डॉ. सिसिलिया काव्र्हालो
ललितगद्य हा एक अतिशय खुला आणि लवचिक वाङ्मयप्रकार. गुजगोष्टी, निबंध, लघुनिबंध, ललित लेख, मुक्तगद्य, व्यक्तिचित्र, प्रवास, निसर्गवाचन, आत्मानुभव, जीवनरीत, लोकसंस्कृती प्राक्तकथाविषयक, देशोदेशीच्या साहित्य- संस्कृती, संदर्भसहितचे लेखन विविध कलानुभवांचे प्रकटीकरण असे विविधांगी लेखन त्यात समाविष्ट होऊ शकते. त्याचबरोबर पत्रस्वरूप, आत्मकथनपर, नियतकालिकांतील लेख, रिपोर्ताज स्वरूपाचे लेखन, फेसबुक ‘वॉल’वरील ब्लॉगलेखन, अर्थात यातील दर्जेदारपणा सांभाळून झालेले लेखन यामधूनही ललितगद्याचा प्रवाह बुलंद हात गेलेला दिसतो.

कोणत्याही प्रकारच्या साहित्यातून व्यक्तिमानस आणि समूहमानस व्यक्त होत असते; मात्र ललित लेखनातून भाषा आणि भावना यांचे विभ्रम बघायला मिळतात; आणि अनुभवाच्या कक्षा जशा विस्तारत जातात तसे लेखनालाही विविध आयाम प्राप्त होतात. संगीता अरबुने यांच्या ‘एक सो बीस हरी पती लौंग आणि मी’ या ललित गद्यासंदर्भात असेच म्हणता येईल. ‘मनीमानसी’ या ललितलेखसंग्रहातील लेख वर्तमानपत्रीय सदरलेखनाचे भान सांभाळत लिहिलेले आहेत त्याचे विकसित रूप ‘एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी’ मध्ये दिसून येते. हा प्रवास मनमोकळेपणा आणि परिपक्वता यांनी रंगत गेलेला आहे. त्यांच्या लेखनात साधेपणा, सच्चेपणा, आत्मशोध, समाज मनाचा शोध इत्यादी वैशिष्ट्ये सहजतेने अवतरलेली आहेत.

सातारच्या एका छोट्या गावातील पानपट्टीच्या दुकानात बसणारी शाळकरी मुलगी लग्न होऊन वसईसारख्या एका उपनगरात आली. स्थिरावली आणि तिच्या लेखनातून विड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागवेलीच्या पानासारखा, रंग चढत गेला. विविध विषयांवरील ललितबंध ‘एकसोबीस हरी पत्ती…’ मध्ये आहेत.

आईिवना पोरकेपणाची मनोवस्था, ‘आई तू का गं गेलीस?’ या लेखातून व्यक्त करीत असताना, आपली आई कलावंत असल्याची प्रचीती घरातील वस्तू पाहून लेखिकेला होते. चंच्या बनवणे, बटणांचे ससे, मण्यांचे पोपट बनवून भिंतीवर त्याच्या चौकटी लावणे, रांगोळी क्रोशेच्या पिशव्या, पॅचवर्कचे पडदे, गालिचे विणणे, जुन्या कपड्यांपासून ‘टॉप बनवणे’ असं निर्मितीक्षम काम करणारी आई कायमची निघून कशी जाऊ शकते अशा विचारात बुडालेल्या दोन्ही बहिणींचे वडील दुसरे लग्न करतात; आणि या बहिणींची ‘सिंड्रेला’ होते. मग लेखिकेतील कवयित्री जागी होते आणि कविता स्रवू लागते.

आईच्या मायेला पारख्या झालेल्या बहिणी, आंतरधर्मीय विवाह केलेल्या मावशीच्या मुस्लिम कुटुंबियांनी मात्र प्रेमाचे भावबंध निर्माण केले. आजीच्या छोट्या घरात मोठा अवकाश, बालपणी- तरुणपणी प्राप्त झालेल्या लेखिकेला स्वत:चे प्रशस्त घरही छोटे वाटत होते. साध्या इंजेक्शनला घाबरणारी मुलगी मोठ्या धैर्याने आपल्या बाळंतपणाला सामोरी जाते. आपल्या मनात उमटलेल्या संवेदनांच्या तारा, दुसर्‍या टोकाशी असलेल्याशी लगेच जुळत (उदाहरणार्थ, बाळंतपणाच्या क्षणी नवरा जवळ असावा असे वाटत असतानाच तो त्याक्षणी कामावरून लवकर आल्याने दत्त म्हणून समोर उभा ठाकणे, आपल्या घरालगतचे फ्लॅट आपल्यालाच मिळावेत अशी इच्छा मनात येताच ती लगेच फलद्रूप होणे इत्यादी) तथापि घरकामाला बाई मिळावी म्हणून प्रतिक्षा करावी लागणे, मनासारखी माणसं मात्र न मिळणे, अशा काही घटना. प्रसंगांनी लेखनातील विरोधाभास फुलत गेलेला आहे.

संग्रहात असे काही विषय आलेले आहेत की ज्यावर कोणी लिहू धजणार नाही. शेण गोळा करण्यासाठी शेणणार्‍या गाईच्या शेपटीजवळ घमेले होत फिरणे, वावरात शौचास जाण्याचा प्रसंग, हौसेखातर कोंबड्या पाळणं, त्या हरवू नयेत म्हणून त्यांच्या पायांना घुंगरू बंधणं, हरवल्यास आसपास शोधत फिरणं, पानपट्टीच्या दुकानात बसणं आणि आपल्या वाढत्या वयाची होणारी जाणीव, हे सारं करीत असताना, ‘कमवा आणि शिका’ हे रयत शिक्षणसंस्थेचं घोषवाक्य मनाला उभारी देत असणं… असं अत्यंत पारदर्शी लेखन तत्कालीन समाज, कुटुंब-व्यवस्था यांचं आरपार दर्शन घडवतं.

सांस्कृतिक सौहार्द आणि सामाजिक दडपण असाही विरोधाभास लेखनाच्या ओघात प्रतिबिंबित झालेला आहे. चाळीतील वास्तव्य, त्यामुळे विविध समूहांशी येणारा संपर्क, काझी कुटुंबाचा शेजार एकीकडे आणि दुसरीकडे मावशीने आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे तिच्या कपाळावरील हिरवं गोंदण, बोडकेपणा सूचित करणारं… त्याचप्रमाणे आईकडे आल्यावर गळ्याला कुंकू लावून घेणे हे सारं लेखिकेला जाहीरपणे कोणाला सांगता येत नव्हतं… आपल्या सासूनेही आपल्याला मनापासून स्वीकारलं नसण्याची कबुली लेखिका देते. मावशीचा आंतरजातीय विवाह आपल्या नवर्‍याने समजून घेतलेला असला; तरी ते मात्र आपल्या घरातील माणसांना कळू नये; याची काळजी तो घेत असल्याचेही लेखिका सांगते.

कामवाल्या बाईला झालेल्या कुष्ठरोगाच्या लागणीमुळे तिच्याविषयी नकाराची भावना व्यक्त करीत असतानाच तिच्या कामाच्या पद्धतीतील नेटकेपणा आणि प्रामाणिकपणाही लेखिका नेमका टिपते. ‘घर, अंगण, मी आणि ती’ या लेखात तिचे कारुण्यपूर्ण वर्णन आलेले आहे. आपल्या बेगडी जीवनाची लेखिकेला झालेली जाणीवही त्यामुळे महत्त्वाची वाटते. जर आपण सच्च्चेपणाने वागलो नाही तर आपली लेखणी कृतक ठरेल; याचीही तिला जाणीव आहे. हा तिचा आत्मशोध तर आहेच; परंतु समूहमनाचा आविष्कार करण्याची सामाजिक बांधिलकी वा सामिलकी माणणारी ही लेखिका असल्याचे ही यावरून दिसून येते.

‘एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी’,
संगीता अरबुने, शब्दालय प्रकाशन
पाने- १४९, किंमत- ३००/- रपये