सेक्स्टॉर्शनचा सापळा! | Sextortion social media suicide Cultural city of the state amy 95 | Loksatta

सेक्स्टॉर्शनचा सापळा!

राज्याची सांस्कृतिक नगरी गेल्या आठवडय़ात वेगळय़ाच कारणासाठी चर्चेचा विषय बनली.

सेक्स्टॉर्शनचा सापळा!

मुक्ता चैतन्य

राज्याची सांस्कृतिक नगरी गेल्या आठवडय़ात वेगळय़ाच कारणासाठी चर्चेचा विषय बनली. पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे अशा शहरांतील तरुण-मध्यमवयीन मुलांचे समाजमाध्यमांवरून गेले वर्षभर ‘सेक्स्टॉर्शन’ सुरू होते. त्यात पुण्यातील उच्चभ्रू वस्तींमधील कित्येक जण बदनामीच्या धाकावर फसविले जात होते. दोन मुलांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे खणून काढले. शोध लागला तो राजस्थानच्या गुरुगोठडी या गावाचा. या संपूर्ण गावातील अडीच हजार नागरिक ‘सेक्स्टॉर्शन’चा उद्योग हाताळत होते. हे सारे उधळून लावण्यासाठी पुणे शहरातील तक्रारी कारणीभूत ठरल्या. त्यावर चर्चा करणारा लेख..

काही महिन्यांपूर्वी पुण्यात दोन अत्यंत दुर्दैवी घटना घडल्या. दोन तरुणांनी आत्महत्या केल्या. या दोघा तरुणांचा एकमेकांशी कुठलाही संबंध नसला तरीही त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र एकच होतं.ते म्हणजे सेक्स्टॉर्शन.

२०२२ या वर्षभरात एकटय़ा पुण्यामधून सेक्स्टॉर्शनच्या १४४५ केसेस नोंदवल्या गेल्या. महाराष्ट्र आणि त्यातही मुंबई-पुणे ही शहरं सायबर गुन्हेगारांना सहज बळी पडणारी आहेत.अशा वेळी सेक्स्टॉर्शनचं हे संपूर्ण प्रकरण आहे काय, यात काम करणाऱ्या गुन्हेगारांची पद्धत नेमकी काय असते, मोबाइलधारक आणि समाजमाध्यामांचे वापरकर्ते म्हणून आपण स्वत:ला या सगळय़ापासून कसं वाचवलं पाहिजे, हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण सेक्स्टॉर्शनच्या घटना सध्या कुणाही बरोबर घडू शकतात.

राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या सीमालगतच्या भागांमधली गावंच्या गावं सायबर गुन्हेगारीची ‘हब्स’ म्हणजेच ‘ठिकाणं’ म्हणून सध्या कार्यरत आहेत. झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्याही काही गावांचा यात समावेश आहे. एखादी कॉर्पोरेट कंपनी चालावी त्या पद्धतीने सेक्स्टॉर्शनचं संपूर्ण ‘रॅकेट’ काम करतं. गावंच्या गावं सामील असल्याने या कानाची बातमी त्या कानाला पोहचत नाही. सायबर पोलिसांनी एक गँग उद्ध्वस्त केली तर पाठोपाठ अजून चार गँग तयार होतायत. बेरोजगारी आणि प्रचंड गरिबीवर माणसांच्या समुदायांनी पैसे मिळवण्यासाठी शोधलेला हा एक सोपा मार्ग आहे का?

या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देणं सोपंही आहे आणि अवघडही!
सेक्स्टॉर्शन टोळय़ांचं काम विविध स्तरांवर चालतं. यात प्रामुख्याने पाच स्तर असतात. यातला पहिला स्तर हा फक्त प्रशिक्षणाचं काम करतो. म्हणजे सेक्स्टॉर्शन कसं करायचं, सावज कसं शोधायचं, चॅटिंग कसं करायचं, तंत्रज्ञान कशा पद्धतीने वापरायचं, आपण पकडले जाणार नाही याची काळजी कशी घ्यायची.. याच्या बारीकसारीक तपशिलांसह रीतसर शिकवण्या या गावांमधून चालतात. प्रशिक्षण झालेली १५ ते २५ वयोगटातली मुलं मग या सायबर गुन्हेगारीच्या व्यवसायात उतरतात.

