ॲड. निशा शिवूरकर
मुस्लीम समाजातील तोंडी तलाकच्या अनिष्ट प्रथेला विरोध करता करता सय्यदभाई मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते बनले आणि पुढे नेतेही झाले. मुस्लीम समाजातील शिक्षणाचा अभाव, गरिबी, बेरोजगारी, सनातनी आचार-विचारांचा पगडा याविरोधात त्यांनी आयुष्यभर लढा दिला. कुठल्याही धर्मातील कुप्रथांविरोधात ते नेहमीच संघर्षरत राहिले.
१८ एप्रिल १९६६ रोजी महाराष्ट्र विधानसभेवर एक अनोखा मोर्चा निघाला होता. ‘मुस्लीम समाजातील जुबानी तलाक बंद व्हावा, इस्लामधर्मीयांना द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू करावा’ या मागण्या करणाऱ्या या मोर्चात लोक कमी होते, परंतु मागण्या महत्त्वाच्या होत्या. मुस्लीम स्त्रियांच्या वेदनेला वाचा फोडण्याचा हा देशातील पहिलाच प्रयत्न होता. या मोर्चाचे नेतृत्व साथी हमीद दलवाईंनी केले होते. मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांवर विचार करण्याची जबाबदारी राज्यव्यवस्थेवर आहे याची जाणीव हमीदभाईंनी निर्माण केली. समाजात बदल करू पाहणाऱ्यांचा प्रवास सोपा नसतो. अशा व्यक्तींना सनातन्यांचा विरोध सहन करावा लागतो. हमीद दलवाईंपुढे महात्मा जोतिराव फुले आणि राजा राममोहन रॉय यांचा आदर्श होता. मुस्लीम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना केली. या प्रवासात हमीदभाईंना सय्यद महबूब शहा कादरी, अब्दुल कादर मुकादम, फकरूद्दीन बेन्नूर, वजीर पटेल, बाबूमिया बँडवाले, हुसेन जमादार, आशा अपराध, सय्यद मुनीर, मुमताज रहेमतपुरे, प्राचार्या कुलसुम पारेख, अन्वर राजन, अन्वर शेख असे अनेक साथीदार मिळाले. ३ मे १९७७ रोजी वयाच्या पंचेचाळिशीतच हमीदभाईंचे निधन झाले. त्यानंतर मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे काम सय्यदभाईंनी जिद्दीने चालवले.
८ एप्रिल रोजी सय्यदभाईंचा मृत्यू झाला आणि अनेक आठवणी जाग्या झाल्या. ‘दगडावरची पेरणी’ करायला निघालेला हा शेतकरी महात्मा फुल्यांच्या कुळातील शेतकरी होता. त्यांच्याही नकळत त्यांनी पेरलेले विचार रूजले. समाजात बदल झाले. धाकटी बहीण खतिजाला नवऱ्याने तोंडी तलाक दिला. मुलांसह ती माहेरी आली. बहिणीच्या दु:खाने सय्यदभाई व्यथित झाले. अशावेळी माणसं हतबल होतात, चिडतात. मेहुण्याला ‘सिधा करूंगा’ अशी भाषा बोलतात, कोर्टात खेचतात असा माझा अनुभव आहे.
खतिजाच्या तलाकने अस्वस्थ झालेल्या सय्यदभाईंच्या मेंदूत अनेक प्रश्नांनी गर्दी केली. मुल्ला, मौलवी, इस्लाम धर्माच्या अभ्यासकांना भेटून त्यांनी ‘असा तोंडी तलाक देऊन नाते कसे संपवता येते? ही अन्याय करणारी प्रथा आहे,’ अशी चर्चा सुरू केली. पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते.
सय्यदभाईंचा तरुण वयातच समाजवादी चळवळीशी संबंध आला. १९७६ च्या एका घटनेने ‘सय्यदभाई’ सामाजिक कार्यकत्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या वर्षी मोरोक्को येथील राबात शहरात मुस्लीम राष्ट्रांची परिषद भरली होती. त्यावेळी फक्रुद्दीन अली अहमद भारताचे परराष्ट्र मंत्री होते. या परिषदेत त्यांना ‘ते मुस्लीम राष्ट्राचे प्रतिनिधी नाहीत’ म्हणून सहभागी होऊ दिले नाही. सय्यदभाईंनी या घटनेचा निषेध करणारी सभा समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या सहकार्याने आयोजित केली होती. त्यानंतर साथी हमीद दलवाईंशी त्यांची भेट झाली. या भेटीनंतर मुस्लीम समाजाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर उत्तरे शोधता येतील असा विश्वास सय्यदभाईंना वाटला. हमीदभाईंच्या विचारांची स्पष्टता आणि अभ्यासाला सय्यदभाईंची कृतीशील साथ मिळाली. खतिजाचा भाऊ हजारो तलाकपीडित स्त्रियांचा भाऊ झाला. त्यांचा आधारवड बनला. समाजबदलासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी सनातन्यांकडून नेहमीच गरसमज पसरवले जातात. ही मंडळी धर्मविरोधी आहेत असा अपप्रचार केला जातो. अशा कार्यकर्त्यांच्या वाटय़ाला उपेक्षा येते. त्यांचे म्हणणे ऐकण्याचे आणि समजून घेण्याचेही नाकारले जाते. सय्यदभाईंनाही या अनुभवांचा सतत सामना करावा लागला. त्यांना धर्माची ताकद आणि मर्यादा समजली होती. ‘मी मुस्लीम समाजाचा घटक आहे. इस्लाम आणि कुराणावर माझी श्रद्धा आहे. मात्र, मुस्लीम व्यक्तिगत कायदा समाजविरोधी असून स्त्रियांवर अन्याय करणारा आहे. कुराणावर श्रद्धा राखून समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट करता येऊ शकतात,’ अशी सय्यदभाईंची स्पष्ट भूमिका होती.
