डॉ. चैतन्य वेंगुर्लेकर
आधी काय होतं?
मोबाइल उघडल्यावर माझ्या डोळ्यांसमोरून रिल्स सरकायला लागत. रोजची काय परिस्थिती असे? तर माझ्यासारखाच रागावलेला कुणीतरी काहीतरी तावातावाने बोलतोय, जो बोलतोय तो कसा चुकीचा आहे त्यावर दुसराच कुणीतरी तिसर्‍याच रिलमध्ये पोटतिडकीने ओरडून सांगतोय, चौथ्यात कुणी कुणाला शिवीच घालतोय, मला कुठलीतरी एक भूमिका उगीचच पटायला लागली आहे. पण खरंच भूमिका पटते आहे की माझ्या मनात मगाशी निर्माण झालेल्या रागाच्या, दु:खाच्या, नैराश्येच्या हतबलतेच्या भावनांना सुखावणारी भूमिका मला आवडली आहे? काहीही असो मी ते पुन:पुन्हा बघतोय. सोशल मीडिया हुशार आहे. त्याला समजलं आहे मला काय हवंय. माझ्यासमोर मला जे हवं आहे ते तो देतोय. आताही, नंतरही, उद्याही देत राहील.

माझ्या भावना सुखावण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कुठेही जात नाही, काही करत नाही, कारण त्या आभासी जगात पूर्ण होतायत. काहीही न करता. डोपामिन, एंडोर्फिन, ऑक्झिटोसिन, सेरेटोनिन. सगळंच मला हवं तेव्हा नुसतंच एक बोट उचलताच मिळतंय असं वाटू लागलंय. हे आहेत सगळे हॅपी हार्मोन्स. हवे आहेत मला. पण… थांबा. आभासी जगात हेसुद्धा आभासीच आहे. मी न नाचताच मला मजा येतेय रिल्स बघून. मी बेडमधून न उठताच मला मजा येतेय बाईकवरून लडाखला गेल्याची. आभास… पण थांबा ना अजून जरा. आणखीन एक खरा खरा हार्मोन मिळतो आहे मला. तो आभासी नाहीये. कोर्टिझोल. माझ्या रागाला, दु:खाला, वेदनेला, नैराश्याला, हतबलतेला सुखावताना हा हार्मोन भेटतो. आणि मग राहतोच तो शरीरात कित्येक तास. ठाण मांडून बसतो आणि पोखरत राहतो माझ्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना आणि क्रियांना. माझी शुगर, माझं बीपी, माझी पचनक्रिया सगळंच बिघडून टाकतोय. वजन वाढलंय. उत्साहच राहत नाही दिवसभर.

मला खूप सुंदर खोटं सांगितलं गेलं : डिजिटल जग मोफत आहे. सोशल मीडियावर शिरायला तिकीट नाही, एखाद्याच्या आयुष्यातील रिल्स पाहायला वर्गणी नाही, जागतिक चर्चेत सहभागी व्हायला कुठलंही शुल्क नाही. पण खोटं आहे ते. खोटंच होतं ते सगळं. किंमत मी कदाचित पैशांत मोजत नव्हतो.

डिजिटल जगात जाण्याची सुरुवात जवळजवळ नेहमी एका भावनेने होते. मी एकटा पडलो की कनेक्शन्सच्या शोधत फोन हातात घ्यायचो. कंटाळा आला की नव्या नोटिफिकेशनचा क्षणिक आनंद हवा असायचा. अस्वस्थ वाटलं की लक्ष विचलित करायचा मार्ग शोधायचो. स्वत:ला अपुरं वाटलं की व्हॉलिडेशन, कौतुक अशा गोष्टींसाठी लाइक्स शोधायचो.

आत गेल्यावर हे जग माझ्या भावनांना पकडून त्यांना आणखी मोठं करायचं. काय बोचतंय, काय दुखावतंय, काय राग आणतंय, काय ‘मी बरोबर आहे’ अशी उत्तेजना देतंय, हे ते शिकतं आणि आपोआपच स्वत:हून मग मला निवडक गोष्टी दाखवतं. पण तरीही एक प्रश्न राहतोच. हे सगळं कशासाठी करतं हे सोशल मीडिया? खरं तर हे समजून घेणं सोपं आहे. आपण सगळेच यातून कधी ना कधी गेलो आहोत किंवा आजही, आताही जातो आहोत. थोडं समजून घेऊया. तर सोशल मीडिया हे सगळं करतं आपल्याला गुंतवून ठेवण्यासाठी. आणि गुंतवून ठेवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे माणसाच्या भावना. आपल्या भारतीय समाजात तर फारच सोपा उपाय. हात, पाय, डोकं, पोट यापेक्षा भावना जास्त दुखावतात आपल्या.