दुसऱ्या स्तरातली गुन्हेगार माहिती गोळा करण्याचं, म्हणजेच डेटा तयार करण्याचं काम करतात. त्यासाठी समाजमाध्यमाचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. फेक अकाउंट्स तयार करणं, त्यासाठी योग्य नावांची, फोटोंची निवड करणं, समाजमाध्यमांत कोण कुठले फोटो अपलोड करतोय, कोण काय पोस्ट टाकतोय याकडे या गुन्हेगारांचं बारीक लक्ष असतं. कोण एकटं आहे, कुणाच्या वॉलवर कुठल्या प्रकारचे फोटो आहेत या सगळय़ाचा बारकाईने अभ्यास करून कोण गळाला लागू शकेल यावर लक्ष ठेवण्याचं काम हे लोक करतात. या सगळय़ा टोळय़ा मोबाइल नंबर्सचा डेटाही मोठय़ा प्रमाणावर विकत घेतात आणि त्याचा सावज हेरण्यासाठी उपयोग करतात.

तिसऱ्या स्तरावरची मंडळी प्रत्यक्ष ‘कॉलिंग’चं काम करतात. म्हणजे सावज हेरून झाला की त्या व्यक्तीला प्रत्यक्ष फोन करणे, त्याची क्लिप तयार करणे, सेक्स चॅट करणे, सेक्स ग्रूम करणे, त्यासाठी मैत्री करणे, प्रेमात आहोत असे दाखवणे इत्यादी गोष्टी या स्तरातले गुन्हेगार करतात. या स्तरात काम करणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देतानाच काही किट्स दिली जातात. दोन कॅमेरे वापरून काम कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलेलं असतं, विदेशी-देशी सेक्स क्लिप्स दिलेल्या असतात. चॅटिंग कसं करायचं यासाठी ‘लव्ह स्क्रिप्ट्स’ लहिलेली असतात. त्यांनी फक्त कॉपी पेस्ट करून सेक्स चॅटिंग करायचं असतं. दुसरं म्हणजे बहुतांशवेळा व्हिडिओ कॉलमध्ये समोर जी नग्न मुलगी असते ती प्रत्यक्षात तिथे नसते. किटमधल्या अनेक क्लिप्समधून क्लिप निवडून दोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने समोर मुलगी आहे असा आभास निर्माण केला जातो. तो कसा निर्माण करायचा याचंही प्रशिक्षण भरती झाल्यानंतरच्या शिकवण्यांमध्ये दिलं जातं.

चौथ्या स्तरात काम करणाऱ्या गुन्हेगारांना म्हटलं जातं बँक ऑपरेटर्स. म्हणजे प्रत्यक्ष एटीएममध्ये जाऊन पैसे काढून आणणं, तिथे पकडलं जाऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणं या सगळय़ा गोष्टी त्यांच्या अखत्यारीत येतात. हे काम करणारे अनेकदा व्यसनी असतात. पैशांच्या मोबदल्यात किंवा गांजा आणि ड्रग्जच्या मोबदल्यात एटीएममधून पैसे काढण्याचं काम ते करतात. आणि त्यानंतर आणखीन एक स्तर असतो तो पाचवा स्तर. या गुन्हेगारांचं काम असतं एटीएम कार्डस् मिळवणं. त्यासाठीही एक विशिष्ट पद्धत वापरली जाते. हे गुन्हेगार गरिबांची खाती विकत घेतात. दोन-पाच हजार रुपयांना गरिबांची खाती, एटीएम कार्डस् विकत घेतली जातात आणि तीस-चाळीस हजारांना विकली जातात. या माणसांचा वरच्या स्तरांशी संबंध येईलच असं नाही. त्यांचं काम एकच खाती विकत घेऊन, एटीएम कार्डस् उपलब्ध करून देणं.