मुस्लीम समाजातील जुबानी- म्हणजे तीन वेळा ‘तलाक’ शब्दाचा उच्चार करून दिल्या जाणाऱ्या तलाकच्या प्रथेमुळे स्त्रियांवर अन्याय होतो, ही सय्यदभाईंच्या मनातील ठसठसती वेदना होती. आयुष्यभर त्यांनी या प्रथेविरुद्ध संघर्ष केला. मुस्लीम सत्यशोधक मंडळाने १९७० मध्ये पुण्यात राज्यस्तरीय मुस्लीम परिषद आयोजित केली होती. या परिषदेत तोंडी तलाकला बंदी, बहुपत्नीकत्वाला विरोध, तसेच व्यक्तिगत कायद्यातील कालबा तरतुदींमध्ये बदलाची मागणी करण्यात आली.
हमीद दलवाईंनी तलाकपीडित मुस्लीम महिलांचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर नेला. ३ आणि ४ डिसेंबर १९७१ ला दिल्लीत हमीदभाईंच्या पुढाकाराने ‘ऑल इंडिया फॉरवर्ड लुकिंग मुस्लीम कॉन्फरन्स’ घेण्यात आली. या परिषदेत तलाकनंतर मुस्लीम स्त्रीला नवऱ्याकडून पोटगी मिळाली पाहिजे, ही व अन्य मागण्या करण्यात आल्या. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. या परिषदेचा परिणाम म्हणून फौजदारी प्रक्रिया संहितेतील पोटगीसंदर्भातील कलम १२५ मध्ये १९७३ ला महत्त्वाची दुरुस्ती झाली. पतीने त्याग केलेल्या पत्नीबरोबरच घटस्फोटित पत्नीलाही पोटगीचा अधिकार मिळाला. याचा फायदा तलाकपीडित मुस्लीम महिलांप्रमाणेच लक्षावधी हिंदू व अन्यधर्मीय स्त्रियांना झाला. वकील म्हणून काम करताना मला अनेक घटस्फोटित हिंदू स्त्रियांना या कलमाआधारे पोटगी मिळवून देता आली.
१९८५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शहाबानो बेगम यांना खालील न्यायालयाने दिलेला पोटगीचा निकाल कायम केला. त्यानंतर उठलेल्या वादळाने शहाबानो एकटय़ा पडल्या. मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि सय्यदभाई शहाबानोच्या मागे उभे राहिले. आपल्या अधिकारासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष करणाऱ्या शहाबानोचा मंडळाच्या वतीने पुण्यात सत्कार करण्यात आला. सय्यदभाईंच्या नेतृत्वात अन्वर राजन, मेहरून्निसा दलवाई, मुमताज रहेमतपुरे, शमसुद्दीन तांबोळी इत्यादी कार्यकत्रे शहाबानो व अन्य तलाकपीडित स्त्रियांसह पंतप्रधान राजीव गांधी व कायदा मंत्री अशोक सेन यांना भेटले. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने महाराष्ट्रात ३ ते १८ नोव्हेंबर १९८५ या काळात ‘तलाकमुक्ती मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाला मोठा विरोध सहन करावा लागला.
२२ ऑगस्ट २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘तोंडी त्रिवार तलाक’ बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला. १९६६ पासून साथी हमीद दलवाई यांनी केलेल्या चळवळीचे हे यश आहे. सय्यदभाईंनी तलाकमुक्तीचे पाहिलेले स्वप्न त्यांच्या समोरच साकार झाले. ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने मुस्लीम महिला विवाह संरक्षण कायदा केला. या कायद्याचे सय्यदभाईंनी स्वागत केले. त्याचबरोबर अन्यधर्मीयांसाठीचे वैवाहिक कायदे दिवाणी स्वरूपाचे असताना हा कायदा मात्र फौजदारी स्वरूपाचा केला. या कायद्याप्रमाणे तलाक देणाऱ्या मुस्लीम पुरुषाला तीन वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. याला मात्र सय्यदभाईंनी विरोध केला. असा कायदा राज्यघटनेच्या समानतेच्या तत्त्वाचा भंग करणारा आणि अन्यायकारक आहे, या कायद्याची मुस्लीम स्त्रीला फारशी मदत होणार नाही अशी स्पष्ट भूमिका सय्यदभाईंनी घेतली.
