कालबाह्य हेलिकॉप्टर आणि अन्य लष्करी सामग्रीच्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून महाराष्ट्रासह देशातील काही लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींचा गट कित्येक दिवसांपासून पाठपुरावा करत आहे. तथापि, संरक्षण मंत्रालयात सध्या एकच धावपळ सुरू आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा दौरा पूर्ण होईपर्यंत काही बोलू नका, असा संदेश त्यांना देण्यात आला आहे. १५ दिवसांपासून संरक्षणमंत्र्यांनी सर्व भेटीगाठी रद्द केल्या आहेत. राष्ट्राच्या सुरक्षिततेची धुरा सांभाळणाऱ्या या मंत्रालयात समरप्रसंगातदेखील नसेल इतकी आणीबाणीची स्थिती सध्या आहे. केवळ संरक्षणच नव्हे, तर सुरक्षा- व्यवस्थेशी निगडित गृह, गुप्तचर यंत्रणा, पोलीस, निमलष्करी व विशेष कृतीदल, सीमेवर तैनात लष्करी जवान, सागरात तळ ठोकलेल्या युद्धनौका या सर्वावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा दौरा सुखेनैवपणे पार पाडण्याचे प्रचंड दडपण आहे. अर्थात प्रश्न जगातील सर्वाधिक शक्तिशाली अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचा आहे. त्यातही सुमारे दोन तास खुल्या आकाशाखाली होणाऱ्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यातील संचलनाचा आहे. या सोहळ्यात ओबामा यांच्या सुरक्षिततेचे भारतीय यंत्रणांच्या बरोबरीनेच अमेरिकी गुप्तचर यंत्रणेसमोरही आव्हान आहे.
देशांतर्गत आणि देशाबाहेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या पत्नीच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी युनायटेड स्टेट सीक्रेट सव्‍‌र्हिसवर असते. संरक्षण कवच पुरवणारी जगात नावाजलेली ही यंत्रणा. सुरक्षा कवच देण्याची पद्धती तसेच कार्यवाहीबद्दल त्यांच्याकडून कमालीची गुप्तता बाळगली जाते. स्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन करताना संभाव्य धोके हेरून स्थानिक यंत्रणांच्या मदतीने आपल्या राष्ट्राध्यक्षांभोवताली मजबूत संरक्षक तटबंदी उभारणे हे त्यांचे मुख्य काम. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची सुरक्षितता हे स्थानिक यंत्रणांसाठी नेहमीच आव्हान असते. यंदा त्यास खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण परिमाणेच बदलली आहेत. ओबामा भारत दौऱ्यावर असल्याने दहशतवादी आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतील. लष्कर-ए-तोयबाला अन्य दहशतवादी संघटना, पाकिस्तान लष्कर, आयएसआय यांचे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत-अमेरिका या दोन्ही राष्ट्रांतील सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्कता बाळगणे अनिवार्य झाले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठीची सुरक्षा मानकेलक्षात घेतल्यास ‘न भूतो..’ अशी सुरक्षाव्यवस्था यंदा अनुभवायला मिळेल. दृश्य स्वरूपात काही अंशी ही व्यवस्था लक्षात येईल. त्याचबरोबर अदृश्य स्वरूपात पडद्यामागून बरेच काही कार्यरत राहणार आहे.
कार्यक्रमस्थळ राजपथ आणि नवी दिल्ली कधीच सुरक्षा छावणीत रूपांतरित झाली आहे. ज्या हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांचा मुक्काम आहे, ज्या मार्गावरून ते मार्गक्रमण करतील, ज्या आग्रा शहराला ते भेट देणार आहेत, अशा सर्व ठिकाणांची टेहेळणी अमेरिकी सुरक्षा यंत्रणांनी आधीच करून सुरक्षाव्यवस्थेचा आराखडा तयार केला आहे. सीक्रेट सव्‍‌र्हिस यंत्रणांच्या नियमित कामकाजाचाच तो भाग आहे. संचलन सोहळ्यात सातस्तरीय सुरक्षाव्यवस्थेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, भारतीय राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याभोवती अमेरिकी आणि भारतीय विशेष सुरक्षा पथकांचे संयुक्त सुरक्षा कवच राहील. अमेरिकेचे अध्यक्ष खुल्या आकाशात जास्तीत जास्त ४५ मिनिटे घालवू शकतात. प्रजासत्ताकदिन सोहळ्यात संचलन दोन तासाहून अधिक काळ चालणार आहे. खुल्या आकाशाखाली इतका वेळ थांबण्याची अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. खबरदारीचा उपाय म्हणून अतिविशेष व्यक्तींची आसनव्यवस्था ‘बुलेटप्रुफ’ काचेच्या भिंतीने बंदिस्त केली जाईल. हा परिसर ‘नो फ्लाय झोन’ करण्याची अमेरिकी यंत्रणांची मागणी अमान्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. कारण ती मान्य केल्यास सोहळ्यातील मुख्य आकर्षण असणारे हवाई संचलनही होऊ शकणार नाही.
