‘शोले’ हा नियतीने घडवलेला सिनेमा आहे असं मला नेहमी वाटतं. चांगले सिनेमे प्रत्येक काळात तयार होत असतात. पण ‘शोले’सारखा एखादाच सिनेमा असतो, ज्याची पुनरावृत्ती कठीण असते. म्हणजे ‘शोले’नंतर खुद्द रमेश सिप्पींनाही असा सिनेमा बनवता आलेला नाही. त्या अर्थाने असे सिनेमे हे नियतीनेच घडवलेले असतात असे मला वाटते. ‘शोले’चा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. एकतर लहानपणी पाहिलेला हा सिनेमा. त्यामुळे लहानपणापासून आत्तापर्यंत या सिनेमाच्या आठवणी माझ्या मनात घर करून आहेत.
‘शोले’ची लोकप्रियता इतकी मोठी होती ना.. म्हणजे त्याकाळी या सिनेमाच्या नुसत्या ऑडिओ एलपीज् निघाल्या होत्या आणि त्यावरही लोकांच्या वेडय़ासारख्या उडय़ा पडल्या होत्या. या चित्रपटाच्या अनेक लहान-मोठय़ा गोष्टी, किस्से मला तपशिलांसकट लक्षात आहेत. पण तेव्हा मला त्या ‘गब्बर’ची- अमजद खानची खूप भीती वाटायची. ‘शोले’त त्याची थरारक भूमिका होती. खरोखरच खलनायक म्हणून त्याचा दरारा होता- इतकं चांगलं काम केलं होतं अमजद खाननं. तीच गोष्ट धर्मेद्रची. या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम अन् फ्रेम लक्षात राहण्यासारखीच आहे. म्हणजे धर्मेद्र त्या उंच पाण्याच्या टाकीवर चढतो आणि दारूच्या नशेत ‘मैं सुसाई..ट कर रहाँ हूँ..’ असं सांगतो. त्यावर खालून कोणीतरी ‘ये सुसाट क्या होता है भाई?’ असा प्रश्न विचारतो. सिनेमातले असे विनोदी संवाद, शब्दांशी केलेला खेळ आणि त्याला तेवढय़ाच सहजतेने पडद्यावर रंगवणारे कलाकार या चित्रपटात होते. मॅकमोहन आणि विजू खोटे यांच्या किती छोटय़ा भूमिका होत्या सिनेमात! पण त्यांचेही संवाद लक्षात राहतात. धर्मेद्र-हेमामालिनीच्या विनोदी व्यक्तिरेखा आणि त्यांची हलकीफुलकी प्रेमकथा, तर अमिताभ बच्चन- जया बच्चन यांची तेवढीच गंभीर प्रेमकथाही मनाला चटका लावून जाते. एकंदरीतच सिनेमाच्या सगळ्या घटकांचा विचार केला तर अगदी जमून आलेला असा सिनेमा आहे हा.
अकिरा कुरोसावा यांच्या ‘सेव्हन सॅमुराई’ या चित्रपटाचा ‘शोले’इतका चांगला देशी अवतार कोणीच करू शकलं नसतं. मुळात सिनेमाची कथा काल्पनिक असली तरी त्याची मांडणी करताना दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ती खरी वाटेल अशी.. वास्तवाच्या जवळ नेणारी केली होती. त्यामुळे लोकांना हा सिनेमा आपला वाटला. त्यातील अनेक घटना, प्रसंग आपल्या मनाला खरोखरचा चटका लावून जातात. निरागस अहमदला (सचिन पिळगावकर) डाकू मारून टाकतात आणि गावाला दहशत बसावी म्हणून त्याला गावात आणून टाकलं जातं ते दृश्य, ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई’ असं विचारणारे इमामचाचा (ए. के. हंगल).. असे कितीतरी प्रसंग आठवतात. या चित्रपटात छोटय़ातली छोटी भूमिका करणारे कलाकारही तितकेच लक्षात राहतात. मग ते सुरमा भोपाली साकारणारे जगदीप असतील, ठाकूरचा नोकर रामलाल म्हणजे सत्येन कप्पू, केश्टो मुखर्जीनी साकारलेला हरीराम न्हावी, ‘अंग्रेज के जमाने के जेलर’ असरानी, लीला मिश्रांची मौसी, मॅकमोहनचा सांभा आणि विजू खोटेंचा कालिया या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्याला वास्तवातल्या आणि म्हणूनच जवळच्या वाटतात. मी इतक्या वेळा ‘शोले’ पाहिला आहे की तो अगदी संवादांसह मला पाठ आहे.
मला आठवतं- मी जेव्हा पहिल्यांदा विजू खोटेंना भेटलो होतो तेव्हा ‘शोले’तला त्यांचा कालिया आठवून इतके भरभरून बोललो होतो. पाऊण तास आम्ही ‘शोले’वर बोललो होतो. लहानपणापासून इतक्या वर्षांचं प्रेम साचून राहिलं होतं, की सगळं त्यावेळी भडाभडा बोलून मोकळा झालो. त्यानंतर मी विजू खोटेंबरोबर अनेकदा काम केलं आहे. पण ते भेटले की ही पहिल्या भेटीची हटकून आठवण येते. खरोखरच विलक्षण असा हा सिनेमा आहे. पण ‘शोले’इतका प्रभावी सिनेमा बनलाच नाही किंवा पुन्हा बनणार नाही, असं विधान करणं योग्य नाही. कसं आहे ना, झाडाला पान येतं, ते हिरवं होतं, मग पिवळं होतं आणि पिकून गळून पडतं. पण पान गळून गेलं म्हणून सगळं संपत नाही. सृष्टीचं चक्र सुरूच राहतं. पुन्हा हिरवं पान येतंच. सिनेमाच्या बाबतीतही असंच आहे असं मी म्हणेन.
‘बाहुबली’चंच उदाहरण घ्या ना! गेली दोन र्वष दिग्दर्शक राजामौली आणि त्यांच्या टीमने प्रचंड मेहनत घेऊन हा भव्यदिव्य चित्रपट केला. आज लोकांनी या सिनेमाला तितकाच भव्य प्रतिसाद दिला आहे. विक्रमावर विक्रम मोडत चालला आहे हा सिनेमा. तुम्ही निष्ठेने, पुरेसा वेळ घेऊन, चित्रपटाची गरज असलेले आर्थिक गणित साधून आणि कलाकारांबरोबर मेहनत घेऊन सिनेमा केलात तर नक्कीच त्याला यश मिळतं. एक चांगला सिनेमा म्हणून त्याची नोंद होतेच. पण इथेच मला ‘नियतीने घडवलेला सिनेमा’ ही संकल्पना मांडावीशी वाटते. म्हणजे ‘शोले’चीच पुनरावृत्ती करेल या अपेक्षेने ‘शान’ चित्रपटाची निर्मिती केली गेली. ‘शोले’पेक्षा जास्त आर्थिक ताकद आणि त्याच्यापेक्षा जास्त भव्य चित्रपट करायचा प्रयत्न केला गेला. पण त्याचं काय झालं, हे आपण पाहिलं. ज्या दिग्दर्शक रमेश सिप्पींनी ‘शोले’ बनवला आणि नवा इतिहास घडवला, त्यांना त्यानंतर इतक्या वर्षांत ‘शोले’सारखा एकही चांगला चित्रपट बनवता आलेला नाही. आपलेच मापदंड कधी कधी मोडता येत नाहीत म्हणतात ना, तसंच त्यांचं झालं आहे. म्हणूनच ‘शोले’ हा नियतीनेच घडवलेला सिनेमा आहे असं मी म्हणतो.