राजू देसले
रेषा ही केवळ चित्राची सीमा नसते. ती एक अनुभव असते, एक स्पंदन असते, अस्वस्थ करणारी वेदना असते, तशीच अनामिक आनंदाकडे घेऊन जाणारी वाट असते. काही रेषा डोळ्यांना दिसतात; काही मनाला जाणवतात. श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांकडे पाहताना अशीच एखादी अंतर्मुख करणारी रेषा आपल्याला भेटते. ती कागदावर असते, पण तिचा प्रवास मनाच्या आतपर्यंत पोहोचतो. नगरमधून चित्र आणि रेषांची साधना करणार्या श्रीधर अंभोरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयी…
श्रीधर अंभोरे यांच्या रेषेचा जन्म कलाशाळेत झाला नाही. तिची पहिली शाळा होती मातीची भिंत. घर मातीचे. हातात कुंचला नव्हता. रंग नव्हते, पण भिंती होत्या आणि मनात चित्रलहरी. कोळशाने त्या भिंतीवर आकृत्या उमटू लागल्या. नकळत नवे विश्व आकार घेऊ लागले. त्या बालपणीच्या विश्वात बाभूळ हा त्यांचा पहिला गुरू होता. बाभळीच्या काटेरी, वाकड्या-तिकड्या, तरीही विलक्षण देखण्या आकारांनी श्रीधर यांच्या रेषेला दिशा दिली. पुढे त्या बाभळीचे रूपांतर मानवी प्रतिकृतींमध्ये झाले आणि त्या प्रतिकृतींमध्ये आकारासह आवेग आला, नाद आला, लय आली.
त्यांची रेषा सरळ अर्थ सांगत नाही. ती अर्थाभोवती फिरते. ती आकृती निर्माण करते, आकृती मोडते; ओळखीचा चेहरा दाखवते, त्याचबरोबर त्याला केवळ संकेतामध्ये रूपांतरित करते. श्रीधर यांच्या मते, कोणतीही रेषा ही संदिग्ध अनुभूती देणारी असते आणि त्या संदिग्धतेतूनच माणूस अंतर्मुख होतो. म्हणून त्यांच्या चित्रातील रेषा ‘पूर्णविराम’ देत नाही; ती प्रश्नचिन्ह ठेवते. पाहणार्याला थांबवते, विचार करायला लावते आणि स्वत:च्या अनुभवातून चित्राचा अर्थ शोधायला भाग पाडते. हीच त्यांच्या चित्रभाषेची ताकद.
बुद्ध, दगड, झाडे, पानं, पक्षी, स्त्री, माणूस, रान, नदी, डोंगर-निसर्ग आणि मानवी जीवनातील असंख्य रूपे त्यांच्या चित्रविश्वात येतात. मात्र ती जशीच्या तशी प्रतिकृती बनून येत नाहीत. श्रीधर त्यांना आपल्या अनुभवाच्या भट्टीतून पुन्हा घडवतात. म्हणून त्यांचा बुद्ध हा केवळ बुद्धाची प्रतिमा राहत नाही; तो करुणेचा, वेदनेचा, मौनाचा आणि अंतर्मुखतेचा संकेत बनतो. झाड केवळ झाड राहत नाही; त्याच्या मुळांमध्ये मातीशी असलेली माणसाची नाळ दिसू लागते. पक्षी केवळ पक्षी राहत नाही; त्याच्या उडण्यात मुक्तीची आकांक्षा जाणवते.
काही वर्षांपूर्वी नाटककार विजय तेंडुलकर व्याख्यानाच्या निमित्ताने अहमदनगरला आले होते. त्या वेळी त्यांनी चित्रकार श्रीधर यांची आवर्जून भेट घेतली. श्रीधर यांच्या कलाप्रवासाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेल्या तेंडुलकरांनी नगरमध्ये तब्बल तीन दिवस मुक्काम करून त्यांची दीर्घ मुलाखत घेतली. पुढे ‘दिंडी’ या दूरदर्शन मालिकेतून ती प्रसारित झाली.
पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, कवी आरती प्रभू आणि बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितावाचनाचा एक आगळावेगळा प्रयोग अहमदनगरमध्ये झाला होता. त्या कार्यक्रमाची पत्रिका श्रीधर यांनी तयार केली होती. पडदा उघडताच पुलंनी त्या पत्रिकेचे मनापासून कौतुक केले. श्रीधर यांच्या कलेचा हा आणखी एक वेगळा पैलू.
श्रीधर यांच्या चित्रांना भटकंतीचीही पार्श्वभूमी आहे. ताडोबा, मेळघाट, नवेगाव, मध्य प्रदेशातील जंगले, भीमबेटका, नर्मदा अशा अनेक प्रदेशांत ते फिरले. ही भटकंती केवळ पर्यटन नव्हती. ती स्वत:ला आणि जगाला समजून घेण्याची त्यांची पद्धत होती. रानातून चालताना त्यांना आकार दिसले, झाडांच्या वाकण्यात रेषा दिसल्या, पक्ष्यांच्या कल्लोळात नाद ऐकू आला, नदीच्या प्रवाहात लय जाणवली. निसर्ग त्यांच्यासाठी दृश्य नव्हता, तो संवाद होता. म्हणूनच त्यांच्या चित्रात निसर्ग ‘दिसत’ नाही, तो ‘जाणवतो’.
