बळी.. बोकड.. बिर्याणी

रशियन सिनेकलावंतांच्या संघटनेकडून आलेल्या निमंत्रणानुसार खोपकर रशिया दौऱ्यावर गेले होते.

मराठी साहित्यविश्वातील वर्तमान स्थिती-गतीची, घटना-घडामोडींची आस्थेने अन् आस्वादक चिकित्सा करणारे सदर..

‘आमच्या रशियात कवितेचा भलताच सन्मान केला जातो. शब्दांचे फारच मोल आमच्याकडे. इतके, की त्यांच्यापायी जीवही जाऊ शकतो. कविता ही खुनास कारणीभूत ठरतेय, असे तुम्ही इतरत्र कुठेतरी पाहिलेय का?’

हा प्रश्न असिप मांडेलश्टाम या कवीचा. कवी रशियन. जन्म- १८९१ आणि मृत्यू- १९३८. जेमतेम ४७ वर्षांचे आयुष्य त्याला मिळालेले. अर्थात त्याच्यासारख्या कवीला तेव्हा रशियात मिळालेले हे एवढे आयुष्यही खूपच झाले म्हणायचे.

‘आम्ही जगतोय, पण ज्या भूमीवर आम्ही राहतोय ती जाणवतच नाहीये आम्हाला

आम्ही जे म्हणू, ते दहा पावलांपल्याड ऐकू नाही येणार तुम्हाला

आणि लोक बोललेच समजा प्रसंगपरत्वे काही

तर त्यात त्यांना करावाच लागेल उल्लेख क्रेमलिन कॉकेशियनचा..’

मांडेलश्टामच्या कवितेच्या या चार ओळींतील शेवटचा ‘क्रेमलिन कॉकेशियन’चा उल्लेख तत्कालीन सर्वसत्ताधीश स्टालिनसाठीचा. कॉकेशियन पर्वतराजीशी स्टालिनच्या वाडवडिलांचे- म्हणजे पर्यायाने स्टालिनचेही नाते. मांडेलश्टामने तत्कालीन परिस्थितीचे केलेले हे यथार्थ वर्णन. असली वर्णने करणाऱ्या कविता आपापसांतही वाचणे, वाचून दाखवणे म्हणजे मोठा गुन्हाच. मग व्हायचे तेच झाले. सन १९३६ ते १९३८ मध्ये स्टालिनच्या राजवटीखाली रशियात मोठी उलथापालथ झाली. विरोधकांना संपवण्याची दमनकारी मोहीम स्टालिनने हाती घेतली होती. त्यात क्रांतिविरोधी कारवाया करतो, असा ठपका ठेवत मांडेलश्टामला अटक करण्यात आली. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. कसे कुणास ठाऊक, पण त्या पोलादी पिंजऱ्यातूनही त्याने पत्नी नादेझ्दाला पत्र पाठवून ‘थंडीपासून बचावासाठी जमल्यास थोडे उबदार कपडे पाठवून दे,’ असे पत्र धाडले. नादेझ्दाने तसे कपडे धाडलेही.. ते मांडेलश्टामला कधीच मिळाले नाहीत. मात्र, काही दिवसांतच त्याचा अंत झाला. मृत्यूचे अधिकृत कारण दिले गेले : निदान न झालेला आजार.

रशियातील या कवीविषयी, त्याच्या कवितेविषयी, त्याच्या मृत्यूविषयी, रशियाविषयी, स्टालिनविषयी, दमनशाहीविषयी येथे लिहिण्याचे प्रयोजन म्हणजे ‘ललित’ मासिकाच्या यंदाच्या पहिल्याच- म्हणजे जानेवारी महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झालेला अत्यंत वाचनीय आणि त्याचबरोबर चिंतनीय असा लेख. ‘वितळलेल्या बर्फावर तरंगणाऱ्या पुस्तकांची कहाणी’ अशा लांबलचक शीर्षकाचा हा लेख लिहिला आहे अरुण खोपकर यांनी. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते आणि लेखक अशी खोपकर यांची बहुपेडी ओळख. भारंभार लिहिणारे ते नाहीत. मोजके व सकस लिहिणे त्यांना पसंत. हा लेख त्याच धाटणीचा आहे.

रशियन सिनेकलावंतांच्या संघटनेकडून आलेल्या निमंत्रणानुसार खोपकर रशिया दौऱ्यावर गेले होते. दौऱ्याच्या वर्षांचा नेमका उल्लेख नसला तरी तो काळ बहुदा १९८१-८२ च्या सुमाराचा असावा, असा अंदाज लेखातील संदर्भावरून बांधता येतो. खोपकर रशियात गेले ते त्या देशाची काहीएक प्रतिमा मनात धरून.. काही अपेक्षा मनात धरून. या अपेक्षा मुख्यत्वे पुस्तकांच्या उपलब्धतेबाबतच्या. त्यांनी लहानपणी सुंदर रंगीत चित्रे असलेली आणि छानशा गोष्टी सांगणारी अनेक पुस्तके बघितलेली. ती सारी पुस्तके रशियन प्रकाशनाची. मूळ रशियन पुस्तकांतील आराखडय़ास धक्का न लावता भाषांतरित मजकुरासह ती छापली जात. हे बालसाहित्य लेखकाच्या मनात अगदी कायमचे घर करून राहिलेले. पुढे ते रशियन शिकले व त्यामुळे त्या भाषेतील अनेक नामवंत लेखकांची पुस्तके थेट वाचण्याची संधी त्यांना मिळाली. म्हणूनच रशियास जाताना त्यांच्या डोळ्यांसमोर उभा होता तो देश असा- की जेथे कोपऱ्याकोपऱ्यावर पुस्तकांची दुकाने असतील. त्यांतील प्रचंड कपाटांत दोस्तोव्हस्की, टॉलस्टॉय, चेखव्ह आदी लेखकांच्या पुस्तकांची चळतच्या चळत उभी असेल. माहिती असलेल्या व माहिती नसलेल्या अशा लेखकांची शेकडो पुस्तके आपल्याला खरेदी करता येतील. मात्र, प्रत्यक्षात रशियात गेल्यावर त्यांचा भ्रमनिरास झाला. हा भ्रमनिरास का? तर, राजकारणी नेत्यांची भाषणे, प्रचारविषयक नियतकालिके व पुस्तके रशियात तेव्हा मुबलक उपलब्ध होती. मात्र, उत्तम साहित्य मुळात अत्यल्प प्रमाणात छापले जाणार, आणि तेही उपलब्ध होईल की नाही, याची शंकाच. खोपकर यांना रशिया दौऱ्याचे निमंत्रण ज्यांनी दिले होते ते नाऊम क्लेमन हे जागतिक कीर्तीचे चित्रपट अभ्यासक. त्यांच्यामुळे खोपकर यांना हवी ती पुस्तके मिळू शकली. मात्र, तेव्हाची रशियातील परिस्थिती कशी होती, भोवताल कसा जखडलेला होता, याचे वर्णन या लेखातून येते.

तरी ती परिस्थिती बरी. सन १९५६ मध्ये निकिता ख्रुश्र्च्ोव्ह यांनी सोव्हिएट कम्युनिस्ट पक्षाच्या विसाव्या काँग्रेसमध्ये स्टालिनच्या राजवटीतील दमनशाहीबद्दल भाषण केले आणि तेव्हापासून रशियातील नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे बर्फ वितळायला लागले, अशी नोंद खोपकर करतात. खोपकर रशियात गेले त्याआधी २५ वष्रे हे बर्फ वितळायला लागले होते. त्या संदर्भाने त्यांच्या लेखाचे शीर्षक ‘वितळलेल्या बर्फावर तरंगणाऱ्या पुस्तकांची कहाणी’ असे.

