युगधर्म म्हणून काही असतोच. आपण कितीही शहाणे, अभिरुचीपूर्ण, विचारी इत्यादी असलो, तरी त्या-त्या काळातल्या समकालीनाशी टाका भिडवून राहणं सोडवता येत नाही. हा-हा म्हणता आपण प्रवाहाबाहेर फेकलं जाण्याची भीती असते. म्हणूनच टीव्ही विकत न घेता मुलांना वाढवणार्या लोकांची (नि त्यांच्या मुलांची) जितकी दया यायची, तितकीच आम्ही सोशल मिडिया वापरत नाही असं उच्चरवानं आणि उच्चभ्रूनिशी सांगणार्या लोकांचीही येते.
आणि तरीही समाजमाध्यमांचा डीटॉक्स करण्याची वेळ येतेच. कारण जीमेल, व्हॉटस्ॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, मेसेंजर, ऑफीसच्या इमेल्स, ऑफीसचं चॅटिंगॲप, यूट्यूब हे सगळं हल्ली एका मोबाईल फोनमध्ये नांदतं. त्यावरच फोन आणि एसेमेस. त्यात ओटीटीची भर. त्यातच वर्तमानपत्रं. कधीकधी इ-पुस्तकांचंही. या सगळ्यांची नोटिफिकेशन्स स-त-त, १२-महिने-२४-तास चालू असतात. वाद, संवाद, तडकावणे, चुचकारणे, चिडवणे, दाखवणे, मिरवणे, कुचाळक्या, वाचन, लिहिणं-नोंदी-याद्या करणं, फोटो काढणं… हे सगळं एकसमयावच्छेदेकरून चालू असतं. आपल्या मेंदूची शंभर शकलं होतील, असा शाप कम् धमकी देण्याची वेळ वेताळावर येऊच नये, आपणच त्याची पुरेपूर व्यवस्था करावी अशातला प्रकार असतो.
यातून शांतपणा मिळवावा कसा? त्याची कधी ना कधी गरज भासतेच. एरवी डोक्यातून अक्षरश: धूर निघेलसं वाटायला लागण्याइतकं भंजाळायला होतं. म्हणून डीटॉक्स.
ते करणं सोपं असतं का? अजिबात नाही. व्यसनी माणसाची काय अवस्था होत असेल, त्याची चुणूक मिळते. पण ते अशक्य असतं का? अजिबात नाही. जमतं. विशेषत: कागदी पुस्तकं, व्यायाम, लोकांना प्रत्यक्ष भेटणं, हातानं करण्याची कामं आणि छंद… इत्यादी सेन्सरी – सेंद्रिय अनुभवांच्या मदतीनं हळूहळू, प्रयत्नपूर्वक जमतं. अविश्वसनीयरीत्या शांत आणि निरोगी वाटतं.
फक्त निदान मला तरी फक्त डीटॉक्स आणि फक्त सोशल मिडियावर बेबंद उंडारणं या दोन्ही टोकांची तितकीच गरज वाटते. आलटून पालटून. काही काळ असा, काही काळ तसा. मेंदूच्या जोडण्या पार विरून जाऊ नयेत, आणि आज-आत्ताशी असलेलं नातं तुटूही नये.
meghana.bhuskute@gmail.com
(लेखिका जर्मन भाषातज्ज्ञ, संपादक आहेत.)
