सुनंदा अमरापूरकर
‘अवघाचि संसार’ या नावाचं रंगीत मुखपृष्ठ असलेलं पुस्तक पाहता क्षणीच वाचण्याची इच्छा व्हावी इतकं सुंदर आहे. या सार्थ शीर्षकावरूनच माझ्या लक्षात आले की, आता आपल्याला कोंड्याचा मांडा करून सुखाने संसार करणार्या एका सुगरणीचे आत्मकथन वाचायला मिळणार आहे. आणि जसजशी वाचत गेले तसतशी प्रत्येक प्रकरणानंतर समाधानाने एखादे सुंदर गाणे ऐकल्यावर आपोआप मान डोलावी तसा अनुभव येत गेला.
पुस्तकाची मांडणीदेखील छान केलेली आहे. म्हणजे एकेक प्रकरण वाचून झाल्यावर काही काळ चिंतन करून मग पुढे जाता यावं. ताबडतोब वाचूनच पूर्ण केलं पाहिजे असा तगादा नाही. अतिशय दुर्मीळ ब्लॅक अँड व्हाइट फोटो, अगदी योग्य ठिकाणी बघायला मिळणे ही या पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू. पुस्तकाच्या सुरुवातीला डॉ. आनंद नाडकर्णी यांची प्रस्तावना वाचायला मिळते. एखाद्या घरात शिरताना कुणी प्रसन्नपणे हसून स्वागताला पुढे यावं तसा छान फील येतो आणि मग सुरुवात होते ती लेखिकेच्या ‘बालपणीचा काळ सुखाचा’ या प्रकरणाला. साधारण १९४० ते ६० पर्यंतचे दादर आणि गिरगाव परिसरात गेलेल्या बालपणाचे वर्णन करता करता तो काळ, त्या वेळचा शांत आणि मोकळा परिसर, सध्यापेक्षा आमूलाग्र वेगळी असलेली भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती यांचे अगदी साद्यन्त वर्णन वाचायला मिळते, तेही किती सहजपणे, खेळकर शैलीत केलेले…
म्युनिसिपालिटीच्या प्राथमिक शाळेत जाताना ६व्या गल्लीच्या कोपर्यावर राजभवनच्या आवारात आरामखुर्चीत वाचत बसलेले डॉ . बाबासाहेब आंबेडकर बघणारी ती पिढी खरोखरच भाग्यवान! या आठवणी वाचताना अंगावर काटा येतो. त्यानंतर येते ते सुंदर प्रकरण म्हणजे शुभाताईंचे वडील चित्रपट निर्माते गोविंद घाणेकर. यांच्याबद्दल लिहिताना पूर्ण घाणेकर कुटुंबाचा धावता इतिहास वाचायला मिळतो. वडिलांच्या व्यवसायामुळे घाणेकर कुटुंबाचे वास्तव्य दादर, गिरगाव आणि पुण्याच्या उच्च्भ्रू वस्तीतील वेगवेगळ्या प्रशस्त घरांमध्ये असे. पाहुणेरावळे, एकत्र मोठे कुटुंब यांच्या अतिशय हृद्य आठवणी वाचताना कधी हसून मुरकुंडी वळते, कधी थक्क व्हायला होते.
बाईंच्या आठवणीतली माणसे इतकी ठळकपणे पुस्तकात उतरली आहेत की सहजपणे लक्षात राहून जावीत. इतक्या मोठमोठ्या आणि खूप प्रसिद्ध व्यक्तींशी जवळचे संबंध असून कुठेही त्याची शेखी मिरवलेली नाही. स्वत:च्या लग्नाविषयी तर खूपच मजेदार पद्धतीने लिहिले आहे. त्या वेळचा तिचा धांदरटपणा, परंपरा तोडण्याचे धाडस, हिंमत याविषयी दाद दिल्याखेरीज राहवत नाही. वाचता वाचता हळूहळू हे पुस्तक गंभीर वळण घेऊ लागते. क्लिनिकल मानसशास्त्र या विषयातच आपण शिकायचे हे एकदा मनाशी पक्के झाल्यावर ही मुलगी चक्क तो विषय कॉलेजमध्ये शिकवण्यास सुरुवात होईपर्यंत चार वर्षे थांबली. त्या वेळी तिचे लग्नही झालेले होते आणि एक मूल होऊन दुर्दैवाने ते गेले होते. नवर्याची नोकरी आपटा नावाच्या अगदी लहान गावी होती. दादर, गिरगाव, पुणे अशा शहरांत राहिलेली मुलगी आता वीज, पाण्याचे नळ अशा मूलभूत सोयीदेखील नसलेल्या लहानशा खेड्यात आपला नवा संसार करू लागली. पण परिस्थितीबद्दल, नवर्याबद्दल चकार शब्दानेही बाई तक्रार करताना दिसत नाही.
वाचताना ओघओघाने कळते की, त्यांच्या पतीला सुरुवातीला दरवर्षी नोकरी बदलण्याची जणू सवयच होती. नोकरी बदलली की सगळ्याच गोष्टी बदलतात. नुकसान, अनिश्चितता, बदल, पुन्हा सगळी घडी नव्याने बसवणे हे आलंच. पण मागचं सगळं विसरून ही बुद्धिमान पत्नी पुन्हा आपली नव्या आव्हानाला तोंड द्यायला पदर खोचून तयार! एकदा स्वीकार केला की मनापासून त्या रंगात रंगून जाण्याइतकी निष्ठा!
