प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
एखादी व्यक्ती कोणाच्या भेटीला जाते तेव्हा ती आपले व्हिजिटिंग कार्ड प्रथम आत पाठवते. त्या कार्डाचे स्वरूप, त्याचे संकल्पन, त्यावरील त्याचे अथवा त्याच्या आस्थापनेचे बोधचिन्ह, त्याचा आकर्षकपणा हेच सर्वप्रथम एखाद्याची ओळख त्या व्यक्तीकडे आपण पोहोचण्यापूर्वी तिला करून देत असते. आपल्या देशात बोधचिन्हांतील कलात्मक आकार-गुणांचे रचनात्मक संकल्पन करण्याचे, ही कला आणि विचार प्रसारणाची ओळख करून देणारे, आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान भूषवलेले एक सर्जनशील कलावंत प्रा. यशवंत चौधरी यांचा सिंहाचा वाटा आहे.
खानदेशातील वाघाडे या गावी २६ एप्रिल १९३० रोजी यशवंत चौधरी यांचा जन्म झाला. तेथेच शालेय शिक्षण घेऊन कलेचा ध्यास असलेल्या चौधरींनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्टकडे धाव घेतली. कलेचे शिक्षण घेत असतानाच परदेशांतून आलेल्या कला मासिकांतील ‘ग्राफिक’ या कलाप्रकाराने त्यांना मोहिनी घातली आणि त्यांच्या चौकस बुद्धीने त्याच्या अभ्यासाला सुरुवात केली. मूळ ड्रॉइंग पक्के हवेच, पण त्यानंतर त्या ड्रॉइंगचे सुलभीकरण केल्यास ती घटना वा चित्र आपल्या मनाशी पक्के ठसते याची त्यांना खात्री होती. दरवर्षी चौधरी परीक्षेत पहिले येत. अंतिम वर्षांतही ते सर्वप्रथम येऊन त्यांनी जे. जे.ची फेलोशिपही मिळवली. भारताने तोपर्यंत ‘ग्राफिक डिझाइन’ या क्षेत्रात फारशी आघाडी घेतली नव्हती. चौधरींच्या सर्जनशील मनाला परदेशात जाऊन या गोष्टी आत्मसात करण्याची अनिवार ओढ लागलेली होती. त्यामुळे ते लंडनला ‘सेंट्रल स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दाखल झाले. त्याकाळी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणे सोपे नव्हते. तेथून त्यांनी नॅशनल डिप्लोमा घेतला. त्यानंतर चौधरींची विचारकक्षा व दृष्टी रुंदावली. विचार प्रसारण कला व ग्राफिक डिझाइन यांना पूरक असलेले विविध अभ्यासक्रम चौधरींनी पूर्ण केले.
लंडनमध्ये त्यांनी काही काळ हॅन्स सचलेयर यांच्यासोबत काम केले. त्यानंतर १९६० मध्ये त्यांनी स्वित्र्झलडमध्ये ‘सिबा’ या बहुराष्ट्रीय औषध कंपनीत कामास प्रारंभ केला. हा काळ त्यांच्या कलाजीवनाला कलाटणी देणारा होता. कला विभागाचे उप-व्यवस्थापक म्हणून ते काम पाहत होते. यादरम्यान चौधरींना ‘पॅकेजिंग’ हा प्रकार जवळून अनुभवायला मिळाला. पॅकेजिंगमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे एखाद्या उत्पादनासाठी करण्यात आलेले वेगवेगळ्या माध्यमांतील पॅकिंग. हे उत्पादनाच्या गरजेप्रमाणे काच, पुठ्ठा, धातू अशा विविध साहित्याद्वारे केले जाते. तेही त्यातील सौंदर्यभाव सांभाळून. आतील मालाचे वजन, सहज हाताळता येईल अशी रचना, वाहतुकीला अडचण होऊ नये अथवा त्याने जास्त जागा व्यापू नये अशा पद्धतीचे बॉक्सेस आदी गोष्टी त्यात पाहाव्या लागतात. इंडस्ट्रियल डिझाइनमध्ये हे शिकावे लागते. पॅकिंग सुशोभित करून आकर्षक करणे- जेणेकरून ग्राहकाला ते पाहिल्याबरोबर विकत घेण्याचा मोह व्हावा, विषयाशी संलग्न रंगसंगती ठेवणे हे ग्राफिक डिझायनरचे काम असते. चौधरींनी या दोन्ही गोष्टी आत्मसात केल्या आणि त्यांनी ‘पॅकेजिंग’ या विषयात नैपुण्य मिळवले. विशेषत: ‘सिबा’ ही औषधाची कंपनी असली तरी त्यांची इतरही सौंदर्यवर्धक उत्पादने होती. त्यामुळे पॅकेजिंगमधील दोन्हींचा समतोल त्यांना सांभाळावा लागत असे. नंतर त्यांनी सिबाच्या भारतातील शाखेत कलादिग्दर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली.
