देशात ज्येष्ठांची संख्या वाढते आहे… त्यांच्या समस्यांची सोडवणूक कशा पद्धतीने करावी याबाबत समाज अनभिज्ञ आहे. परिणामी ज्येष्ठांच्या समस्यांची सोडवणूक होण्याऐवजी त्या समस्या अधिक जटिल होत आहेत. ज्येष्ठांशी संबधित समस्या सोडविण्यासाठी डॉ. रोहिणी पटवर्धन यांचं ‘स्माइल@60’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारे. ज्येष्ठांच्या समस्यांवर सकारात्मक विचार करायला लावणारे, त्यावर उपाययोजना करण्यास मार्गदर्शन करणारे असे हे पुस्तक.लेखिका वृद्ध कल्याणशास्त्रातील तज्ज्ञ आहेत, वृद्धांश्रमांवर त्यांचा सखोल अभ्यास आहे त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व अधिक.

पुस्तकातील ‘वृद्ध समजून घेताना’ या विभागात लेखिकेने वय वाढते म्हणजे नेमके काय होते, वृद्धसंख्या वाढ म्हणजे एक संधी कशी आहे, वृद्ध कल्याणशास्त्राची ओळख, वृद्धकल्याण- राजकीय प्रश्न की सामाजिक? अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह केला आहे. ‘वृद्ध समस्यांचे स्वरूप’ या विभागात वृद्धांना येणार्‍या समस्या, त्यांची मानसिकता, त्यांना होणार्‍या त्रासापासून न्याय कसा मिळवता येईल याची माहिती दिली आहे. ज्येष्ठ विधवा महिलांच्या समस्या, मालमत्ताविषयक माहिती आणि अर्थव्यवस्थापन या विषयावर लेखिकेने सांगितले आहे. विधवांना जाणवणार्‍या एकटेपणातून मार्ग कसा काढावा याचे याचे विश्लेषण पुस्तकात येते. या संबंधित उदाहरणेही लेखिका देते.

मुले ज्येष्ठांंचा सांभाळ करू शकत नसतील तर कोणाकडे तक्रार करावी, कशी करावी, त्याबाबतच्या कोणत्या तरतुदी आहेत त्या लेखिका सांगतात.आंधळेपणाने निर्णय न घेण्याचा सल्लाही त्या ज्येष्ठांना देतात. समुपदेशन या महत्त्वाच्या घटकावर लेखिकेने भर दिला आहे. देशाला कार्यक्षम, सक्षम ज्येष्ठांची गरज असून, समाजातील प्रतिष्ठीत लोकांनी- सेवानिवृत्त न्यायाधीश, शिक्षक, नोकरदारांनी यासाठी काम करावे- जेणेकरून ज्येष्ठांचे जीवन अधिक सुकर होईल असे त्या सुचवितात.ज्येष्ठांची वाढतील संख्या ही समाजातील मोठी समस्या असल्याची अनेकांची धारणा आहे. परंतु त्यांना समजून घेतल्यास, योग्य मार्गदर्शन केल्यास हीच मंडळी समाजासाठी आधारसतंभ ठरतील. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवांचा सामाला उपयोग होईल हेच या पुस्तकातून सूचित होते.

‘स्माइल@60’,
डॉ. रोहिणी पटवर्धन,
रोहन प्रकाशन,
पाने- १९२, मूल्य- ३४० रुपये.