वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या आजारामुळे त्यांची श्रवणशक्ती कमी होत पूर्णपणे गेली, वाचा हरवली आणि पडलेल्या मर्यादेशी झुंज सुरू झाली. वडिलांनी तेव्हा खूप उर्दू पुस्तकं आणून दिली. ते त्यांच्या घडणीचं आणि भाषेचं अंग बनलं. पुढे सुधारणा झाली, पण हयातभर नियतीसमोर हार न मानता असामान्य मनोबलाने आणि परिश्रमांनी होऊ शकणार्या शोकांतिकेची सतीश गुजराल यांनी सुखांतिका केली आणि स्वत:च्या आयुष्याचं शिल्प घडवलं…
कलाकार सतीश गुजराल राजधानीत आजही तुम्हाला अनेक ठिकाणी भेटतात. नामवंत गॅलरीज आणि महत्त्वाच्या इमारतींमध्ये लावलेली चित्रं, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टसारख्या संस्थांच्या हिरवळीवर आसमंताच्या सौंदर्यात विसावलेली धातू, बर्न्ट वूड आणि फायबरग्लासमधली शिल्पं, शास्त्री भवन, तीन मूर्तीमधली भव्य म्युरल्स किंवा संसद भवनात अचानक समोर येणारी लाला लजपत राय, नेहरू यांची पोर्ट्रेट्स आणि त्यांनी डिझाइन केलेले झरोके, जाळीदार भिंती प्रकाश आणि हिरवाईचं नेत्रसुख देणार्या, विटांनी बांधलेल्या बेल्जियन दूतावासासारख्या वास्तू… हे सगळं घडवणार्या कलाकाराला नैसर्गिक मर्यादांनी बांधलं नव्हतं.
त्यांचं सर्जनातलं अस्तित्व ठिकठिकाणी जाणवतंच, पण तोही काळ होता जेव्हा ते त्यांची सावली बनून राहिलेल्या गृहिणी, सचिव, सखी किरणबरोबर बरेचदा कलाप्रदर्शनात दिसत. साधारण उंची, चंदेरी केस व दाढी आणि चष्म्याआडून कायम आनंदात लुकलुकणारे डोळे. कपड्यांच्या निवडीतही अभिरुची जाणवायची. नेहमी गडद रंगाच्या शर्ट /जॅकेट/ सूट बरोबर गर्द लाल/ निळ्या रंगाचा मफलर /स्कार्फ. आवडणारी चित्रं, शिल्पं जवळून पुरेसा वेळ देत पाहणार्या कलाकाराला मी उत्सुकतेने पाहात असे.
एकदा त्रिवेणीत वसुंधरा तिवारी- ब्रूटा आणि दुसर्या कोणा तेव्हा नवोदिताच्या प्रदर्शनाला ते आले होते. तेव्हा एका नामांकित वृत्तपत्राचा वार्ताहर प्रदर्शनाबद्दल त्यांचं मत विचारू पाहत होता. त्यांनी फक्त हाताने नकार दिला (मी म्हणेन सस्तेमें छूट गया, चिडले असते तर लज्जास्पद झटकणं वाट्याला आलं असतं) कलावर्तुळात सर्वश्रुत होतं की चित्रं पाहताना सतीशजी कोणाशी बोलत नाहीत. फक्त चित्रकार स्वत: तिथे असेल आणि चित्राबद्दल काही सांगू इच्छित असेल तर ते जाणून घेत. कारण प्रत्येक कलाकाराला सतीशजी आलेत, चित्रं बघताहेत याचं अप्रूप वाटायचं. चित्रकार आणि ते असा दोघांच्यातच संवाद व्हायचा.