सतीप्रथेच्या विरोधात संघर्ष करणारे राजा राममोहन रॉय आणि स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा फुल्यांचा वारसा सय्यदभाईंनी पुढे नेला. त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये अंतर नव्हते. अपत्यप्राप्ती झाली नाही तर सहजपणे आपल्या समाजात दुसरा विवाह केला जातो. सय्यदभाई व अख्तरचाचींना मूल झाले नाही. दोघांनी परस्परांच्या सल्ल्याने चाचींच्या भावाचा मुलगा असीमला दत्तक घेतले. मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात दत्तकाची तरतूद नाही. अख्तर बेगम यांनी सर्वोच्च न्यायालयात मुस्लीम स्त्री-पुरुषांना दत्तकत्वाचा अधिकार मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. मुलगा असीम आणि अख्तरचाचींनी सय्यदभाईंना समाजपरिवर्तनाच्या कार्यात साथ दिली. दोघे पती-पत्नी अनेक तलाकपीडित मुलींचे अब्बा आणि अम्मी झाले.
पती-पत्नीमधील वाद, भांडणे, मतभेद चच्रेने, संवादाने मिटवता येतात, त्यातून मार्ग काढता येतो अशी सय्यदभाईंची भूमिका होती. तसा प्रयत्न त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने केला. अनेक संसार जोडले. पती-पत्नीचे जमत नसेल, एकत्र राहणे शक्यच नसेल तर घटस्फोट वा तलाक घ्यायला हवा. त्यासाठी न्यायालयात प्रकरण दाखल करावे. न्यायालयाबाहेर एकटय़ा पुरुषाच्या मर्जीने घाईने दिल्या जाणाऱ्या एकतर्फी तलाकला सय्यदभाईंचा विरोध होता.
समान नागरी कायदा ‘हिंदू वोट बँक’ तयार करण्याचे आणि समाजात द्वेष पसरवण्याचे हत्यार बनले आहे. आजपर्यंत िहदुत्ववादी म्हणवणाऱ्यांनी समान नागरी कायदा व्हावा म्हणून कोणतेही प्रयत्न केले नाहीत. तसा कोणताही मसुदा तयार केलेला नाही. मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि इंडियन सेक्युलर सोसायटीने पुण्याच्या आय. एल. एस. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सत्यरंजन साठे यांच्या मार्गदर्शनात प्रा. जया सागडे व प्रा. वैजयंती जोशी यांनी ‘Indian Marriage and Matrimonial Remedies Act, १९८६’चा मसुदा तयार केला. त्यात विवाहासाठी स्त्रीचे वय १८ आणि पुरुषाचे २१ वर्षं असावे, विवाहाची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या व तीन साक्षीदारांच्या समक्ष व सह्यंनिशी वधू-वरांनी विवाह करत असल्याचे जाहीर करावे, अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र हा विवाहाचा निर्णायक पुरावा मानावा, विवाहानंतर एक वर्षांच्या आत घटस्फोटासाठी अर्ज करता येणार नाही, परस्पर संमतीच्या घटस्फोटासाठीही न्यायालयात जावे लागेल, मुलांचा ताबा, पोटगीचे निर्णय न्यायालयात होतील, दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार कामकाज चालेल, जोडीदार जिवंत असताना केलेला दुसरा विवाह रद्दबातल आणि गुन्हा समजला जाईल, इत्यादी तरतुदी त्यात दिल्या आहेत.
सय्यदभाई परिस्थितीने घडवलेले कार्यकत्रे आणि नेते होते. अतिशय खडतर आयुष्य ते जगले. हलाखीची आíथक परिस्थिती कधी त्यांच्या कार्यातील अडचण बनली नाही. तलाकच्या प्रश्नाबरोबरच मुस्लीम समाजातील दारिद्रय़, बेरोजगारी, शिक्षणाचे प्रमाण या प्रश्नांनी सय्यदभाई अस्वस्थ होते. देशातील धार्मिक ध्रुवीकरणाच्या आणि द्वेष पसरविणाऱ्या राजकारणाने ते चिंतित होते. धार्मिक राजकारणाने मुस्लीम समाजाला लक्ष्य केले आहे याची तीव्र खंत त्यांना वाटत होती. भारतातील संमिश्र, सहिष्णु, बहुसांस्कृतिक प्रवाहापुढे बहुसंख्याकवादाच्या नावाने उभ्या केलेल्या संकुचित राष्ट्रवादाचा प्रगतीशील, उदारमतवादी पक्ष-संघटनांनी एकत्रितपणे मुकाबला केला पाहिजे अशी सय्यदभाईंची धारणा होती. त्यांनी आयुष्यभर हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समूहातील धार्मिक शक्तींना विरोध केला. एकात्मता आणि शांततेच्या मार्गाने बंधुभाव व भगिनीभाव जोपासण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या मृत्यूने आपण एका सत्यशोधकाला मुकलो आहोत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन!
advnishashiurkar@gmail.com

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका