेटरींची भेट झाली. जब्बार नावाच्या या सेक्रेटरींनी प्रदूषणाच्या प्रश्नावर आवाज उठवला होता म्हणून त्या अमेरिकन कंपनीच्या व्यवस्थापनाने त्यांना कंपनीतून बडतर्फ केले होते. जब्बार आता भोपाळमधील एका झुग्गी-झोपडीमध्ये राहत होते. पोटापाण्यासाठी सिक्स सीटर ‘फटफटीया’ चालवत असत. त्यांच्या बरोबर फटफटीयावर बसून तीन तास भोपाळभर फिरत होतो. या प्रवासात त्यांनी युनियन कार्बाइडमधील तो अपघात कसा घडला, याची सविस्तर माहिती दिली. हिंदी भाषेत बोलणाऱ्या जब्बार यांचा लहेजा आणि बोलीभाषेतील शब्द हे भारतातील रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्या सर्व कामगारांना सहज समजतील असेच होते. गमतीचा भाग असा की, ही भाषा आणि हे अनुभव सामान्य शिक्षित समाजाला खूपच परके वाटले असते. म्हणूनच जब्बार यांची कहाणी नीट सोप्या भाषेत मांडणे आवश्यक बनवले. तसे केले. याला अनुवाद म्हणता यईल का? — असा प्रश्न वाटतो.

एकूणच तुम्ही सामाजिक कामात जोडलेले असाल, विशेषत: जनसंघटनांशी संबंधित असाल तर अनुवाद करणे, भाषांतर करणे ही एक आवश्यक गोष्ट बनते. तुमचे कौशल्य आपोआप विकसित होत जाते. सामान्य माणसांची भाषा, भाषेचा लेहेजा आणि त्याच्याशी जोडलेली देहबोली हे एक समग्र संवाद साधन असते. त्यासंबंधीचे तुमचे आकलन आपोआप वाढत जाते. अनेक वेळा अशा भाषिक अनुभवामुळे तुमची सांस्कृतिक जाणीवही विकसित होते. म्हणूनच भाषांतर किंवा अनुवाद म्हणजे प्रत्यक्ष लिखित कृती एवढेच नाही, असे वाटते.

१९८४-८५ पासून  संपर्क साधनांचा विकास झाला. संगणक आणि त्यावर आधारित नव्या औद्योगिक विकासालाही गती मिळाली. या सर्व प्रक्रियेचा एक मोठा परिणाम म्हणजे देशांतर्गत स्थलांतराला नवी चालना मिळाली. वेगवान शहरीकरणामुळे जिल्हा पातळीपर्यंत इतर राज्यातून कामगार, कष्टकरी येऊन पोहोचले. या प्रक्रियेमुळे भाषिक व्यवहारावरही परिणाम झाला. राजस्थानमधून येणारे कडाई कामगार, बिहार, बंगालमधून येणारे सुतार- असे नवनवीन भाषिक गट येथे मिसळत राहिले. आपल्याला त्यांची भाषा, त्यातील शब्द समजून घ्यावेच लागले. कारण ती आपलीच गरज होती. आपल्याही नकळत त्यांच्या पेशाशी निगडित अनेक शब्द मराठी भाषेत रुळले. या शब्दांमधून, त्या भाषेतील ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचले. याचा आपण तसा फारसा विचार करत नाही. आपल्यासाठी जगातील ज्ञानभाषा एकच आणि ती म्हणजे  केवळ इंग्रजी! आपल्याच भारतीय भाषांतील ‘ज्ञान’ आपल्याला महत्त्वाचे वाटत नाही. उलट ‘माझीच भाषा, तुझ्या भाषेपेक्षा श्रेष्ठ’ असा भ्रामक मोठेपणा आपल्याला सुखावतो. असो. आपण मान्य करावे अथवा न करावे, पण ही भाषिक घुसळण आपल्या सर्वाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.

सांगण्याचा मुद्दा अनुवाद किंवा भाषांतर ही एक आवश्यक प्रक्रिया बनली आहे. जागतिकीकरण, मानवी स्थलांतर, नवे तंत्रज्ञान, नवी जीवनशैली या सगळय़ामधील प्रवाही बदलांमुळे भाषिक अवकाश विस्तारित जातो. मानवी भावना, मानवी जीवन त्यातील यातना, कुचंबणा, आनंद यासाठी विविध भाषा संवाद आपण करतच असतो. रोजच्या संवादात प्रत्येक जण मराठीव्यतिरिक्त दुसरी भाषा ऐकतो, समजून घेतो तेव्हा ते भाषांतर असते. कधी समाज-माध्यमांची नवी साईन लँग्वेज किंवा अल्प शाब्दिक मिश्र भाषा तयार होते. या सगळय़ात भाषांतर आणि अनुवाद हा व्यवहाराचा भाग बनतो असे दिसते.

बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे नवे प्रश्न ( उदा. आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न इ.) समोर आले. त्याविषयीचे ज्ञान माहिती मराठीत आणणे हे आम्हा चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी आपोआपच आवश्यक बनले.

