‘लोकरंग’ (१३ सप्टेंबर ) मधील मकरंद साठे यांचा ‘सार्वजनिक अवकाशाचाच विसर?’ हा लेख वाचला. प्रत्येक माणसाला शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी जशी वैयक्तिक / सार्वजनिक आनंदाची आवश्यकता आहे तद्वतच समाजास एकोप्यासाठी आणि समाजस्वास्थ्यासाठी विविध सण- समारंभ आणि उत्सवांची गरजदेखील तितकीच महत्त्वाची मानली गेली आहे. सांप्रतकाळी पारंपरिक उत्सवात आमूलाग्र बदल घड(व) ल्याने विविध व्याधींचा समाज शिकार बनला, हे नक्कीच! ध्वनिप्रदूषणावर (डीजे, डॉल्बी वगैरे!) आणि वायुप्रदूषणावर (फटाके वगैरे!) आपण यशस्वी मात करू शकलो तर बर्‍याचशा प्रमाणात आपण अनेक समस्या दूर करू शकतो; मग आताचा सुशिक्षित समाज या चांगल्या कामी मागे का! – बेन्जामिन केदारकर, विरार.

सार्वजनिक मंडळांनी कलाकार घडवले

‘लोकरंग’ (१३ सप्टेंबर) मधील मकरंद साठे यांचा ‘सार्वजनिक अवकाशाचाच विसर?’ हा लेख वाचला. महाराष्ट्रातील मुख्य असलेले सार्वजनिक उत्सव- गणेशोत्सव, नवरात्र व दहीहंडी. या सार्वजनिक सणाने आता मूळ उद्दिष्ट सोडून वेगळेच स्वरूप धारण केले आहे. पूर्वी हे सण आपल्या जुन्या परंपरा सांभाळून साजरे केले जात. त्याच्यामध्ये स्पर्धा किंवा चढाओढ नव्हती. आतासारखी दहीहंडीचे उंच थर लावण्याची स्पर्धा नव्हती. मी पण मुंबईत सार्वजनिक गणेश मंडळांचा खजिनदार होतो. आम्हीही हे सर्व सार्वजनिक सण साजरे करत होतो, पण पारंपरिक पद्धतीने. मी आणि माझा भाऊ आम्ही स्वत: रात्र रात्र जागून मंडप सजावटीचे काम करत असू. माझे सहकारी मित्र मंडळी एकत्र आरती म्हणत असू. बायका झिम्मा फुगडी खेळत. अगदी प्रसन्न वातावरण असायचे. मुंबईत लालबाग – परळ. गिरणी कामगारांच्या वसाहतीत तर खूप मज्जा असायची. बरेचसे मराठी कलाकार या सार्वजनिक गणेश उत्सवात आपली कला सादर करत आणि पुढे जाऊन अनेक जण मोठे कलाकार झाले. म्हणजे या सार्वजनिक मंडळाने कलाकार घडवले आहेत हे विसरून चालणार नाही. – नामदेव गणपत राव, नवीन पनवेल.

हरवलेला सुवर्णमध्य

‘लोकरंग’ (१३ सप्टेंबर ) मधील मकरंद साठे यांचा ‘सार्वजनिक अवकाशाचाच विसर?’ आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित ‘प्रबोधनकारांची शतकापूर्वीची भूमिका…’ हे दोन्ही लेख आजच्या महाराष्ट्राच्या सामाजिक वास्तवाचे विदारक चित्रण करणारे आणि आत्मपरीक्षणाची आर्त हाक देणारे आहेत. शंभर वर्षांपूर्वी प्रबोधनकारांनी मांडलेले विचार आणि आज मकरंद साठे यांनी उपस्थित केलेले प्रश्न यांच्यात एक थेट आणि अस्वस्थ करणारा सांधा जोडला गेला आहे.

मकरंद साठे यांनी आपल्या लेखात ‘सार्वजनिक अवकाश’ या संकल्पनेची अत्यंत धारदार चिरफाड केली आहे. सार्वजनिक अवकाश म्हणजे केवळ रिकामे रस्ते, चौक किंवा मैदाने नव्हेत; तर ते एका जिवंत समाजाचे वैचारिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे माध्यम असते; परंतु दुर्दैवाने आज या अवकाशाचा विसर पडत चालला आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती, त्यामागील प्रबोधनाचा उद्देश आज कितपत टिकून आहे, हा मोठा प्रश्न आहे. आजचे उत्सव हे ‘मोठे मंडप’, ‘रस्त्यांची अडवणूक’ आणि सर्वात भयानक म्हणजे ‘डीजेचा कानठळ्या बसवणारा आवाज’ या तीन सूत्रांवर चालताना दिसतात. हा केवळ ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न नाही, तर ती नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर आलेली गदा आहे. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही आवाजाच्या मर्यादा पाळल्या जात नाहीत, कारण या बेकायदेशीर कृत्यांना स्थानिक पातळीवर आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी राजकीय पाठबळ मिळते. पूर्वी उत्सवात संवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम असायचे, आज त्याचे रूपांतर केवळ एका भडक आणि व्यावसायिक प्रदर्शनात झाले आहे.

या समकालीन संकटाला ऐतिहासिक आरसा दाखवण्याचे काम ‘प्रबोधनकारांची शतकापूर्वीची भूमिका’ हा लेख करतो. १९२६ सालच्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या भूमिकेचा संदर्भ देताना हा लेख स्पष्ट करतो की, राजकीय स्वातंत्र्याइतकीच सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती महत्त्वाची असते. लोकशाहीमध्ये सामाजिक जाणिवा प्रगल्भ होणे आवश्यक आहे आणि ‘राष्ट्र प्रथम, जातपात नंतर’ ही भावना रुजली पाहिजे. प्रबोधनकारांना उत्सवांचे जे ‘चिकित्सात्मक स्वरूप’ अभिप्रेत होते, ते आजच्या व्यापारीकरणात हरवून गेले आहे.

साठे यांनी लेखाच्या उत्तरार्धात आणखी एक महत्त्वाचा पैलू मांडला आहे, तो म्हणजे भौतिक सार्वजनिक जागांसोबतच आता ‘आभासी सार्वजनिक अवकाश’ ( रःू्रं’ टी्रिं) देखील प्रदूषित झाला आहे. सोशल मीडिया वरवर लोकशाहीवादी वाटत असला तरी तो सत्तेतील लोकांकडून सहज नियंत्रित केला जातो. तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे निर्माण झालेले चेहराविहीन आणि द्वेषमूलक वातावरण विषयाला वेगळेच वळण देते. रस्त्यावरील डीजेचा गोंगाट आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंग या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, जिथे संवाद हरवला आहे आणि केवळ गोंगाट शिल्लक राहिला आहे.

शेवटी, या दोन्ही लेखांचे पडसाद उमटताना आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, उत्सवाचा आनंद इतरांना त्रास देऊन साजरा केला जाऊ शकत नाही. परंपरा या माणसानेच तयार केल्या आहेत आणि गरजेनुसार त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. कायद्याचे राज्य, प्रशासकीय पारदर्शकता आणि नागरिकांमध्ये स्वत:हून झालेली जनजागृती यातूनच सुजाण समाजाची निर्मिती होऊ शकते. सार्वजनिक जागांवर सर्वांचा समान हक्क आहे आणि तो अबाधित राखणे, हेच एका प्रगल्भ समाजाचे लक्षण आहे. आता वेळ आली आहे की आपण गप्प न बसता, डीजेचा आवाज नव्हे तर विवेकाचा आवाज वाढवला पाहिजे. – प्रवीण नारायणराव डोईबळे

