डॉ. अविनाश भोंडवे

‘डॉक्टर्स खोऱ्याने पैसे मिळवतात आणि समाजाला लुटतात, व्यावसायिक नीतिमत्ता पायदळी तुडवतात,’ असे आरोप वैद्यकीय व्यावसायिकांवर आज सर्रास होत असतात. या पाश्र्वभूमीवर मुंबईच्या के. ई. एम. आणि सायन हॉस्पिटलचे माजी डीन डॉ. अविनाश सुपे यांचा ‘सर्जनशील’ हा आत्मचरित्रपर ग्रंथ म्हणजे या आक्षेपांना दिलेले सडेतोड उत्तर आहे. डॉक्टर बनण्यासाठी काय करावे लागते, व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य मिळवण्यासाठी तो काय काय धडपड करतो, जीवनातल्या विविध क्षेत्रांत तो किती प्रगल्भ असतो, आणि पैसा नव्हे, तर दुर्धर आजाराचा रुग्ण बरा झाल्यावर त्याच्या डोळ्यांतील कृतज्ञता हीच त्याची कमाई कशी असते, याचा प्रत्यय पानापानांतून येत राहतो.

Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
sankashti ganesh chaturthi 2024 shubh muhurat puja vidhi and mantra dwipriya falgun ganesha chaturthi
सर्वार्थ सिद्धी योगातील संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, शुभ योग आणि चंद्रोदय वेळ
Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे

विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील खेडय़ातून नोकरीनिमित्ताने मुंबईत येऊन स्थायिक झालेल्या एका निम्न मध्यमवर्गी कुटुंबातील एका हुशार मुलाने सर्जरीमध्ये एम. एस. झाल्यावर लाखो रुपयांचे उत्पन्न देणारा खासगी व्यवसाय करण्याचा मोह नाकारून मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षकी पेशा पत्करला. आणि त्यानंतर पोटाच्या शस्त्रक्रिया, दुर्गम भागातील गरीबांसाठी वैद्यकीय शिबिरे, वैद्यकीय संशोधन, वैद्यकीय शिक्षकांसाठीचे उच्च शिक्षण, मॅनेजमेंट, आपत्ती नियोजन, रुग्णालयांचे व्यवस्थापन अशा अनेकविध क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. सामान्य कुटुंबातील या मुलाने आपल्या मेहनतीने, कुशाग्र बुद्धिमत्तेने आणि धडपडय़ा स्वभावाने देशभरातच नव्हे, तर परदेशातही नाव कमावले. भारतातील वैद्यकीय शिक्षणाला वळण देणाऱ्या डॉ. अविनाश सुपे यांच्या जीवनप्रवासाची ही गाथा केवळ वाचनीयच नव्हे, तर मननीय आहे. आत्मकथन स्वरूपातील या पुस्तकाची भाषा अतिशय सरळ व सुबोध आहे. विशेष म्हणजे मोठमोठय़ा पदांवर काम करूनही आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवूनही कोणतीही आत्मप्रौढी त्यांच्या लिखाणात जाणवत नाही.

विद्यार्थिदशेत मुंबईतल्या वांद्रे गव्हर्नमेंट कॉलनीतील मित्रांबरोबर केलेली धमाल,  जयहिंदू कॉलेजमधील दिवस, मेडिकल कॉलेजातील आठवणी, इंटर्नशिपचा काळ यांचे वर्णन करताना ४० वर्षांपूर्वीच्या मुंबईची भूतकालीन सफर ते घडवून आणतात. 

वैद्यकीय शिक्षणाच्या काळातील त्यांचे शिक्षक डॉ. अरुण सम्सी, डॉ. रवि बापट, डॉ. शरदिनी डहाणूकर, डॉ. आर. ए. भालेराव, डॉ. मनू कोठारी, त्यांचे मामा डॉ. दामोदर कोलते यांची व्यक्तिचित्रे समर्पकरीत्या त्यांनी रंगवली आहेत. त्यातील डॉ. कोलते, डॉ. मनू कोठारी, डॉ. डहाणूकर यांच्यासोबतचे प्रसंग हृदयस्पर्शी आहेत. सर्जरी आणि जीवनात घ्यायचे निर्णय याबाबत या शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि त्यांच्यासोबतचे ऋणानुबंध यामुळे आपले आयुष्य कसे उंचावत गेले याचा ते कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. मेडिकल कॉलेजमध्ये असताना केलेल्या साहित्य व कलाविषयक गोष्टींमुळे त्यांचे जीवन कसे बहरत गेले याचे उत्कट वर्णन ते करतात.

