विजय जाधव
वाचनसंस्कृतीविषयी बोलताना आज एक विचित्र विरोधाभास जाणवतोय. एका बाजूला माहितीचा प्रचंड स्फोट, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव आणि ज्ञान सहज उपलब्ध झाल्याची भावना निर्माण झालीय; तर दुसर्या बाजूला सखोल वाचनाची घटती सवय आणि गंभीर वैचारिक संवाद कमी होत चाललाय. अशा काळात काही प्रकाशन संस्था केवळ पुस्तकनिर्मितीपुरत्या मर्यादित राहत नाहीत; त्या विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक प्रश्नांभोवती संवाद निर्माण करण्याचाही प्रयत्न करतात. ‘सृजन प्रकाशन’ आणि पुढे सुरू झालेल्या ‘सृजन त्रैमासिक’चा प्रवास अशाच एका प्रयत्नातून आकाराला आला.
मी मूळचा रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातला. सत्तरचे दशक संपताना शिक्षणासाठी मुंबईत आलो. ऐंशीच्या दशकात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना डाव्या चळवळीशी जोडला गेलो. तो सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा काळ होता. युवकांच्या अनेक चळवळी आकाराला येत होत्या. माझ्या पिढीवर ‘लिटिल मॅगेझिन’ म्हणजेच लघुनियतकालिक चळवळीचा प्रभाव पडला.
साठोत्तरी काळात उभ्या राहिलेल्या या चळवळीने मराठी साहित्यविश्वात बर्यापैकी घुसळण केली. मुख्य प्रवाहातील साचेबद्ध साहित्य आणि मध्यमवर्गीय अभिरुचीला त्यांनी छेद दिला. भिन्न प्रकारचे लेखन, विद्रोही विचार, दलित-बहुजन अनुभव, अस्तित्ववादी प्रश्न आणि समाजातील अस्वस्थ वास्तव साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. वाचन, लेखन, भित्तिपत्रके, चर्चा, वैचारिक गट आणि सांस्कृतिक हस्तक्षेप यांमधून अनेक तरुण सामाजिक आणि वैचारिक चळवळींकडे वळले. मला लिखाण-वाचनाची आवड होतीच. रेखाटन आणि सुलेखन करणं खूप आवडायचं. याच आवडीतून भित्तिपत्रकं काढू लागलो. त्या काळात समान आवड असणार्या मित्रांचा एक छोटा गट तयार झाला होता. आंबेडकर कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज आणि कीर्ती कॉलेजमध्ये त्या काळात आम्ही ‘शलाका’, ‘मैत्रेय’ अशा नावांनी भित्तिपत्रकं काढली.
पुढे आव्हान नाट्यमंचशी संपर्क आला. डाव्या विचारांचे अनेक नवे मित्र जोडले गेले. आधी ‘आव्हान प्रकाशन’ आणि नंतर ‘निर्माण प्रकाशन’ या नावांनी आम्ही सुरुवातीची प्रकाशने केली. त्यात प्र. श्री. नेरूरकर यांनी अनुवादीत केलेला कवितासंग्रह ‘हो-ची-मिन्हच्या तुरुंग कविता’ आणि ‘आरक्षण – भ्रम आणि वास्तव’ ही पुस्तके होती. या काळात धुमील, गोरख पांडेय, सर्वेश्वर दयाल सक्सेना इत्यादी कवींच्या कवितांचे विविध ‘पोएट्री पोस्टर्स’ काढले.
दरम्यान मी मुंबई महानगरपालिकेत कामाला लागलो. आमचा गट बुलेटीन काढू लागला. त्यात माझा पुढाकार असायचा. आम्ही चार-पाच बुलेटिन्स काढली. बर्तोल्ड ब्रेख्त यांची जन्मशताब्दी होती. ब्रेख्त आणि कवी मनोहर वाकोडे यांच्यावर बुलेटिन्स निघाले. त्या माध्यमातून साहित्य, नाटक आणि इतर सामाजिक प्रश्नांवर चर्चा निर्माण करण्याची आमची धडपड असायची.
