पंकज घाटे pankajghate89@gmail.com

सावरकरांच्या समाजधारणा आणि विज्ञाननिष्ठा समजून घेण्यासाठी मुख्यत: त्यांचे जात्युच्छेदक निबंध, सामाजिक भाषणं, विज्ञाननिष्ठ निबंध पाहायला हवेत. हिंदू संघटनांसाठी त्यांनी हिंदूंचा आवेशपूर्ण गौरव केला, स्फूर्तिदायी चित्रं उभी केली, इतिहासाला वेठीला धरलं. पण दुसऱ्या बाजूला हिंदू समाजातले दोष दाखवताना रूढींची खिल्ली उडवली, हेटाळणी केली; तसंच कठोर भाषेत त्याची चिकित्सा केली, उपाय सुचवले आणि कृतीही केली. यादृष्टीने सावरकर आजही महत्त्वाचे ठरतात.

pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
pune digitization, digitization social and political documents pune
पुण्यातील दीडशे वर्षांच्या सामाजिक-राजकीय दस्तऐवजाचे ‘डिजिटायझेशन’; पुणे सार्वजनिक सभेचा पुढाकार, निधीची मात्र चणचण
Hindu Code Bill and Dr Babasaheb Ambedkar Marathi News
Hindu Code Bill: बाबासाहेबांचा राजीनामा; पंडित जवाहरलाल यांची भूमिका नक्की काय घडले होते?
chandrashekhar bawankule raj thackeray (1)
“राज ठाकरे मोदींच्या गॅरंटीवर देशाला पुढे नेण्यासाठी…”, बावनकुळेंचं सूचक वक्तव्य; मनसेच्या जागांच्या कथित मागणीवरही भाष्य

 ‘माझे जीवन जाणत्या आरंभापासून भारतीय राष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाशी संबद्ध झालेले आहे. इतकेच नव्हे तर पुढे पुढे त्या राष्ट्रीय जीवनाचा ते माझे व्यक्तिजीवन एक प्रमुख आणि परिणामकारक घटक होत आले आहे.’

‘माझ्या समकालीन पिढीतील लक्षावधी तरुणांच्या आयुष्याची दिशा पलटून जावी इतका त्यांच्यावर माझ्या मतांचा, प्रयत्नांचा आणि सहवासाचा प्रत्यक्ष परिणाम झालेला आहे.’

वि. दा. सावरकरांच्या या दोन वाक्यांचा त्यांच्या हयातीत जितका प्रत्यय आला तितकाच तो आज एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या सुरुवातीलाही घेता येतो. सावरकरांनी आपल्यातल्या नेतेपणाची जाणीव कायम प्रखर ठेवली. तिचा त्यांना कधीही विसर पडला नाही.

सावरकरांचे विचार पटो वा न पटो, तुम्ही त्यांचे कट्टर समर्थक असा वा नसा; त्यांची राजकीय मतंही तुम्हाला मान्य नसतील. पण त्यांचा प्रभाव आजही अनेकांवर पडताना दिसतो. ते पटतात म्हणून नव्हे, तर आपल्या सोयीनुसार निवडलेला सावरकर विचार डोक्यावर घेऊन एक मोठा वर्ग त्यांच्यापाठी गेला. पोथी-परंपरानिष्ठ परंतु सावरकरांच्या क्रांतिकार्याचं, हिंदुत्वाचं, त्यागाचं, आकर्षण असणाऱ्या, कँाग्रेसचं राजकारण न पटलेल्या लोकांपासून ते स्वत:ला सुधारकी समजणाऱ्या वा पुरोगामी विचाराचे म्हणवणाऱ्या लोकांपर्यंत सावरकरांचा कोणतातरी विचार आपापल्या गरजेनुसार ग्रा वाटत आलेला आहे.

