scorecardresearch

‘अरे भाई निकल के आ घर से..’

१९५६ मध्ये ‘नई दिल्ली’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात बडय़ा शहरात राहायला जागा मिळवण्यासाठी आपली मूळ ओळख लपवून राहावं लागणाऱ्या नायकाच्या भूमिकेत किशोरकुमार होते.

श्रद्धा कुंभोजकर
१९५६ मध्ये ‘नई दिल्ली’ नावाचा चित्रपट आला होता. त्यात बडय़ा शहरात राहायला जागा मिळवण्यासाठी आपली मूळ ओळख लपवून राहावं लागणाऱ्या नायकाच्या भूमिकेत किशोरकुमार होते. जात, भाषा, प्रदेशाची कुंपणं तोडून सर्वानी मोकळेपणानं एकमेकांत मिसळावं आणि जगात होणाऱ्या बदलांना सामोरं जावं असा संदेश देणारं या चित्रपटातलं ‘अरे भाई निकल के आ घर से’ हे  गाणं आजही लोकप्रिय आहे.

‘दुनिया बदल गयी प्यारे,

आगे निकल गई प्यारे,

अंधे कुँए में चुपके क्यूँ,

बैठा हुआ है मत मारे?

पानी को, तेल को छोडा,

बिजली की रेल को छोडा,

कल चाँद और तारों पें पहुँचेगा एटमी घोडा’

भारताला स्वातंत्र्य मिळून तेव्हा जेमतेम एक दशक झालेलं होतं. मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीनं नर्मविनोदी पद्धतीनं का होईना, भारतीय राष्ट्रवादामधल्या विसंगतींवर बोट ठेवलं होतं.  वैश्विक बदलांना सामोरं जायचं तर कुंपणाबाहेर पडायला हवं याची टोचणी जनतेच्या मनाला लावली होती. आणि तरीही जनतेनं देशद्रोहाचे हेत्वारोप न करता ती टोचणी हसतखेळत स्वीकारली होती.

आज भारत हे सार्वभौम राष्ट्र पंच्याहत्तराव्या वर्षांत पाऊल टाकतंय. कोविडमुळे कधी नव्हे इतक्या प्रमाणात भारतीयांचं भवितव्य जगाशी जोडलं गेलं आहे. अशावेळी राष्ट्रवादाची कालसुसंगतता आणि मर्यादा तपासून पाहणं गरजेचं आहे असं वाटतं.

जन्मभूमीबद्दल प्रेम, देशभक्ती या भावना मानवी समाजानं अगदी प्राचीनतम काळापासून जोपासलेल्या दिसतात. भारतापुरतं पाहायचं झालं तरी पावणेदोनशे वर्षांपूर्वीच्या ‘मेरी झाँसी नहीं दूँगी’पासून ते साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या वेदांच्या संहितांपर्यंत अनेक ठिकाणी आपल्याला जन्मभूमीबद्दल आपुलकीचे दाखले सापडतात. मात्र, देशप्रेम ही भावना आणि ‘राष्ट्रवाद’ ही सत्ताविषयक संकल्पना या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे बऱ्याचदा लक्षात घेतलं जात नाही. ‘राष्ट्रवाद’ या राजकीय संकल्पनेमध्ये असं अभिप्रेत असतं की, माणसाच्या व्यक्ती म्हणून असणाऱ्या ज्या ज्या निष्ठा असतील, त्यांमध्ये सर्वोच्च स्थान हे राष्ट्राप्रति असणाऱ्या निष्ठेला असायला हवं. अर्थातच लिंगभाव, जात, गाव, धर्म अशा इतर अनेक ओळखींना राष्ट्राच्या नागरिकानं कमी महत्त्व द्यावं, आणि प्रसंग आलाच तर राष्ट्रासाठी या इतर निष्ठांना त्यांनी सोडचिठ्ठी द्यावी असंही ‘राष्ट्रवाद’ या संकल्पनेमध्ये अभिप्रेत असतं. आणि या सर्वोच्च निष्ठेच्या समर्पणामुळे त्या, त्या समुदायाला ‘आपल्या राष्ट्रासाठी’ केलेल्या कोणत्याही बऱ्यावाईट गोष्टीचं समर्थन करावंसं वाटतं.