परंपरेनुसार या सोहळ्यातील प्रमुख अतिथींचे भारतीय राष्ट्रपतींसमवेत मोटारीने राजपथावर आगमन होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगात कोणत्याही दौऱ्यात रस्तामार्गाने भ्रमण करताना खास निर्मिलेल्या अतिसुरक्षित ‘बीस्ट’ मोटार वगळता अन्य वाहनांचा वापर करीत नाहीत. त्यामुळे या सोहळ्यास ते नेमक्या कोणत्या मोटारीतून येणार, याबद्दल संदिग्धता आहे. बीस्ट या आलिशान आणि तितक्याच मजबूत मोटारीची वैशिष्टय़े लक्षात घेतल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षाव्यवस्थेचा दर्जा लक्षात येतो. १८ फूट लांब आणि आठ टन वजनाची ही मोटार शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. रासायनिक हल्ल्यापासून संरक्षणाची तजवीज, रात्रीच्या अंधारात सुस्पष्ट दिसेल असे कॅमेरे, उपग्रहाधारित दूरध्वनी आणि १८० अंश कोनात वळण घेईल असे चालकास दिलेले खास प्रशिक्षण ही या वाहनाची काही वैशिष्टय़े. शिवाय अमेरिकेचे उपाध्यक्ष आणि पेंटागॉनशी थेट संपर्क साधण्याची खास व्यवस्था या मोटारीत आहे. त्यामुळे भारतीय राजशिष्टाचाराचे पालन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष करणार काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बसविलेले १५ हजार सीसी टीव्ही कॅमेरे, वर्दळीच्या ठिकाणी संशयितांची चेहऱ्यावरून ओळख पटवता येईल यासाठी कार्यान्वित केलेले ‘फेस रेकग्निशन कॅमेरे’, दुपटीने वाढवलेला फौजफाटा, हवाई हल्ले रोखण्यासाठी बसविलेल्या विमानविरोधी तोफा, मोक्याच्या ठिकाणी उंच इमारतींवर तैनात होणारे ‘स्नाइपर्स’ अर्थात बंदुकधारी, ७२ तास आधी सभोवतालचा परिसर रिक्त करणे, सोहळ्याच्या कालावधीत दिल्ली विमानतळावरील बंद ठेवण्यात येणारी हवाई तसेच रस्ते व मेट्रो स्थानकावरील वाहतूक आदी उपायांद्वारे सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कसूर राहू नये याची दक्षता बाळगली जात आहे. दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवताना सीमेवरून घुसखोरी होऊ नये म्हणून अतिरिक्त कुमक तैनात केली गेली आहे. सागरी सीमांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवण्यात येत आहे. खुद्द अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यावेळी दहशतवादी कारवाया घडल्यास गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. या काळात गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानमधून उपग्रहाधारित दूरध्वनीवरील संभाषणावर लक्ष ठेवून आहेत.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षाव्यवस्थेची वेगळी खासियत आहे. त्यात कोणत्याही स्वरूपाची तडजोड करण्यास गुप्तचर यंत्रणा तयार नसतात. ‘एअर फोर्स १’ विमानाने राष्ट्राध्यक्ष जगभर प्रवास करतात. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असणाऱ्या या विमानाची शत्रूच्या रडार यंत्रणेला निष्प्रभ करण्याची क्षमता आहे. ४५ हजार फूट उंचीवरून राष्ट्राध्यक्ष जगाच्या संपर्कात राहतील अशी विशेष व्यवस्था या विमानात आहे. आवश्यकतेनुसार दिमतीला अमेरिकन लष्कराची हेलिकॉप्टर्सही असतात. राष्ट्राध्यक्ष जेव्हा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, तेव्हा ते ‘आर्मी वन’ या नावाने ओळखले जाते. ज्या हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्ष वास्तव्य करतील, त्याचा ताबा आधीच गुप्तचर यंत्रणा घेते. राष्ट्राध्यक्षांचे आगमन होण्याच्या काही दिवस आधी संपूर्ण हॉटेल रिक्त करून त्यांच्यासाठी राखीव असणाऱ्या दालनांच्या मजल्यावरील सर्व प्रकारचे फर्निचर, आरसे व तत्सम साहित्य हटविले जाते. त्या ठिकाणी नव्याने सर्व व्यवस्था केली जाते. गरज वाटल्यास यंत्रणेने संबंधित हॉटेलमधील ‘वायरिंग’ही बदलल्याची काही उदाहरणे आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या तीन दिवसीय भारतदौऱ्यात सुरक्षिततेसाठी चाललेले हे सगळे व्याप या महासत्तेचा रूबाब अधोरेखित करणारे आहेत.