सोनाली कुलकर्णी
मी नानांना पहिल्यांदा पाहिलं ‘एनसीपीए’मध्ये. डॉक्टर जब्बार पटेलांच्या कुसुमाग्रजांवर आधारित डॉक्युमेंटरीचं चित्रीकरण सुरू होतं. त्यात मी आणि ना. धो. महानोर ‘पळस’ ही कविता म्हणणार होतो, पण त्याच्या आधी तिथे ऑथेल्लोचं चित्रीकरण सुरू होतं. नाना आणि पूजा पवार दोघं त्यात काम करत होते. मी कुठेतरी त्या अंधार्या प्रेक्षागृहातील एका रिकाम्या खुर्चीत बसून ते पाहत होते. त्यावेळी त्यांना समोर भूमिकेत पाहताना मला ते ‘लार्जर दॅन लाईफ’ वाटले होते. त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली, तेव्हा मात्र आमची सुरुवात बर्याचदा तू तू मै मै… पद्धतीनेच झाली, पण त्या टोकदार प्रसंगांमधूनच का होईना आमच्यात कधीही न संपणारं असं सौहार्दाचं नातं फुललं.
नानांचा रांगडा स्वभाव आणि आमच्या दोघांमध्ये रंगलेल्या वादविवादांचे प्रसंग मला इथे मुद्दाम सांगावेसे वाटतात. अनेकदा समोरचा माणूस आपल्याला सहज आकळत नाही. एनसीपीएमधली त्यांची ती ऑथेल्लो करतानाची प्रतिमा मनात ठसली, त्यानंतर बर्याच वर्षांनी मला एका चित्रपटाची ऑफर आली होती, पण काही कारणानं मला त्या निर्मात्याचं वर्तन आवडलं नाही, त्यामुळे दिग्दर्शकाचाही मी विचार केला नाही आणि त्या चित्रपटाला नकार दिला. त्यावेळी मी भाड्यानं एका घरात राहत होते आणि तिथला नंबर मिळवून नानांनी मला त्या चित्रपटातील सीन्स वाचण्यासाठी रिहर्सलला त्यांच्या घरी येण्यासाठी सांगितलं. त्यावर मी तो सिनेमा करत नाही, असं सांगितल्यावर ते खूप चिडले. ‘‘काय समजतेस काय स्वत:ला? माझ्या समोर सिनेमे निवडण्याइतकी मोठी झालीस का तू?’’ असं त्यांनी रागातच विचारलं, पण तरीही मी त्यांना माझं चित्रपट नाकारण्यामागचं कारण सांगत त्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं. त्यांच्यासमोर माझी भूमिका ठामपणे मांडण्याचा हा माझ्या आयुष्यातला असा एकच प्रसंग नव्हता.
नानांबरोबर मी तीन चित्रपट केले. तिन्हीही आयकॉनिक सिनेमे. मिलन लुथरिया आणि रमेश सिप्पींचा ‘टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह’. उमेश कुलकर्णी आणि अभिजीत घोलप यांचा ‘देऊळ’ आणि समृद्धी पोरेचा ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’. त्या अर्थानं आमची ओळख ही या तीन सिनेमांची. तर मिलन लुथरियाचा ‘टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह’ करतानाही आमच्यात अशी छोटीमोठी भांडणं रंगली होती. चित्रिकरणा दरम्यान कुठलाही सीन करण्याआधी नाना खूप सूचना करत असत. त्यावेळी खरं तर या महान अभिनेत्यासमोर मी कशी उभी राहणार, माझ्या चुका ते पदरात घालतील का? अशी कुठलीच भीती त्यांनी जाणवू दिली नाही. एकदा सेटवर आले की ते त्यांच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या व्यक्तिरेखेत शिरायचे. तर त्यावेळी कुठलातरी सीन करत असताना ‘मी वाक्यं कशी म्हटली पाहिजेत’ हे ते सांगायला लागले. माझं एकच म्हणणं होतं की, आपण दोघेही कलाकार आहोत. आपले संवाद पाठ झाले आहेत, आता वाक्यांची दिग्दर्शकासमक्ष तालीम होऊ देत. त्यासाठीच तर तो आहे. त्यावर त्यांचं म्हणणं होतं, ‘‘मिलनचं नाही, मी आधी काय सांगतोय ते ऐक. या वाक्यानंतर हस… इथे असं बोल…’’ त्यांच्या सूचना सुरूच राहिल्या. मग आमच्यात शाब्दिक चकमक उडाली. शेवटी त्यांना गप्प करण्यासाठी मी म्हटलं, ‘‘अहो, तसं करत बसले तर मी लेडी नाना पाटेकर वाटेन ना! आणि मला नाही तसं दिसायचंय.’’ अशाच आणखी एका जेलच्या दृश्यात ते मला सांगत होते, तुझ्या एका डोळ्यात अश्रू असायला हवेत आणि दुसर्या डोळ्यात हसू दिसायला हवं. तो त्यांचा इतका आग्रह सुरू होता, की थोड्या वेळाने सेटवर जो तो मला सूचना देऊ लागला होता. शेवटी मी चिडले आणि सगळ्यांना दहा मिनिटे बाहेर जाण्यास सांगितले. माझा अवतार बघून सगळे निमूट तिथून निघून गेले आणि पुढच्या पंधरा मिनिटांत शांतपणे चित्रीकरण सुरू झालं. मला वाटतं, या अशा प्रसंगांमध्ये मी बोटचेपी भूमिका न घेता, मला जे योग्य वाटेल ते ठामपणे सांगितलं आणि तसंच वागले. हा माझा स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा कुठे तरी नानांनाही आवडला होता. ‘टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह’ चित्रपटानंतर आमच्यातलं ट्युनिंग खूप छान जमलं.
