|| समीर गायकवाड

म्हादबानं शेतात जायचं बंद करून सात-आठ महिने लोटले होते. त्याचं वडिलोपार्जित रान आता पडीक पडलं होतं. त्याचा धाकटा मुलगा भास्कर हा पत्नी सावित्रीसह पाऊसपाणी असलं की शेतात राबायचा. एरव्ही ते त्यांच्या बांधाला लागून असलेल्या नवनाथ पवाराचं शेत खंडानं करायचे. नवनाथनं म्हादबाकडं शेत कसायला दिलं तेव्हा म्हादबा तिशीतला असावा. बायको-पोरांना हाताशी धरून त्यानं दोन्ही शेतं फुलवली होती. नवनाथाचं खत, बियाणं असायचं; तर मेहनत म्हादबाची असायची. उत्पन्नाचा दहावा हिस्सा म्हादबाला राही. सोबत त्याच्या रानातल्या दर पिकाला पाण्याच्या चार पाळ्या मिळत. आजवर याच्या जोरावरच म्हादबा आणि त्याचं खटलं तगून होतं. पण दिवस सगळे सारखे नसतात याचा मस्तक खणून काढणारा अनुभव म्हादबाला आला.

साठीत आलेला म्हादबा थकला नव्हता, पण जेरीस आला होता. कारण मागच्या तीन-चार वर्षांपासून पावसाने हात आखडता घेतल्यापासून त्याचं कंबरडं मोडलं होतं. नवनाथच्याच पिकांना जेमतेम पुरेल इतकं पाणी साठू लागलं. सलग पिकं जळाल्यानं म्हादबाच्या डोईवर कर्ज झालं. तेव्हा नवनाथाच्या विहिरीचं पाणी बंद झाल्यानं हिस्सा तरी वाढवून मिळावा असा लकडा भास्करनं बापाच्या पाठीमागं लावला. शब्दाला पक्का असलेला म्हादबा याला राजी नव्हता. आपण एकदा केलेली बोली बदलता येणार नाही असं त्याचं म्हणणं. यावरून बाप-लेकात खटके उडू लागले. शब्दाला कवटाळून बसलेल्या बापाला संसारापेक्षा वचन महत्त्वाचं वाटतं, या भावनेनं भास्करच्या मनात घर केलं. एके दिवशी मनाचा हिय्या करून त्यानं सांगितलं, की जोवर खंडाचा हिस्सा वाढवून मिळणार नाही, तोवर नवनाथाच्या शेतात राबणूक बंद!

त्याचवेळी रिकामं बसण्याऐवजी त्यानं विष्णू अवताडेच्या शेतातलं काम धरलं, कारण त्याला जबाबदारीची जाणीव होती. घरातली खाणारी तोंडं त्याच्या नजरेपुढून हलत नव्हती. आपण बिनकामाचे घरी बसलो तर बा अजूनच खचून जाईल हे त्याला ठाऊक होतं.

आपला पोरगा सांगतोय त्यात तथ्य आहे हे म्हादबालाही कळत होतं, पण नवनाथासमोर जाऊन घासाघीस करण्यास त्याची तयारी नव्हती. म्हादबाच्या घरी यावरून धुसफुस सुरू झाली. भास्कर उलटून बोलत नव्हता, पण ऐकतही  नव्हता. म्हादबाची बायको सगुणा आणि भास्करची पत्नी सावित्री यांनी म्हादबाच्या बाजूनं कौल देत पवाराच्या शेतातलं काम सुरू ठेवलं. एकटा पडूनही भास्कर इरेला पेटला होता.

