– स्वानंद बेदरकर
भाषा आणि संगीताच्या प्रेमापोटी नाशिकमधला तरुण पत्रकारितेतील दहा वर्षांची नोकरी सोडून प्रकाशन संस्था काढण्याच्या तयारीला लागला. पुण्या-मुंबईच्या ‘मोठ्या’ प्रकाशकांनी ‘या फंदात पडू नका’ असा सल्ला दिला. पण तरी स्वत:च्या कामावर विश्वास असल्याने ‘शब्दमल्हार’ ही प्रकाशनसंस्था उभी राहिली. दहा वर्षांत पाच राज्य पुरस्कारांसह उत्तम दर्जा आणि निर्मितीमूल्य असलेली पुस्तके देणार्‍या या प्रकाशनाची जडण-घडण…

शब्दांवरचे प्रेम आणि त्याच्या अर्थाबद्दलची आस्था शाळकरी वयात वाढली. पुुढे राज्यभरातील वक्तृत्व स्पर्धांनी माझ्यात भाषेची गोडी वाढविली. त्यामुळे एम.ए करू लागलो. घरातल्यांनी कधी कुठल्याही गोष्टीला नकार दिला नाही. माझे ‘मराठी’मध्ये रमणे त्यांना दिसत होते. मध्यमवर्गीय असूनही नोकरीसाठी लागेल ते शिकलेच पाहिजे असा धोशा त्यांनी कधीही धरला नाही. म्हणूनच मी आधाशासारखे सतत ऐकत-पाहत- बोलत राहिलो.
पुढे वयाच्या एका टप्प्यावर वाचनानेच मला नोकरी दिली. ती होती पत्रकारितेची. कै. वि. रा. जोग वाचक स्पर्धेत राज्यस्तरीय पहिले पारितोषिक प्राप्त झाले. याची बातमी विविध दैनिकांप्रमाणे नाशिकच्या दै. गांवकरीतदेखील आली. बातमी वाचून मालकांनी मला बोलावले आणि ‘आमच्याकडे नोकरी कराल का?’ विचारले. वर्तमानपत्राचा गंधही नसताना त्यांचे आमंत्रण आणि माझे ‘हो’ म्हणणे पुढच्या वाटचालीचा सकारात्मक संकेत म्हणून घडले आणि मी पत्रकार झालो. साहित्यिक-सांस्कृतिक बातम्यांची पत्रकारिता करू लागलो. मग अचानक एके दिवशी संपादकांनी रविवार पुरवणीचे काम हाती दिले. तेही सहकार्‍यांच्या मदतीने चांगले करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच कवी ग्रेसांपासून न्या. चंद्रशेखर धर्माधिकारीपर्यंत कोणत्याही क्षेत्राचे वावडे न मानता उत्तम ते छापण्याचा प्रयत्न केला. एका विशिष्ट टप्प्यानंतर मात्र त्या कामातही साचलेपणा जाणवू लागला. ‘पुढे काय?’ असा प्रश्न स्वत:लाच करत असताना दोन मार्ग समोर होते- एक म्हणजे मराठीचा प्राध्यापक व्हायचे, नाहीतर इतर मोठ्या दैनिकांचे आलेले आमंत्रण स्वीकारायचे. प्राध्यापक मला अजिबातच व्हायचे नव्हते; कारण प्राध्यापक झाल्यानंतर मिळणार्‍या गलेलठ्ठ पगारामध्ये सुखासीन झालेले आणि वाचन-लेखनापासून तुटलेले अनेकजण मी पाहत होतो. आहे ती नोकरी सोडून मोठ्या दैनिकात गेलो, तर पगाराच्या आकड्यात फरक पडेल; पण काम तेच करावे लागणार. तेही मला नको होते. त्यामुळेच आपण प्रकाशन संस्था काढायला हवी, हा विचार प्रबळ झाला आणि दहा वर्षांची चांगली पत्रकारिता एका राजीनाम्याने संपुष्टात आणली. मग पुण्या-मुंबईच्या ‘मोठ्या’ प्रकाशकांना भेटलो. तेव्हा त्यांनी ‘अजिबात या व्यवसायात येऊ नका. हे भिकेचे डोहाळे आहेत.’ असे सांगितले. नोकरी सोडून आणि लग्न करून बसलो होतो. त्यामुळे सगळ्यांच्याच थोड्या फार फरकाच्या या सारख्या वाक्याने छातीत धस्स झाले, पण माझ्या कामावर विश्वास ठेवणार्‍या आप्तांनी ‘हे तू कर. आम्ही तुझ्याबरोबर आहोत…’ असा आधार दिला आणि मग प्रकाशन संस्था काढायचे नक्की केले. शहरातल्या साहित्य क्षेत्रातल्या सगळ्याच श्रद्धेय मंडळींनी मला चांगला मुलगा वाया गेला आता, या अर्थाने ‘श्रद्धांजली’ अर्पण केली, पण भीष्मराज बाम सरांचे एक वाक्य अखंड मदतीला होते- ‘चार भिंतीत सुरक्षित वाटू लागले की, त्या भिंती तोडून बाहेर पडायचे असते.’ तसेच केले.

