राधिका विंझे
शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि ईशा आजी-आजोबांबरोबर कोकणात गेली. कोकणात जाऊन खूप आंबे, फणस खायचे, खेळायचं, बागडायचं असं तिनं ठरवलं होत. ७-८ तासांच्या प्रवासाला १० तास का लागले, असं घरी गेल्यावर कोकणातल्या काकानं विचारलं. ईशा पटकन म्हणाली, ‘‘काय करणार! रस्त्याचं डांबरीकरण सुरू होतं. त्या डांबराचा इतका वास येत होता की त्यानं आजीचं डोकं दुखायला लागलं. नुसत्या वासानं आजीचं डोकं दुखायला लागलं इतका तो वास तीक्ष्ण होता.’’
ईशानं लगेचंच आजोबांना याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘‘अगं डांबर उच्च तापमानाला तापवतात तेव्हा त्यातून एक विशिष्ट रसायन बाहेर पडतं, त्याचा वास येतो.’’ ईशाला त्या वास निर्माण करणार्या रसायनबद्दल कुतूहल वाटलं.
कोकणातल्या घरी आतल्या खोलीत काकानं आंब्यांची मोठी लगड लावून ठेवली होती. त्या पिकलेल्या आंब्यांच्या घमघमाटानं ईशाची भूक चाळवली. जेवायला थोडा वेळ होता. ईशाला आंबे-फणसांची बाग बघण्याची उत्सुकता होती, म्हणून ती काकाबरोबर बागेत गेली. बागेत जाता जाता ईशाला झाडावर लगडलेले फणस दिसले. तसंच बागडणारं सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू दिसलं. ईशा म्हणाली, ‘‘काका, फणसाचा इतका वास येतोय, आपण फणस खाऊ या.’’
काका म्हणाला, ‘‘घरी काकूनं फणस कापून ठेवलाय, तो खाऊ.’’ घरी येताच आमरसाचा सुगंध ईशाच्या मनात भरला. तेवढ्यात स्वयंपाकघरात काकूनं ठसकेदार लसणीची फोडणी दिली. त्या लसणीच्या फोडणीचा वास क्षणात सगळीकडे पसरला. लसूण फोडणी दिल्यावर आमरसाचा वास नाहीसा होऊन फक्त लसणीचा वास सगळीकडे येऊ लागला याचं ईशाला आश्चर्य वाटलं. पुढे छान जेवण झालं. तरीही ईशाच्या डोक्यात हे वासाचं चक्र सुरू होतं.
जेवणानंतर आजोबांबरोबर वामकुक्षी घ्यायला गेल्यावर ईशानं आजोबांना त्याबद्दल विचारलं. दिवसभरात अनुभवलेल्या डांबर, आंबा, फणस, लसूण या वासांचं वेगळेपण ईशानं मनात नोंदवलं याचं आजोबांना कौतुक वाटलं. ईशा म्हणाली, ‘‘आजोबा, आज आपण प्रत्येक पदार्थाचा वेगवेगळा वास अनुभवला. काहींचा तीक्ष्ण तर काहींचा मंद सुगंध. हे एवढे वेगवेगळे वास कुठून येतात?’’
‘‘हे बघ, प्रत्येक पदार्थाचं रासायनिक गुणसूत्र असतं. निसर्गात आढळणारी मूलद्रव्ये त्या पदार्थात विशिष्ट प्रमाणात असतात. त्या मूलद्रव्यांमुळे पदार्थाला त्याचा वास प्राप्त होतो. उदा. फळं पिकतात तेव्हा त्यात एस्टर नावाचं रसायन तयार होतं. त्यामुळे फळ पिकलं की गोडूस वास येतो. फोडणीत लसूण घालतात तेव्हा वास येतो, कारण लसणीत सल्फरयुक्त रसायन असतं. कांद्यामध्येदेखील असंच सल्फरयुक्त रसायन असतं. ही तीक्ष्ण वासाची रसायनं हवेत लगेच पसरतात, त्यामुळे आपल्याला कांदा, लसूण, इत्यादींचा वास येतो. लिंबू कापल्यावर त्यातल्या लेमोनिन व सिट्रल या रसायनांमुळे आंबट वास येतो. एवढंच काय, तू आज बागेत फुलपाखरू पाहिलंस, तेसुद्धा फुलांमध्ये असलेल्या रसायनामुळे (volatile organic compounds) फुलाकडे खाद्य शोधण्यासाठी आकर्षित होतं.’’आजोबांनी ईशाला माहिती दिली. तिच्यासाठी ही सगळी माहिती खूपच नवीन होती. एकदम लक्षात येऊन तिनं विचारलं, ‘‘मग आजोबा, आपण स्वयंपाक करतो त्या गॅसमध्ये कोणतं रसायन असतं? त्याचाही वास तीक्ष्ण असतो.
आजोबा म्हणाले, ‘‘स्वयंपाक करण्यासाठी लागणार्या गॅसमध्ये खरं तर कोणतंही वास येणारं रसायन नसतं. परंतु तो ज्वलनशील असल्यानं त्यात मर्के प्टन्स (Mercaptans) नावाचं रसायन मिसळतात. त्यामुळे मर्केप्टन्सच्या वासावरून गॅसगळती लगेच लक्षात येते व धोका टळतो.’’
नवीन माहिती डोक्यात साठवताना, यापुढे कोणताही वास आला तर त्यातलं रसायन काय ते शोधायचं असं मनाशी ठरवून ईशा झोपी गेली.
radhikavinze@gmail.com
