प्रिय वाचकहो, आजच्या ‘जनात-मनात’चा विषय सर्वथा वेगळा आहे. कधी मनात उमटणारे भावनांचे तरंग, कधी वैचारिक द्वंद्व तर कधी घडणाऱ्या गोष्टींचा वेगळ्या अंगाने घेतलेला परामर्श यांतून ‘जनात-मनात’ साकारते आहे. पण आज मी पुन्हा एकदा माझ्या लाडक्या वैद्यक विश्वाकडे वळतो आहे. विषय आहे- कृत्रिम कान- बाह्य़कर्ण. बॅहमॅनचे लांबलचक खोटे कान लावून आमची मुले मोठी झाली. पण आता वैद्यकशास्त्रने प्रयोगशाळेत कृत्रिम कान Tissue engineering   च्या माध्यमातून तयार केला आहे, त्याचा हा आढावा.
२०१३-१४ सालातील लक्षणीय वैद्यकीय उपलब्धी कोणत्या याचा आढावा घेताना काही गोष्टी ठळकपणे समोर आल्या. वैद्यकाची सगळीच पुढची दिशा ही जनुकीय तंत्रज्ञान आणि प्रयोगशाळेत नवे प्रयोग करून वेगवेगळे मानवी अवयव तयार करण्याकडे आहे. यकृत, स्वादुिपड ही आंतरिक इंद्रिये, त्वचा हे बाह्य़ावरण आणि कान, डोळे ही ज्ञानेंद्रिये तयार करण्याकडे संशोधनाचा ओढा आहे. मॅसेच्यूसेटस्, फिलाडेल्फिया, प्रिन्स्टन या अमेरिकेतील विद्यापीठांकडे हे शिवधनुष्य उचलण्याची क्षमता आहे. अनेकदा जन्मदत्त व्याधी किंवा अपघात यामुळे बाह्य़कर्ण त्याच्या जागेवरून लुप्त होतो. ‘कानफाटय़ा’ म्हणणे आणि तो ‘काननिराळा’ असणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. कान म्हणजे चेहरेपट्टीची महिरप. नाकाने शेंडा मिरवावा, डोळ्यांनी भिरभिरावे आणि कानाने जग हलकेच, अलगदपणे टिपून घ्यावे. कान म्हणजे चेहरेपट्टीला घातलेले कुंपण. जन्मजात ते नसणे हा दुर्दैवाचा आघात काही बालकांवर होतो आणि मग तो बाह्य़कर्ण निर्माण करण्यासाठी प्लॅस्टिक सर्जन्सची धडपड चालू होते. कधी बाह्य़त्वचा लावून तर कधी डोक्याच्या त्वचेचे प्लॅप रोपण करून बाह्य़कर्ण निर्माण करण्याचे यत्न होतात. पण आकार, रूप, रंग, कूच्रेची लवचीकता आणि अंतरंगातील वेगवेगळया घडय़ा याबाबतीत ते प्रयत्न कुचकामी ठरतात आणि मग प्रयोगशाळेतून ‘मेड टू ऑर्डर, रेडीमेड’ बाह्य़कर्ण बनविण्याचे संशोधन ‘Bionic Ear’ या संकल्पनेला जन्म देते होते.