रत्नागिरीच्या वास्तव्यात त्यांनी हिंदू संघटन, जात्युच्छेदन, अस्पृश्यतानिवारण, हिंदू-हिंदूंमधील बंधुभाववर्धन, अंधरूढींचे निर्मूलन, विज्ञानवादाचा प्रसार, यंत्रयुगाचे स्वागत, स्वदेशी, भाषाशुद्धी इत्यादी मुद्दय़ांवरून पुष्कळ लेख लिहिले, भाषणं दिली. स्थानबद्धतेच्या काळातला हाच त्यांचा मुख्य अजेंडा ठरून गेला. आधी विधायक कार्यक्रमांची, सुधारणांची आखणी करून, तसं काम करण्यासाठी स्थानिकांना हाताशी धरून नेटानं त्या राबवल्या. इतकंच नव्हे तर समाजाच्या काळ्या बाजूंचं स्वरूपही उघड केलं. सावरकरांच्या समाजधारणा आणि विज्ञाननिष्ठा समजून घेण्यासाठी मुख्यत: त्यांचे जात्युच्छेदक निबंध, क्ष-किरणे,  सामाजिक भाषणं, विज्ञाननिष्ठ निबंध पाहायला हवेत. हिंदू संघटनांसाठी त्यांनी हिंदूंचा आवेशपूर्ण गौरव केला, स्फूर्तिदायी चित्रं उभी केली, इतिहासाला वेठीला धरलं. पण दुसऱ्या बाजूला हिंदू समाजातले दोष दाखवताना रूढींची खिल्ली उडवली, हेटाळणी केली; तसंच कठोर भाषेत त्याची चिकित्सा केली, उपाय सुचवले आणि कृतीही केली.

हिंदू समाजातील जातींनी त्याची एकात्मता भेगाळली जाते, त्याचे राष्ट्रबळ खच्ची होते; म्हणून त्यांनी जातिव्यवस्थेची पाहणी केली. त्यांच्या मते, चातुर्वण्र्य म्हणजे जातिव्यवस्था नव्हे. जातिभेद केवळ क्षुद्र समजुतींवर आधारलेला असून तो पोथीजात आहे. अस्पृश्यता ती त्यातली फार भयंकर विकृती आहे. तिच्यामुळे राष्ट्रीय एकात्मता तर भंगतेच; पण माणसासारख्या माणसाला अस्पृश्य मानणे हा मनुष्यतेविरुद्ध नि स्वत:च्या आत्म्याविरुद्ध मोठा गुन्हा आपल्याकडून घडतो. जातिभेदाच्या दोषाचे वाटेकरी सर्व जाती, सर्व वर्ण, सर्व हिंदू व्यक्ती आहेत. स्पर्श, व्यवसाय, रोटी-बेटीव्यवहार या जन्मजात जातींवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी जातींच्या भिंती न मानता बेखटक होऊ लागल्या की जातिभेदाची विषारी नांगी मोडेल.

