जे. के. रोलिंगची ‘द कॅज्युअल व्हेकन्सी’ ही प्रौढ वाचकांसाठीची पहिलीवहिली कादंबरी असली तरी यामध्ये तिने दारिद्रय़ हा सर्वस्पर्शी विषय हाताळला आहे. सामाजिक समस्यांची तीव्र जाणीव आणि तीव्रतेने अनुभव देणारी जिवंत पात्रे यांचा पुन:प्रत्यय या कादंबरीत येतो..
जगप्रसिद्ध आणि सर्वप्रिय हॅरी पॉटर या व्यक्तिरेखेची निर्माती ब्रिटिश लेखिका जे. के. रोलिंग हिच्या प्रौढ वाचकांसाठीच्या ‘द कॅज्युअल व्हेकन्सी’ या पहिल्यावहिल्या कादंबरीचे प्रकाशन काही दिवसांपूर्वी झाले. ही कादंबरी ग्रामीण इंग्लंडमधील एका लहान गावाच्या पाश्र्वभूमीवर असून सामाजिक वास्तवातून घडलेल्या मानवी संबंधांचे आणि संघर्षांचे वास्तववादी चित्रण त्यात आलेले आहे. यातुविद्या आणि मायाजाल यांचे शिक्षण देणाऱ्या हॉगवर्ट विद्यालयाच्या अभूतपूर्व भयचकित वातावरणाने भारलेल्या, १९९७ ते २००७ पर्यंत प्रसिद्ध झालेल्या सात हॅरी पॉटर कादंबऱ्यांप्रमाणे ही कादंबरी नसून ती प्रौढ वाङ्मयात मोडणारी आहे.
पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर लिहिलेल्या या कादंबरीबद्दल रोलिंगला असा दृढ विश्वास वाटतो, की अद्भुतकथांची लेखिका या तिच्या प्रतिमेत निश्चित परिवर्तन होईल. एडिम्बरो या स्कॉटलंडच्या राजधानीत सध्या तिचे वास्तव्य आहे. त्याच शहरात तिने ‘यू.एस.ए. टुडे’ या अमेरिकन वृत्तपत्रासाठी मुलाखत दिली आहे. ‘‘मला आवडलेली ही कादंबरी प्रत्येक वाचकांना प्रिय होईल असे नाही, पण तिचे अप्रूप आहे,’’ असे ती नम्रपणे म्हणते. प्रत्येक कलाकृती व्यक्तिनिष्ठ असते याची पूर्ण जाणीव तिला आहे. आत्मनिष्ठेचा हा प्रत्यय ‘द कॅज्युअल व्हेकन्सी’चा आत्मा आहे. ही आत्मनिष्ठा, वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवनातील तीव्र संघर्ष, अपत्य वात्सल्यातून आलेली कर्तव्यनिष्ठा आणि मुलांच्या भावविश्वातील मानसिक आंदोलनांचा शोध या कादंबरीचा प्रेरणास्रोत आहे.
‘द कॅज्युअल व्हेकन्सी’ ब्रिटिश कादंबरीच्या परंपरेत समाविष्ट व्हावी, असे रोलिंगला वाटते. एकोणिसाव्या शतकातील इंग्लिश कादंबऱ्यांचे तिला विशेष आकर्षण आहे. डिकन्स, ट्रोलोप, मिसेस गॅरकेल यांनी चित्रित केलेल्या रूढिप्रिय मर्यादित व्यक्तिसमूहांच्या चित्रणाने तिच्यावर विशेष गारुड केले आहे. त्यामुळे त्या परंपरेचा भाग बनून सुवैध इंग्लिश कादंबरी निर्माण करावी, अशी रोलिंगची तीव्र इच्छा आहे. कथारचना कौशल्य, जिवंत व्यक्तिचित्रण आणि आभासी विश्वनिर्मिती ही परंपरेची वैशिष्टय़े यावरील तिचे प्रभुत्व अबाधित आहे.
४७ वर्षांच्या आयुष्यातील सुख-दु:खांचे तीव्र चढउतार हा वैयक्तिक अनुभव रोलिंगच्या आत्मनिष्ठेचा पाया आहे.  पूर्वायुष्यातील दारिद्रय़ाचे भीषण चटके, सरकारी अनुदानावर व्यतीत केलेले हलाखीचे जीवन व त्यामुळे दारिद्रय़ाची बहुविध रूपे, दाहकता आणि त्याचा गहनार्थ हा तिच्या चिंतनाचा विषय झालेला आहे.
हॅरी पॉटरच्या वाचकवर्गाला असे वाटते, की तिने सतत त्या बालजादूगाराबद्दलच लिहावे; परंतु असा वाचकानुनय केल्यामुळे चांगल्या कलाकृतीची निर्मिती होऊ शकत नाही, असे रोलिंगला ठामपणे वाटते. लेखकाने निर्मितीच्या ऊर्मीला अनुसरूनच लेखन करावे, असे तिचे मत आहे. त्याला अनुसरूनच ही नवी कलाकृती आहे.