प्रत्येक दाम्पत्याच्या जीवनात संकटांचे, कसोटीचे प्रसंग येतच असतात. पण शुभा आणि सदानंद थत्ते यांच्या जीवनात घडलेले काही प्रसंग अगदी अतर्क्य, विचित्र आणि वाचताना हेलावून टाकणारे आहेत. दीड वर्षांच्या नीताला झालेला देवीचा भयंकर आजार (अख्ख्या मुंबईत एकच हॉस्पिटल असताना) सभोवती दररोज माणसे मरत असताना घरी आल्यानंतरही सहा महिने तिची शुश्रूषा करावी लागणं, ट्रेनमध्ये गुंडांनी सदानंदवर जीवघेणा हल्ला करणं… मोनिका या त्यांच्या दुसर्या मुलीचा पाय जन्मत:च कमी लांबीचा असणं… असे एकेक विचित्र प्रसंग त्यांच्या आयुष्यात येत गेले आणि या सगळ्यावर कळस म्हणावा असा प्रसंग म्हणजे एका नोकरीच्या निमित्ताने परदेशात गेले असताना सदानंद यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं निधन होणं आणि ज्यांनी त्यांना काम देऊन परदेशात पाठवलं होतं त्यांनी ओळख दाखवण्यासही नकार देणं, जबाबदारी घेणे दूरच. त्यांचे शव ताब्यात मिळण्यापासून अनेक कायदेशीर उपचार करता करता बाईंची कसोटी लागली. त्यांच्या अंगच्या हिमतीने त्या पुरेपूर उतरल्या. नवरा गेल्याचे कळल्यावर त्या व्यक्तीने मेहनतीने उभारलेला व्यवसाय अक्षरश: परस्परच पळवला. ज्या हिमतीने थत्तेबाईंनी त्या सर्व जंजाळातून वाट काढली, हे सर्व प्रसंग मुळातून वाचण्यासारखे.
अत्यंत तैलबुद्धीचा, कल्पक, सद्वर्तनी, प्रेमळ माणूस, पण जीवनात व्यवहाराशी फारकत असल्यामुळे कायम अयशस्वी ठरलेल्या पतीवर निरतिशय प्रेम करत राहून, अतिशय शांत वृत्तीने, समंजसपणे संसार केलेल्या या स्त्रीला कितीही वेळा वंदन केले तरी ते कमीच ठरेल. नशिबाने दरवेळेला त्यांची परीक्षा पाहिली आणि त्यांनी दरवेळी न डगमगता नशिबाला हरवले ही वस्तुस्थिती केवळ प्रशंसनीय आणि अनुकरणीय.
त्यांच्या धाकट्या मुलीला व्यंगावर मात करून सर्वसामान्यांसारखे जीवन जगता यावे यासाठी त्यांनी शांतपणे सर्व अडचणींवर मात करून जिवाचे रान केले हे सांगताना ‘‘दैव तरी एखाद्याची किती परीक्षा घेत असते ’’ म्हणून वाईटही वाटते; आणि कुशाग्र बुद्धी, धमक, माणुसकीने वागणं हा खरा स्वभाव हे सगळं या स्त्रीला लाभलेलं होतंच. त्याच्या जोडीला तिला लाभली होती आत्मविकासाची ओढ आणि आपल्या विद्येचा समाजाला उपयोग करून देण्याची आस, त्यामुळे वैयक्तिक सुखदु:खे पूर्णत्वाने निभावून तिने मानसशास्त्राच्या क्षेत्रात जे उत्तुंग कर्तृत्व करून दाखवले त्याबद्दल त्यांच्या प्रशंसेला शब्दही अपुरे पडतील.
आपल्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या लेखणीला बहर येतो. ठाण्याच्या आयपीएच संस्थेच्या त्या संस्थापक विश्वस्त आहेतच, ते त्यांचं लाडकं अपत्य असलं तरी इतर अनेक संस्थांच्या आणि व्यक्तींच्या त्या कृतिशील आधार आहेत. लोकांची सेवा करण्यासाठी क्लिनिकल मानसशास्त्र ही शाखा निवडून स्वत:च्या जीवनानुभवातून प्राप्त झालेले ज्ञान सतत इतरांना निरपेक्षपणे वाटणार्या, ऑपेरेशन झालेले असतानाही व्हीलचेअरवर बसून रुग्ण तपासणार्या डॉ. शुभा थत्ते ही त्यांची खरी ओळख आहे. कडू-गोड अनुभवांचे जीवन पूर्णत्वाने जगत असताना मानसशास्त्रातली अनेक संशोधने त्यांनी पूर्ण केली आणि विकारांच्या उपचारामध्ये विचारांच्या साहाय्याने विकासाचा कसा अंतर्भाव करता येईल यासाठी वेगवेगळे उपक्रम आखून ते राबवलेही. आजही त्या अतिशय मनापासून भावनिक नियोजन, विवेकनिष्ठ मानसशास्त्र यांमधले त्यांचे अनुभवसिद्ध ज्ञान मुक्तहस्ताने वाटत असतात. मनापासून प्रामाणिकपणे लिहिलेलं हे पुस्तक सगळ्यांनी जरूर वाचावे.
‘अवघाचि संसार’, शुभा थत्ते, डिंपल प्रकाशन, पाने-२२८, किंमत-३००