आधी उल्लेख केलेल्या ८० च्या दशकापासूनच जागतिकीकरणाला वेग आला. त्याचबरोबर नवीन सामाजिक, राजकीय परिस्थिती आकाराला आली. आधी मंडल आयोग तीव्र राजकीय वादाचा प्रश्न बनला, तर त्याला प्रतिसाद देत स्पर्धात्मक धर्माधतेचे राजकीय मुद्दे पुढे आले. हिंदू विरुद्ध मुस्लीम, हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असे ‘ते विरुद्ध आम्ही’ असे मुद्दे राजकीय केंद्रस्थानी आले. अतिशय वेगाने समाजाचे विभाजन आणि धार्मिक ध्रुवीकरण होत गेले. यातून निर्माण होणारे प्रश्न गंभीर होते. मानवी वेदना, हातबलता, स्त्री-पुरुषांची कोंडी आणि िहसक उद्रेक हे जणू भारतीय राजकारणाचा अविभाज्य घटक बनले. २००२ साली केल्या गेलेल्या मुस्लीम नरसंहारानंतर, तर आपल्या सर्व  जगण्याला जणू अमानुषतेचा पदर चिकटला. या सर्व परिस्थितीला सजग माणूस म्हणून भिडताना इंग्रजी, हिंदी भाषेतील (काही वेळा गुजराती ) माहिती आणि अनुभव मराठीत आणणे अपरिहार्य होते. त्यातूनच ‘आरोग्याचा बाजार’, ‘गुजरात पॅटर्न’ अशी पुस्तके

मराठीत अनुवादित केली. त्याच क्रमात अजूनही देशात संवेदनशील मानवी शहाणपणा शिल्लक आहे का? याचा शोध घेणे अपरिहार्य होते. त्यातूनच नासिरा शर्मा यांच्या कथा आणि साहित्य हाती आले. त्यांच्या विविध कथा अनुवादित केल्या. त्याच कथा ‘निद्रित निखारे’ या संग्रहाच्या भाग बनल्या.

 पण धार्मिक विद्वेष पुढील दोन दशकातही कमी न होता वाढतच गेला. किंबहुना धार्मिक विद्वेष आणि माणुसकीची विटंबना हाच सत्तेचा मुख्य आधार बनला. या पार्श्वभूमीवर माणसा- माणसातील संवाद, प्रेम वाढावा टिकावा यासाठी सलोखा संपर्क गटाबरोबर काम करू लागलो.

धार्मिक विद्वेषाने अस्वस्थ झालेल्या सबा नक्वी यांचे ‘इन गुड फेथ’ हे पुस्तक म्हणजे देशातील जनसामान्यांच्या सहिष्णू शहाणपणाचा पुरावा वाटला. भिन्न धर्मीयांच्या श्रद्धास्थानांशी देशातील सामान्य माणसं जोडली जातात. श्रद्धा-अंधश्रद्धा बाजूला ठेवली तर त्यातील या माणसांच्या मनातील समर्पणाची आणि परस्पर समानतेची भावना नक्कीच चकित करणारी वाटली. या संयुक्त श्रद्धास्थाने आणि संयुक्त धार्मिक परंपरा काही आज कालच्या नाही तर शेकडो वर्षांच्या आहेत. म्हणूनच ‘इन गुड फेथ’  ‘सलोख्याचे प्रदेश’ या नावाने मराठीत आणणे आवश्यक वाटले.

‘सलोखा’ संपर्क गटातील कामामुळे मराठी भाषक असलेल्याच पण ‘हिंदू’, ‘मुस्लीम’, ‘ख्रिश्चन’ अशा वेगळय़ा धार्मिक ओळखी बाळगणाऱ्या माणसांचा संपर्क आला. ही सर्व माणसे अतिशय गरीब, दुर्बळ माणसे आहेत. त्यांचे जीवन, त्यांच्या जीवनातील जात-धर्म यांचे स्थान, जात-धर्म यामुळे याच देशात त्यांचे जीवन किती वेगळे आहे, या माणसांना निव्वळ जन्माने मिळालेल्या जात-धर्मामुळे आज भीषण तणावाला तोंड द्यावे लागत आहे. या भयग्रस्त नागरिकांना ना कोणता निवडीचा अधिकार आहे, ना जात-धर्म नाकारण्याची मुभा आहे- किती ही चमत्कारिक अमानुष परिस्थिती!

अशा अमानुष परिस्थितीला तोंड देत, झुंज करत धडपडणाऱ्या या माणसांना आपण आपले म्हणणार का? त्यांच्यासाठी दोन पावले पुढे येणार का? याचा अखंड शोध घ्यायला पाहिजे. त्यासाठी त्यांची वेदना, त्यांच्या यातना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनुवाद किंवा भाषांतर हे एक परिणामकारक साधन बनते. नवे सलोख्याचे प्रदेश शोधताना हिंदी, इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषेतील साहित्य संवेदनेचे स्रोत बनते. अशा सलोख्याच्या वाटेवर ‘साहित्य अकादमीने’ या भाषांतर / अनुवादावर आपली मोहर उमटवावी यापरते आनंदाचे काय असू शकते? mujumdar.mujumdar@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 01:06 IST

संबंधित बातम्या