र. धों. कर्वेच्या संतती नियमनाच्या कार्याविषयी खूप ऐकले होते, परंतु २९ मेच्या ‘लोकरंग’मधील डॉ. अंजली जोशी यांचा लेख वाचल्यावर आपल्याला रधोंबद्दल फारच थोडी माहिती आहे हे लक्षात आले. काळाच्या कितीतरी पुढे असलेले त्यांचे विचार त्या काळातील मागासलेल्या, कर्मठ व रूढीवादी समाजाला झेपणारे नव्हते हे एक वेळ समजून घेतले तरी विज्ञान-तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या आजच्या आधुनिक समाजालासुद्धा ते झेपत नाहीत, ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. याउलट, याच आधुनिक स्त्रिया जुन्या रूढी-परंपरांना फॅशनचे रूप देऊन त्या अंगीकारतात तेव्हा निराश व्हायला होते. विवेकवादाची मशाल दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर र. धों. कर्वे यांनी त्या काळात केलेले कार्य किती मोठे होते हे अधिकच प्रखरतेने जाणवते. – विनय सोरटे, मुलुंड (प.)

‘अरुणा वरुणा’ उपनदीचा अनुल्लेख
राहुल बनसोडे यांचा ‘नाशिकचं आपण काय केलं?’ हा ‘लोकरंग’(२९ मे)मधील लेख वाचला. त्यात गोदावरीतीरी येऊन मिळणाऱ्या वाघाडी व सरस्वती या उपनद्यांचा उल्लेख आहे. पण आणखी एका उपनदीचा उल्लेख हवा होता, ती म्हणजे अरुणा वरुणा ही उपनदी. या उपनदीचा उगम नाशिकजवळच्या चांभार लेण्यांपासून होतो. ही उपनदी वाहत येऊन गोदावरीस रामकुंडामध्ये येऊन मिळते. तिच्या एका तीरावर नाशिक नगरपालिकेने सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे स्मारक उभारले आहे. त्याचप्रमाणे या उपनदीच्या काठावर कपालेश्वर नावाचे एक पुरातन मंदिर आहे. – कृष्णराव पलुस्कर, मुलुंड

‘दशावतारी राजा’ तुळशीदास बेहेरे यांचे!
‘लोकरंग’मधील ‘कलास्वाद’ या प्रा. मं. वि. राजाध्यक्ष यांच्या सदरात अशोकजी परांजपे यांच्यावरील लेख वाचला. अशोकजींची तरल, अवीट गोडीची गीते, भक्तिरसाने ओथंबलेली नाटके आणि त्यांच्या मृदु स्वभावाविषयी पहिल्यांदाच लिहिलं गेलं आहे. ‘आयएनटी’च्या लोककला संशोधन केंद्राचे संचालक म्हणून त्यांच्या भरीव योगदानाची उत्तम माहिती या लेखात आहे. फक्त एक उल्लेख राहून गेला. ‘दशावतारी राजा’ हे नाटक तुळशीदास बेहेरे यांनी लिहिले आहे. अशोकजींनी या नाटकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. अशोकजींना बेहेरे आपले गुरू मानत. तसेच दशावतारी कलावंत पद्मश्री बाबी नालंग यांचे अनेक प्रयोग बेहेरेंनी बालपणापासून पाहिले होते. त्यांच्या अभिनय आणि वेशभूषेने त्यांना कायम भारून टाकले होते. बाबी नालंगांची आणि अशोकजींची भेट बेहेरेंनीच घडवून आणली होती. यातूनच पुढे कोकणातील दशावतारी लोककलेचा प्रयोगात्मक अभ्यास बेहेरेंनी केला. – प्रा. रेखा तुळशीदास बेहेरे