ही कहाणी पुस्तकांची आहेच; पण त्याहीपेक्षा ती पुस्तके ज्या बर्फावर तरंगत आहेत त्या बर्फाची आहे. त्याच बर्फाविषयी बोलताना खोपकर संदर्भ देतात तो कवी असिप मांडेलश्टाम याचा. खोपकर ज्या काळात रशियात गेले होते त्या काळात निदान बर्फ वितळत तरी होता. पण मांडेलश्टाम ज्या काळात कविता लिहीत होता, काही सांगत होता, तो काळ म्हणजे एका अर्थाने हिमयुगच. माणसाची व्यक्त होण्याची प्रेरणा निर्दयपणे छाटून टाकणारे, त्याला पुरते जखडून टाकणारे हिमयुग. त्या हिमयुगाशी लढताना मांडेलश्टामने जीव गमावला. त्याचे सारे साहित्य स्टालिनच्या राजवटीने जप्त केले होते. त्याच्या पुस्तकांवर बंदी आली होती. तरीही स्टालिनच्या मृत्यूनंतर ते साहित्य पुन्हा उगवून आले ते दिवंगत मांडेलश्टामची पत्नी नादेझ्दा हिच्या योगाने. पतीने लिहिलेल्या, मात्र दमनशाहीने नष्ट केलेल्या कवितांमधील शब्द न् शब्द नादेझ्दाने आपल्या आठवणीत राखून ठेवला होता. स्टालिनच्या अंतानंतर काही वर्षांनी नादेझ्दा हिने पतीच्या कविता पुन्हा एकदा जगापुढे आणल्या. सोबत तिने ‘होप अगेन्स्ट होप’ व ‘होप अबँडंड’ असे दोन भागांतील आत्मचरित्रही लिहिले.. असा तपशील खोपकर पुरवतात.

याच तपशिलाच्या अनुषंगाने त्यांच्या लेखात एक वाक्य येते.. ‘कुणी हुकूमशाहीची तरफदारी करायला लागले तर त्याला सांगावेसे वाटते, उद्या बळी जाणाऱ्या बोकडाने तरी आज बिर्याणीचे गुण गाऊ नयेत.’

पुस्तकांची कहाणी सांगणाऱ्या लेखातील हे एक- किंबहुना सर्वाधिक- महत्त्वाचे वाक्य. हे वाक्य लागू होणार कुठल्या काळास? तर- कुठल्याही काळास. कारण उद्याचा काळ काय असेल, हे आत्ताच सांगणे कठीण असले तरी हे वाक्य मनात ठसवून ठेवण्यास काहीच हरकत नाही. ते ठसवणे तितकेसे कठीण नाही. हे वाक्य लागू होणार कुणाला? तर- कुणालाही. कारण रशिया असो वा अन्य कुणी.. स्टालिन असो वा अन्य कुणी.. शतक एकोणिसावे असो वा अन्य कुठले.. हुकूमशाहीची मूळ गणिते आणि समीकरणे सारखीच असतात. त्याची प्रमेये तशीच असतात. हुकूमशाहीचे पीक कुठल्या भुईतून, कधी निघेल याचा नेमच नाही काही. शिवाय, हुकूमशाहीचे पीक काढणारे हात ‘हे पीक हुकूमशाहीचे नाहीच..’ अशी बतावणी करण्यात वाकबगार असतील तर प्रश्न अधिकच बिकट होणार. अशा स्थितीत ‘उद्या बळी जाणाऱ्या बोकडाने आज बिर्याणीचे गुण गाऊ नयेत,’ असे सांगायला कुणीतरी हवेच. हे सांगणे बिर्याणीसाठी नाही, तर उद्या मानेवर चालणाऱ्या सुऱ्याबाबतचा तो इशारा.

आणि या लेखाच्या शेवटाकडे जाताना, लेखाच्या अगदी प्रारंभी असिप मांडेलश्टामने जो प्रश्न केला होता, त्याची आठवण काढणेही सयुक्तिक. ‘कवितेपायी जीवही जाऊ शकतो, इतके मोल असते शब्दांना’ हे त्याचे अनुभवसिद्ध सांगणे. हे असे मोल आपल्याला ठाऊक आहे? शब्दांचे खरेखुरे वजन तोलले आहे आपण? ठाऊक असेल आणि तोलले असेल तर उत्तमच. नसेल, तर निदान मांडेलश्टामच्या कवितेवरून तरी त्याचा बोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. समजा, सवय नसेल असल्या गोष्टींची;

तरीही..

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The current status of marathi literature world