मु. पो. पंढरपूर

आजच्या काळातील संवेदनशील कवी व गीतकार म्हणून दासू वैद्य परिचित आहेत. भोवतालातील घटना, व्यक्ती आणि मानवी जगण्याकडे कवीच्या नजरेतून पाहणारे त्यांचे नवे पाक्षिक सदर..

आजच्या काळातील संवेदनशील कवी व गीतकार म्हणून दासू वैद्य परिचित आहेत. भोवतालातील घटना, व्यक्ती आणि मानवी जगण्याकडे कवीच्या नजरेतून पाहणारे त्यांचे नवे पाक्षिक सदर..
गावाकडच्या वाडय़ात लहानपणी आम्ही पोरं धिंगाणा करायचो. तेव्हा वैतागलेली भागीरथाआजी कापऱ्या आवाजात ओरडायची, ‘एकदा मला त्या मणकर्णिका घाटावर नेऊन घाला. त्याशिवाय मला शांती मिळणार lok03नाही. घटकाभर डोळा लागत नाही तर या पोरांचा धांगडधिंगा सुरू. उचल रे पांडुरंगा!’ या स्वगतातलं मणिकर्णिका घाट हे काशी तीर्थक्षेत्री असणारं शेवटचं विश्रांतीचं स्थान होतं. काशीप्रमाणेच परंपरेनं डोक्यात रुतलेलं दुसरं स्थान म्हणजे पंढरपूर! पण इथं हात-पाय, डोळे धडधाकट असताना एकदा पांडुरंगाच्या पायांवर डोकं ठेवण्याची इच्छा पुन:पुन्हा व्यक्त व्हायची आणि गावाकडे आजही होते.
कुठलंही अवडंबर नसणारा, थेट दर्शन घेऊ देणारा हा गोरगरीबांचा देव. हा पांडुरंग आणि त्याचं मुक्काम पोस्ट असणारं पंढरपूर मराठी संस्कृतीत पार मिसळून गेलंय. एक सर्वव्यापी प्रतीक झालंय. संत मेळ्यानं या पंढरपुराला अधिक उजागर केलं. अभंगांतून, लोककथांतून, गाण्यांतून, चित्र-शिल्पांतून, उखाण्यांतून, नाटय़-चित्रपटांतून, कवितांतून हे पंढरपूर ध्रुवपदासारखं पुन:पुन्हा आवर्त होताना दिसतं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ ही रचना आपल्या डोक्याच्या घुमटात घुमत राहते. खडीसाखरेसारख्या कडक, पण कानात विरघळणाऱ्या प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील ‘चल गं सखे, चल गं सखे पंढरीला’ आपल्याशी अधिक सलगी करतं. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘माझे माहेर पंढरी’ अशी अनेक भक्तिगीतं लहानपणी लग्नमंडपांत, मंदिरांत, गणेश मंडळांत लावलेल्या कण्र्यातून गावभर ऐकू यायची. गावालगतच्या मळ्यातील मोटेचा आवाज किंवा मशिदीतल्या मुल्लाच्या आजानचा आवाज ऐकू यावा एवढय़ा शांत वातावरणात कण्र्यात वाजणाऱ्या या गाण्यांचं आम्हाला अप्रुप होतं. असा पंढरपुरी काढा भल्या लहानपणापासून पीत (ऐकत) गेल्यामुळे आता कुठेही ‘पंढरपूर’ शब्द भेटला की लांबच्या प्रवासात बालपणीचा वर्गमित्र भेटल्यासारखं वाटतं.
गावातलं विठ्ठल मंदिर तर नेहमीच गजबजलेलं. एक गोड आवाजाचे कीर्तनकार दरवर्षी गावात यायचे. विठ्ठल मंदिरात त्यांचं कीर्तन रंगायचं. गावातली सगळी मोठी मंडळी कीर्तनाला मोठय़ा नम्रतेनं हजर असायची. पोलीस पाटील, पाटील, सावकार, पैलवान, मास्तर, म्हातारे, आया-बाया असे सगळे सगळे भक्तिभावे कीर्तन ऐकायचे. आरंभी कीर्तनकाराच्या पाया पडायचे. कीर्तनाच्या आख्यानात लोक रंगून जायचे. ठरावीक वेळांनी श्रोत्यांना विठ्ठलनामाचा नामी डोस असे. कीर्तनकारासोबत श्रोत्यांचा आवाज मंदिरात घुमायचा.. ‘विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठऽऽल.. विठ्ठऽऽल.. विठ्ठल.. ठ्ठल.. ठ्ठल.. ठ्ठल..’ आणि लोक पुन्हा ताजेतवाने व्हायचे. श्रावणात भागवत सप्ताह सुरू असे. भक्तिभावे पोथी ऐकली जाई. ‘अथ प्रथमोध्याय: समाप्त:’ असं म्हटल्यावर ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा समूहस्वर घुमायचा. भल्या रामपाऱ्यात काकडआरतीच्या नावाखाली हरीचे नाव घेऊन पांडुरंगाला आळवले जाई. काहीच नसेल तर मंदिरात नामसप्ताह सुरू असे. आळीपाळीनं वीणा गळ्यात घेऊन नामसंकीर्तनाचा अखंड पहारा सुरू असे. असा हा विठूचा गजर आणि हरीनामाचा झेंडा कायम रोवलेला असे. ‘ग्यानबा.. तुकाराम’च्या पावल्या रंगात येत. टाळ-मृदंगाच्या आवाजात एकजीव झालेली खडय़ा आवाजातील भजनं भल्या रात्रीपर्यंत सुरू असत.
