– सोनाली नवांगुळ
इतिहासापासून लपता येत नाही, पळून जाता येत नाही, त्याचा धागा खटकन् तोडताही येत नाही. हा इतिहास दाहक, छिन्न करणारा, होतं-नव्हतं ते गमावून शून्यातून सुरुवात करायला लावणारा असेल तर कदाचित येणार्या पिढ्या कडवटपणा, वैफल्य आणि संतापाच्या नकारात्मक इंधनावर पोसल्या जाऊ शकतात. ३ जून १९४७ला भारतातील सत्तेच्या हस्तांतराच्या नि फाळणीच्या अधिकृत घोषणेनंतर काय घडलं याची आठवण (पुस्तकं, सिनेमे, आत्मकथा यामार्गे असली तरी) आजही ऊर दडपून टाकते. फाळणी ही राजकीय व्यूहरचनेचा भाग होती व कागदी नकाशातील भूमीवर रेघ ओढून कोणाची हद्द कुठपर्यंत हे राजकीय धुरीणांनी निश्चित केलं तरी प्रत्यक्षात रेघेच्या अलीकडे-पलीकडे असणारी माणसं जिवंत असतात! ती आपलं घरदार, गणगोत, शेजार, नदीओढे, भूमीशी जोडलेल्या रीतीभाती, सांस्कृतिक आचार, लहानग्यांची अंगण, देवतांशी आणि पूर्वजांशी जोडलेल्या स्मृती… सगळंच एका क्षणात सोडून जीव वाचवण्यासाठी परक्या भूभागाकडे धाव घेतात तेव्हा त्यांच्या हृदयाची गती नि रक्ताची उष्णता काय असेल याचा अंदाज करता येणं कठीण आहे. विविध जातीधर्मांचे हे विस्थापितांचे लोंढे जगण्याच्या रोजच्या अनिश्चिततेशी कसे लढले, त्यांनी कसा व कोणत्या बळावर टिकाव धरला हे इतिहासाच्या पानांतून निसटून जातं. ‘सिंधी – उद्योजकतेचा नवा अवकाश घडवणार्या जिद्दी विस्थापितांची कहाणी’ या पुस्तकात मात्र भारताच्या फाळणीतून विस्थापित झालेल्या ‘या’ समूहाची शून्यातून साकार झालेली भरारी वाचायला मिळतेच, पण ‘फाळणी’ ही अत्यंत भारयुक्त घटना नव्याने आकळते; ही सामाजिक शास्त्राच्या अंगाने पाहिलं तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे पुस्तक फाळणीकडे केवळ इतिहास म्हणून बघत नाही, ते एका समाजाच्या सामूहिक आघातावरील प्रतिक्रियेकडे आणि पुनर्निर्मितीच्या प्रक्रियेकडे बघायची नजर देते.
‘खडतर प्रसंगांना धीरोदात्तपणे तोंड देणार्या आणि कोणाही व्यक्तीला ‘इतर’ न समजता, आपलेपणाने जवळ करणार्या सर्वांना…’ या अर्पणपत्रिकेपासून हे पुस्तक निश्चित सूर लावतं व दिशा सांगतं. त्यामुळेच पाच हजार वर्षांहून जुना इतिहास असणार्या ‘सिंधी’ समाजाच्या भूगोल, इतिहास आणि वर्तमानाची संदर्भासहित कहाणी सांगणारं हे पुस्तक असलं तरी ती एका समाजातील माणसांची नव्याने ओळख धुंडाळण्याची व त्यासाठीच्या धडपडीची अत्यंत प्रेरक शोधगाथा आहे.