या टोळय़ा कधीही मोठय़ा रकमांवर हात मारत नाहीत. साधारण पाच हजारांपासून सुरुवात होते ते तीस चाळीस हजारांच्या घरात व्यवहार संपतो. त्यापेक्षा मोठय़ा रकमांच्या अपेक्षा केल्या जात नाहीत. कारण, इतक्या छोटय़ा रकमेसाठी कुणीही सायबर पोलिसांची मदत घ्यायला जात नाही.
लैंगिक संबंध आणि एकूणच लैंगिकतेकडे बघण्याचा आपल्या समाजातला दृष्टिकोन यामुळेही तक्रारी चटकन दाखल होत नाहीत. आपली नाचक्की होईल या भीतीने तक्रार दाखल न करता खंडणी दिली जाते. तक्रारींचे प्रमाण अत्यल्प आणि सेक्स्टॉर्शनचा धंदा तेजीत असं एकूण चित्र आहे.
गावंच्या गावं यात गुंतलेली असल्यामुळे सायबर पोलिसांनाही अनेकदा सर्व स्तरांपर्यंत पोहोचणं अवघड जातं. एक टोळी पकडली गेली की त्यांचं सगळं किट वापरून दुसरी टोळी लगेच कामाला लागते. एखादा १० ते ५ असा जॉब असावा अशी ही मुलं काम करतात. सकाळी १० वाजता शेतातल्या, जंगलातल्या त्यांच्या कामाच्या ठिकाणावर जातात आणि संध्याकाळी ५ ला घरी परत. टोळय़ा पकडल्या गेल्या तरी निरनिरळय़ा स्तरांवर काम करणाऱ्यांची प्रमोशन्स होतात आणि नव्या टोळय़ा उभ्या राहतात. हे सतत आणि अविरत सुरू आहे.

सायबर गुन्हेगारांच्या अनेक टोळय़ा पकडणाऱ्या पोलीस अधिक्षक, सिव्हिल डिफेन्स डॉ. रश्मी करंदीकर यांच्याशी या विषयावर संवाद साधला. त्या सांगतात, ‘‘गरिबी, उपजीविकेचं साधन नाही, शिक्षणाला किंमत नाही आणि झटपट पैसा अशा विचित्र परिस्थितीमुळे तरुण यात मोठय़ाप्रमाणावर गुंतलेले आहेत. तक्रार दाखल होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे या प्रकारच्या गुन्हेगारीत येणाऱ्या तरुणांना यात तसा ‘रिस्क फॅक्टर’ दिसत नाही. उलट ‘सेक्स्टॉर्शनचं’ काम करणाऱ्या मुलांना लग्नाच्या बाजारात सहज मुलगी मिळते हे मी बिहारमध्ये बघितलं आहे. समजा पकडला गेला तरी थोडीफार शिक्षा होईल आणि मुलगा परत येणार हे सगळय़ांना माहीत असतं. गुन्हेगारीतलाही ‘व्हाईट कॉलर’ प्रकार मनाला जातो हा. पोलिसांच्या दृष्टीने अजून एक अडचण असते ती म्हणजे पुरावे गोळा करणं. सगळं गाव किंवा गावातली अनेक जण यात सहभागी असतात. अनेकदा गावाबाहेर शेतात, जंगलात हे सगळे उद्योग सुरू असतात. त्यामुळे मोबाइल, सिम कार्डस् कॅमेरे, लॅपटॉप या वस्तू शेतात नाहीतर जंगलात जमिनीत पुरल्या जातात. ज्या खणून काढणं अनेकदा कठीण होऊन बसतं. मी एकच सांगेन, कुठलाही अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नका. समजा उचललाच तरी बोट मोबाईलच्या कॅमेऱ्यावर ठेवा, म्हणजे तुमचा चेहरा रेकॉर्ड होणार नाही. समोर जी नग्न बाई असते ती लाईव्ह चॅट मध्ये नसते, तुम्हाला एक वेगळी क्लिप दाखवली जात असते हे लक्षात ठेवा. समजा पैशांची मागणी झाली तर नंबर ब्लॉक करा. या टोळय़ा साधारण एका व्यक्तीला जास्तीतजास्त पाच नंबर्सवरून कॉल करतात. जर तुम्ही कॉल ब्लॉक करत राहिलात तर आपोआप तुम्हाला फोन येणं बंद होईल आणि न घाबरता तक्रार दाखल करा.’’

आता एखाद्याला प्रश्न पडेल की, हे सगळं फक्त पुरुषांच्या बाबतीतच होतं का? तर असं मुळीच नाही. महिलांच्या संदर्भातही असे प्रकार मोठय़ा प्रमाणावर घडत आहेत, पण त्या गुन्हेगारांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. यात नायजेरिन टोळय़ा अधिक प्रमाणात आहेत आणि मोठय़ा रकमेची फसवणूक केली जाते. पुरुषांच्या बाबतीतला हा खेळ हजारांमधे असेल तर स्त्रियांच्या बाबतीत लाखोंचा असतो. स्त्री-पुरुष सगळय़ांच्याच बाबतीत घडणाऱ्या या गुन्ह्यंमध्ये माणसांच्या मानसिकतेचा, भावनिक कमकुवतपणाचा, एकटेपणाचा, मोहाच्या क्षणांचा अभ्यास करून निरनिराळी ग्रूिमग तंत्रे वापरली जातात.