भास्करनं दुसरीकडे काम धरल्याचं म्हादबाच्या मनाला लागलं. तो आतल्या आत कुढू लागला. अखेर त्यानं नवनाथची भेट घेण्याचं ठरवलं. सकाळीच उठून तो पवाराच्या घराच्या दिशेनं निघाला. ओसरीवर रिकामटेकडय़ा लोकांचा अड्डा जमवून म्हातारा नवनाथ उघडय़ाने बसून होता. इतक्या सगळ्या माणसांना बघून म्हादबा वरमला. त्याच्या घशाला कोरड पडली. तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारून त्यांनी त्याला भंडावून सोडलं. खरं तर क्वचितप्रसंगी गावात येणाऱ्या म्हादबाची नड नवनाथनं ओळखली होती. येण्याचं कारणही हेरलं होतं. पण तो मुकाट बसून म्हादबाची परीक्षा घेत होता. भिडस्त स्वभावाचा म्हादबा स्वतवरच चडफडत राहिला. बराच वेळ इकडचं तिकडचं बोलून रिकाम्या हातानं आणि खिन्न मनानं तो माघारी वळला. त्याला मेल्याहून मेल्यासारखं वाटलं. हे आपल्याच्यानं होणार नाही हे त्याला कळून चुकलं. नवनाथाची इतकी वर्षे इमानेइतबारे चाकरी करूनही त्यानं आपलं मन ओळखलं नाही, आपली नड जाणली नाही; उलट आपली टवाळकी होत असताना तो मूढ बसून राहिला याचं त्याला वैषम्य वाटू लागलं. खोटं निमित्त पुढे करत तो जड पावलानं तिथून निघाला. घरी गेल्यावर सगुणेला, सावित्रीला काय सांगायचं याचं मनात काहूर उठलं. भास्करचे बोल एक प्रकारे खरे ठरले. आपण हरलो, आपल्याला फसवलं गेलं असं त्याला राहून राहून वाटू लागलं.

त्या दिवसापासून त्याच्यातलं चतन्य लोप पावलं. तो घरात बसून राहिला. ओघानं त्याचं बोलणं कमी झालं. एकांताच्या गत्रेत तो खोल बुडून गेला. दिवसभर आढय़ाकडे तोंड करून तो मुक्यानं बसायचा. रात्र झाली की बाजंवर पडून चांदण्या मोजायचा. त्याला कुशीत घेण्यासाठी आभाळ खाली वाकायचं आणि तो कूस बदलायचा! त्याच्या अंथरुणात शिरलेला अंधार दिवसा त्याच्या डोळ्यांत गोठून राहायचा. खरं तर म्हादबाला भास होऊ लागले होते. कधी नांगरणीचे, तर कधी दारं धरायला वाफ्यात उभं असल्यागत वाटू लागलं. गव्हाच्या लोंब्या पिडऱ्याला गुदगुल्या करताहेत, उसाचा चिकटा अंगावर रेंगाळतोय, बाजरीचे डोलते तुरे अगत्यानं बोलावताहेत, हरभरा पायात घुटमळतोय, तुरीची काडं अंगाला घुसळून काढताहेत, भुईमुगात पावलं अडखळताहेत असे अनेक भास होऊ लागले. एका रात्री तर कहर झाला. ताकद एकवटून त्याने वस्तीवरल्या खोलीत ठेवलेला डांब मोकळ्या वावरात आणला आणि खड्डं खांदून पुरण्याचा प्रयत्न करू लागला. सगळे जागे झाले. म्हादबाला तशा अवस्थेत पाहून दिग्मूढ झाले. भास्करनं मात्र मन घट्ट करत आपला बेत तडीस न्यायचं ठरवलं.

हा-हा म्हणता पावसाळा कोरडा गेला. दिवाळी फिकी गेली. निम्मा हिवाळा सरला, शिशिरागमन झालं. मार्गशीर्ष सुरू झाला. अंग गोठवणाऱ्या एका रात्री भास्कर म्हादबाच्या जवळ गेला. हसतमुखानं म्हणाला, ‘‘आबा, उद्या रानात या. खळं केलंय. वीस पोती जुंधळा सहज होईल. लई दिस झालं तुम्ही रानातच आला न्हाईसा. आता उद्या बघाच! ’’ त्याच्या त्या उद्गारानं म्हादबाच्या डोळ्यांत अद्भुत लकाकी तरळली. तो चमकून बाजंवरून ताडकन् उठला. पुन्हा एकदा त्यानं भास्करकडून खात्री करून घेतली. भास्करच्या गळ्यात पडून तो ढसाढसा रडू लागला. त्याची अंगी भिजली. त्या रात्री म्हादबाला झोप कसली म्हणून आलीच नाही. भास्करनं रान कधी नांगरलं, कधी पेरलं.. कसं कळू दिलं नाही? पाणी कुठून आणलं? असे प्रश्न त्यानं विचारण्याआधीच भास्करनं उत्तर दिलेलं. विष्णू आवताडय़ाच्या शेतात काम करताना तिथनंच पाइपलाइन टाकून, त्याचंच ठिबक भाडय़ानं आणून रात्री रानात राबून जुंधळा केलेला. पाण्याच्या बदल्यात निम्मा हिस्सा त्याला देऊ केलेला. भास्करचं हे चरित्र म्हादबाला स्वर्गीय सुख देऊन गेलं.