नानांबद्दल नेहमी सहजपणे ते तिरसट होते किंवा रागीट होते, अशी चर्चा होत राहिली. एखाद्या कलाकाराबद्दल असं म्हणणं सोपं असतं, पण तो कसा जगला, त्यानं आयुष्यात काय कमावलं ते पाहणंही तितकंच गरजेचं आहे. मी स्वत: नानांना याबद्दल विचारलं होतं, ‘‘असं का वागायचात तुम्ही? कशाला वेगवेगळ्या सुपरस्टार लोकांचे अपमान केलेत?’’ तर त्यांनी रांगडंच उत्तर दिलं… ‘‘एका अत्यंत सामान्य कुटुंबातनं मी आलो. माझ्याकडे रूप नाही, रंग नाही, नाव नाही, खानदान नाही, पैसा नाही, शिक्षण नाही. मग मी इथं कसा टिकेन? पहिला सिनेमा मिळाला तेव्हा त्याचा काही दिवस आनंद व्यक्त केला. मग शूटिंगला गेलो त्या पहिल्या दिवशीच कळलं की आपण त्या सिनेमातच नाही. कुणी कळवायची तसदीच घेतली नाही. अपमानास्पद वाटलं, लाजल्यासारखं झालं, खुन्नस तरी कशावर काढणार? मग अरे-तुरे करूनच सगळ्यांशी बोलायला सुरुवात केली. मी तेवढा घट्ट आणि कणखर राहिलो नसतो तर मला कुणी वार्यालासुद्धा उभं केलं नसतं.’’ नानांनी कोणी दिलेला मोठेपणाही स्वीकारला नाही. एखाद्याला मस्तपैकी काहीतरी सुनवत अरे-तुरे करत संवाद सुरू झाला की समोरचेही मोकळे होत असत. नानांसमोर एकदम माणूस म्हणून ते सहजतेने संवाद साधत. त्यानंतर आम्ही ‘देऊळ’ केला. त्यातलं माझं आणि नानांचं नातं खूपच सुंदर आहे. म्हणजे ते ज्या पद्धतीनं गिरीशनं लिहिलंय आणि उमेशनी माझ्याकडनं करून घेतलंय त्याला तोड नाही. त्यातली वहिनी ही खासगीत नवर्यावर खूप दादागिरी करत असते. फारच मस्त करून घेतलंय ते उमेशनी. तर तिथलं वातावरण नानांसाठी सगळं नवीन होतं. सेटवरच्या सगळ्या मुलांबरोबर त्यांना कायम मज्जा करायची असायची. कोणी काही एखादी ॲडिशन घेतली की त्यांना त्याच्या वरचढ काहीतरी करायचं असायचं. त्यांचा हा जो ‘मॅड क्युटनेस’ होता, तो कायम हजर असे. त्यांना सगळ्यांपेक्षा छान काम करायचं असायचं. अन् ते करायचेही. शूटिंग संपलं की मग आउटडोअरला वगैरे एक दरबार जमवायचा, सगळ्यांशी गप्पा मारायच्या. ‘सध्या तुमच्या भावविश्वात काय चाललंय’, ‘मुलं-बाळं, काय कोणाचं कोणाशी डेटिंग सुरू आहे, काय प्रकरण…’ ही एवढी अशी माहिती त्यांना कशाला पाहिजे असं वाटायचं. पण, त्यांनी या सगळ्याचा कधी विचार केला नाही. मराठी मालिकाही ते खूप बघायचे. त्यांना सगळी बित्तंबातमी असायची. कुठले कोण कोण नवीन कलाकार आहेत. त्यांना ते भेटायचेदेखील. कुणाच्या कामाबद्दल डोंगराएवढं कौतुकदेखील चाले. कौतुक करावं तर ते नानांनीच… अगदी माझंही त्यांच्याकडून हौणारं कोडकौतुक मला मनापासून आवडायचं.