भारतात तेव्हा ‘बिनाका’ या ब्रॅण्डखाली सिबाची उत्पादने खूपच लोकप्रिय होती. त्यांची बिनाका टूथपेस्ट, बिनाका टाल्कम पावडर ही तर खूपच गाजली होती. दर बुधवारी रात्री आठ वाजता रेडिओ सिलोनवरून होणाऱ्या ‘बिनाका गीतमाला’मुळे तर त्यांना अधिकच प्रसिद्धी मिळत असे. जोडीला असे अमीन सयानींचे मधाळ निवेदन. त्यामुळे ‘बिनाका’ हे नाव सर्वत्र गाजत होते. जोडीला बिनाकाच्या जाहिरात संकल्पनांमध्ये तसेच त्यांच्या उत्पादनांच्या वेष्टनामध्ये चौधरींची कल्पकता व सर्जनशीलता अंतर्भूत होती. याच दरम्यान यशवंत चौधरी सर जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयात आम्हाला अभ्यागत व्याख्याते म्हणून शिकवायला येऊ लागले. सदैव सुटात असणारे चौधरी सर संस्थेत आल्याबरोबर जाणवत असे ते त्यांचे बुद्धिमान, प्रसन्न असे व्यक्तिमत्त्व. त्यांचा हसतमुख शांत स्वभाव.. तरीही त्यांचा वाटणारा दबदबा. हनुवटीवर छोटीशी बुल्गानीन दाढी, हातात बॅग असे हसतमुख सर वर्गात आल्याबरोबर बॅग उघडून नवनवीन संकल्पनांवरील आपली उत्पादने काढत व त्यावर शास्त्रशुद्ध विवेचन करत. त्यांचा स्वभाव इतका मोकळा होता की कोणीही त्यांना दबकत नसे. काही वर्षे ‘सिबा’त नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वत:ची ‘कम्युनिका कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ ही डिझाइन संस्था सुरू केली व अखेपर्यंत तिथेच ते कार्यरत होते.
डिझाइनसोबत त्या वस्तूच्या होणाऱ्या वापराच्या बाबतीत ते कमालीचे जागरूक असत. वापरताना अडचण भासू नये म्हणून जाड क्रीम असलेल्या मोठय़ा तोंडाच्या बाटल्या अथवा टय़ुब्सचा वरील भागच त्यांनी तळ म्हणून वापरला. त्यामुळे बाटली अथवा टय़ुब उलट करून ठेवली असता हळूहळू जाडसर द्रव तोंडाशी जमा होतो व त्यामुळे संपूर्ण बोटे आत न घालता ती वरच्या वर अलगद बोटावर घेता येते. एखाद्या पारदर्शक तेलाच्या वा अन्य उत्पादनाच्या काचेच्या बाटलीवर सुंदर डिझाइनचे लेबल असले तरी त्यावर सरकारी नियमानुसार त्या उत्पादनाबद्दल माहिती देणेही बंधनकारक असते. परंतु ती लेबलचे सौंदर्य बिघडवू शकते. म्हणून मग चौधरींनी ती लेबलच्या मागील बाजूस टाकली. आतील द्रव पारदर्शक असल्यामुळे तो मजकूर मागील बाजूनेही सहजगत्या वाचता येत असे. अशा प्रकारची कल्पकता चौधरींच्या कैक संकल्पनांतून दिसून येते. याच प्रकारे त्यांनी बिनाकाच्या ‘टाल्क फॉर मेन’ या जेन्टस् पॉवडरसाठी पॅकेजिंग केले तेव्हा त्यांनी त्या डब्याचा एक कोपरा तिरका ठेवला. एक्झिक्युटिव्ह वा तत्सम प्रकारच्या लोकांसाठी- ज्यांना सतत मीटिंग्जना जावे लागते, अशांसाठी- ही पावडर होती. जी कोटाच्या खिशात सहज ठेवता येत असे व त्याच्या तिरक्या कटमुळे खिशातून ती सहज बाहेर काढता येत असे. त्यावर त्यांनी सुलभ असा पत्त्याच्या डावातील राजा दाखवला. अशा अनेक गोष्टींचा ते चहुबाजूंनी विचार करून संकल्पन करीत असत.
