आपल्याकडची माहिती आपण कशी मांडतो, ते महत्त्वाचे. डायरी लेखन, पत्र लेखन हे इतिहासजमा झाले. हल्ली प्रत्य़ेकाला समाजमाध्यमांतून व्यक्त होण्याची घाई झाली आहे. खरे तर समाजमाध्यमात तातडीने व्यक्त होता येते. त्यावर प्रतिक्रियादेखील तातडीने येतात. पण त्या लेखनावर काम करून त्याला भरपूर सुधारून त्यातून कथा किंवा लेखाचा ऐवजदेखील तयार होऊ शकतो. अनेकदा आपल्याला असे अनेक लेखक दिसतात, ज्यांच्याकडे दीर्घ लेखनाची, कथांची क्षमता आहे, ते समाजमाध्यमांवर आपल्या कल्पना संपवत चालले आहेत. समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याची घाई टाळली, तर आपल्याकडे असलेल्या कल्पनांचा अधिक चांगल्या प्रकारे लेखनासाठी वापर करता येऊ शकतो.

गंभीर लिखाण कराय़चे असल्यास या माध्यमांपासून दूर राहणचे इष्ट. एकदा तुम्ही एखादा लिखाणप्रकार लिहिण्यात वाकबगार होता, तेव्हा तुम्हाला सातत्याने त्या प्रकारच्या लिखाणाची मागणी मासिके, दैनिके आणि दिवाळी अंकांकडून व्हायला लागते. मी सुरुवात चित्रपट समीक्षणाने केली. पुढली पंधरा वर्षे मी सिनेमाची समीक्षाच केली. पुढे कथा लिहिण्यासाठी वेळ आणि शक्यता तयार झाल्या. माझ्या वाचनात जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या कथा आल्यानंतर मी स्वत:ला आयुष्य़ाच्या एका टप्प्यावर कथा लिहिण्यासाठी उद्याुक्त केले. कथा दरवेळी कुठल्या ना कुठल्या दृश्यात दिसू लागली. ती दिसली की पुढे कसे जायचे हे माझे ठरत नाही.

दिवा हातात घेतल्यानंतर त्याचा समोर जितका प्रकाश दिसतो, तिथपर्यंत माझे त्याबाबतचे चाचपडत चालल्यासारखे लिहिणे होते. लिहिता लिहिता नवीन मार्ग सुचतात. आधी काहीच स्पष्ट नसलेला भाग दृश्यमान होतो. कथा कधी काही काळासाठी थांबतेदेखील. पण नंतर तिला नव्याने घडविता येते. त्यात आधी जे सांगायचे, मांडायचे तेदेखील बदललेले असते. लिहायला कशी सुरुवात करावी असे मला जेव्हा विचारले जाते, तेव्हा त्याचे उत्तर बसून लिहायला लागणे, हीच खरी सुरुवात. तुम्ही अडखळाल, ठेचकाळाल, पण तुम्हाला तुमचा मार्ग दिसण्याची शक्यता त्यातूनच येऊ शकेल. कोणतेही नियम वगैरे न पाळता मोकळेपणाने जितके आणि जसे लिहाल ते महत्त्वाचे. त्यातूनच पुढे लेखक म्हणून घडू शकाल.