नानांना काही सांगायचं असेल किंवा त्यांच्याकडून काही करून घ्यायचं असेल तर माझ्यावर अनेकदा मध्यस्थीची जबाबदारी येऊन पडायची. ‘देऊळ’च्या वेळेला नाना माझ्या पाठीवरनं उडी मारतात, असा काही एक आमचा सीन होता. त्यावेळी काहीतरी तांत्रिक गडबड होत होती. ग्रीन स्क्रीन टीव्ही चालू होता. मग एकदा साऊंड चुकला, एकदा टीव्ही ऑन नाही झाला. तर ते वैतागून म्हणाले, ‘‘अरे काय, किती वेळेला मला उड्या मारायला लावताय? मी ६२ वर्षांचा आहे, रात्रीचे १० वाजलेत, किती वेळ आपण शूट करतोय?’’ त्यावेळी एकदमच तणावाचं वातावरण निर्माण झालं, शेवटी शूटिंग हसतखेळत व्हायला हवं म्हणून ‘‘अरे, चला सगळ्यांनी नीट करा रे…’’ म्हणत मी बोलायला सुरुवात केली. मध्येच उमेशलाही ‘‘अरे तू दिग्दर्शक आहेस ना…’’ असं म्हणत सगळ्यांना सूचना द्यायला लावली आणि मग तो सीन पूर्ण झाला. असाच आणखी एक प्रसंग आठवतो तो म्हणजे पुण्याच्या केळकर डॉक्टरांचा रेफरन्स खरं तर मला नानांनीत दिला होता. पण त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी नानांना प्रमुख पाहुणे म्हणून येण्यासाठी राजी करण्याची त्यांनी मला गळ घातली. ‘‘तू नाना सरांना यायला सांग.’’ मी म्हटलं, ‘‘अहो, ते तुमचे स्नेही आहेत तर तुम्ही सांगा.’’ शेवटी माझ्यावर जबाबदारी येऊन पडली. मी तर कितीतरी वेळेला नानांची बॉडीगार्डही झाले आहे. त्यांना लोकांनी सह्या वगैरे मागून, फोटोसाठी आग्रह करून त्रास देऊ नये म्हणून मीच गर्दीपासून त्यांना दूर ठेवायचे.
मग ते माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आले होते. मी ‘लोकसत्ता’साठीच लिहिलेल्या लेखांचं पुस्तक होतं, तर मग प्रकाशनाला कोण प्रमुख पाहुणे? मी नानांनाच ‘‘तुम्ही याल का?’’ विचारलं. मी त्यांना पुस्तक आधी वाचायला दिलं. तेही दिलेला शब्द पाळून अगदी वेळेत आले. त्या कार्यक्रमालासुद्धा मी त्यांची बॉडीगार्ड झाले होते. कारण, कितीतरी पत्रकार आणि मीडिया हाऊसेस आले होते. ते सगळ्यांशी फार प्रेमाने बोलले. सगळ्यांसमोर चेष्टा करणं आणि आपली दोस्ती दाखवणं हा त्यांचा अत्यंत आवडता शौक होता. नानांचं असं भरभरून प्रेम माझ्या पदरी पडलं. माझी, माझ्या घरच्यांची चौकशी कायम असायची. माझा नवरा नचिकेतला ते जावईच म्हणायचे. ‘‘नचिकेत कसा आहे? काय म्हणतोय रियाज? आता कुठे आहे तो? सोनीमध्ये आहे का काय… स्टारमध्ये आहे का… कुठे आहे गं सध्या? बालाजी? म्हणजे ते एकता कपूरचं ना?’’ असं काहीतरी, मग कावेरीची चौकशी, ‘‘अरे बापरे! बोलायला लागली?, किती वर्षांची आहे? अरे बापरे, पाच वर्षांची झाली? ’’ म्हणजे फार बातम्या लागायच्या त्यांना सगळ्या माझ्या कुटुंबियांच्या.
नानांना परदेश प्रवास करायलाही खूप आवडायचं. कोणाला न कळू देता त्यांच्या युरोपच्या ट्रिप असायच्या, ते अमेरिकेत जायचे. आणि तिथे खूप दिवस फिरून यायचे. हे ते कधीपासून करायला लागले, मला माहिती नाही. पण ते जवानांना भेटायला जायचे, वारंवार जायचे. माझ्याकडे एक कप आहे, जो त्यांना भेट मिळालेला होता मिलिट्रीचा आणि तो त्यांनी मला दिला. तोही खूप वर्षांपूर्वी… त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक खेळाडूंना शूटिंग रेंज बांधून दिल्या. तेजस्विनी सावंतपासून कित्येक क्रीडापटूंना शूटिंग इक्विपमेंट्स, रेंजसाठी सढळ हाताने मदत केली. ते कोणाला माहितीही नसेल आणि त्याचा उल्लेख होत नाही. त्यांना स्वत:ला शूटिंगची खूप आवड होती. म्हणूनच त्यांनी या क्रीडा प्रकारासाठी सातारा, कोल्हापूर आणि असंख्य गावांमधल्या मुलांना मदत केली.
