गिरीश कुबेर

‘‘श्रीधर तेव्हा चार वर्षांचा असावा. नुकताच आलेला मुंबईहून. बाबूजी आणि ललिताबाई यांच्याबरोबर. दुपारी त्याची मान दुखायला लागली. अंगातही कणकण होती. सगळ्यांना वाटलं असेल साधं काही… संध्याकाळी सगळे जमले स्टुडिओमध्ये. अण्णा (माडगूळकर) होता, माणिक (वर्मा) होती… निघताना रात्रीच्या रेकॉर्डिंगची चर्चा झाली. आम्ही सगळे निघालो… रात्री दहा वाजता आकाशवाणीवर भेटायचं ठरलं. त्याप्रमाणे एकेक असे सगळे आले.

खास बालगंधर्वही आलेले. सगळेच उत्साहात. रेकॉर्डिंगची तयारी झाली. बाबूजींनी विचारलं, ‘‘गाणं कुठाय?’’ अण्णा म्हणाले, ‘‘तुमच्याकडे तर दिलं संध्याकाळी !’’ बाबूजी म्हणाले, ‘‘माझ्याकडे तुम्ही दिलंच नाही.’’ अण्णाला काही ते पटेना. ते तुमच्याकडेच दिलं, असा त्याचा आपला धोशा सुरू. ते ऐकून बाबूजी रागावले आणि त्यांना रागावलेलं पाहून अण्णा चिडला. बाबूजी म्हणाले, ‘‘श्रीधरची तब्येत बरी नाही… त्या तंद्रीत कुणाकडे दिलं की काय आठवत नाही.’’ ते ऐकलं आणि अण्णाच्या रागाचा स्फोटच होतो की काय वाटलं. म्हणाले, ‘‘मी चाललो घरी…!’’ ते उठले आणि खरंच निघाले. प्रसंग मोठा बाका… म्हटलं परिस्थिती हाताबाहेर जायच्या आत अण्णाला थांबवायला हवं. मी पटकन उठून त्यांचा हात धरून दुसऱ्या खोलीत घेऊन गेलो… म्हटलं, ‘‘गाणं हरवलं म्हणून काही बिघडत नाही… सुचेल तसं नवीन लिहा.

तुम्हाला सुचणारच नाही, असं शक्य नाही… सुचलं, लिहून झालं की दार वाजवा… मी बाहेरनं उघडतो,’’ असं म्हणून त्यांना अक्षरश: कोंडलं… खोलीचा दरवाजा बाहेरनं लावून घेतला. एकाला तिथं उभं केलं. फार वेळ लागला नाही… अण्णांनी आतनं दरवाजा खटखटवला. बाहेर आल्यावर म्हणाले, ‘‘हे पहिल्यासारखं नाही… थोडा काही बदल झालाय असं वाटतं या गाण्यात. ‘पुत्र सांगती चरित पित्याचे’ नंतर ज्योतीने तेजाची आरती… हे नवीन सुचलं.’’ अण्णाचं हे नवीन गाणंही सर्वांना आवडलं… रेकॉर्डिंग व्यवस्थित पार पडलं… दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे त्याचं प्रक्षेपण झालं… ‘‘स्वयें श्री रामप्रभु ऐकती… कुशलव रामायण गाती…’’

गीतरामायणाच्या जन्माची ही आठवण मी ऐकली खुद्द सीताकांत लाड यांच्याकडून. तीन-चारदा तरी ऐकली असेल. त्यांना सालाबरहुकूम सगळं लक्षात होतं. बहुधा १९५५ सालची ही घटना. मी ऐकली तेव्हा १९९२ साल सुरू होतं. पण सीताकांत लाड ती कहाणी अशा चेहेऱ्यानं, लकबीनं सांगत होते की जणू कालच त्यांच्या डोळ्यासमोर हे सगळं घडलंय आणि ते लगेच ऐकवायची संधी मिळालीये. लाडांची ओळख होणं, त्यांच्या घरी जाणं-येणं होणं आणि सौ. लाडांच्या हातचं सुरमईचं कालवण अनेकदा चाखायला मिळणं… हे आता मागे वळून पाहिलं की अगदीच आश्चर्यकारक वाटतं…

