स्मिता पोतनीस
शाळेतल्या विज्ञान प्रदर्शनासाठी नेहा आणि रिटा दोघी त्यांचं प्रोजेक्ट जपून आणत होत्या. मीना टीचरही त्यांच्याबरोबर होत्याच. नेहाच्या आईबाबांच्या मदतीने त्यांनी हे प्रोजेक्ट तयार केलं होतं. प्रदर्शन बघायला येणारे बरेच लोक होते. नेहा आणि रिटा अगदी मनापासून माहिती देत होत्या. तिथं काही पदार्थही ठेवलेले होते. नेहा सांगत होती, ‘‘पदार्थांच्या वासामुळे आपल्या घ्राणेंद्रियाच्या तंत्रिका पेशी उत्तेजित होतात. त्या थेट मेंदूशी जोडल्या जातात. त्यामुळे खरा पदार्थ खायच्या आधी आपण त्याची चव अनुभवू शकतो. तसं याला तुम्ही ‘इलेक्ट्रॉनिक नोज’ म्हणू शकता. हे स्मेल सेन्सर आहे. पदार्थाजवळ ठेवलं की ते हवेतले वासाचे सूक्ष्म कण पकडून त्यांचा कोड तयार करतं. हा कोड आपण नेटद्वारे पाठवू शकतो.’’

‘‘हा त्याचा दुसरा भाग. काट्रिज बॉक्समध्ये काही मूलभूत वासद्रव्यं साठवलेली असतात. कोड मिळाला की ती मिसळून त्या पदार्थाचा वास तयार होतो,’’ रिटानं सांगितलं.

तिथं आलेल्या एकानं विचारलं, ‘‘पण याचा उपयोग काय ते कळलं नाही.’’

‘‘म्हणजे बघा, जी मुलं घराबाहेर शिकायला किंवा नोकरी करायला जातात, त्यांना तिथं त्यांच्या आईच्या हातचं खायची इच्छा होते, पण जमत नाही. तिथं आहे तेच खायला लागतं. त्या वेळी त्यांना त्यांच्या आईनं घरच्या पदार्थांचा वास पाठवला तर तो वास ते घेऊ शकतील. त्या वासानं त्यांच्या मेंदूला खायची इच्छा निर्माण होईल आणि ते जे अन्न खात असतील, त्याची चव त्यांना अधिक चविष्ट वाटेल,’’ रिटा म्हणाली.

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या प्रदर्शनात नेहा-रिटाच्या टीमला बक्षीस मिळालं. नेहा ते सगळं मोबाइलवर तिच्या आजीला सांगत असताना बेल वाजली. तिनं दरवाजा उघडला तर दारात एक व्यक्ती आणि तिच्या टीचर! तिनं त्यांना आत बोलावलं आणि आईबाबांनाही तिथं बोलावलं.

‘‘नमस्कार! मी यांची ओळख करून देते. हे अमित देशपांडे. एक अनाथाश्रम चालवतात. त्यांची एक योजना आहे. जी त्यांनी मुख्याध्यापकांना म्हणजे कानविंदे सरांना सांगितली. ती आपल्या स्मेल सेन्सर उपकरणाबाबत आहे. त्यांना त्याने खूप मदत होईल म्हणतात. बघा तुम्हीही,’’ मीना टीचर म्हणाल्या.

‘‘सांगा न, काय करू शकतो आम्ही? तुम्हाला काही मदत होणार असेल तर आम्हाला आनंदच आहे,’’ नेहाच्या बाबांनी विचारलं.

‘‘नमस्कार, मला तुमचं ते उपकरण हवंय, पण ते फार महाग असेल तर विकत घेण्याची तेवढी आमची ऐपत नाही. पण काही प्रमाणात जमेल तेवढी किंमत आम्ही देऊ.’’

‘‘ते ठीक आहे, पण का हवंय तुम्हाला?’’ नेहाच्या आईनं विचारलं. तेवढ्यात, नेहा हळूच तिच्या कानाशी पुटपुटली, ‘‘आई, मी देणार नाही ते कोणालाही.’’ तिच्या आईनं तिच्या हातावर थोपटलं आणि थांब अशी खूण केली.

देशपांडेंनी मात्र ते ऐकलं. ते किंचित हसले. म्हणाले, ‘‘बेटा नेहा, तुला असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे, पण त्या उपकरणाचा तू काय उपयोग करणार आहेस ते सांगशील का? तो महत्त्वाचा असला तर मी माझं कारण सांगणार नाही आणि ते मागणारही नाही.’’

नेहाला काही त्याचं उत्तर सुचेना. तेव्हा ते पुढे म्हणाले, ‘‘नेहा, तुझ्याकडे कारण नसेल तर मी कारण सांगू का? तुला पटलं तर तू होकार दे. तरीही तू नाही म्हटलंस तर मी तसाच जाईन. काय आहे न, आमचा अनाथाश्रम लोकांनी दिलेल्या दानावर चालतो. तिथं अनाथ मुलांना आम्ही आधार देतो, पण मुलांना चांगलं खाता यावं हा प्रयत्न केला तरी ते देणं आम्हाला कठीण जातं. तुम्ही साधं अन्न ज्याला म्हणता तेही त्यांना मुश्किलीने देऊ शकतो. ती मुलं साधं अन्न खाताना त्यांची भूक भागते, पण त्यांनाही चविष्ट अन्न खावं वाटतं. ते देऊ शकत नसलो तरी ते खाल्ल्याचा आनंद आम्हाला त्यांच्या चेहर्‍यावर बघावासा वाटतो.’’

‘‘हे बघा, त्यांच्या आश्रमाचे आणि मुलांचे फोटो. मी स्वत: जाऊन बघून आलेय,’’ मीना टीचर म्हणाल्या.
‘‘या मुलांना चांगल्या पदार्थांचा वास मिळाला तर त्या वासावर ते साधं अन्न खातानाही त्यांना चविष्ट वाटेल आणि तो आनंद चेहर्‍यावर येईल. चालेल का?’’ देशपांडेनी विचारलेल्या प्रश्नावर नेहानं नकळत होकारार्थी
मान हलवली.

‘‘पण पदार्थाचा वास येण्यासाठी ते तयार करायला…’’ नेहाच्या आईनं विचारलं.

‘‘हो, खरं तर माझी आणखी एक विनंती आहे. त्यांना बाहेरच्या पदार्थांचे वास देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरच्या अन्नाचा वास पाठवलात तर त्यांना ते फार आवडेल.’’ ते ऐकताना नेहाला ती काही खाताना किती कटकट करते ते डोळ्यांसमोर येत होतं. या मुलांना फक्त वासावरच जेवावं लागेल आणि तरी ते समाधानी दिसतील. या विचारानंच नेहाच्या डोळ्यांत पाणी तरळलं. नेहानं आनंदाने का्ट्रिरज बॉक्स त्यांना दिला. एवढंच नाही तर नेहाच्या आईबाबांनी दर महिन्याला त्या मुलांसाठी खरोखर चांगलं जेवण द्यायचं ठरवलं.

potnissmita7@gmail.com