प्रकाशन संस्थेला ‘शब्दमल्हार’ हे नाव सुचले. त्या पाठीमागचे कारण जशी मला साहित्याची आवड आहे तशीच संगीताचीही. पहिले पुस्तक होते डोंबिवलीच्या ऋषिकेश वांगीकर यांचे. त्यांचा ‘कथास्तु’ हा लघुकथासंग्रह प्रसिद्ध केला आणि नंतर ओळखीच्या स्थानिक लेखकांची पुस्तके प्रसिद्ध केली. त्यात जवळपास वर्ष गेले. नाव असलेल्या लेखकांची पुस्तके हाती नसल्याने वितरकांचा प्रतिसाद शून्य होता. यादरम्यान काही वेगळ्या घाटाच्या सांगीतिक मैफली केल्या. पुस्तक प्रकाशनासाठी नामवंत मंडळी बोलविण्याचा आग्रह धरला. त्यामुळे ‘शब्दमल्हार’ हे नाव शहरात पोचण्यास मदत झाली; मात्र ज्याला ‘सूर सापडणे’ म्हणतात ते काही घडत नव्हते. मनातली धाकधूक वाढत होती आणि याच काळात महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी असणारा पुरस्कार ‘कथास्तु’ या संग्रहाला जाहीर झाला आणि आपण चांगले काम करू शकतो, या सकारात्मकतेने मनाला भरते आले.

मोठ्या लेखकांना सांगायला या राज्य पुरस्काराचे निमित्त मिळाले. साहित्य तर दमदार हवेच; पण त्याव्यतिरिक्त पुस्तकाची निर्मिती म्हणूनही ते उत्तमच असायला हवे, हे याच काळात समजले. दरम्यान तमिळ लेखक पेरूमल मुरुगन यांचे ‘वन पार्ट वूमन’(मूळचे ‘अधरोभागन’) हे पुस्तक गाजत होते. ‘माझ्यातल्या लेखकाचा मृत्यू झाला आहे…’ या लेखकाच्या विधानाने साहित्यविश्वात खळबळ माजवली होती. याच पुस्तकाच्या इंग्रजी प्रकाशनाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. बंदी असलेले हे मूळ पुस्तक न्यायप्रकरणातून मोकळे झाले. हे सगळे वर्तमानपत्रात वाचून आपण हे पुस्तक अनुवादासाठी घ्यायचे असे ठरवले; मात्र ते घ्यायचे कसे हेही माहीत नसल्याने डॉ. सतीश श्रीवास्तव यांच्या मदतीने ‘पेंग्विन’शी पत्रव्यवहार करून त्या पुस्तकाचे अधिकार ‘शब्दमल्हार’ला प्राप्त झाले. अनुवादक कोण, असा प्रश्न होता तेव्हा नुकताच परिचय झालेला प्रणव सखदेव हा नव्या दमाचा लेखक डोळ्यापुढे आला. त्यानेही अनुवादाला होकार दिला. त्या पुस्तकाने ‘शब्दमल्हार’ला नाशिकच्या बाहेर ओळख मिळवून दिली. महत्त्वाचे म्हणजे ती ओळख जशी वाचकांमध्ये होती तशी विक्रेत्यांच्या टेबलवरही मिळाली. पुण्या-मुंबईबाहेरचा प्रकाशन संस्था चालवणारा हा मुलगा वेगळे देण्याचा प्रयत्न करतो आहे, हे लक्षात आणून द्यायला हे पुस्तक कारणीभूत ठरले. पुस्तकाची विक्री वाढू लागली. मग लक्षात आले की आपण अशा वेगळ्या प्रयोगांवर भर दिला पाहिजे. त्यातूनच ‘गीतरामायणा’च्या इंग्रजी आवृत्तीचा प्रकल्प हाती घेतला. त्यालाही ऑनलाइन विक्रीवर चांगला प्रतिसाद मिळाला. हे सगळे सुरू असताना दिवाळी अंक नावाची पारंपरिक गोष्ट संपादक म्हणून मनाला खुणावत होती. सहकार्‍यांच्या मदतीने ‘शब्दमल्हार’ याच नावाने दिवाळी अंक सुरू झाला. पहिल्या पाच वर्षांतच २२ पारितोषिके अंकाला मिळाली. त्याचे सारे श्रेय या अंकात लिहिणार्‍या लेखकांचेच. छायाचित्रकार मिलिंद ढेरे, चित्रकार पंकज बावडेकर, डॉ. शेफाली भुजबळ यांची अंकाला लाभलेली मुखपृष्ठे वाचकांच्या मोहाचा विषय ठरली. मी फक्त प्रायोगिक तत्त्वावर विषय सुचवत गेलो. यात माझ्यासाठी मी ठेवलेला एक विषय म्हणजे मुलाखत. प्रत्येक अंकात दोन मुलाखती. एक साहित्यिकाची आणि एक संगीतातील व्यक्तित्वाची. साहित्यातही ज्यांना ज्ञानपीठ वा सरस्वती सन्मान प्राप्त आहे असेच लेखक आणि संगीतात ज्यांना पद्मभूषण, विभूषण अशा सन्मानाने गौरविले गेले आहेत अशा व्यक्तींच्या मुलाखती घेण्याचे ठरवले. मग त्यानिमित्ताने भारतभर फिरण्याचा योग आला. डॉ. एस. एल. भैरप्पा, शंख घोष, महाबळेश्वर सैल, पद्मा सचदेव, गोविंद मिश्र, रघुवीर चौधरी, भालचंद्र नेमाडे, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे, बिरजू महाराज, पार्वती बाउल, सुरेशदादा तळवलकर, बी. जयश्री या अशा काही महनीयांच्या दीर्घ मुलाखती हा एकूणच अंकाचा ठेवा ठरला. या प्रयोगामुळे भारतभर प्रकाशन व्यवसायात काय चालले आहे, याचा अंदाज येत गेला.