‘द कॅज्युअल व्हेकन्सी’चे कथासूत्रही फार दीर्घ नाही. ही कथा एका कल्पित ब्रिटिश ग्रामीण भागात घडते. तेथे ग्रामसभेच्या बॅरी फेअरब्रदर नावाच्या सदस्याच्या अचानक निधनाने गावाचे सर्व वातावरण ढवळून निघते. स्थानिक निवडणुकीतील हिंसक व अस्वस्थ करणाऱ्या घटना यातून ग्रामसभेचे राजकारण व त्याची भौतिक आणि मानसिक चिकित्सा या कादंबरीत आढळते. चेपस्टो या गावात रोलिंग वाढली. हे गाव इंग्लंडच्या नैर्ऋत्येस वेस्टकन्ट्री परगण्यात आहे. वयाची १८ वर्षे तेथे व्यतीत झाल्याने तेथील वातावरण व लहानमोठय़ा ग्रामस्थांचे परस्परसंबंध हे तिला फार जवळून पाहता आले. त्याचा ठसा तिच्या निर्मितिप्रक्रियेवर दीर्घकाळ राहिला. त्याचाच परिणाम म्हणून कल्पित पॅगफर्ड या नावाची आणि ग्रामस्थांची निर्मिती झाली आहे, असे तिचे म्हणणे आहे.
या कादंबरीत पॅगफर्डमधील काही कुटुंबांचे सविस्तर चित्रण आहे. तेथे एका कुटुंबात टेरी विडन ही व्यसनाधीन महिला व्यसनमुक्तीसाठी झगडत आहे. तिची क्रिस्टल नावाची बिनधास्त स्त्रीमुक्तीवादी तरुण कन्या रॉबी नामक लहान भावाबरोबर आहे. हे कुटुंब दारिद्रय़ाने पिचले आहे. दारिद्रय़ाचे असह्य़ चटके सहन करणाऱ्या क्रिस्टलचे जीवन कसे व्यतीत होते, तसेच दारिद्रय़ाने पिचलेल्या असंख्य ग्रामस्थांना कसे जगावे लागते याचे चित्रण यात आहे. क्रिस्टलला केवळ दारिद्रय़ाशी संघर्ष करावा लागतो असे नाही, तर आईच्या व्यसनाधीनतेशी झगडावे लागते. वर्षांनुवर्षे दरिद्रतेची तीव्रता वाढत जाते आणि त्यातून आपत्ती व भीषण वास्तव यांच्याशी तिला सामना करावा लागतो. त्याची र्सवकषता आणि दाहकता यात होरपळल्यामुळे तिला दारिद्रय़ाचा गहनार्थ कळू लागतो. त्यातच स्थानिक राजकारणाच्या झगडय़ात ती सापडते. दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांच्या निवासस्थानांची जबाबदारी सरकारने केवळ पॅगफर्डसारख्या छोटय़ा गावावर टाकल्यामुळे ग्रामस्थांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात तिची ससेहोलपट होते. दारिद्रय़ आणि त्याच्याशी निगडित प्रश्नांची उकल आणि चिकित्सा कादंबरीत आल्याने तिला वैश्विक आयाम मिळाला आहे.
दारिद्रय़ाचा अर्थ व त्याकडे दूषित नजरेने पाहणाऱ्या बेपर्वा समाजाची दरिद्री कुटुंबाविषयी अवहेलनेने दुर्लक्ष करणारी अनास्था याची सखोल चर्चा रोलिंगने केलेली आहे. आता तिने दारिद्रय़ाशी झगडणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी विश्वस्त निधी स्थापन केलेला आहे आणि लेखन करणाऱ्या समृद्ध कलाकारांचे सामाजिक उत्तरदायित्व आपल्या वर्तनाने सिद्ध केले आहे.
वंचितांचे सत्यचित्रण करणाऱ्या, सामाजिक समस्येला भिडणाऱ्या तिच्या या कादंबरीचे नाते डिकन्सच्या कादंबरीशी जुळते यात शंका नाही. डिकन्सचा सहृदय बंधुभाव, नर्मविनोद, सामाजिक समस्यांची तीव्र जाणीव आणि तीव्रतेने अनुभव देणारी जिवंत पात्रे यांचा पुन:प्रत्यय रोलिंगच्या या पहिल्याच कादंबरीत येतो. पात्रांच्या अंतर्मनातील विश्वांचे दर्शन या कादंबरीचे वैशिष्टय़ आहे.
ही कादंबरी केवळ इंग्लिश ग्रामीण भागाच्या समस्यांचे चित्रण करणारी नाही. प्रादेशिकतेची मर्यादा ओलांडून मानवाच्या उत्तरदायित्वाचा शोध घेणारी ही सर्वस्पर्शी कलाकृती आहे. माणसांनी स्वावलंबी बनून आपली प्रगती करून घ्यावी किंवा निष्क्रिय राहून आपला विनाश ओढवून घ्यावा, की इतरांनी विपत्तिग्रस्त माणसांना मदतीचा हात आपण होऊन द्यावा, की अशा व्यक्तींची जबाबदारी सरकारने घ्यावी, असे प्रश्न अनेक देशांना भेडसावत आहेत. या प्रश्नांचा शोध घेणे ही सद्यस्थितीच्या वास्तवाची निकड आहे. त्याला स्पर्श करणारी ही कादंबरी रोलिंगच्या नवोन्मेषशालिनी प्रतिभेचा आविष्कार आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Story img Loader