गावात वारीची परंपरा होती. वारीला जाण्यासाठी अनेक अडचणी असत. ज्यांना दिंडीत वारीला पायी जाणं शक्य नव्हतं, ते एसटीनं पंढरपूर गाठायचे. बऱ्याच लोकांना आर्थिक अडचणी असायच्या. अशा वेळी कोणी घरातलं शिल्लक धान्य विकायचं. घोंगडी, शिलाई मशीन विकून पंढरपूरला गेलेले दोघेजण मला आजही आठवतात. काहींना जाणं शक्यच नव्हतं. हे लोक आपल्या गावालाच मनोमन पंढरपूर समजून ‘विठ्ठऽऽल.. विठ्ठऽऽल.. ठ्ठल.. ठ्ठल..’ करीत राहायचे. पुढं मला एक स्त्री भेटली. अरुण कोलटकरांच्या ‘नगेली’ कवितेत. तीसुद्धा पंढरपूरला जाऊ शकली नाही. ही स्त्री वेश्या आहे. देहविक्रीच्या धंद्यात तिचा जीव उबगला आहे. मोठय़ा हौसेनं ती पंढरपूरला निघते. भव्य स्टेशन बघूनच हरखून जाते. पण तिला तिच्या खिळखिळ्या शरीराचा भरोसा वाटत नाही. प्रवास झेपणार नाही म्हणून ती घरी परतते. काढलेलं तिकीट वाया जातं. परतताना पांडुरंगालाच, जमल्यास घरी ये, असं मनोमन निमंत्रण देते आणि स्वत:च्या घरी पांडुरंगाची वाट पाहत बसते. ‘नगेली’ कवितेतील पंढरपुराला निघालेली ही स्त्री शेवटी गेलीच नाही. अनेक कारणांनी अनेक जणांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही. अशा अनेक भक्तांना पंढरपुराबद्दल हुरहुर असणं स्वाभाविक आहे. पण आपल्यासारख्या इतर ‘नगेल्या’नाही पंढरपुराबद्दल उत्सुकता असतेच. अशा नगेल्या उत्सुकाने एकदा डॉ. रा. चिं. ढेरे यांचा ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ हा ग्रंथ जरूर वाचावा. (जसं आग्ऱ्याला जाण्यापूर्वी एकदा माधव आचवलांचं ताजमहालवरचं पुस्तक जरूर वाचावं.) एखाद्या देवाचा आणि देवस्थानाचा किती समूळ पाठपुरावा करता येतो याचं सुंदर उदाहरण म्हणजे ढेऱ्यांचा हा ग्रंथ आहे. पंढरपूरस्थित विठ्ठल हा लोकमानसात महासमन्वय झाला आहे. या संशोधनातील पंढरपुरी माहिती मोठी वाचनीय आहे. पंढरपूरचं पूर्वीचं नाव पांडुरंग क्षेत्र, पुंडरीक क्षेत्र, पौंडरीक क्षेत्र असं होतं. आताचं ‘पांडुरंग’ हे विठ्ठलाचं पर्यायी नाव पूर्वी क्षेत्रवाचक- म्हणजे गावाचं नाव होतं. ‘पांडुरंग विठ्ठल’ म्हणजे पांडुरंग क्षेत्रीचा विठ्ठल. पांडुरंगच का? तर संतांच्या दृष्टीनं विठ्ठल हा गोपालकृष्ण आहे. गाईच्या खुरांनी उधळलेल्या धुळीनं त्याचं सर्वाग धूसर झाल्यामुळं त्याला ‘पांडुरंग’ हे नाव लाभलं. असं ‘पंढरपुरी’ रहस्य ढेरे यांच्या शोधग्रंथातून साक्षात उलगडत जातं.