नानांवर # टी ळःः नंतर जो किटाळ आला, त्यांच्यावर जबरदस्त टीका झाली. त्यावेळी मलाही बर्यापैकी विचारलं गेलं की, ‘‘तुझं काय म्हणणं आहे?’’ तर मी म्हटलं,‘‘माझा वैयक्तिक अनुभव मी मांडलेला आहे.’’ नानांमध्ये एक टारगट स्वभावाचा तरुण लपलेला होता. पण एखाद्या स्त्रीला त्रास द्यावा म्हणून त्यांनी कधी काही केलेलं नाही. समोर असलेल्या ग्रुपमध्ये हशा पिकवण्यासाठी आपण एखादा विनोद पेरतो ना, तशी त्यांची चेष्टामस्करी चालायची. मी वर म्हटलं तसं त्यांच्याबरोबर माझे अनेकदा वाद झालेले आहेत, पण वाद घालताना ते समोरच्यालाही बोलण्याची संधी द्याायचे. म्हणजे ‘‘गप्प बस, माझंच ऐकून घे.’’ असा त्यांचा स्वभाव नव्हता. समोरच्याकडे मुद्दा असेल तर ते जाणून घ्यायचे. कदाचित मुद्दामहून एखाद्याला ‘‘चला खेळू या, आता आपण दोघं भांडण भांडण खेळूया.’’ अशाप्रकारे आव्हान देत ते बोलतंही करायचे. पण, ते जर समोरच्याच्या लक्षात आलं नाही तर त्यांच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यताच अधिक असायची.
मराठीतले काही कलाकार आहेत, जे हिंदीत हिरो झाले. नाना मात्र हिंदी चित्रपटांचे प्रमुख अभिनेते झाले. तर तिथे तग धरण्यासाठी, तिथे टिकाव लागण्यासाठी त्यांनी अनेक आक्रमक लकबी, शैली आत्मसात केल्या होत्या. समोरच्याला काहीतरी शाब्दिक अपमानास्पद वाटेल असं बोलणं किंवा थोडीशी गुर्मी दाखवणं हे त्यांच्यात येत गेलं, त्यांच्यात उतरत गेलं. पण, खरंतर ते भयंकर तरल आणि कोवळ्या मनाचे होते. ‘ऑगस्ट रश’ नावाचा एक सिनेमा आहे. त्याच्यात एक लहान मुलगा आहे- ज्याला सतत संगीत ऐकू येत असतं, तसे नाना मला आज दिसतात. त्यांच्या शेतात पहुडलेले, कुठल्याशा झाडाखाली… आजूबाजूला डोलणार्या पिकांमध्ये… त्यांनी मला तिथली एक कविताही ऐकवली होती की, कसा उनाड वारा येतो अचानक आणि मग एकेक पान गळून पडतं… गेल्या काही वर्षांमध्ये… समाजमाध्यमांच्या आघातात ते बर्यापैकी शांत झाले होते, त्यांनी त्यांच्यातला मृदुपणा घट्ट धरून ठेवला होता. आणि आता ते जिथे पोहोचले आहेत, तिथे त्यांना गुरुस्थानी असणार्या माणसांजवळ, त्यांच्या पायाशी बसून त्यांना भयंकर आवडणारी गोष्ट म्हणजे कविता ऐकवून दाखवत असतील…
नेहमी माणसांमध्ये असणारे नाना… जेव्हा त्यांना त्रास होत होता, तेव्हा कुठलाच बॉडीगार्ड आणि कुठलीच जवळची माणसं त्यांच्याजवळ नसावीत, हे हृदयद्रावक आहे. त्यांना स्वत:ला खूप आवडलं असतं अजून काम करायला. आणि त्याहीपेक्षा काम करून जे जे मिळालं आहे ते दान करायला त्यांना अधिक आवडलं असतं. त्यांच्यासाठी त्यांनीच मागून घेतलेला दिवस होता कदाचित तो… सलाईन लावलंय, डॉक्टरांची धावपळ चाललीय, ऑपरेशन करावं लागणार आहे… या कशाच्याही फंदात न पडता आपला माणूस पैलतीरी पोहोचलेला आहे. ज्या निष्ठेने त्यांनी माणसांना मदत केली, त्याची जागा कोणी घेऊ शकणार नाही. आणि त्यांच्या एकंदरीत जगण्यातलीच ही पॅशन कायमच आपल्या स्मरणात राहील.
happysokul@gmail.com
