डॉ. आशुतोष जावडेकर

योगिनी सातारकर-पांडे हे सद्य:काळातले मराठी कवितेमधील महत्त्वाचे नाव. त्यांच्या आधीच्या संग्रहाने उंचावलेल्या अपेक्षांना पूर्ण करणारा त्यांचा नवीन कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याचे शीर्षकदेखील फार बोलके आणि भेदक आहे- ‘शब्द जायबंदी होण्याचे दिवस’!  समीक्षेत डिकन्स्ट्रक्शन आणि वाचककेंद्रित समीक्षा या गोष्टी विरुद्ध अक्षावर असतात. संहितेबाहेर काहीही नाही असे डिकन्स्ट्रक्शन समीक्षा- तत्त्व म्हणते. वाचकदेखील त्या संहितेतच सामावलेला असतो. याउलट वाचककेंद्रित समीक्षा ही वाचकाला संहितेबाहेर अंतरावर उभी करते आणि वाचक ही बदलती गोष्ट असते असेही सांगते. योगिनी पांडे-सातारकर यांच्या संग्रहाचे शीर्षक वाचून मला वाटलं की तो वाचक आता बदलत बदलत इतका असहिष्णु, दुसऱ्याचे वेगळे मत अजिबात ऐकून न घेणारा असा दुराग्रही झाला आहे, की शब्द जायबंदी होण्याची कारणे ही संहितेतच नव्हे, तर वाचकांमध्येही आहेत. आणि इंग्रजीच्या प्राध्यापक असलेल्या कवयित्रीला जागतिक साहित्य आणि समीक्षा अभ्यासून असं काहीसं नेणिवेत वाटलं असावं.. नाहीतर ती असे शीर्षक संग्रहाला देते ना! नीरजा यांनी या संग्रहाची पाठराखण करताना लिहिलेल्या ब्लर्बमध्ये बाहेर कर्कश आवाज उसळले असताना या कवितेचा आवाज आश्वासक आहे असं म्हटलं आहे. ते काहीसं खरंदेखील आहे. पण मला मात्र संग्रह वाचल्यावर जाणवलं की, या संग्रहात तो बाहेरचा गदारोळ अधिक स्पष्टतेने, सहजपणे आणि भेदकपणे कवयित्री दाखवते आहे. रोगाचे निदान दाखवणारा हा संग्रह आहे.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

हेही वाचा >>> श्रेष्ठतम कादंबरीची प्रतीक्षाच..

उपचार अपुरे आहेत हेही सुचवणारा हा संग्रह आहे. ‘आक्रमकतेचा अभिशाप सुटता सुटला नाही’ असं अचूक मांडणारी ही कविता सत्ता- संवादाच्या अनेक शक्यता दाखवत राहते. ‘जिथे आटूनच गेलाय, आस्थेचा समग्र जीवनप्रवाह..’ अशी आसपास स्थिती असताना कवयित्री पुन्हा पुन्हा उच्चारत राहते संवेदनशील मनाची होणारी घुसमट आणि तडफड. माणूस म्हणून आणि बाई म्हणून जगताना जे अनेक राग-लोभ वाटय़ाला येतात त्याचं चित्रण या संग्रहात आहेच. आणि त्याचं वेगळं वैशिष्टय़ म्हणजे ते चित्रण बाईच्या परिभाषेत नाही. ते रॅडिकल फेमिनिझम आणि फेमिनाईन लेखन याच्या मधली एक स्वत:ची, हक्काची वाट पकडत म्हणतं : ‘माहितीये मला अवघड आहे हुशार, सृजनशील आणि तरुण असणं- सांभाळून राहील, अंतर ठेवून वागलं कितीही- तरीही.’ आजीवरची कविता तर मुळातून पुन्हा पुन्हा वाचावी अशी. भाकरी थापणारी ती आजी, तिचे ते जगणे आणि नातीचे या काळातील जगणे यांची सांगड ती चुलीवर तव्यावर पडणारी भाकर आता सहज घालू शकत नाही! आणि तरी-  ‘भाकरीनंच जोडलंय तिचं-माझं नातं..’ असं कवयित्री म्हणते तेव्हा अनेक नव्या संवादाच्या पायवाटा दिसू लागतात. मुळात या सगळ्या कवितेला ओढ आहे ती-‘मनाची दुखरी सल उलगडून दाखवायला हवी असते एक जागा, परत येईल जिथे हक्काने काहीही न सांगता..’ अशा जागेची. ती जागा हरवत चालली आहे याचं भान या कवितेला आहे. मधेच तिला आशा जाणवत राहतेदेखील.

हेही वाचा >>> मानवी नातेसंबंधांची ‘सायड’

‘मी अक्षरांना म्हटलं, मला तुमच्याकडून काहीच नकोय, तर त्यांनी शब्द दिले आणि कविता उमलून आली..’ हेही कवयित्री सांगते. त्याचा आधारही वाटतो. पण क्षणिक! कारण उर्वरित कविता मूलत: दाखवत राहते तो सर्वत्र पसरलेला विसंवाद. प्रॅग्मॅटिक्समध्ये संवादाचा समतोल हा तपासला जातो. या संग्रहात अनेक जागा अशा आहेत, जिथे भाषाशास्त्र चकित होईल. उघडी खिडकी असली तरी बाहेरचं दिसत नाही, कान असले तरी आवाज येत नाही हे जाणून कवितेत शेवटी येतं- ‘सगळ्या भवतालातून मी वजा होत चाललेय बहुधा.’ हे संवेदन सध्याच्या काळात सार्वत्रिक आणि जागतिक म्हणावे असे आहे. अनेक प्रामाणिक माणसांचा तो हुंदका आहे. आणि भाषिकदृष्टय़ा त्यातील संवादाच्या adjacency pairs हरवल्या आहेत. चारुदत्त पांडे यांनी साकारलेल्या मुखपृष्ठामध्येही तोच भाव फार नेमका, गहिरा बनून समोर येतो. पुराची धोक्याची पातळी दाखवणारी खूणपाटी अनेकदा पुलावर असते. योगिनी सातारकर-पांडे यांचा हा नवा संग्रह म्हणजे संवादाचा संभाव्य दुष्काळ सांगणारी नेमक्या नसेवर बोट ठेवणारी दुखरी खूणपाटीच आहे!                                     

‘शब्द जायबंदी होण्याचे दिवस’- योगिनी सातारकर-पांडे, ग्रंथाली प्रकाशन,पाने- १२०, किंमत- १५० रुपये.