ज्या काळात ‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना राजकीय तत्त्वप्रणाली म्हणून बहरली, त्या एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांमध्ये माणसांचं जग बरंच मर्यादित होतं. त्यांच्या भोवतालातील संस्कृतीनुरूप कुठे भाषा, कुठे लिंगभाव, कुठे धर्म-पंथ अशा ओळखींवर माणसं एकमेकांना धरून राहत होती.. संघर्षही करत होती. अशावेळी ‘राष्ट्र’ हे भौगोलिकदृष्टय़ा विशाल असं प्रारूप समोर उभं ठाकलं आणि हे काहीतरी उत्तम, उदात्त, उन्नत आहे अशा भावनेनं अनेक समुदाय भारावून गेले. राष्ट्र हे जणू काही सर्वात मोठं, महन्मंगल असं चिरस्थायी निष्ठा ठेवण्यायोग्य दैवत असल्याची मांडणी अनेक प्रखर राष्ट्रवादी माणसं करू लागली. भारत असो वा जर्मनी वा इटली- सर्वत्र प्रादेशिक ओळखींना ओलांडून माणसं ‘राष्ट्र’ म्हणून एकत्र येऊ लागली. त्यातच साम्राज्यवादी सत्तांना उलथून टाकण्यासाठी या एकत्र आलेल्या माणसांच्या चळवळी उभ्या केल्या गेल्या. साम्राज्यवादाला विरोध आणि राष्ट्रवादाची राजकीय परिपूर्ती म्हणून एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात अक्षरश: शेकडो राष्ट्रं पृथ्वीच्या पाठीवर निर्माण झाली. इतकंच नव्हे तर ज्या समाजांनी या व्यवस्थेनुसार आपल्या रचना बदलायला नकार दिला, त्यांची ‘मागास जमाती’, ‘टोळ्यावाले’ म्हणून संभावना केली गेली, किंवा त्यांच्या संमतीविना त्यांना कोणत्या तरी राष्ट्रामध्ये कोंबण्यात आलं. त्यांना पृथ्वीवरच्या मानवी समुदायाचे नागरिक म्हणून आपलं म्हणणं मांडण्याचे अवकाश जवळपास नाहीसेच केले गेले. आणि हे सगळं नैतिकदृष्टय़ा योग्यच आहे असं भासवणारी तत्त्वज्ञानंही उभी केली गेली.

दुसरीकडे माणूस म्हणून आपण राष्ट्रापेक्षाही एका आणखी मोठय़ा समुदायाचा भाग आहोत, ही जाणीवही काही ठिकाणी जागती राहिलेली दिसते. यातूनच मानवी अधिकारांची संकल्पना उदयाला आली. कोणत्याही राष्ट्राचे, समुदायाचे नागरिक असणाऱ्या आणि नसणाऱ्याही माणसांना केवळ माणूस म्हणून काही अधिकार आहेत आणि त्यांची जपणूक करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे, हा विचार या संकल्पनेच्या मुळाशी होता. मानवी अधिकार आयोगासारखी प्रारूपं सार्वभौम राष्ट्रांमधील सत्तांना जाचक वाटणारी असली तरीही ती निदान तात्त्विक पातळीवर तरी मानवतेच्या मूलभूत प्रतिष्ठेच्या तत्त्वांचा आग्रह धरत राहिलेली दिसतात. आणि काही प्रमाणात राष्ट्रराज्यांच्या हिंसक कारवायांना पायबंद घालण्यात ती यशस्वीही झालेली दिसतात.