असा कृत्रिम बाह्य़कर्ण निर्माण करण्यासाठी थॉमस सेराव्हेंटस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्लॅस्टिक सर्जन्सची मदत घेऊन कानाचा साचा तयार केला. तो हुबेहुब खऱ्या कानासारखा दिसेल याची दक्षता घेतली. मेंढराच्या कूच्रेच्या पेशी प्रयोगशाळेत उंदरांच्या त्वचेखाली रोपित करून त्यांची संख्यात्मक वाढ करण्यात आली. लवचीक कूर्चा वाकून जाऊन कानाची घडी होऊ नये म्हणून टायटॅनियम वायर्सची गुंफण तयार केली गेली. त्रिमिती डिजिटल मॉडेल (थ्री-डी) तयार करण्यासाठी थ्री-डी िपट्रर टेक्नॉलॉजी वापरली गेली. गाईच्या शरीरातील पेशींनी साच्याला तात्पुरता आकार देण्यात आला आणि सरतेशेवटी प्रयोगशाळेत वाढविलेल्या मेंढराच्या कूर्चा पेशींनी या कृत्रिम कानाला गोलावा दिला. पॉलिडायमिथीलसिलोक्झेन या विशेष सिलिकोन संयुगाने, या साच्याला आकारबद्धता दिली गेली. पेशींची वाढ व्हायला अंदाजे तीन महिन्यांचा कालावधी लागला. हे सर्व कान प्रयोगांमध्ये उत्तमरित्या स्वीकारले गेले आणि आपले काम करू लागले. श्रवणक्षमता, आत्मविश्वास आणि चेहऱ्याला बळकटी आली. इथे कानाच्या क्षेत्रफळाचा आणि भूमितीचा जसा विचार झाला तर त्याच्यावर रंग-रूप आणि कामाचाही संस्कार झाला. बाह्य़कर्णाच्या या प्रयोगशाळेतील निर्मितीने नव्या संशोधनाची कवाडे खुली केली. Retinits pigmentosa या दुर्धर व्याधीने  Retina  हे डोळ्याचे अंतरपटल खराब झालेल्या अंध व्यक्तींसाठी कॅमेराच्या चीपचा वापर करून कृत्रिम डोळा तयार करण्यात आला. अपघातात हात तुटलेल्या किंवा जन्मजात हात नसलेल्यांसाठी Bionic Hand   ही तयार झाला आहे.
Bionic ear, bionic hand   याहीपुढे वैद्यकशास्त्र आता मृत्युपश्चात hand donation and transplantation आणि  face transplant या नव्या विषयांत कार्यरत आहे. शल्यशास्त्रात भारतीय सर्जन्सचा हात कोणी धरू शकत नाही आणि त्यातही प्लॅस्टिक सर्जरीची गंगोत्री म्हणजे सुश्रुत. तेव्हा काही वर्षांतच या शस्त्रक्रिया आपल्या येथेही होऊ लागतील. हात तुटलेल्या, हात नसलेल्या, चेहरा विद्रूप झालेल्या अनेक रुग्णांना त्या पुनर्जन्म देतील, पण या साऱ्या आधुनिक संशोधनाबरोबर नतिक कर्तव्याचा वसाही आपण विसरता कामा नये.
वैद्यकक्षेत्रात कृत्रिम अवयवांचे नवे दालन उघडते आहे. याचा अर्थ उद्या हे अवयव केमिस्टकडे मिळतील असे नाही. पण गरजूंना मदत करण्यासाठी शास्त्र सज्ज झाले आहे, हे खरेच. यापकी बहुतांशी उपलब्धी या गुणसुत्रे, जेनेटिक लॅबारेटरी यांच्याशी संलग्नित आहेत आणि इथेच उपलब्धींच्या मोहात पडणाऱ्या वैद्यकशास्त्राला नीतिमत्तेच्या मर्यादा कधीही न ओलांडण्याची आठवण पुन:पुन्हा करून देणे गरजेचे आहे. अन्यथा पसा, पद, प्रतिष्ठा आणि यशाची धुंदी या दुष्टचक्रातून वाकडे पाऊल पडू शकते. COMA, You never let me go  या कादंबरी-चित्रपटांतून हा भस्मासुर कोणती भयावह दिशा घेऊ शकतो हे आपण पाहिले आहे.
बायॉनिक कान हे प्रगतीचे पहिले पाऊल आहे, पण शेवटी ‘बुरा मत बोलो, देखो, सोचो’ म्हणणारी बापूजींची तीन माकडेच महत्त्वाची. कानावर हात ठेवणाऱ्या माकडाने कानावरचे हात कधी न काढणेच बरे.