सर्वसमावेशक तत्त्वेच गायब

‘लोकरंग’ (१३ सप्टेंबर ) मधील मकरंद साठे यांचा ‘सार्वजनिक अवकाशाचाच विसर?’हा लेख वाचला. सार्वजनिक अवकाश हा तर फारच पुढचा विचार झाला, मुळात आपल्याला सार्वजनिक या शब्दाच्या अर्थाचाच विसर पडलेला आहे. मला आठवते, होळीच्या वेळी रंग खेळून झाले की आम्ही पोरंटोरं रंगाने रंगलेल्या थोबडाने, डबे बडवत ‘आयना का बायना…’ बोंबलत घरोघरी बिदागी घेत फिरायचो. आमच्या टोळीत चाळीतली सगळी मुले असायची. त्यांना धर्म नव्हता, जात नव्हती, कुठल्याही शारीरिक व्याधींची बंधने नव्हती. ‘तशी बिदागी गोळा करणे’ ही एक ‘सार्वजनिक प्रथा’ होती. मुख्य म्हणजे टोळी मोऽऽठी दिसली पाहिजे ही त्या मागची धडपड असली तरी तो उपक्रम सार्वजनिक होता हे महत्त्वाचे. आता मुळातच कोणत्याही सार्वजनिक उत्सवातून सार्वजनिकत्व, सर्वसमावेशकत्व ही तत्त्वेच गायब झालेली आहेत. हा इंजिनाचा, हा मशालीचा, हा हाताचा, हा कमळाचा आणि अलीकडे फारच जोरदार धनुष्यबाणाचा असे उत्सव सुरू झालेत. त्यात परत हिंदूंचा उत्सव हे एक नवीनच फॅड सुरू झाले आहे. मग जॉन, सलीम तर सोडाच, पण शीख, गुज्जू, जैन, आंबेडकर इत्यादीही त्यात सामील होत नाहीत. प्रत्येकाच्या जाती, धर्म, वर्ण, पंथ, व्यवस्था यांचा स्वत:चा त्यांचा त्याच्या पुरताच असा एक स्वतंत्र वेगवेगळा तरीही ‘सार्वजनिक’ उत्सव असतो. तुम्ही ‘सार्वजनिक’ म्हणून चुकून जर दुसर्‍या एखाद्या उत्सवात गेलात तर ‘ते’ सारे तुमच्याकडे कमालीच्या संशयी वृत्तीने पाहू लागतात, कारण आता ‘सार्वजनिक अवकाश’च नव्हे तर ‘सार्वजनिक’ या शब्दाची संकल्पनाच आता कमालीची संकुचित झालेली आहे, पण आपापला अवकाश अधिकाधिक विस्तृत करत व्यापायचा प्रत्येकाचा प्रयत्न आणि हव्यासही त्यामुळे वाढलेला आहे हे निश्चित. – ॲड. एम. आर. सबनीस, मुंबई.

माहितीपूर्ण ‘सदाहरित दुर्वा’

‘लोकरंग’मधील ‘बालमैफल’ मध्ये (१३ सप्टेंबर) मेघना जोशी यांच्या ‘गुण घेईन आवडी!’ या सदरातील ‘सदाहरित दुर्वा’ हा लेख फार आवडला. त्यात थोडी भर म्हणून काही माहिती : रस्त्याच्या कडेला किंवा बागेत अनेक प्रकारचे गवत उगवते, त्यातून खरी दुर्वा ओळखण्यासाठी या तीन गोष्टी पाहा :

१) पसरणारी मुळे ( फ४ल्लल्ली१२) : दुर्वा वनस्पती सरळ वर न वाढता जमिनीसरपट आडवी पसरते. तिच्या फांदीच्या गाठींमधून मुळे खाली मातीत जातात. (२) पानांची रचना : खोडाच्या शेंड्याला एकाच ठिकाणाहून तीन किंवा पाच टोकदार पानांचा तुरा वर येतो. (३) कणखरपणा : दुर्वा हाताला मऊ न वाटता थोडी कडक आणि चामड्यासारखी कणखर असते.

थोडक्यात, आपल्याकडे ग्रामीण किंवा निमशहरी भागांत दुर्वा या घरच्या अंगणातच मिळतात, पण मेट्रो शहरांमध्ये राहणार्‍या लोकांना मात्र त्या शोधाव्या लागतात किंवा बाजारातून विकत आणव्या लागतात, हे लक्षात यावे म्हणून! – अविनाश गोवर्धन