‘बोधचिन्ह’ हा संकल्पन प्रकार तर यशवंत चौधरींचा आत्माच समजावा लागेल. पूर्वी एखादे बोधचिन्ह केल्यावर त्याचा वापर कसाही केला जात असे. मात्र, चौधरींनी त्याला शिस्त लावली. बोधचिन्हाचा आकार, त्याची आखणी, विशिष्ट पद्धतीची ठेवण, एका ठरावीक जागी इतर घटकांना पूरक अशी ठेवून बोधचिन्हाला विशिष्ट अशी जागा त्यांनी मिळवून दिली. बोधचिन्ह हे केवळ पत्रव्यवहार वा स्टेशनरीपुरते मर्यादित न ठेवता त्याला व्यापक रूप दिले. संपूर्ण व्यवहारात त्याचा वापर होऊ लागला. यात अंतर्गत सजावटीपासून कर्मचाऱ्यांचे गणवेश, वाहतुकीची वाहने, ऑफिस स्टेशनरी, मार्गदर्शक चिन्हे, लहानसहान भेटवस्तू अशा गोष्टींचाही समावेश झाला. विचार प्रसारण क्षेत्रात ‘कॉर्पोरेट आयडेंटिटी’ म्हणून बोधचिन्हाचा नवा आविष्कार अस्तित्वात आला. ‘एचडीएफसी’ या गृहप्रकल्पाकरता आर्थिक साहाय्य देणाऱ्या संस्थेसाठी चौधरींनी हे माध्यम प्रथम हाताळले. त्यामध्ये त्यांनी घरबांधणीसाठी विटांचा वापर दाखवला असून त्याच आधारे कंपनीचा लोगो बनवला. त्यात त्यांनी विश्वास, संरक्षण आणि सुरक्षा दाखवली. तेच रंग त्यांच्या कार्यालयात मार्गदर्शिकेसाठी फिरवले. त्यांचे फॉम्र्सदेखील त्याच शिस्तीत संकल्पित केले. या त्यांच्या संकल्पनेला त्यावर्षीचा पुरस्कारही मिळाला. आपल्या ‘कम्युनिका कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ या संस्थेसाठीही त्यांनी दृक्श्राव्याचे प्रतीक म्हणून डोळा व कान या आधारे ग्राफिक चिन्ह तयार केले. ग्राफिक डिझाइनमधील एक अधिकारी व्यक्ती म्हणून चौधरी ओळखले जाऊ लागले. बोधचिन्हांच्या कलात्मक संकल्पनांत यशवंत चौधरी हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले. कुवायामा या चित्रकार-संपादकाने प्रकाशित केलेल्या जागतिक चित्रकारांच्या चित्रकृतींत चौधरींची ५४ चित्रे निवडून त्यांना चौथे स्थान देण्यात आले होते. बोधचिन्हांच्या वापरात त्यांनी भारतीय संस्कृतीची जडणघडण प्रामुख्याने साधली. आय.डी.सी.च्या शैक्षणिक चर्चासत्राचे बोधचिन्ह करताना त्यांनी शंकराचा तृतीय नेत्र वापरला, तर राजकीय नेते चंद्रशेखर यांच्या पदयात्रेच्या बोधचिन्हासाठी त्यांनी वामनाच्या तीन पावलांचा वापर केला. यातून त्यांच्या भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीच्या अभ्यासाची पुरेपूर कल्पना येते. कॉर्पोरेट क्षेत्रासाठी तर त्यांनी असंख्य लोगो बनवले.