यापुढे जाऊन सावरकरांनी ही अंगे हिंदू समाजाची आहेत, पण ही अंगे म्हणजे हिंदुत्व नव्हे. उलट ही अंगे शस्त्रक्रिया करून काढून देता येतील; कारण ती अपरिहार्य नाहीत. आवश्यक तर नाहीतच नाहीत, असं नि:संदिग्धपणे सांगितलं. ती कापून टाकली की हिंदू समाज उलट निरोगी होईल अशी त्यांची धारणा होईल. जातिभेदाचं दायित्व त्या उतरंडीवरच्या प्रत्येक वरच्या जातीवर पडतं हे ऐतिहासिक सत्य स्पष्ट दिसल्यावर ते सांगायला त्यांनी अजिबात काचकूच केली नाही. ‘जातिभेदाच्या खुळाचे खापर ब्राह्मणांवर वा क्षत्रियांवर वा स्पृश्यांवरच फोडणे निव्वळ पक्षपात आहे. या रोगाने प्रत्येक जात पछाडली जात आहे. हा जात्यहंकाराचा दोष सर्वाचा आहे. अस्पृश्यांतील अस्पृश्यता आपण सर्वानी मोडून टाकली पाहिजे. त्याविषयी ज्या ज्या शिव्या ब्राह्मणास वा क्षत्रियास कोणी हासडू इच्छितो त्यांच्या त्यांच्या ‘प्राप्तीचा अर्धा वाटा’ यच्चयावत जातींना वाटून दिला पाहिजे.’ प्रत्येक वरची जात खालच्या जातींना ‘ब्राह्मण’ बनून त्याच जातिभेदाच्या ढोंगाखाली हीन लेखते हे सावरकरांनी नित्याच्या व्यवहारातील उदाहरणांनी स्पष्ट केलं. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा अनेक दलित नेत्यांप्रमाणे जातिभेद, अस्पृश्यतेवर सावरकर तुटून पडत असले तरी त्यांना धर्मातराची भूमिका पसंत नव्हती. बौद्धधर्म स्वीकाराने तुम्हीच असा व्हाल, असं ते म्हणत होते. जन्मजात अस्पृश्यतेचे आणि जातिभेदाचे उच्चाटन हिंदू संघटनेचे अनिवार्य उपांग आहे. हिंदू राष्ट्राला पोषक असणाऱ्या या सुधारणा हिंदू राहूनच शक्य होणार आहेत. कट्टर हिंदुत्वाभिमानी सुधारकांच्या प्रयत्नांमुळे आज अस्पृश्यता मरू लागली आहे. हिंदू राहूनच अस्पृश्यांचा खरा उद्धार होईल असं सावरकरांना वाटत होतं. तोच डॉ. आंबेडकर आणि त्यांच्यातला प्रमुख भेद होता. मोठय़ा संख्येनं अहिंदू होऊनही त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार नाही; त्याचप्रमाणे नव्या धर्मातही कमी जातीतच गणना होत राहिल्यामुळे त्यांची सामाजिक अवहेलना थांबणार नाही. उलट ते हिंदू सुधारकांचा पाठिंबा गमावतील; तसंच आपल्या पैतृक परंपरेला, स्वाभिमानाला, स्वत्वाला मुकतील. त्यांच्या सुधारणेची हमी हिंदूंच्याच परिवर्तन प्रक्रियेत आहे, ही सावरकरांची धारणा होती. तिचं त्यांनी सातत्यानं समर्थन केलं.

हिंदुसभेच्या मार्फत शाळांतून सरमिसळ बसवण्याचं आणि शुद्धी आंदोलन १९२५ पासूनच सुरू होते. अस्पृश्य मानल्या गेलेल्या मुलांना शाळेत इतर मुलांबरोबर बसण्याचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी सरकारशी पत्रव्यवहार केला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या डिस्ट्रिक्ट बोर्ड आणि अनेक शाळांनी पुढे येत या सरमिसळ बसवण्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि काही वर्षांतच मोठी मजल मारली. सावरकर त्यावेळी स्वदेशीचा प्रचार करत असत. रत्नागिरीच्या बाजारपेठेत ते स्वत: स्वदेशी वस्तू विकण्यास बसत. १९३१ मध्ये रत्नागिरीतल्या काही व्यापाऱ्यांनी आपण परदेशी साखर आणि चहा विकणार नाही असं लेखी अभिवचन दिलं होतं.

१९३० च्या दरम्यान सविनय कायदेभंग चळवळ ऐन भरात होती. सावरकरांना मानणारे, त्यांचा कार्यक्रम राबवणारे स्थानीय अनुयायीही या काँग्रेसप्रणीत चळवळीत उतरले. १९३३ साली सावरकरांचे निर्बंध कायम ठेवण्यात आले. मुंबई सरकारच्या अधिकाऱ्यांनी हे निर्बंध उठवू नयेत असंच एकमतानं सांगितलं. महात्मा गांधींना विरोध करणाऱ्या आणि डॉ. आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या जातींतील लोकांमध्ये सावरकरांचा थोडा प्रभाव आहे; त्यामुळे त्यांच्यावरचे निर्बंध उठवले तर राजकारणात ते बरीच मजल मारतील, असं रत्नागिरीच्या गिलीगन कलेक्टरला वाटत होतं.

सावरकरांनी स्थानिक पातळीवर सुधारणा राबवताना दिलेल्या भाषणांचे विषय सुधारकी असले तरी त्याच्या अनुरोधानं ते राजकीय प्रचार मोठय़ा चलाखीनं करत असत. सावरकरांना एकतर जिल्ह्याबाहेर घालवावं, नाहीतर जाहीर भाषणं देण्यास मनाई तरी करावी असं त्यावेळच्या पोलीस अधीक्षकाचं मत होतं. तर दुसरीकडे, अस्पृश्यतानिवारण कार्यामुळे भडकलेल्या कर्मठ सनातनी ब्राह्मणांनी मुंबईच्या गव्हर्नरकडे अर्ज केला. त्यात सनातनी हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्यामुळे सावरकरांना हिंदुधर्मविरोधी कृत्य करण्यास मनाई करावी आणि त्यांना जिल्ह्याबाहेर ठेवावं, असं सुचवलं होतं. सावरकरांना घातलेली अट फक्त राजकीय असल्यामुळे सामाजिक सुधारणेचं काम करण्यास त्यांना मनाई करता येणार नाही, असं गृहखात्याच्या अधिकाऱ्यांचं मत असल्यामुळे त्यांनी अशा विनंत्यांकडे दुर्लक्ष केलं.

धार्मिक सामाजिक सुधारणेच्या कार्याला समाजातल्या परंपरानिष्ठ लोकांचा विरोध असतो. त्यांची संख्याही मोठी असते. सुधारणा म्हणजे अल्पमत; रूढी म्हणजे बहुमत. अशा कार्यक्रमांमुळे बहुसंख्य सुधारक समाजात अप्रिय बनत किंवा त्यांना लोकप्रियतेला मुकावं लागत असे. सुधारकांना जर सुधारणा करण्याचा अधिकार आहे, तर समाजालाही सुधारकांवर बहिष्कार घालण्याचा आहे, अशी व्यवहारी दृष्टी सावरकरांची होती. त्यामुळे त्यांच्यासारखे क्रांतिकारी राजकीय कार्यापेक्षा सामाजिक कार्यात गुंतून राहणं ब्रिटिशांच्या पथ्यावरच पडत होतं. अशा कार्यक्रमांना त्यांनी कधीही विरोध केला नाही; पण जर या सुधारणांच्या आडून सावरकर अन्य राजकीय गोष्टी पुढे आणू लागले की मात्र त्यांना आडकाठी केली जात असे. 

सावरकरांनी रत्नागिरीतून मुक्तता झाल्यावर क्वचितच मोठे सामाजिक कार्यक्रम हाती घेतले. पण त्यांच्या सुरुवातीपासूनच्या कामातून प्रेरणा घेऊन ज्यांनी त्या मार्गानं वाटचाल केली त्यांत सध्या विस्मृतीत गेलेले समतानंद ऊर्फ अनंत हरी गद्रे यांचं नाव घ्यायला हवं. सावरकरांच्या प्रभावामुळे त्यांनी आपलं जीवन जातिभेद आणि अस्पृश्यतेला शाप मानून त्याविरोधात समर्पित केलं. अर्थात, या सुधारणांचं बीज त्यांच्या मनात पडलं होतं ते अच्युतराव कोल्हटकरांमुळे. त्यांच्यासोबत ते परळच्या कामगारवस्तीत झालेल्या एका लहानशा स्पृश्यास्पृश्य सहभोजनाला हजर होते. त्यावेळच्या सौहार्दपूर्ण वातावरणामुळे ते खूप प्रभावित झाले. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरही उपस्थित होते. पुढे गद्रे यांनी रत्नागिरीत पतितपावन मंदिराला भेट दिली. त्यावेळी मंदिरात होमविधी आणि सहभोजन सरमिसळ पद्धतीने झालं. या सगळ्यांतून प्रेरणा घेत त्यांनी स्पृश्यास्पृश्यांचे सहभोजनाचे कार्यक्रम महाराष्ट्रात जागोजागी घडवून आणले. झुणका-भाकर सहभोजनाची आणि पुढे स्पृश्यास्पृश्य सत्यनारायण अशा दोन चळवळी सुरू केल्या. आचार्य अत्रेही सुरुवातीला त्यांच्यासोबत असत. सावरकरांनी रत्नागिरीत सुरू केलेल्या समाजक्रांतीची केलेली उठावणी पुढे साऱ्या महाराष्ट्रात पसरली.

देशाला एकात्म, सामर्थ्यशाली बनवूनच त्याचं ऐहिक वैभव मिळवून देता येईल, असं सावरकर मानत असत. त्यांच्या कल्पनेत त्यावेळचा बलाढय़ युरोप होता. ‘युरोप आज जे अजिंक्य झाले आहे ते मुख्यत: यंत्रबळे’ अशी त्यांची समजूत होती. ‘यंत्रशक्तीमुळेच रशिया हे आज जगातील प्रबळांतले प्रबळ, संपन्नांतील संपन्न, प्रत्येक जणास काम, अन्न-वस्त्र नि आनंद समतेने उपभोगू देणारे राष्ट्र झाले आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे. रशिया, जर्मनी, इंग्लंड, वगैरे जी राष्ट्रं होती; त्या बरोबरीने हिंदुस्थान बलवान, शस्त्रसज्ज, अद्ययावत, भौतिक संपदांनी श्रीमंत व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी लिहिलेल्या लंडनच्या बातमीपत्रांपासून ते जात्युच्छेदक निबंधांमध्ये पुष्कळ ठिकाणी याचं प्रत्यंतर मिळतं. बलवान राष्ट्रासाठी हिंदूंचे बलवंत संघटन गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही दृष्टींनी त्यांना आवश्यक वाटत होतं.

द. न. गोखले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रहस्य उलगडून दाखवलं, त्यातले काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. तरुणपणी सावरकरांवर टिळकांच्या जहाल राजकारणाचा प्रभाव होता; तसा तो आगरकरांच्या बुद्धिवादी समाजकारणाचाही पडला होता. महाराष्ट्रात जो ‘आधी सामाजिक की राजकीय’ हा वाद निर्माण झाला, तो मिटविण्यात म. गांधींप्रमाणे सावरकरांचे स्थानही ऐतिहासिक आहे. समाजसुधारणेकडे राजकीय दृष्टीने उपयोजन करणारा विमर्षक म्हणून सावरकरांचं स्थान महत्त्वाचं आहे, असं गोखल्यांनी म्हटलं आहे. हा असा बुद्धिवादी तोंडवळा असलेल्या सुधारणा कार्यक्रम सामान्यांच्या आवाक्यात सहजपणे येत नसतो. इतका टोकाचा विचार समाजाला सहजासहजी मान्य होत नाही. र. धों. कर्वे यांचं उदाहरणही याबाबतीत लक्षणीय ठरेल. तसंच, सावरकरांना लोकसंग्रहाचं भान असलं तरी त्यांचा आत्मकेंद्रित स्वभाव अंदमानचा प्रदीर्घ बंदिवास भोगून, रत्नागिरीत स्थानबद्धतेत राहून आयुष्याच्या शेवटी ते एकलकोंडेपणाकडे झुकत गेला. अनेक थोरामोठय़ांना त्यांची भेट मिळत नसे.

रत्नागिरीत वास्तव्याला असताना आपल्या बुद्धीच्या बळावर सावरकरांनी देव, धर्म, चातुर्वण्र्य, अस्पृश्यता, व्रतवैकल्ये, यज्ञ इत्यादींचे जे विच्छेदन केलं ते अपूर्व होतं. ज्या समाजात ते हा विचार रुजवू पाहत होते त्याची तो आत्मसात करण्याची पात्रता होती का? तर नव्हती; पण ती होण्याकडे मंदगतीने वाटचाल सुरू झाली होती! वरवर सहिष्णू परंतु व्यवहारात जेव्हा परधर्म, स्पर्श, बाटवाबाटवीचा संबंध जेव्हा येतो तेव्हा हिंदू समाज आपल्या अस्तित्वासाठी असहिष्णू बनतो, तरीही आपल्या गतीने यात होणाऱ्या सुधारणांना प्रतिसादही देत असतो. या समाजाच्या ऐतिहासिक वाटचालीत हे अनेकदा समोर आलं आहे. गाय केवळ उपयुक्त पशु, देवता तर नव्हेच नव्हे, असं जे परखड मत ठामपणे मांडलं, ते तेव्हाही कोणाला झेपलं नाही. आजही झेपणार नाही! सामान्य लोकांपासून नि जनआंदोलनापासून त्या बुद्धिवादानेच त्यांना वेगळं केलं होतं, असा द. न. गोखल्यांचा अभिप्राय आहे. 

सावरकरांच्या विचारसरणीचा, कृतीचा, धारणांचा एक अढळ बिंदू हिंदुराष्ट्रवाद आहे. समतेच्या पायावर जातीविहीन हिंदू समाज निर्माण करून एकसंध सामर्थ्यशाली हिंदू राष्ट्र उभारण्याचं त्यांचं ध्येय होतं. इथे एक फरक करायला हवा तो म्हणजे, डॉ. आंबेडकर आणि सावरकर यांच्या समतेच्या प्रेरणा निराळ्या होत्या. सावरकरांच्या सुधारणेचं आवाहन माणुसकी, न्यायबुद्धी, दयाभावनेपेक्षा देशभक्ती आणि स्वाभिमान यांना होतं. जातिभेदामुळे सामाजिक ऐक्याला कशी बाधा येते; देश कसा दुर्बल बनतो यावर ते भर देत. शुद्धीची चळवळ संख्याबळ घटू नये, मुस्लीम-ख्रिश्चनांच्या तुलनेत तरी कमी होऊ नये म्हणून चालवली होती.

य. दि. फडक्यांनी सावरकरांच्या भोवती अनेक कारणांनी ज्या मर्यादा पडल्या होत्या त्यांतून ते बाहेर येऊ शकले नाहीत, असा अभिप्राय दिला आहे. मिल, स्पेन्सरचे विचार, युरोपियन उपयुक्ततावाद, उदारमतवाद यांचा महाराष्ट्रीय बुद्धिवंतांच्या मनावर प्रभाव पडला. त्यांत सावरकरही होते. यासोबत चित्पावनी ब्राह्मणी वर्चस्वाचा जो प्रभाव महाराष्ट्रातील विचारविश्वावर पडला होता, तो चित्पावन जातीत जन्मलेल्या सावरकरांनी पुढे विकसित केला. योगवसिष्ठ, वज्रसूची, मनुस्मृतीबाबतचं लिखाण वाचून त्यातले काही दुवे आपल्याला कळतात. पुढे सावरकरांनी सामाजिक-सांस्कृतिक वर्चस्व अबाधित राखण्यासाठी यातून व्यापक हिंदुत्वाची चौकट प्राप्त करून दिली.

भा. कृ. केळकरांनी सावरकरांच्या समाजसुधारणांचं केलेलं मूल्यांकन इथे नोंदवायला हवं. ते लिहितात, ‘सावरकरांचा पुरोगामी, विज्ञानवादी, हिंदुविचार हा अनुयायांनी उपेक्षिला व विरोधकांना त्यांच्या राजकीय हिंदुत्वाचं वावडं असल्यामुळे पुरोगामी सामाजिक हिंदुत्वाची त्यांची संकल्पना राजकीय अस्पृश्यतेमुळे विचारातही घेतली गेली नाही. त्यामुळे सावरकरांचं सामाजिक कार्य आतापर्यंत झालेल्या सर्व सुधारकांपेक्षा वेगळं मूलगामी असूनही त्याचं सामाजिक मूल्यमापन झालं नाही. हिंदुत्वाचा एकान्तिक व आक्रमक विचार करणारा एवढीच त्यांची ओळख देशाला झाली. १९३७ नंतर सावरकर हिंदुत्वाचं आणि अखंड भारताचं राजकारण करू लागले. सामाजिक क्रांतीचं एक टोक गाठल्यावर सावरकरांनी ती सोडून दिली. परिणामी, हिंदुत्वाचा अजेंडा असलेली समाजसुधारणा चळवळ पाठी पडली. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक सुधारणा बदलत्या परिस्थितीमुळे सहज रूढ होऊन गेल्या; अनेक कारणांनी त्यांना चालना मिळत गेली. स्वतंत्र भारतात राजकीय अस्पृश्यतेमुळे त्यांचं समाजसुधारणेचं कार्य दुर्लक्षित राहिलं.