झालं असं की, मी नुकताच गोव्यात स्थिरावलो होतो आणि गोविंदराव येणार होते. यायच्या आधी कोणाकोणाकडे भेटायला जायचं, कोणाला हॉटेलवर भेटायला बोलवायचं, संध्याकाळच्या बैठकीचं निमंत्रण कोणाला… याची व्यवस्थित यादी आली. त्यात एक नाव होतं सीताकांत लाड. लहानपणी कधी तरी घरी वडिलांच्या तोंडून ते ऐकल्याचं आठवत होतं. आजोळी सातारला उन्हाळ्याच्या सुट्टीत वाड्यात एकाच्याच घरी असलेल्या रेकॉर्ड प्लेअरवर गीतरामायण ऐकायचा कार्यक्रम ठरलेला असायचा.

पॉट भाड्यानं आणून आंब्याचं आईस्क्रीम बनवायचं. त्याला पार्श्वभूमी गीतरामायणाची. आम्ही पोरं ‘राम जन्मला गं सखी’चा सुंठवडा वाटायच्या ऐवजी आईस्क्रीम चापायचो. वडीलधाऱ्यांच्या गीतरामायणाच्या गप्पा कानावरनं जायच्या. त्यात हे नाव कानावरून गेलेलं. पण त्यांच्याशी कधी संपर्क असायचं काही कारण नव्हतं. गोविंदरावांच्या यादीत ते नाव आलं आणि हे सगळं आठवलं. लाड पणजीत राहायचे. महालक्ष्मी देवळाच्या रस्त्यावर आमचं ‘टाइम्स’चं ऑफिस होतं आणि तिथून उजवीकडे हाकेच्या अंतरावरच्या इमारतीत लाड. गोविंदरावांचं निमंत्रण द्यायला घरीच गेलो. मुलगा होता. माझ्यापेक्षा लहान. आनंद नाव बहुधा. त्याची आईपण होती घरात. मालतीताई.

वयानं मोठ्या वाटल्या. त्यांच्याकडून कोण, काय झाल्यावर त्यांना म्हटलं, सीताकांत लाडांना गोविंदरावांचा निरोप द्यायला आलोय. सावळ्या रंगाच्या आणि घारसर डोळ्यांच्या मालतीताईंच्या वागण्यातला गोडवा लगेच जाणवला. एव्हाना खुद्द लाडही आले आतून. चौकटीचा शर्ट आणि पांढरा लेंगा. अंगाला काहीतरी झालं होतं त्यांच्या. मी त्यांना सांगितलं कशाला आलोय ते. भेटीच्या दिवशी बाकीच्यांना जमायला संध्याकाळचे आठ वाजणार होते. गोविंदरावांनी लाडांना सांगितलेलं तुम्ही साडेसहा-सातपर्यंत या. सीताकांत आणि मालतीताई दोघेही आले… नंतर जे काही कानावर पडत गेलं ते अद्भुत होतं.

लाडांचं बालपण गिरगावातलं. घरी वाडवडिलांना गाण्याची आवड आणि समजही. घर अगदी ऑपेरा हाऊसच्या जवळ. घरी येणारे जाणारे कोणकोण? बाकी नावं आहेतच तगडी, पण एक महत्त्वाचं नाव सांगायला हवं. सीताकांतांच्या वडिलांचे एक स्नेही होते. वामन मंगेश दुभाषी. ते पार्ल्यातले. वामनरावांचा प्राचीन वाङ्मयाचा व्यासंग दांडगा. संस्कृत पंडितच. थोरले लाड आणि वामनराव मिळून ‘महाराष्ट्र सारस्वत’ नावाचं एक मासिकही चालवत. कधी त्या दोघांच्या चर्चेत न. र. फाटक असत. तर या दुभाषींबरोबर त्यांचा नातू यायचा गिरगावात. सीताकांतांचा समवयस्क. विटी-दांडू वगैरे खेळ सुरू असला तरी आतनं ऑर्गनचे सूर कानावर आले की हा मुलगा आणि सीताकांत दरवाजाबाहेर गाणं ऐकत उभे राहत. मोठ्यांच्या बैठकीत दिवाणखान्यात मज्जाव असे त्यांना.