विचार प्रसारण कला ही केवळ जाहिरातीपुरती मर्यादित नसून तिचा उपयोग समाजशिक्षण, सामाजिक बांधिलकी, कुटुंबकल्याण अशा जनहित कार्यासाठीदेखील समर्थपणे होतो, हे ते मुद्दाम अधोरेखित करीत असत. भारतासारख्या महाकाय देशात खेडोपाडीच्या अशिक्षित जनतेला या कलाप्रसाराद्वारे ज्ञान प्राप्त करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. आपल्या देशात विचार प्रसारण कला ही केवळ जाहिरातीपुरती मर्यादित राहू नये, दूरदर्शन या माध्यमाचा वापर केवळ शाम्पू, तेल व साबण विकण्यापुरता होऊ नये, तर कॉर्पोरेट इंडस्ट्री, समाजशिक्षण व बालशिक्षण यासाठी प्रामुख्याने व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते. साने गुरुजींच्या विचाराने भारलेले चौधरी काही काळ गुरुजींच्या ‘साधना’ साप्ताहिकाचेही काम पाहत असत. ‘साधना’चे शीर्षकही त्यांनी आपल्या खास टायपोग्राफीमध्ये केले होते. त्यांच्या रचनात्मक मांडणीतील सर्जनात्मक वैशिष्टय़ हे की, त्यात ते सामाजिक संदर्भ तर आणतच, शिवाय तत्त्वाची भर घालून स्वत:ची तालबद्धता व अर्थसूचकता गुंफून एक आगळा पोत निर्माण करीत.
मधुकरराव चौधरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. जे. जे. स्कूलच्या बाबतीत आरंभापासूनच त्यांना विशेष रस होता. त्यामुळे विशेष काम असले की त्यांचे आम्हाला बोलावणे येत असे. असेच एकदा त्यांनी मला बोलावले. त्या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांच्या बैठकीला मी चौधरींनाही सोबत घेऊन गेलो. मधुकररावांनी सांगितले की, मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात सर्वप्रथम ‘चले जाव’चा नारा दिला आणि आज तेथे केवळ एक स्तंभ उभा आहे. पुढच्या पिढीला हा इतिहास कधीच कळणार नाही. त्यासाठी या मैदानावर एक कायमस्वरूपी तो देदीप्यमान इतिहास सांगणारे क्रांतिस्मारक व्हायला हवे. श्याम बेनेगल, सदाशिवराव गोरक्षकर, कमलाकर सोनटक्के यांच्यासहित अनेक मान्यवर या बैठकीला हजर होते. या ऐतिहासिक मैदानावर तितकेच प्रभावी स्मारक हवे यासाठी चौधरींनी रात्रंदिवस खपून एक प्रकल्प तयार केला. त्यात स्वातंत्र्यसैनिकांची माहिती देणारे प्रदर्शन, संग्रहालय, ग्रंथालय, फिल्म प्रोजेक्शन, थिएटर, रेस्टॉरंट आदींचा समावेश होता. हे सर्व अंडरग्राउंड असून ते सर्व पाहत पाहत जेव्हा लोक बाहेर येतील तेव्हा त्यांच्यावर प्रकाशाचा झोत पडून स्वतंत्र भारतात आपण परतल्याची जाणीव होणार होती. मधुकररावांनी त्यात खूप रस घेतला होता. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विरोधकांची एक फळी तयार झाली व ‘मैदान बचाव’ची हाक देण्यात आली. मधुकरराव त्यांनाही पुरून उरले. पण पुढे सरकार बदलले व सर्व प्रोजेक्ट ठप्प झाले. यशवंत चौधरींचा होऊ घातलेला एक अभ्यासू प्रकल्प मध्येच थांबला.