रवींद्रनाथ टागोरांनी रंग-रेषांच्या अंतिम ध्येयाबद्दल सुसंगत परिपूर्णतेचा शोध घेतला पाहिजे, असे म्हटलेले. श्रीधर यांच्या चित्रविश्वाकडे पाहताना या विचाराची आठवण होते.
स्त्री हा त्यांच्या चित्रविश्वातील महत्त्वाचा विषय. स्त्रीचे जगणे, तिची अनेक रूपे, तिच्या वाट्याला आलेला सोशीकपणा, तिची असुरक्षितता, तिचे सामर्थ्य आणि समाजातील तिचे स्थान- हे सर्व ते गाजावाजा न करता रेखाटतात. त्यांच्या स्त्रीप्रतिमा आक्रस्ताळ्या घोषणा करत नाहीत; त्या शांत असतात, पण त्या शांततेत वेदना असते. त्यांच्या देहबोलीत अनुभवांचा इतिहास असतो. म्हणून श्रीधर यांच्या स्त्रीचित्रांकडे पाहताना आपण केवळ स्त्रीचे रूप पाहत नाही; तिच्यामागे उभे असलेले संपूर्ण सामाजिक जग आपल्याला जाणवते.
बुद्धाच्या प्रतिमांमध्येही त्यांच्या कलेचा हाच चिंतनशील स्वर दिसतो. बुद्धाच्या चेहर्यावरचे मौन, डोळ्यांतली करुणा, देहाभोवतीचा अवकाश- या सगळ्यांतून श्रीधर दु:ख, वेदना आणि त्यापलीकडे जाण्याचा मानवी प्रयत्न व्यक्त करतात. त्यामुळे त्यांच्या चित्रात ‘सुंदर’ आणि ‘विद्रूप’, ‘निसर्ग’ आणि ‘मानव’, ‘आनंद’ आणि ‘वेदना’ यांच्यात भिंत राहत नाही. जीवनाच्या या परस्परविरोधी जाणिवा त्यांच्या रेषेत एकत्र येत.
श्रीधर यांनी अहमदनगरहून ‘आदिम’ आणि ‘दिंडी’ ही अनियतकालिके प्रकाशित केली. सायक्लोस्टाइलच्या प्रती काढून रेखाटनांचे आणि चित्रांचे प्रयोग करण्याचा तो काळ. मर्यादित साधनांमध्येही नवे काही करण्याची अस्वस्थता त्यांच्या अंगी होती. या प्रयोगांचे साहित्यविश्वात स्वागत झाले. पुढे ‘हंस’, ‘अस्मितादर्श’, ‘अनुष्टुभ’, ‘राजस’, ‘युगवाणी’ अशा अनेक नियतकालिकांतून त्यांची चित्रे सातत्याने प्रकाशित होत राहिली. चित्रकार म्हणूनच नव्हे, तर साहित्याच्या संवेदनशील विश्वाशी संवाद साधणारा कलावंत म्हणूनही श्रीधर यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
श्रीधर यांच्या चित्रशैलीचे वैशिष्ट्य त्याच्या साधेपणात दडलेले होते. त्यांची रेषा अलंकारिक नाही, पण ती अर्थगर्भ होती. ती सजवण्यासाठी नाही, उलगडण्यासाठी होती. रंगांचा दिखाऊ उत्सव करण्यापेक्षा आकार, अवकाश, रेषा आणि काळोख-उजेड यांच्या सूक्ष्म संबंधातून ते वातावरण निर्माण करीत. त्यांच्या चित्रात काही तरी अपूर्ण असे आणि तेच अपूर्णत्व पाहणार्याला चित्र पूर्ण करण्यासाठी आमंत्रित करी. ही सहभागाची जागा त्यांच्या कलेला वेगळेपण देत असे.
सुख-दु:खाच्या गडद जाणिवा, माणसाची मातीशी असलेली घट्ट नाळ आणि निसर्गाच्या खांद्यावर ठेवलेला माणसाचा हात ही श्रीधरच्या चित्रकार म्हणून असलेली मूलभूत बांधिलकी. त्यांची भटकंती म्हणजे बाहेरच्या जगाचा शोध घेताना आतल्या जगाचा घेतलेला शोध. रानातला पक्ष्यांचा कल्लोळ त्यांच्याशी संवाद साधतो आणि त्या संवादाचे रूपांतर कागदावर रेषांमध्ये होत असे. झाडांच्या सावल्या त्यांच्या चित्रात स्मृती बनत. दगड माणसाच्या मौनाचा आकार घेत असे. बाभूळ पुन:पुन्हा त्यांना आपल्या काटेरी विश्वात खेचून नेत असे.
कदाचित म्हणूनच श्रीधर अंभोरे अगदी आतापर्यंत बाभूळबनात हरवत… आणि त्या हरवण्यातच त्यांना आपली रेषा सापडली.
रेषेतून नाद, आकारातून लय आणि चित्रातून जीवनाचा गूढ अर्थ शोधत राहणे, हीच श्रीधर अंभोरे यांच्या दीर्घ चित्रसाधनेची खरी ओळख. त्यांच्या चित्रांतील रेषा कागदावर संपत नाही; ती पाहणार्याच्या मनात पुढे चालत राहते. एखाद्या अनामिक वाटेवरून, एखाद्या बाभळीच्या सावलीतून, एखाद्या पक्ष्याच्या उडण्यातून ती आपल्याला स्वत:कडे घेऊन येते.
आणि तेथेच श्रीधर यांची कला ‘चित्र’ न राहता ‘अनुभव’ बनते.
uraju.desale@gmail.com