तुमच्या फीडची रचना पाहा ना. एखाद्या मित्राच्या परफेक्ट सुट्टीचा फोटो तुमच्या मनात ईर्षा निर्माण करतो, ‘फो मो’ची( फिलिंग ऑफ मिसिंग आऊट) टोचणी देतो आणि माझं आयुष्य कसं कंटाळवाणं आहे असं वाटायला लावतो. राजकीय पोस्ट या राग भडकावण्यासाठीच असतात. तो राग तुम्हाला कमेंट करायला, पोस्ट शेअर करायला, वाद घालायला भाग पाडतो. त्या रागात तुम्हाला तात्पुरता उद्देश मिळतो, ‘तुम्ही योग्य बाजूला आहात, आवश्यक गोष्ट करता आहात.’ असं तुम्हाला वाटायला लागतं. हे जे वाटणं आहे तेही आभासीच असतं. पण ते खरं वाटतं, कारण ते तुमच्या भावनांना प्रमाणित करतं. पुन्हा पुढचा प्रश्न. ते आपल्याला गुंतवतच का? त्यात त्यांचा काय फायदा? मी यापूर्वीच म्हणालो त्याप्रमाणे भांडवलशाहीचा हा सगळा खेळ आहे. तुम्ही सोशल मीडियावर राहता ते भावनांच्या भांडवलावर. तुमच्या भावनांच्या भांडवलावर तुमची गरज काय या पल्याड जाऊन तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय विकता येईल याचाही अंदाज सोशल मीडिया अचूक काढतं. जेवढा वेळ तुम्ही सोशल मीडियावर राहता तेवढा वेळ ते तुमच्यासमोर कुठली ना कुठली जाहिरात आणतं. त्याची तुम्हाला काय गरज आहे हेही पटवून देतं. तुमच्या भावनांच्या गुंत्यातले तुकडे करून ते जाहिरातदारांना विकले जातात. बस, एवढ्याकरता हा सगळा खटाटोप सोशल मीडिया करतं. तुम्हाला सगळं मोफत देतं.

मोफत? या मोफत वाटणार्‍या गोष्टीच्या बदल्यात तुम्ही त्यांना त्यांचे ग्राहक बनण्याव्यतिरिक्त काय देता माहिती आहे? तुमचा आयुष्यातला अमूल्य वेळ त्यांना देता, तोही मोफत. तुमच्या मुलांच्या, जोडीदाराच्या, आईवडिलांच्या हिश्शाचा तुमचा वेळ काढून देता, मोफत. ज्या वेळेचा उपयोग तुम्ही खर्‍याखुर्‍या गोष्टी करायला केला असता तो वेळ तुम्ही त्यांना देता, पूर्णपणे मोफत.

आता काय झालं?

माझ्या लक्षात आलं की माझं आयुष्य या सोशल मीडियाला देतो आहे. अगदीच मोफत. आणि मग माझा डिजिटल डिटॉक्सचा प्रवास सुरू झाला. कोणत्याही व्यसनाला रामराम ठोकल्यावर सुरू होतात तसं. इथंही ते झालं.

डिजिटल डिटॉक्स ही एखादी फॅशन किंवा चैन नाही. ती भावनिक स्वच्छतेची गरज आहे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे तंत्रज्ञानाला शत्रू मानणं नव्हे; ती आपल्या भावनिक सार्वभौमत्वाची पुन:प्राप्ती आहे. मी सुरुवातीला मोबाइलमधून सगळ्या सोशल मीडिया साइट्स काढून टाकल्या. अस्वस्थेशिवाय काहीच नुकसान झालं नाही. खूप वेळ शिल्लक राहायला लागला. मग मी मला काय काय गोष्टी करायच्या आहेत त्याची एक यादी केली. त्यात अगदी बागकामापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत आणि भरतनाट्यम् शिकण्यापासून ते मोटारसायकल रेस परत चालू करण्यापर्यंत सगळं होतं. हळूहळू या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. व्यायाम सुरू केला. वजन नियंत्रणात आलं. माझ्या भावनांवर आता माझं नियंत्रण होतं. त्यामुळे शुगर, बीपी याची भीती राहिलीच नाही. वेळेवर लक्ष देऊन जेवणं, जेवल्यावर मोबाइल घेऊन लगेचच आडवं न होणं, यामुळे पचनशक्ती सुधारली. घरात सगळ्यांना वेळ देता आला.

एक महिन्याचा डिजिटल डिटॉक्स अवघड होता. मोबाइलचा, इयर-प्लगचा आवाज बंद होता. शांततेच्याही कानठळ्या कानात घुमत होत्या. हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. माझ्या हातात मोबाइल ऐवजी खुरपं आलेलं. मातीचा स्पर्श होत होता. पंचेंद्रियांनी मी माती, झाडं, अवजारांना अनुभवत होतो. मी माझ्या हातांनी लावलेल्या टोमॅटोच्या रोपांना पाहिलं फळ आलं तेव्हा त्याचा फोटो काढावा आणि सोशल मीडियावर नोंदवावा अशी उर्मी दाटून आली. त्या क्षणाला मी मनाला आवर घातला नसता, तर पुन्हा मी त्या चक्रात अडकलो असतो.

मोटारसायकल याच्या उलट होती. मोठा आवाज, तात्काळ उपाय. थ्रॉटल फिरवताना वारा माझ्या जॅकेटला धडकत मागे जात असल्यासारखा वाटला आणि इंजिनच्या कंपनाने मोबाइलची कंपनं विरून गेली. आणि भरतनाट्यम्! मी कधी असं काही करायला घेईन असं वाटलंच नव्हतं. अनपेक्षित आनंद होता तो. खिशात फोन नसताना, फोनचा ताल नसताना बोल आणि टाळ्यांवर अडवू करायचे, स्क्रीन वरून लक्ष काढून स्वत:च्या शरीराच्या लयबद्ध हालचालींवर लक्ष केंद्रित करायचं. या सगळ्यांशी माझं एक वेगळं नातं निर्माण झालं. संगीत, नृत्य, ताल, लय, अभिनय आणि मी. आता मी या सगळ्यांचा भाग झालोय.
adv.vengurlekar@gmail.com
(लेखक क्रीडा आणि व्यायाम प्रशिक्षक आहेत.)