चौधरींनी जाहिरात क्षेत्रासोबतच कला-शिक्षणाचीही काळजी घेतली. विचार प्रसारण कला ही काळासोबत तंत्रज्ञानाने व्यापली जाणार आहे हे ते जाणून होते. त्यासाठी संगणक ही काळाची गरज आहे हे ते शिक्षण खात्याला बजावून सांगत होते. विद्यार्थ्यांच्या भावी पिढय़ांना याचा लाभ व्हावा यासाठी प्रथम शिक्षकांना त्यात प्रशिक्षित करण्याची गरज भासल्याने आय. आय. टी.च्या सहकार्याने चौधरींनी जे. जे.मध्ये शिक्षक-विद्यार्थ्यांसाठी संगणक कार्यशाळा घेतली. आम्ही जेव्हा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे संस्थेचे संगणकीकरण करण्यासाठी अनुदानाची मागणी केली, त्यावेळी चौधरींनीच त्यासाठी शास्त्रशुद्ध असा प्रकल्प तयार केला. पुढे येणाऱ्या विचार प्रसारणातील संगणकीय महत्त्व ध्यानात घेऊन फिल्म, फोटोग्राफी, ऑडिओ व्हिज्युअल आणि नवी येऊ घातलेली प्रसारमाध्यमं यांसाठी विद्यार्थ्यांना संगणकाची कशी गरज आहे हे त्यांनी उदाहरणांसहित सादर केले. त्याचाच परिपाक म्हणजे संस्थेला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अनुदान मंजूर केले व संस्थेमध्ये प्रथमच संगणक आले.
यशवंत चौधरींना दृक्काव्याचीही विलक्षण ओढ होती. अनेक साहित्य व कवी संमेलनांना ते हजेरी लावत. कित्येकदा त्यांच्या घरी पेडर रोडवर अनेक जण जमत. त्यात षांताराम पवार, प्रभाकर कोलते, संभाजी कदमांसारखे चित्रकार-कवी असत. तर वसंत परब, शंकर पळशीकर, नारायण सोनवडेकर, गजानन भागवत यांसारखे कलाकारही असत. चौधरींचे मराठी आणि इंग्रजी लिखाण मनाला मोह पाडणारे असे. त्यात एखादा संशोधनात्मक लेख असल्यास पाहायला नको. ‘एशिया ७२’ या दिल्लीतील भव्य प्रदर्शनाच्या पोस्टरसाठी त्यांनी ‘उद्याचा भारत’ यासाठी अनेक प्रांतांतील बालकांची छायाचित्रे वापरून त्याचे कोलाज केले व त्यातून त्यांनी साकारले पंडित नेहरू- भारताचे भविष्य!
असा हा उमदा अन् मनमिळाऊ माणूस अखेरच्या काळात मात्र थोडा खचलेला वाटत होता. पेडर रोडवरील राहती जागा खाली करण्याविषयी त्यांच्यावर सतत दडपण येत होते. अनेक एजन्सींकडून त्यांनी केलेल्या कामाचे पैसेही मिळत नसल्याचे त्यांच्या बोलण्यात येत असे. पुढे कानाच्या आजाराने ते त्रस्त झाले होते. जसलोक इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हे कळताच मी जसलोकमध्ये गेलो. त्यांचे व्याही त्यांची देखभाल करत होते. जसलोकसमोरच फिल्म डिव्हिजनशेजारी त्यांचे निवासस्थान असल्याने कित्येकदा जसलोकमधून उतरून ते घरी जात व किरकोळ कामे उरकीत. पुढे त्यांना डिस्चार्ज मिळाला तरी त्यांचे दुखणे वाढतच गेले. गुण काही आला नाही. पुढे पुण्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कळले. मात्र, त्यानंतर ते मुंबईत कधी आले ते आम्हाला कळलेच नाही. कळले ते एकदम १९ सप्टेंबर २००१ रोजी दुपारी माझ्या कार्यालयात कोणीतरी फोन करून निरोप ठेवला होता- चौधरी गेल्याचा!
rajapost@gmail.com