मासिक सुरू करावे हा विचार पाठीशी लागला आणि ते सुरूही केले. सलग तीन वर्ष मासिक सुरू होते. वाचक वर्ग मर्यादित असला तरी उत्तम काम करता आले. पण करोनामुळे हे मासिक बंद करावे लागले. मासिकामुळे ‘शब्दमल्हार’च्या वाङ्मयीन संस्कृतीच्या चलनवलनाला हातभार लागला होता. नाशिकमधून ‘अमृत’ नंतर असा एक महत्त्वाचा प्रयोग ‘शब्दमल्हार’ करू शकले होते.

मग भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त एक प्रकल्प हाती घेतला. ज्यांचा भारतीय वाटचालीवर स्वतंत्र ठसा आहे, अशा आज आपल्यात नसलेल्यांना आजच्या त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी पत्र लिहायचे. काळाचे परिमाण साधत पत्र हा वाङ्मयप्रकार हाताळायचा त्याचाच एक ग्रंथ झाला. त्याचे नाव ‘शब्द कल्पिताचे’. पन्नास पत्रांच्या या ग्रंथात महाकवी कालिदास ते नामदेव ढसाळ असा एक मोठा पट मांडता आला. राजकारण सोडून इतर सर्व क्षेत्रातील व्यक्तींना प्रातिनिधिक रूपात सामावण्याचा प्रयत्न केला. पन्नास पत्र प्राप्त झाली. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी या संकल्पनेला ग्रंथरूपात आणताना त्याचे सोने केले. पंधराशे रुपये किमतीचा हा ग्रंथ अतिशय उत्तम पद्धतीने विकला जातोय. या ग्रंथाने संपादक, प्रकाशक म्हणून मला एक आत्मविश्वास दिला की, तुम्ही उत्तमाचा ध्यास घेऊन जर वाचक अभ्यासकांच्या ओंजळीत काही देण्याचा प्रयत्न केला, तर तिथे किंमत हा विषय अजिबात आड येत नाही. पुस्तक व्यवसाय संपुष्टात आला आहे, मराठीचे आता काही खरे नाही, नव्या मुलांनी या व्यवसायात येऊ नये हे सारे खोटे असल्याचा प्रत्यक्ष अनुभव मला या ग्रंथाने दिला. एक मात्र खरे आहे की प्रकाशक, संपादक म्हणून एका खुर्चीत बसून आता तुम्हाला चालणार नाही. लेखक आपल्याकडे चांगले काही आणून देईल, या भरवशावर न राहता सतत नव्या कल्पना प्रत्यक्षात आणून उत्तम लिहिणार्‍यांना लिहिते करावे लागेल.