पुस्तक वाचताना लक्षात येते की फाळणीच्या पार्श्वभूमीवर ‘सिंधी’ हा विशिष्ट समाज लेखकांच्या शोधयात्रेच्या केंद्रस्थानी आहे; तरीही हे त्यांच्या वेदनेचं, सोशिकतेचं, संयमाचं अथवा यशाचं गौरवीकरण नाही, शोषित असण्याचा कंगोराही नाही, उलट अशा सामूहिक आघातांचे व जखमांचे पापुद्रे तटस्थपणे तपासत व वेळोवेळी देशीपरदेशी अभ्यासकांचे संदर्भ देत घटनाक्रमाची परखड चिकित्सा करणारी ही शोधयात्रा आहे. प्रत्येक टप्प्यावर प्रसंग विशद करताना दिलेले काटेकोर संदर्भ हे या पुस्तकाचं सर्वात मोठं बलस्थान आहे. ही सहा पाने संदर्भसूची पुस्तकाच्या अखेरीस बघायला मिळते. तत्कालीन प्रशासकीय, धोरणात्मक, राजकीय पातळीवर काम करणार्या व्यक्तींचे हे हवाले आहेत. त्यांना फाळणीच्या आगेमागे हलणार्या राजकीय सूत्रांसंदर्भातील अहवाल, पत्रव्यवहार, पत्रके, सरकारी आदेश, गोपनीय कागदपत्रे हाताळण्याची अथवा त्यांच्यापर्यंत थेट पोचण्याची वाट किंवा निर्णयप्रक्रियेशी संबंधित पद असल्यामुळे, त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल दस्तावेजी आधार मिळतो आणि एकांगी निष्कर्ष काढले जाण्याची शक्यता कमी होते. या जाणीवपूर्वक ठरवलेल्या कथनशैलीतून लेखक आपलं मत सांगून वाचकांची भूमिका तयार करत नाही, तर अधिकृत पुरावे देऊन त्यांची विचार करण्याची व समजून घेण्याची मानसिकता घडवते.
फाळणीच्या संदर्भात लिहिताना नरसंहार, त्यातील क्रौर्य, होरपळीविषयी सांगणं अपरिहार्य असलं तरी लेखकद्वयींची भाषा अतिशय संयमी आहे. भावविव्हळ वर्णने करून वाचकांच्या हृदयाला हात घालण्याऐवजी ती विचारांना चालना देण्याचा प्रयत्न करते.
सिंधी समाजाची कष्ट करायची अचाट तयारी, स्वाभिमानाला धक्का न लावता नव्या वाटा चोखाळण्याचा गुण, सहअस्तित्व, सहजीवन आणि परस्पर आदराचा आराध्य दैवत झुलेलाल यांचा संदेश याबद्दलचे तपशील देताना सिंधी समाजाच्या भरारीचे खरे इंगित लेखकांनी सांगितले आहे- बहुसांस्कृतिकता आणि बहुअस्मिता! आपण नव्याने रुजू पाहात असलेल्या समाजातील विविध सांस्कृतिक प्रवाह, विचार, आचार आणि तितक्याच अस्मितांचा प्रवाह व मतभेद समजून घेत त्यांच्याशी फटकून किंवा स्वत:चा वेगळेपणा दाखवत जगण्याचा मार्ग न स्वीकारता आपलंसं करण्याचा मार्ग सिंधी समाजाने पत्करला. स्वत:भोवती भिंती बांधल्या नाहीत. ताठरतेचा विलय केला. असं करताना स्वत:ची संस्कृती, मूल्यव्यवस्था आणि जीवनविषयक दृष्टिकोन यांच्याशी प्रतारणा केली नाही. श्रद्धा आणि श्रम यांचे दोर घट्ट पकडून ठेवले. मानवी प्रतिष्ठा कोलमडून पडावी अशी वागणूक असतानाही चेहर्यावरचा शांतपणा सहसा ढळू दिला नाही. श्रमाचे मोल, समूहभान आणि सहिष्णुता आणि समावेशकता अशा मूल्यांचा ध्यास ठेवून जीवन घडवले व प्रवाहित ठेवले. आपल्या सांस्कृतिक संचिताची पुनर्रचना करून अस्मितेला नवे पैलू पाडले. लेखकांनी सोदाहरण या सर्व गोष्टींची नोंद घेतली तशी नाण्याच्या दुसर्या बाजूचीही घेतली आहे. वस्तू उत्पादनाचा सनदशीर मार्ग सोडून ड्युप्लिकेट माल तयार करणे, बनावट कागदत्रे करणे, बेकायदेशीर चलन, बांधकाम, कर घोटाळा, इंजेक्शन्सचा काळा बाजार वगैरेंची नोंद घेतली आहे. अर्थात आजच्या जगात अशा गुन्ह्यांचे सामान्यीकरण झाले आहे, परंतु वाटचालीचा आढावा घेताना लेखकांनी फट ठेवलेली नाही.