सामूहिकपणे काम करताना अनेक व्यावहारिक अडचणीही जाणवत होत्या. चर्चा आणि वादविवाद भरपूर व्हायचे; पण प्रत्यक्ष जबाबदारी घेणारे लोक तुलनेने कमी असायचे. पण या काळाचा एकूण अनुभव खूप सजग करणारा ठरला.
सातत्याने नवं आणि वेगळ्या स्वरूपाचं साहित्य प्रकाशित करण्याची इच्छा होती. नोकरी असल्याने थोडी स्थिरता आली होती. त्यामुळे आता स्वत:चं प्रकाशन सुरू करावं अशी योजना मनोमन बनवू लागलो. या सगळ्या प्रक्रियेतूनच २००७ साली ‘सृजन प्रकाशन’ची सुरुवात झाली. संजय पवार यांचं ‘४७ एके ४७’ आणि आनंद तेलतुंबडे यांचे ‘जागतिकीकरण आणि दलित’ आणि ‘भारतीय परिप्रेक्ष्यातून धर्मनिरपेक्षता’ ही सृजनची सुरुवातीची प्रकाशने.
या प्रवासाला आता जवळपास दोन दशके झाली. प्रकाशन, संपादन, वितरण अशी बहुतांश कामे स्वत:च सांभाळावी लागत असल्याने, तसंच नोकरीत खूप वेळ जात असल्याने, प्रकाशनात सातत्य राखणं कठीण जायचं, त्यामुळे चिडचिड व्हायची. ‘सृजन’चा दिवाळी अंक त्याच काळात सुरू केला. तो बरेचदा उशिरा यायचा. अनेक प्रती नि:शुल्क वाटण्यात जायच्या. त्यामुळे आर्थिक फटका बसायचा. पण वाचकांना विचार करायला भाग पाडणारं साहित्य निर्माण करू शकलो हे समाधान मोठं असायचं. आजही नवं पुस्तक छापून हातात आलं की सगळ्या धावपळीचं चीज झाल्यासारखं वाटतं.
वीस वर्षांच्या या प्रवासात अनेक चढउतार आले. आर्थिक ताळमेळ, नोकरी, वेळेची मर्यादा आणि आरोग्य यांच्यात समतोल साधणं नेहमीच सोपं नव्हतं. पण या प्रवासात अनेक नवे सहकारी आणि लेखक जोडले गेले. काही नव्या लेखकांची पहिली पुस्तकं प्रकाशित करण्याची संधी मिळाली, हे समाधान महत्त्वाचं वाटतं.
मुख्य प्रवाहात तुलनेने कमी दिसणार्या विषयांवर आणि नव्या लेखकांवर काम करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून राहिला. व्यापक दृष्टिकोन ठेवून विविध अनुभवांना जागा देण्याचा प्रयत्न असतो. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर गंभीर विचारमंथन घडवणारं साहित्य प्रकाशित करण्यावर सृजनचा भर असतो.
वैचारिक आणि ललित साहित्य हे दोन्ही प्रवाह महत्त्वाचे वाटतात. सुधाकर गायकवाड यांचं ‘माणूस, त्याचा समाज व बदल – डॉ. आंबेडकर यांचे सिद्धांतन’ हे पुस्तक या प्रवासात महत्त्वाचं योगदान ठरलं. तर सुधीर जाधव यांची ‘कामाठीपुरा’ ही कादंबरी विशेष चर्चेत राहिली. या पुस्तकांमुळे विविध सामाजिक वास्तवांकडे पाहण्याचे नवे संदर्भ मिळाले.
परिघावरील समाजघटकांचे अनुभव आणि दृष्टिकोन केंद्रस्थानी आणणं, हा सृजनच्या कामाचा गाभा आहे. वैचारिक पुस्तकांचा वाचक तुलनेने मर्यादित असतो. पण असा वाचक पुस्तकांशी दीर्घकाळ जोडलेला राहतो. त्याच्यापर्यंत पोहोचण्याची आमची धडपड असते.