तेव्हापासून या मुलाशी लाडांची दोस्ती झाली ती अखेरपर्यंत टिकली. वडिलांचे ते मित्र वामन मंगेश दुभाषी हे ‘ऋग्वेदी’ नावानं ओळखले जात आणि त्यांचा नातू पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे – ‘पुलं’ या नावानं आजही ओळखला जातो. सीताकांत आणि पुलं या दोघांनाही लहानपणापासनं ज्या गाण्याचा लळा लागला तो आवाज होता नारायणराव राजहंस यांचा. ऊर्फ बालगंधर्व. हे लाडांच्या वडिलांचे स्नेही. झालंच तर मास्तर कृष्णराव. अनंतराव गद्रे. हिराबाई बडोदेकर. शेजारीच त्यांच्या राहायचे रघुनाथ धोंडो कर्वे. म्हणजे महर्षींचा मुलगा.

हा सगळा देश स्वतंत्रही झाला नव्हता तेव्हाचा काळ. सीताकांत लाड त्या काळात रमलेले असायचे. वर्तमानात अलीकडेपर्यंत त्यांना पुलं, बाकीबाब, गदिमा, पुभा, बा. सी. मर्ढेकर वगैरेंची साथ होती. ती सुटल्यावर सीताकांत पुन्हा आपले आपल्या सोनेरी इतिहासातच गेले. एक प्रसंग तर मला जसाच्या तसा अजूनही डोळ्यासमोर दिसतोय. त्यावेळी गोविंदरावांच्या एका गोवा फेरीत त्यांचा संध्याकाळचा जाहीर कार्यक्रम अचानक रद्द झाला. (त्याची रसदार कथा ‘स्नेहचित्रे’च्या पुढच्या भागात) त्यामुळे बाकी नेहमीचे सगळे कोणी भेटणार नव्हते. रात्रीची बैठक नव्हती. मलाच त्याचं वाईट वाटत होतं. कारण या सगळ्यांच्या गप्पा ऐकणं कमालीचं आनंददायक होतं. त्या आनंदाला यावेळी मुकावं लागणार म्हणून वाईट वाटत होतं. गोविंदराव म्हणाले, ‘‘लाडांना विचार, संध्याकाळी आहेत का? आपण तिकडेच जाऊ.’’ मालतीताई म्हणाल्या, ‘‘फारच छान… जेवायलाच या.’’ गोविंदरावांना घेऊन गेलो त्यांच्याकडे.

संध्याकाळी सहाची वेळ असेल. लाड तयार होते. बैठकीसाठी आवश्यक घटक होतेच. पण नवीन होता तो एक ग्रामोफोन. दहा-बारा… कदाचित जास्तच… रेकॉर्ड काढून ठेवलेल्या सीताकांतांनी. आम्ही पोहोचलो. सूर्य मावळून गेलेला. त्यामुळे चहा वगैरेचा प्रश्नच नव्हता. प्रसंगोचित पेयं सिद्ध होती. आवश्यक तितकं करून मालतीताई खोलीतून निघून गेल्या. सीताकांत आणि गोविंदराव… आणि कोपऱ्यात बसून अदृश्य असा मी. सीताकांत एका पाठोपाठ एक रेकॉर्ड लावतायत. मधेच थांबवतायत आणि त्या गाण्याची, एकेका जागेची गंमत अलगद शब्दांनी उलगडून दाखवतायत. वयपरत्वे एरवी सगळ्यांच्या बैठकांत कमी बोलणारे होते ते सीताकांत. कानांनीही असहकार पुकारल्यानं शांत असत. गोविंदराव त्यांना त्यामुळे नेहमी जवळ बसवून घेत. पण सगळ्यांच्या गप्पांतले अबोल सीताकांत आणि आता मी पाहात होतो ते सीताकांत… कमालीचा फरक!