ते एकदा त्यांच्या पंजाबी-हिंदीत म्हणाले होते, ‘‘चित्र तुमच्याशी बोलत असतं, चित्रातून चित्रकार तुम्हाला काही तरी सांगू पाहत असतो. ते तुम्ही ऐकून घेणार नसाल तर नकाच ना बघू. बाजारात हिंडल्यासारखं प्रदर्शन नसतं बघायचं. चित्रं पाहताना बोलणं ही अभिजात नृत्य पाहताना समोर बसून आपसांत कुजबुजण्याइतकीच बदतमीजी आहे.’’ नंतर तिथल्या कॅफेमध्ये त्यांनी आम्हा चौघांना सांगितलं होतं : ‘‘पूर्वी आर्ट बीटवर जरा जाण असलेली माणसं असत. आता जो क्राइम/ अपघात कव्हर करतो त्याला काम नसलं तर आर्टवर पाठवून देतात.
गुन्हा/ अपघात आणि कला एकाच मापाने तोलणारे संपादक, (मिस्कीलपणे ‘आर्ट नू ॲक्सिडेंट समझना बहुत गल्त नहीं है?’), आणि ज्याचं आपलं काही देणंघेणं नाही अशांवर मिळेल त्याला (इसको -उसको) विचारून लिहिणारे हे ‘रंगरूट’ (हा त्यांचाच शब्द ) दोघेही कुसूरवार आहेत.’’ जरा थांबून- ‘‘कधी कधी मी प्रेसवाल्यांना मुद्दाम बाहेर भेटून मला काय वाटतं ते सांगतो, समज असणार्यांनी नव्या कलाकारांसाठी एवढं करायलाच हवं ना! इस शहरने अभी आर्ट और आर्टिस्ट लोगोंकी कदर करना नहीं सिखा.’’ त्यांचा पारा जरा वाढला की किरणजींचा हात हलकेच त्यांच्या बाहीवर येत असे आणि पारा खाली येई. त्यांची ही रास्त मतं जाहीर असल्यानं प्रदर्शन पाहताना पॅप्सही आसपास फिरकण्याची चूक करत नसत. हेच सतीश गुजराल कुठल्या झगमगत्या पार्टीमध्ये पेज थ्रीसाठी मात्र, किरणजींसह आरामात पोज देत : ‘‘तब तो कोई और काम ही नहीं होता.’’
गुजराल कुटुंब फाळणीआधी झेलम म्हणजे आताच्या रावळपिंडीतलं. वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या आजारामुळे त्यांची श्रवणशक्ती कमी होत पूर्णपणे गेली, वाचा हरवली आणि पडलेल्या मर्यादेशी झुंज सुरू झाली. आजाराच्या सुरुवातीच्या काळात वडिलांनी त्यांना खूप उर्दू पुस्तकं आणून दिली होती- मन रमवण्यासाठी; ते त्यांच्या घडणीचं आणि भाषेचं अंग बनलं. कालांतरानं प्रयत्नांती त्यांच्या वाणीत बरीच सुधारणा झाली. ते चित्र चांगली काढतात हे बालपणीच आईवडिलांच्या लक्षात आल्यानं त्यांनी चित्रकलेचा अभ्यास करावा असं ठरलं.
लाहोरच्या मेयो कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये त्यांना शिल्पकलेत दगड /धातू /लाकूड या माध्यमांचा वापर, क्ले मॉडेलिंगमधून स्थापत्याचे आराखडे आणि डिझाइन बनवणं, स्केल ड्रॉइंग्स, जुन्या इमारतींचे प्लॅन्स काढून घेऊन शिकण्याचं पायाभूत तांत्रिक प्रशिक्षण मिळालं. हे सगळं शिकून पुढे ते त्याचा वैविध्यपूर्ण वापर स्थापत्य व्यवसाय, चित्रं आणि शिल्प बनवण्यात करणार होते. चित्रकला तर होतीच. मुंबईच्या जे. जे.मध्ये शक्य तेवढं शिक्षण घेतलं. फाळणीनंतर वडिलांनी घाईत भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि सगळंच मागे सोडून आलेल्या सधन कुटुंबाची वाताहत झाली. आसपासची डोळ्यांनी पाहिलेली निर्घृण हिंसा, गुन्हे आणि जाळपोळीच्या कालखंडात मनात खोलवर गेलेले चरे नंतर ‘पार्टिशन’ या चित्रमालिकेत आणि नंतरही कलेत वेळोवेळी प्रतिबिंबित होणार होते. न्यू यॉर्कच्या ‘म्युझिअम ऑफ मॉडर्न आर्ट’मध्येही त्यांचं पार्टिशन मालिकेतलं ‘आऊटपोस्ट’ हे चित्र आहे.