एक सर्जन म्हणून काम करताना वैद्यकीय कौशल्ये प्राप्त करण्यासाठी घेतलेले कष्ट, लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय परिषद भरवताना घेतलेले कष्ट यांतून ते घडत गेले. मुंबईतील अनेक दंगलींचे अनुभव घेत डॉ. सुपेंनी आपत्ती व्यवस्थापनाची अशी काही सोय केली की जखमी व गंभीर जखमी रुग्ण एकाच वेळी मोठय़ा संख्येने आले तरी त्यांच्यावर सुविहित उपचार व्हावेत.

वैद्यकीय शिक्षकांना नेतृत्व, शिक्षण आणि संशोधन प्रशिक्षण देणाऱ्या अमेरिकेतील फेमर इन्स्टिटय़ूटमध्ये संस्थेमध्ये काम केल्यावर त्यांनी ते बीज भारतभर पसरवले. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियामध्येही वैद्यकीय उच्च शिक्षणाबाबत नियोजन करण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे. डॉ. सुपे हे केवळ डॉक्टर, सर्जन, वैद्यकीय शिक्षक आणि डीन नव्हते; तर त्यांना ट्रेकिंगचीही आवड होती. हिमालयातील गिर्यारोहण, कैलास मानसरोवर यात्रा, अंटाक्र्टिका सफर, वेगवेगळी जंगले आणि अभयारण्यातील सफारी यांची वर्णने ते रंजकतेने करतात. फोटोग्राफीचेही त्यांनी शास्त्रोक्त शिक्षण घेतले. नौदलातील फोटोग्राफर बोधें सरांसमवेत त्यांनी जंगलांतील तसेच महाराष्ट्रातील मंदिरांचे फोटोंचे पुस्तक काढले.  शास्त्रीय संगीताची आवडही त्यांनी जोपासली. युरोपचा प्रवास असो की ऑपरेशन थिएटरमधील शस्त्रक्रिया- गाण्यांचा छंद त्यांनी निगुतीने जोपासला. त्यांनी पेटीवादनाचे शिक्षणही घेतले.

या सर्व प्रवासात कुटुंबीयांचे आपल्या आयुष्यावर झालेले सकारात्मक परिणामही ते कथन करतात. हे पुस्तक डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकानेच वाचले पाहिजे. शिक्षकांकडून काय शिकावे, व्यवसायात उत्कर्ष कसा साधावा, आपले जीवन कसे समृद्ध करावे आणि पैशापेक्षा समाधान कसे महत्त्वाचे, हे या पुस्तकातून नक्कीच शिकायला मिळेल.

गेल्या काही वर्षांत सनदी नोकरी करणाऱ्या आणि समाजात नाव कमावणाऱ्या अनेकांनी आपल्या आत्मकथनांत काही वाद आणि वावटळ उठवणाऱ्या गोष्टी लिहिल्या. पण डॉ. सुपे यांच्या पुस्तकात असा कोणताही उल्लेख औषधालाही शोधून सापडत नाही. उत्तम सर्जन त्यालाच म्हणतात, जो शस्त्रक्रियेचे हत्यार केव्हा उचलायचे नाही हे समर्थपणे ठरवू शकतो. हा वस्तुपाठ सर्जन होणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेला असतो. कदाचित याचाच हा परिणाम असावा. सरकारी नोकरीत उच्च स्थानी काम करताना अनेकदा राजकारण, अपमान व अवहेलनेचाही सामना करावा लागतो. डॉ. सुपे यांनी अशा कोणत्याही गोष्टींचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी स्वत:साठी घालून घेतलेल्या उच्च नैतिकतेचा हा परिपाक असावा. ‘सर्जनशील’ हे पुस्तक म्हणजे इवलासा वेलू गगनभरारी कसा घेतो याचे उत्तम उदाहरण आहे.

सर्जनशील’- डॉ. अविनाश सुपे, ग्रंथाली प्रकाशन, पाने-३५७, किंमत- ३५० रुपये.