आणि त्याला कारण होतं ते गाणं. बालगंधर्वांचं गाणं. त्या गाण्याच्या बरोबरीनं, एकेका पदाच्या पदराखालनं सीताकांत अशा काही आठवणी सादर करत की त्या मुळातल्या गोड चेहेऱ्याच्या कानात हिऱ्याच्या कुड्या घातल्या की तो चेहेरा जसे उजळतो… तसं त्या गाण्याचं होऊन जायचं. सीताकांत तर जणू ते क्षण पुन:पुन्हा जगत होते. हे असं तीनेक तास सुरू असेल. मधेच मालतीताई काही हवं नको ते पाहायला डोकावून जायच्या. तेवढंच, पण ते दोघे या जगात नव्हतेच. त्यांचं आपलं… ‘एकला नयनाला विषय तो झाला…’ नंतर ‘मांडवी’त सोडायला जाताना गोविंदरावांकडून लाडांची महती कळली. गोविंदरावांनी स्वत: जातीनं लक्ष घालून ‘महाराष्ट्र टाइम्स’चा ‘बालगंधर्व’ विशेषांक काढला त्याची कल्पना अशाच बैठकीतली. त्या दिवशी गोविंदरावांकडून लाडांविषयी ऐकलं आणि ठरवलं त्यांना भेटण्यासाठी गोविंदरावांनी गोव्यात येईपर्यंत अजिबात थांबायचं नाही.

मग मी माझा माझाच जाऊ लागलो लाडांकडे. त्यांच्या आकाशवाणीतल्या आठवणी ऐकणं म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास समजून घेणं. कसलं ऐश्वर्यसंपन्न जग होतं ते. त्या जगात सीताकांतांच्या बरोबर बा. सी. मर्ढेकर होते. आकाशवाणी केंद्राचे संचालक झुल्फिकार अली बुखारी होते. मंगेश पाडगावकर यांना आकाशवाणीच्या नोकरीसाठी शिफारस करणारे बाकीबाब बोरकर होते. सीताकांतांची जन्मजात पुण्याई मोठी. पु. ल. देशपांडे बालमित्र असणं हेच केवढं मोठं संचित.

पण सीताकांतांनी पुढच्या काळात वडिलोपार्जित पुण्याईत स्वत:ची तितकीच भर घातली. त्यामुळे गदिमा येऊन मिळाले. पु. भा. भावे आले. वामनराव चोरघडे आले. याच आकाशवाणीतल्या कारकीर्दीत त्यांच्याकडून ‘गीतरामायण’ करवून घेतलं गेलं. गदिमा ते बाबूजी अशा कित्येकांनी पुढच्या कित्येक कार्यक्रमांत ‘गीतरामायणा’चं श्रेय सीताकांतांना दिलंय. बाबूजी आणि गदिमा यांना अनेकदा आकाशवाणीवर सांगीतिकांच्या निमित्तानं लाडांनी एकत्र आणलं. आता काही तरी यापेक्षा अधिक भरीव, समाजावर दीर्घकाल परिणाम करू शकेल असं काही हातून घडावं अशी इच्छा या सगळ्यांच्या गप्पांत व्यक्त होऊ लागली.

बोलता बोलता १९५५ साल उजाडलं. पुढच्या काही कार्यक्रमांच्या योजना होत असताना लाडांचं लक्ष एप्रिल महिन्यातल्या रामनवमीवर पडलं… आणि पुढचा सगळा इतिहास सगळ्यांनाच माहितीये. पण गदिमांचा असलेला सीतारामायण, काशीरामायण, गंगारामायण वगैरेंशी असलेला परिचय फारच कमी जणांना माहीत असेल. त्यामुळे रामायणावर काही संगीतकाव्य करण्याची कल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा ती पेलवण्याचं कसलंच आव्हान गदिमांना वाटलं नाही.

नंतरचा सगळा गीतरामायणाचा प्रवास इतका झपाट्याने झाला की आकाशवाणीशी अधिकृत कराराची वाट न बघताच सुरुवातीला काही कार्यक्रम सादर झाले. दर आठवड्याला शुक्रवार-शनिवार-रविवार अशा तीन दिवशी सकाळी पावणेनवाच्या ठोक्याला नवीन, पुढचं गीत सादर होत असे. समग्र महाराष्ट्र हातातलं कामधाम सोडून रेडिओ कान लावून बसत असे त्यावेळी. इतकी प्रचंड लाट होती गीतरामायणाची की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अंगणात दुसरा विषय नव्हता कुठला. वर्तमानपत्रं आधीच्या आठवड्यातली गाणी छापायला लागली…

हे सगळं सीताकांतांच्या तोंडून ऐकणं ही एक वेगळी मजा होती. मुळात ते इतिहासात रमणारे. त्यात हातून असं काही घडलेलं. एकदा त्यांना विचारलं, ‘‘ते श्रीधरचं काय झालं त्या दिवशी?’’