तक्रार दाखल न होण्यामागे अनेकदा आपणच नसत्या पोलिसी जाचात अडकू ही भीती सुद्धा असते. त्यावर प्रसिद्ध सायबर वकील अॅड. वैशाली भागवत यांनी सांगितले की, दोन प्रौढांमधील संमतीने झालेला सेक्स चॅट हा कायद्याने गुन्हा नाही. पण त्याचे व्हिडिओ किंवा ते मेसेज जर शेअर केले गेले तर लैंगिक छळासाठी भारतीय दंड संहिता १८६० ( IPC) च्या कलम ३५४ अ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७ (अश्लील सामुग्री ऑनलाइन प्रसारित करणे) अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या मेसेज आणि व्हिडिओचा गैरवापर करून धमकावले किंवा खंडणी मागितली गेली किंवा अब्रूनुकसानीची धमकी दिली तर हासुद्धा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने अजिबात घाबरण्याचे कारण नाही. कायदा त्याच्याच बाजूने आहे. या प्रकारच्या गुन्ह्यंना सेक्स्टॉर्शन किंवा रिव्हेंज पॉर्न असे म्हटले जाते. या पद्धतीचे गुन्हे प्रेमातून कटुता आलेल्या नात्यात, डेटिंग अँप्सवर, हनी ट्रॅप्ससाठी आलेल्या व्हिडिओ कॉल्समधून घडू शकतात. अशावेळी फोन नंबर, जर काही चॅटिंग झालं असेल तर त्याचे स्क्रीनशॉट्स, खंडणी मागणीचे चॅट्स, कॉल रेकॉर्डस् आदी गोष्टी पुरावा म्हणून वापरता येतात. त्यामुळे घाबरून हे पुरावे डिलिट करू नयेत. Cybercrime.gov.in
या पोर्टलवरही तक्रार नोंदवता येऊ शकते किंवा जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवता येऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या स्वत:च्या बाबतीतल्या सेक्शुअलाइज्ड कन्टेन्टविषयी तक्रार समाजमाध्यमांकडे केली तर अपलोड झालेला तो कन्टेन्ट काढून टाकणे समाजमाध्यमांसाठी बंधनकारक आहे.

सेक्स्टॉर्शन आणि त्या संबधातले गुन्हे हे ‘जे1 झालं का?’ या प्रश्नापलीकडे गेले आहेत. हा संपूर्ण विषय बराच गंभीर आणि मनोसामाजिक पातळीवर गुंतागुंतीचा आहे. बेरोजगारी, गरिबी, झपाटय़ाने बदलणारी मूल्य व्यवस्था, गन्ह्यंचे सामान्यीकरण अशा असंख्य गुंतागुंतीच्या मुद्यांमध्ये हा सगळा विषय अडकलेला आहे. समाजमाध्यमे ही भावनांचीच बाजारपेठ आहे. त्याचाच फायदा सेक्स्टॉर्शनसारख्या सायबर गुन्ह्यंमध्ये घेतला जातोय. आपण तयार केलेलं ‘डिजिटल फूटिपट्र्स’ वापरूनच आपल्याला लक्ष्य केलं जातंय. समजामाध्यमं आणि इंटरनेटच्या जगात वावरणारा प्रत्येक जण भक्ष्य आहे. आणि शिकारी टपून बसलेले आहेत त्यामुळे सावध असा!