दरम्यानच्या काळात रुळानुबंध (रेल्वे या विषयावरील ललितगद्य), नात्यांचे स्व्हिहसिंग (बँकिंग विषयावरील कथा), शून्य (शून्य या विषयावरील तत्त्वचिंतन), कलंदर बिलंदर (व्यक्तिचित्रणसंग्रह) या पुस्तकांना राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार प्राप्त झाला. मुक्त विद्यापीठाचे दोन वेळा विशाखा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तीन आणि प्रकाशक संघाचे सहा पुरस्कार विविध पुस्तकांना मिळाले. दहा वर्षांत पाच राज्य पुरस्कार, नात्यांचे स्व्हिहसिंग या कथासंग्रहाच्या २१ आवृत्त्या, रुळानुबंधच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आणखीही काही पुस्तके दुसर्‍या-तिसर्‍या आवृत्तीसाठी सज्ज आहेत. या सगळ्याचा विचार करता संपादकाला जर दृष्टी ठेवून काम करता आले, तर ते पुण्या-मुंबईबाहेरही होऊ निश्चित शकते. आरोग्याचे अर्थशास्त्र (डॉ. सतीश श्रीवास्तव). लोकसंचिताचे देणे (डॉ. तारा भवाळकर), ढाबळ (अरविंद ओढेकर), आरभाट नोंदींचे प्रकरण (रवींद्र लाखे), बळीवंत आम्ही (राजशेखर शिंदे), जाणोनी अर्थाची गुपिते (सुजाता नागपुरे), अज्ञातवास -३ काव्यखंड ( सी. एल. कुलकर्णी), जाट-मराठा : मैत्री आणि संघर्ष
(नीलकंठ रंगी), बळीवंत (श्रीकांत देशमुख), अविस्मरणीय (अविराज तायडे), तरल तलम तरीही तीक्ष्ण (अनंत येवलेकर), आणीबाणीचे ते दिवस (भास्कर ब्रह्मनाथकर), नव्या पर्वाच्या प्रतीक्षेत (असावरी काकडे) ही ‘शब्दमल्हार’ची काही महत्त्वाची पुस्तके.

दिवाळी अंकासाठी गानसरस्वती किशोरीताईंची मुलाखत घ्यायला गेलो तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न विचारला,

ताई : तुझ्या संस्थेचे नाव काय?
मी : शब्दमल्हार
ताई : म्हणजे काय ?
मी : शब्द म्हणजे ‘साहित्य’ आणि मल्हार हा पावसाशी संबंधित ‘राग’. म्हणजे साहित्य आणि संगीत यात काम करणारी संस्था किंवा मल्हारासारखे येणारे शब्द म्हणून ‘शब्दमल्हार’
ताई : चूक
मी : अरे बापरे मग…?
ताई : शब्दांमुळे लेखकाच्या मनावर साचणारा मल (अहंकार) घालवणारी ती म्हणजे ‘शब्दमल्हार’ असे सांगत जा यापुढे…
मी : हो ताई

आपल्या प्रकाशन संस्थेचे एक शीर्षक गीत असावे हा विचार मनात आला. तसे ते गीत मीच लिहून काढले. ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी ते गायले असून पं. रोणू मुजुमदार(बासरी), पं. नितीन वारे (तबला) यांची साथसंगत त्याला आहे. नाशिकच्या ज्ञानेश्वर कासार यांनीच त्याला संगीत दिले. प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमात हे गीत ऐकवले जाते. त्यातून एक वातावरणनिर्मिती तर होतेच; पण आपली प्रकाशन संस्था लोकांच्या मनावर सतत बिंबत राहावी यासाठी होणारी मदत महत्त्वाची आहे.

आत्तापर्यंत ‘शब्दमल्हार’च्यावतीने मंजूषा पाटील, डॉ. मिलिंद मालशे, पं. कैवल्यकुमार गुरव, गंधार देशपांडे, रागेश्री वैरागकर यांच्या मैफली झाल्या असून आमच्या सहकार्याने केलेल्या दक्षिणगंगा संगीत महोत्सवात पं. वेंकटेशकुमार, विदुषी श्रुती सडोलीकर यांचे गायन झाले आहे. या मैफलींमध्ये झालेली पुस्तक विक्री हाही ‘शब्दमल्हार’ प्रकाशनाच्या वाटचालीतला महत्त्वाचा मुद्दा आहे.

swanand.bedarkar@gmail.com