या जगलेल्या मानवी अमानुषतेबद्दल त्यांनी A Brush with Life ( १९९७) या आत्मनिवेदनात सविस्तर लिहिलं आहे. वयाच्या तिशीपर्यंत त्यांना पंजाबी व उर्दू या दोनच भाषा येत, (आणि कदाचित पंजाबीमिश्रित हिंदी) तो लहेजा जन्मभर साथ देणारा ठरला. मेक्सिकोत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा चिकाटीनं इंग्रजीही शिकले. आपलं म्हणणं खोलवरून येणार्या आवाजात, सावकाश आपल्या शब्दांत मांडता येऊ लागलं आणि गुजराल बाहेरच्या मोठ्या जगाशी जोडले गेले. मेक्सिकोमध्ये म्युरल्ससाठी विख्यात स्पॅनिश मास्टर्स दिएगो रिव्हेरा (फ्रिडाशीही चांगली मैत्री झाली) आणि सिक्येरो यांच्याकडून ते तंत्र शिकताना ही ‘लिंग्वाफ्रँका’ कामी येणार होती. दिएगोसारखीच त्यांच्याही म्युरल्समध्ये पुराणकथांचा वापर आणि स्पॅनिश संस्कृतीतली गहिरी रसरशीत रंगसंगती दिसते.
आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळवणारे गुजराल व्यवसायाने आर्किटेक्ट होते, पण त्यांच्याजवळ आर्किटेक्चरची डिग्री नव्हती. आवडीनुसार शिकत जाऊन त्यांनी आर्किटेक्चरल कन्सल्टन्सी सुरू केली होती. त्यांनी बेल्जियन दूतावास, गोवा युनिव्हर्सिटी, मॉरिशसची गांधी इ्स्टिटट्यूट, नेपाळमधला भारतीय दूतावासासारखे मोठे प्रकल्प केले, ते केवळ त्यांच्या पक्क्या पायाभूत ज्ञानाच्या आणि सौंदर्यदृष्टीच्या जोरावर. तिथे काम करणारा एक आर्किटेक्ट मित्र मजेने म्हणायचा, ‘‘आमच्या कार्यालयाची भाषा पंजाबी आहे.’’ (पायर्यांना ‘पौडीयां’, डाव्या -उजव्याला ‘सज्जे -खब्बे’ वगैरे) त्यांच्याबरोबर काम करणारा त्यांचा मुलगा मोहित आर्किटेक्ट आहे. त्यांचं स्वत:चं दक्षिण दिल्लीतल्या लाजपतनगरमधलं घरही अतिशय सुंदर, विटांचं बनलेलं.
अंगणात टेराकोटा, त्यांची शिल्पं आणि बालकन्यांमध्ये हिरवाई, भरपूर खुल्या जागा आणि हवा आणि प्रकाश खेळता राहण्यासाठी जाळ्या, झरोके. प्रशस्त ऐसपैस दिवाणखाना आणि भारतीय गडद रंगात सजवलेलं. प्रत्येक भिंत त्यांच्या सुंदर चित्रांनी, कलात्मक वस्तूंनी भरलेली, पाहताक्षणी हे घर सर्वार्थानं समृद्ध कलाकाराचं आहे हे लक्षात येतं. सगळं घर हिंडून बघावंसं वाटतं, पण हिंमत नाही होत विचारण्याची. त्यांची एक टिपिकल विनोदबुद्धी होती.
आनंदी वृत्तीनं स्वत:ला, कलाव्यवसायाच्या गुणदोषांना हसता यायचं : ‘‘मला एकानं विचारलं होतं, ‘‘सर, आप क्यूबिझम के बारे मे क्या सोचते हैं? जाहीर है, उसे मेरी कोई पेंटिंग- शेंटिंग तो समझ नहीं आयी थी. उसने कहीं सुना होगा ‘क्यूबिझम’, बस ओही पूछ लेया! फेर पूछा, ‘‘आप बनाते हैं?’’ मै केया, क्यूबिझम? ना जी, मुश्कील लगती है, इसिलिये ॲब्स्ट्रॅक्ट बना के काम चला लेता हूँ…’’ किरणजींचं लिप रीडिंग हे त्यांच्या संवादाचं माध्यम होतं, जगाशी जोडणारा दुवा. असं म्हटलं जातं की, गुजराल यांची जरा गंभीर, उदास रंगातली चित्रं किरणजी आयुष्यात आल्यावर रंगीबेरंगी झाली आणि स्ट्रोक्स लक्षात यावेत इतके दमदार. बासष्ट वर्षं व्याधीबरोबर काढल्यावर शस्त्रक्रियेनं ऐकू येईल असं एक अत्याधुनिक उपकरण त्यांना ऑस्ट्रेलियात शस्त्रक्रियेनं लावलं गेलं आणि बर्यापैकी ऐकू येऊ लागलं असं कळलं आणि के एल सहगल आणि तलत महमूदची गाणी परत ऐकू शकल्याचा आनंद झाल्याचंही! पण मग तांत्रिक कटकटी नकोशा झाल्यानं ते काढून टाकून सगळं पूर्ववत सुरू झालं.
व्याधीमुळे आलेले अडथळे निर्धारानं बाजूला सारत त्यांनी आपले कलेशी प्रयोग चालू ठेवले आणि त्यातून कदाचित इतर कोणाही भारतीय कलाकाराने आजवर न आणलेली माध्यमं आणि शैलींमधली विविधता आपल्या निर्मितीत आणली. आयुष्यात आस्वादाचा आनंदही भरभरून घेतला. खाण्यापिण्यात त्यांना खूप रस होता (‘ब्लेम इट ऑन माय पंजाबी जीन्स’ असं दिलखुलास हसत म्हणत). गुजराल परिवाराचं आणखी एक अतिशय सुखद वाटणारं वैशिष्ट्य म्हणजे आपसात असलेली घट्ट नाती. भारताचे अल्पकाळ पंतप्रधान असलेले त्यांचे मोठे भाऊ- इंदर कुमार गुजराल आपल्या स्वच्छंदी धाकट्याची खूप काळजी घेत, सुख-दु:खात कायम पाठीशी उभे असत.
सतीश आणि किरणजींची तिन्ही देखणी, सुस्थितीतली मुलंही आईवडिलांवर खूप प्रेम करत. त्याची झलक पाहून वाटायचं, हेच कदाचित त्या दोघांना लाभलेल्या दीर्घायुष्याचं कारण असावं. ‘‘My lifel s work is a reflection of my journey, my struggles and my triumphs’’ हे त्यांचं विधान प्रसिद्ध आहेच. पण कधी कधी गुजरालांचं जीवन पाहून वाटतं की, ग्रीक शोकांतिकेच्या नायकाप्रमाणे ते ‘ट्रॅजिक फ्लॉ’ (विनाशाकडे नेणारा एकच दोष) समोर मान झुकवते तर जगाच्या कोपर्यात जगून संपणारे सहानुभूतीचे पात्र ठरते. पण नियतीसमोर हार न मानता असामान्य मनोबलानं आणि परिश्रमांनं त्यांनी होऊ शकणार्या शोकांतिकेची सुखांतिका केली आणि स्वत:च्या आयुष्याचं शिल्प घडवलं ही सकारात्मक वृत्तीची जीत आहे, देशभरांत सांगितली- ऐकली जावी अशी!
uarundhati.deosthale@gmail.com