पुण्यनगरी.. सावजकेंद्र
फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांत आपला व्यवहार कसा आहे याची ‘हेरगिरी’ अव्याहत सुरू असते. पण त्यातून पैसे कमावण्याचे अनेक वाममार्ग गेल्या काही वर्षांमध्ये समोर येत आहेत. ‘सेक्स्टॉर्शन’ हे त्यातले ताजे उदाहरण. सुंदर ललनांची छायाचित्रे दाखवून तरुणांपासून ज्येष्ठांशी आधी मैत्री करायची. त्यानंतर चावट गप्पांचा आधार घेत खोटय़ा चित्रफितींच्या आधारे त्यांना भुलवून त्यांच्या चित्रफिती बनवायच्या. मग बदनामीच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचे. हे सारे सुनियोजित क्रमाने सुरू होते. मुंबई, ठाणे, कोल्हापूरमध्ये फसविण्यात आलेल्या कित्येकांनी तक्रारीच दाखल केल्या नाहीत. मुंबईत ६८ तक्रारी दाखल झाल्या, पण एकटय़ा पुणे शहरात एका वर्षांत या उद्योगाचे शिकार झालेल्या १४४५ नागरिकांनी पोलिसांची मदत मागितली. हजारो रुपयांची खंडणी नव्या मार्गाने लुटणारे हे गुन्हेगार आपल्या गावातून पुणे शहरावर लक्ष्य केंद्रित करीत होते. दत्तवाडीतील एका मुलाने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, तेव्हा त्याच्या या कृत्यामागे ‘सेक्स्टॉर्शन’ असल्याचे समोर आले. पोलिसांनी आत्महत्या केलेल्या मुलाच्या मोबाइलच्या आधारे शोध घेतला असता राजस्थानच्या अलवर जिल्ह्यतील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुगोठडी हे गाव उजेडात आले. या गावात पुरुष-महिला आणि तरुणींकडून सेक्स्टॉर्शनच्या नवनव्या क्लृप्त्य़ा लढविल्या जात होत्या. संपूर्ण गावातील अडीच हजार नागरिक निष्णात सायबर गुन्हेगारांसारखे दिवस-रात्र ‘सेक्स्टॉर्शन’चा खेळ चालवत होते. या गावात गेलेल्या पुण्यातील पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. तरीही पोलिसांनी हा सारा प्रकार उघडकीस आणला.

पुण्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘सेक्स्टॉर्शन’च्या जितक्या तक्रारी दाखल झाल्या, त्यापेक्षा शेकडोपटीने वाढ यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात झाली. भयापोटी तक्रारी न दाखल करणाऱ्यांची संख्या यापेक्षा दुप्पट असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्मार्टफोन आणि विविध गॅझेटधारक व्यक्ती या गुन्हेगारांच्या तावडीत सापडल्या आहेत. कुटुंबात राहूनही वाढत चाललेला एकटेपणा, समाजमाध्यमांचे व्यसन आणि त्यांतून दाखविली जाणारी लैंगिक तृप्तीची आकर्षणे.. अशा अनेक गोष्टी ‘सेक्स्टॉर्शन’ होण्यास कारणीभूत आहेत. स्मार्टफोनचा वापर सुदृढ मानसिक आरोग्य राखण्याइतपत होत नसल्याने अशा प्रकारच्या फसवणुकीच्या सापळय़ांत अडकण्याचे प्रमाण तुलनेने उच्चभ्रू वर्गात अधिक आहे. मुंबईसारख्या वेगाने धावणाऱ्या शहरांमध्येही फसवणुकीचा हा प्रकार गुन्हेगारांसाठी यशस्वी ठरतो, आणि पुण्यासारख्या सर्वच बाबतीत निवांत असणाऱ्या शहरात सावज शोधणे सोपे होते. फोटो किंवा चित्रफितींना भाळून किमान बुद्धीपातळी गमावत लोक फसण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात. खासगी माहिती, बँक खात्यांचे तपशील यांची देवाण-घेवाण करतात. पुढे ‘न परतीच्या मार्गावर’ आल्यानंतर अधिकाधिक लुबाडले जातात. पोलिसांत, सायबर सेलमध्ये तक्रार करण्यास धजावतात, त्यांची यातून सुटका होऊ शकते. भीतीने तक्रार न करता या गुन्हेगारीला प्रोत्साहनच मिळू शकते.

समाजमाध्यमांनी आपल्या जगण्यावर सध्या सर्वाधिक आक्रमण केलेले असताना ‘सेक्स्टॉर्शन’चे चक्रव्यूह आपल्यासमोर वेगवेगळय़ा रूपात प्रगट होत राहणार आहे. त्यात अडकायचे की त्यापासून लांब राहायचे यासाठी पुढील काळात दक्षता आपली आपल्यालाच घ्यावी लागणार आहे.
muktaachaitanya@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 02:05 IST
Next Story
अभिजात: रेन्वां गोतावळय़ात रमणारा कलाकार