‘‘घटसर्प निघाला तो आजार… बाबूजी आणि ललिताबाईंना इतकी काळजी होती… तशातच रेकॉर्डिंग झालं पहिल्या गाण्याचं.’’ खरं तर त्याआधी गाणं हरवण्याचा प्रकार घडल्यामुळे गदिमा आणि बाबूजी रागावलेले. पण तो राग निवळला. आता रेकॉर्डिंग सुरू होणार तर गदिमांच्या डोक्यात आलं गाण्याची सुरुवात लव-कुश यांनी ‘श्रीराम… श्रीराम… श्रीराम…’ असं तीन वेळा म्हणून केली जावी. पण मध्यरात्र उलटून चार तास झालेले आणि कार्यक्रम प्रसारणाला तितकाही वेळ राहिलेला नव्हता. आता हे कुश-लव आणायचे कुठून पहाटेच्या वेळी. मग स्त्रियांचा आवाज लहान मुलांसारखाच असतो… असं म्हणून पर्याय निघाला. पण स्त्रिया तरी आणायच्या कोण? पर्याय होता माणिकताई आणि ललिताताई. त्या होत्या हॉस्पिटलात श्रीधरबरोबर. पण तरी त्यांना बोलावून आणलं आणि त्यांच्या श्रीरामनामानं गीतरामायणाचा प्रारंभ झाला.

गीतरामायण आणि बालगंधर्व हे दोन ध्रुव होते सीताकांतांच्या आयुष्यातले. त्याभोवतीच फिरलं त्यांचं आयुष्य. बालगंधर्वांना सीताकांतांनी जितकं जवळून पाहिलंय तितकं अन्य कोणी नाही, असं पुलं म्हणालेत. बालगंधर्वांच्या काय काय आठवणी होत्या सीताकांतांकडे. माझी पिढी बालगंधर्व वगैरे नंतरची. त्यांचं थेट त्यामुळे काही मला कधी ऐकायला मिळालेलं नाही. लाडांकडूनच कॉपी करून घेतलेल्या दोन कॅसेट्स आहेत बालगंधर्वांच्या पदाच्या. कुमारजींचा ‘मला उमजलेले बाळगंधर्व’ हा माझा आवडता आल्बम. पण सीताकांतांकडे असलेला ‘बालगंधर्व’साठा शब्दश: अतुलनीय. त्यात अगदी महात्मा गांधींनी ‘बालगंधर्व’ ऐकण्याची इच्छा व्यक्त करणं, ती पूर्ण होणं, स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपती भवनात डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी बालगंधर्वांचं गाणं ठेवणं आणि त्या बैठकीस पं. जवाहरलाल नेहरू असणं… आणि मग मुंबईतला बालगंधर्वांचा सत्कार.

अगदी आचार्य अत्रे ते शिवाजी गणेशन ते पृथ्वीराज कपूर, यशवंतराव चव्हाण, गोव्याचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर अशा एकापेक्षा एक दिग्गजांची भाषणं. त्यातही विशेष म्हणजे शिवाजी गणेशन आणि पृथ्वीराज यांनी बालगंधर्वांवर केलेलं भाष्य… इतक्या प्रचंड आठवणी… जणू सोन्याची खाणच!

माझं गोवा सुटलं आणि ही खाण दुरावली. नंतर बातम्याही आल्या. आधी मालतीताई गेल्या. काही काळानं सीताकांतही गेले. आता वाटतं, हे सगळं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं. एवढा प्रदीर्घ कला-काळ सीताकांतांनी अनुभवलेला. तो काळ तर सरलाच, पण तो पाहिलेली जाणकार माणसंही गेली.

आताही ‘रामनवमी’ला गल्ली ते दिल्लीतले ‘बाबूजी’ त्यांच्या परीनं सुरेल नकला सादर करत असतात गीतरामायणाच्या. आणि आता तर काय ‘राम’ म्हणजे… काही बोलायचीच सोय नाही. या राजकीय रामभक्तांचा उन्माद पाहिला की सीताकांत आठवतात. त्यांच्या तोंडून ऐकलेले गदिमा आठवतात. त्या स्नेहाळ सांस्कृतिक रामकथा आठवतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांचं स्मरण करायचं आणि जय जय राम… म्हणत गप्प बसायचं. त्या आठवणींत जास्त राम आहे…!