दरम्यान, भास्करनं शेताच्या खालल्या अंगाचं रिंगण दगडगोटे वेचून साफ करून पार सपाट करून ठेवलं होतं. रिंगणाच्या मधोमध छातीइतक्या उंचीचा डांब रोवला. इकडून तिकडून गोळा केलेलं गाडीभर शेण आणून खळ्यातल्या चिखलात ओतलं. सगळी ऱ्याड रबडी एकत्र केली. सफाईनं पसरवली. खळ्याचं रिंगण हाडकायला, वाफशावर यायला एक दिवस पुरला होता. खळं होता होईल तेवढं खुरतून घेतलं. डांबाला जुंपायसाठी बलाचे निरोप रात्रीच देऊन ठेवले होते.

दुसऱ्या दिवशी तांबडफुटी व्हायच्या आधीच भास्कर पोरंटोरं घेऊन रानात गेला. ओढय़ातला मऊशार काळा दगड त्याने आदल्या रात्रीच तिथं आणून ठेवला होता. गुलाल माखून त्याची पूजा केली. धनधान्याला बरकत येऊ दे म्हणून साकडं घातलं. खळ्याभवती पेंढीवर पेंढी रचून पाळा रचला. आत जाण्याइतकी जागा मोकळी सोडली. बलांची पूजा केली आणि त्यानं बलं हाकण्यास सुरुवात केली. सकाळी उत्साहात असणारी त्याची पोरं दमून गेल्यानंतर लाकडं आणि जुंधळ्याच्या पेंढय़ा वापरून तयार केलेल्या खोपीत जाऊन केव्हा झोपी गेली, काही कळलंदेखील नाही. मोडणीसाठी आलेल्या बायका खटाखट ताटं मोडीत होत्या. उन्हे चांगलीच वर आली. आणि निमिषार्धातच पहाटंपासूनची भास्करची प्रतीक्षा संपली. बांधाच्या पल्याडल्या बाजूला तीन ठिपके दिसू लागले तसं त्यानं खळ्याचं गाणं सुरू केलं. त्याचा पल्लेदार आवाज कानावर पडताच म्हादबाच्या जड झालेल्या पायात बळ आलं. सर्व ताकदीनिशी तो धावत सुटला. सगळ्यांचं लक्ष म्हादबाकडं लागून राहिलं. धावताना धोतराचा सोगा निसटला आणि तो थकलेला पिंपळ खळ्यात येऊन कोसळला. भेदरलेली बलं मागं सरली. भास्करनं त्यांचा कासरा आवळत त्यांना शांत केलं. त्याने पुढे होत खाली पडलेल्या पित्याला कवेत घेतलं. म्हादबाच्या डोळ्यांत आनंदाश्रूंनी एकच दाटी केली होती. भास्करनं घट्ट मिठी मारताच त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. म्हादबाच्या डोळ्यांतलं पाणी टपोऱ्या दाण्यांवर पडताच त्यांना सोनेरी चकाकी येऊ लागली. सावित्री, सगुणाच्या डोळ्यांनाही पाझर फुटला. मोठय़ांचा गलका ऐकून खोपीतली पोरं बाहेर आली.. आज्जी-आज्ज्याला गच्च बिलगली.

बऱ्याच काळानंतर त्या रात्री म्हादबा रानात मुक्कामाला राहिला. खळ्याशेजारी बाज टाकून समाधानानं निजला. त्याला कवेत घेण्यासाठी वाकलेल्या आभाळाला त्यानं आिलगन दिलं. आणि हो.. त्या रात्री चंद्राला दिमाखदार खळं पडलं होतं- ज्याचं प्रतिबिंब म्हादबाच्या डोळ्यांत पडलं होतं!

sameerbapu@gmail.com