वर्षभरापूर्वी अमरनाथ सिंग यांनी कार्यकारी संपादक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ‘सृजन’ दिवाळी अंक बंद करून हे नियतकालिक आता त्रैमासिक करण्यात आले. ‘आकलनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी’ असे या त्रैमासिकाचे ब्रीदवाक्य ठरले. या बदलानंतर नियतकालिकाचा आशय आणि विषयांची विविधता वाढली. पुस्तकाच्या आकारात प्रकाशित होणार्या त्रैमासिक सृजनचे आतापर्यंत तीन अंक प्रसिद्ध झाले असून, हळूहळू या त्रैमासिकाभोवती एक नियमित वाचकवर्ग तयार होताना दिसतोय.
त्रैमासिकात विशिष्ट विषयांभोवती केंद्रित लेखन, दीर्घ मुलाखती, अभ्यासपूर्ण लेख आणि नव्या लेखकांना दिलेली जागा यावर भर असतो. विविध विषयांवर सखोल अभ्यासपूर्ण लेखन मराठीत उपलब्ध व्हावं, हा प्रयत्न त्यामागे आहे.
‘प्रकाशन व्यवसायात तोटा सहन करावा लागतो,’ असं वारंवार म्हटलं जातं. मराठी प्रकाशन क्षेत्रातील मर्यादित बाजारपेठ, कमी होत चाललेली वाचनसंस्कृती, वाढता उत्पादन खर्च आणि वितरणातील अडचणी पाहता या विधानात काही प्रमाणात तथ्य निश्चितच आहे. परंतु प्रकाशन हा केवळ आर्थिक व्यवहार नाही; तो सांस्कृतिक आणि वैचारिक हस्तक्षेपाचाही भाग आहे. एखादं पुस्तक किती विकलं गेलं, यापेक्षा त्याने किती नवे प्रश्न निर्माण केले, किती वाचकांना विचार करायला भाग पाडलं आणि किती नव्या लेखकांच्या अभिव्यक्तीला मंच मिळाला, हे अधिक महत्त्वाचं ठरतं.
वैचारिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्या संस्थांचं मूल्य केवळ नफ्या-तोट्याच्या गणितावर ठरत नाही; ते समाजात निर्माण होणार्या बौद्धिक हालचालींमधून ठरतं. म्हणूनच ‘सृजन’साठी प्रकाशन हा व्यवसाय असला, तरी त्यापेक्षा अधिक तो सामाजिक जबाबदारी आणि वैचारिक बांधिलकीचा प्रवास आहे.
‘सृजन’ची भूमिका केवळ पुस्तकं प्रकाशित करण्यापुरती मर्यादित नाही. जनप्रबोधनाच्या रूतलेल्या प्रवाहाला नवी गती देणं, हा आमच्या कामामागचा मुख्य हेतू आहे. समाज अधिक विचारशील, संवेदनशील आणि चिकित्सक व्हावा, यासाठी साहित्य आणि वैचारिक संवाद यांना आम्ही परिवर्तनाची महत्त्वाची साधने मानतो.
सृजनला वाटते की लेखक, कलावंत आणि साहित्यिक यांची भूमिका केवळ मनोरंजन किंवा अभिव्यक्तीपुरती मर्यादित असू शकत नाही. सुस्त मानसिकतेला अस्वस्थ करणे, रूढ आणि अमानुष व्यवस्थांना प्रश्न विचारणे, विस्मृतीत गेलेल्या अनुभवांना पुन्हा आवाज देणे आणि समाजाला आत्मपरीक्षणासाठी भाग पाडणे, हेही त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे अंग आहे. कारण विचारांना हादरा देणारे साहित्यच समाजाला नव्याने पाहण्याची आणि बदलाची प्रेरणा देऊ शकते.
आजही एखादा तरुण लेखक पहिल्यांदा हस्तलिखित घेऊन येतो. किंवा एखादा वाचक जुन्या अंकाबद्दल फोन करून बोलतो तेव्हा या प्रवासाचं महत्त्व पुन्हा जाणवतं. मराठीत गंभीर स्वरूपाचं लेखन टिकून राहावं, एवढीच या प्रयत्नामागची साधी अपेक्षा आहे.
srujanprakashan@gmail.com