इतिहासाच्या मुळांमधून सिंधी समाजाच्या वाढविस्ताराचा आवाका तपासताना आजच्या काळाशी धागा जोडून घेण्याचं काम मुलाखतरूपी लेखांमधून लेखकांनी उलगडलं आहे. लछमन हर्दवानी, सपना भावनानी, भरत ऊर्फ सान्वी जेठवानी, शशी व सुशील गजवानी, विशाल पिंजानी अशा कला, उद्योग, सामाजिक चळवळ, भाषा, माध्यमे क्षेत्रातील दहा जणांच्या मुलाखतीतून लिहिलेली टिपणे विचार करायला लावणारी आहेत. या मुलाखतींमधून सिंधी लिपी, कोष, वाङ्मय, कला, आजचे संघर्ष, राजकीय-सामाजिक भूमिका, सांस्कृतिक पेच, भाषेच्या अस्तंगत होण्याची काळजी असे अनेक विषय येतातच, पण या परिचयातून एकूण देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक घुसळणीमध्ये आपला वाटा हिरिरीने उचलण्याविषयीचा त्यांचा पिंडही कळतो.
चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारलेलं मुखपृष्ठ अर्थवाही आहे. सिंधी अस्मितेचं प्रतीक असलेली, कलाकुसर केलेली गोल टोपी शीर्षकाच्या वेलांटीत दिसते. पार्श्वभूमीवरचा काळपट विटकरी रंग फाळणीच्या दाहक स्मृतींचा निदर्शक आहे. हाती लागलं तितकं सामानसुमान डोक्यावर घेऊन मैलोन्मैल पायी अंतर तुडवणार्या विस्थापितांच्या आकृत्या आणि खाली दिलेला भारताचा नकाशा यातून स्थलांतराचा प्रवास एका डोळ्यांसमोर साकार होतो.
देशाचे तुकडे होऊन विदारकपणे माणसं या जागेवरून त्या जागेवर हाकलली, झिडकारली जातात हा प्रचंड भयंकर मानसिक आणि शारीरिक आघात असतो. अशा आघातातून सावरून नव्याने आपलं संचित पुनस्र्थापित करणार्या समूहाच्या इतिहासाशी प्रामाणिक कहाण्या मराठी भाषेत अपवादानेच आहेत. ‘सिंधी’च्या निमित्ताने देशपातळीवरील पडसादांचा, पुराव्यांचा आधार घेत निदान महाष्ट्रापुरती शोधयात्रा हाती आली हे महत्त्वाचे. लाखो माणसांच्या भूभागाची नव्हे स्मृतींच्याही विस्थापनाची ही शोधयात्रा एकप्रकारे मानवी क्षमतेची शोधयात्रा आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीतही माणसं आपली जीवनेच्छा टिकवून कशी फुलतात, फळतात हे नुसता कोरडा सनावळींचा इतिहास कधी सांगतो? इतिहास साध्या माणसांच्या दुर्दम्यतेचा, चिकाटीचा पट मांडणारा असायला हवा!
‘सिंधी’,
डॉ. रोहिणी तुकदेव, ओंकार थोरात, मनोविकास प्रकाशन,
पाने- ३०४,
किंमत- ४५० रुपये.