मानवता आणि राष्ट्रीयत्व या दोन अक्षांसोबतच पर्यावरणाचा तिसरा अक्षदेखील आज कळीची भूमिका निभावताना दिसतो आहे. एका राष्ट्राचे नागरिक म्हणून आपले काही हक्क आणि कर्तव्यं आहेत, तसंच माणूस म्हणूनही आपल्याला अधिकार आणि कर्तव्यं आहेत. यांच्या सोबतीनं गेल्या काही दशकांमध्ये या विचारानं जोर धरला आहे की, पृथ्वी हा ग्रह एकटय़ा माणसाच्या मालकीचा नाही. इतर अनेक प्राणी, वनस्पती आणि एकूणच जीवसृष्टीचेही या ग्रहावर काही अधिकार आहेत. इतकंच नव्हे तर अजून न जन्मलेल्या पिढय़ांचाही नैतिक हक्क या ग्रहावर आहे. त्यामुळे ही जबाबदारी ओळखून शाश्वत जीवनसरणी अंगीकारली पाहिजे याची जाणीव करून देणारा पर्यावरणवादी विचारांचा तिसरा अक्षही महत्त्वपूर्ण ठरतो.

प्रत्यक्ष आपल्या सभोवताली पाहिलं तर मात्र या तीनही आघाडय़ांवर आपली सद्य:स्थितीतली कामगिरी चिंताजनकच वाटते. राष्ट्रवादाचं एक व्यक्तिकेंद्री आणि आश्रयदातृत्वाला मान्यता देणारं प्रारूप आपल्या गळी उतरवण्याचे प्रयत्न चालू आहेत. सर्व प्रश्नांची सोडवणूक करणं आणि त्यासाठीचे प्रयत्न करणं हे एखाद्या नेतृत्वाच्या महान कामगिरीवर अवलंबून असल्याचा भास निर्माण केला जातो आहे. मग ते राजकीय प्रश्नांच्या बाबतीत असो, किंवा आर्थिक वा  सांस्कृतिक! लोकशाही व्यवस्थेमध्ये असणारं लोकसहभागाचं तत्त्व बाजूला पडून ‘अंधेरे में एक प्रकाश..’ असं नेतृत्वच योग्य मानलं जाऊ लागलं आहे. यामुळे सत्तेचं केंद्रीकरण तर होतंच आहे, पण व्यक्तींना समाजाप्रति बांधिलकी न वाटता नेत्यांच्या प्रति शरणागत निष्ठा ठेवण्याची सवय पडत चालली आहे.

मानवी अधिकारांच्या बाबतीत पाहायचं तर  इतर राष्ट्रराज्यांसारखंच तोंडदेखल्या आदराचं धोरण आपणही अवलंबलेलं दिसतं. प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर मात्र अनेक प्रकाराने शासकीय यंत्रणेकडूनही मानवी अधिकारांचं उल्लंघन राजरोसपणे होत राहतं, यावर नुकतीच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनीही चिंता व्यक्त केलेली आहे. ईशान्येकडील राज्यांत, तसंच मध्य भारतातील आदिवासीबहुल प्रदेशांमध्ये शासन यंत्रणेच्या प्राथमिक सुविधा पोहोचण्याची वाट आजही तिथले भारतीय नागरिक पाहत आहेत. त्यामुळे राष्ट्रराज्याचं प्रारूप आणि लोकशाहीची पद्धत स्वीकारूनही सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीच्या वाटा मोकळ्या झाल्यात असं दिसत नाही. तरीही भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीच्या विविध यंत्रणांच्या साहाय्यानं साक्षरता, अन्नाची स्वयंपूर्णता, वीजजोडणी, कायदा व सुव्यवस्था अशा अनेक बाबतींत आपल्या राष्ट्रराज्यानं मोठा पल्ला गाठला आहे हे स्पष्ट आहे. त्याचे अनेकविध कवडसे कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात पडलेले दिसतात. भारतीय नाटय़-चित्रपटसृष्टी, संगीत, साहित्य, खेळ यांना जागतिक पातळीवर मानाचं स्थान प्राप्त झालेलं दिसतं.

पर्यावरणाच्या बाबतीत मात्र सर्व विकसनशील देशांसारखंच आपण शाश्वत विकासाच्या वाटेकडे अडखळत पावलं टाकतो आहोत असं म्हणावं लागतं. अनेकविध आर्थिक अडचणी आणि अभावांमुळे तुमच्या-माझ्या हातून होणारा  पर्यावरणाचा ऱ्हास तर मोठा आहेच; पण बलाढय़ भांडवलदार आणि सत्ताधाऱ्यांच्या हातमिळवणीमुळे होणाऱ्या प्रदूषण आणि विनाशाची पातळी ही वेगळीच आहे. इथेही राष्ट्रीय हरित लवादासारखे काही आशेचे किरण दिसतात. पण समुदाय म्हणून आजही पर्यावरणीय गुन्हेगारांना ‘हाऊ डेअर यू?’ असा प्रश्न विचारणारी ग्रेटा थनबर्ग आपल्या राष्ट्रवादाच्या दृष्टीनं थोर ठरत नाही.

मग गेल्या पंच्याहत्तर वर्षांचा ‘जमाखर्च स्वातंत्र्याचा’ मांडायचा झाला तर काय दिसेल? तर इथे ‘शतपथब्राह्मणा’तली मनुमत्स्यकथा समर्पक ठरेल असं वाटतं.

मनू नावाचा ऋषी सकाळी नदीमध्ये अघ्र्य देत असताना त्याच्या हातात एक छोटासा मासा आला. ‘मला तू सोबत घेऊन चल आणि माझं रक्षण कर, म्हणजे मी पुढे तुझं रक्षण करेन,’ असं तो मनूला म्हणाला. मनूनं विचारलं, ‘हे कसं शक्य आहे?’ त्यावर मासा म्हणाला, ‘तू मला आता कमंडलूमध्ये घेऊन चल. आम्ही लहान असल्यामुळे आमच्या जिवाला या नदीत इतर माशांपासून धोका असतो. मी जरा मोठा झालो की मला एखाद्या कुंडात सोड. आणखी मोठा झालो की मग मला कुणी गिळंकृत करू शकणार नाही. मग मला तू समुद्रात सोड. नंतर एक मोठा पूर येणार आहे. तेव्हा तू नावेत बस, मी तुला वाचवेन.’ खरोखर त्या माशाने सांगितल्याप्रमाणेच गोष्टी घडत गेल्या आणि प्रलय आला तेव्हा नावेत बसलेल्या मनूला त्या माशानं सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं.

तर राष्ट्रवादाची व्याप्ती आणि मर्यादा ओळखून त्याच्या पलीकडे जाऊन मानवी प्रतिष्ठेमुळे आणि वैश्विक जीवसृष्टीचे जबाबदार नागरिक म्हणून मिळालेले अधिकार आणि कर्तव्यं आपण पार पाडली तरच आपण सुरक्षित राहू असं वाटतं.

मानवाधिकार आणि राष्ट्रवाद यांच्यातला प्रखर संघर्ष हे आज जगभरातले वर्तमान आहे. परंतु ते माणसांपुरते मर्यादित आहे. तथापि ही पृथ्वी केवळ माणसांचीच नाहीए, तर अन्य जीवसृष्टी, निसर्ग यांचीही आहे याचे आपले भान हरपले आहे. त्याचे भीषण फटके वेगवेगळ्या दुर्घटनांद्वारे आपण सध्या अनुभवतो आहोत. तेव्हा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत याचेदेखील भान आपल्या ऱ्हस्व दृष्टीला येणार की नाही, हाही तेवढाच गहन प्रश्न आहे.

shraddhakumbhojkar@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shraddha kumbhojkar article new delhi kishor kumar ssh

ताज्या बातम्या