खरं तर हे पंढरपुरी आख्यान लागण्यासाठी कारणीभूत ठरला तो मराठी चित्रपट ‘एलिझाबेथ एकादशी’! हिंदी चित्रपटांचं अनुकरण करण्याचं मराठी चित्रपटांतलं ‘फॅड’ एकदाचं संपलं. नवे रंगकर्मी नवनव्या आशयांत आंघोळ करून मराठी चित्रपटाकडे वळले आणि स्वत:चा चेहरा असलेला मराठी चित्रपट चर्चेत आला. या नव्या लोकांनी नवनवे प्रयोग केले. त्यामुळे मराठी चित्रपटांमध्ये आज चैतन्य आलंय. अशा प्रयोगशील दिग्दर्शकांपैकी परेश मोकाशी हे महत्त्वाचं नाव. दि. बा. मोकाशी यांचा प्रातिभ वारसा पुढं चालवणारे परेश मोकाशी हे ‘मु. पो. बोंबिलवाडी’ नाटकामुळे लक्षवेधी ठरले. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटामुळं या दिग्दर्शकाचं वेगळेपण अधोरेखित झालं. याच मोकाशींचा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा पंढरपुरी काढा प्यालेला मराठी चित्रपट! लेखिका मधुगंधा कुलकर्णीनी हा काढा मस्त आटवलाय. पडद्यावर चित्रपट सुरू होतो आणि आपण पंढरपुरात प्रवेश करतो. वाटतं, आपण चित्रपटाचं तिकीट काढलेलं नसून पंढरपूरच्या एसटीचंच तिकीट काढलंय. पंढरपूरच्या जत्रेतच नव्हे, तर गल्लीबोळांत आपण फिरत राहतो. या गल्लीबोळी पाहताना गावाकडच्या गल्लीबोळी आठवल्या. बोळींतून जिवाच्या आकांताने पळणारे ज्ञानेश, झेंडू पाहताना माजिद माजेदीच्या ‘चिल्ड्रन ऑफ द हेवन’ चित्रपटातील बोळींतून फाटका बूट घालून पळणारे बहीण-भाऊ आठवले. या पंढरपुरी चित्रपटात एका सरळमार्गी कुटुंबावर संकट येतं. चरितार्थाची साधन असलेली स्वेटर विणणारी मशीनच बँक अधिकारी कर्जापायी जप्त करतो. अशा कठीणप्रसंगी अंगवळणी पडलेल्या रिवाजाप्रमाणे ही संकटग्रस्त पात्रं गावातल्या मूर्तिरूप पांडुरंगासमोर हात जोडून उभी राहय़ला हरकत नव्हती. पण तसं घडत नाही. मुलगा-मुलगी, आई- आजी असे सर्वजण आपापल्या परीनं या प्रश्नाला भिडतात. साक्षात् पंढरपुरात हे लोक स्वत:चा विठ्ठल शोधतात. घरातला कर्ता पुरुष गेल्यावर बाई स्वेटर विणून, पोळ्या लाटून घर चालवतेय. दोन मुलं, सासू यांचा गाडा रेटतेय. हे कथानक पंढरपुरात घडतंय. आचरणाने वारकरी संप्रदाय पचवलेलं हे घर आर्थिकदृष्टय़ा गरीब असलं तरी पंढरपुरातल्या घरापेक्षा वेगळं आहे. कारण या घरात देवांच्या फोटोबरोबरच न्यूटनचा फोटो लावलेला आहे. न्यूटनचा नुस्ता फोटोच नाहीए, तर या घरातल्या स्वर्गवासी प्रमुखाने नव्या प्रकारची सायकलही स्वत: बनवलेली आहे.
वृक्षाची पानं खाऊन परीक्षेत यश मिळवू पाहणाऱ्या दैवी वातावरणात स्वकर्तृत्वानं प्रश्नाला सामोरं जाणारं हे कुटुंब आहे. दृश्यरूपात अबीर, बुक्का, तुळशीच्या माळा दिसत नसल्या तरी खरा भागवतधर्म कळलेली ही पात्रं जगणं समृद्ध करतात.
अशीच पंढरपुरी पाश्र्वभूमी असलेला ‘लय भारी’ चित्रपट काही दिवसांपूर्वी आलेला होता. त्या चित्रपटाचा ‘पब्लिक खिंच’ इरादा स्पष्ट होता आणि तो साध्यही झाला. यातील नायक चमत्कारिक मारामाऱ्या करतो, नाहीतर विठ्ठलासमोर हात जोडून उभा राहतो. (गावात विठ्ठल उपलब्ध असल्यावर का उभं राहू नये?) पण ‘एलिझाबेथ एकादशी’मधील पात्रं स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून नैतिक मार्गाने प्रश्नाला सामोरे जातात. कातडीसारखी जगण्याला चिकटलेली माणसाच्या भोवतालची दुनिया ‘फिल्मी’ असू शकत नाही. ती वास्तवच असते. जशी ‘एलिझाबेथ’मध्ये आहे. ‘एलिझाबेथ’मधील पात्रांची भाषा, लकबी, पोशाख, घरे, रस्ते, गल्ल्या, बोळी व मानसिकता अस्सल पंढरपुरी आहे. पात्रांची निवड करताना नेहमीचे यशस्वी चेहरे न घेता अस्सल पंढरपुरी पात्रांना पडद्यावर आणलेलं आहे. त्यामुळे हे मंदिराबाहेरचं पंढरपूरदर्शन स्वत:मधला विठ्ठल शोधण्यासाठी माणसाला जागं करतं.
आमच्या एक आत्याबाई होत्या. स्वतंत्र विचाराची फटकळ बाई. रागिष्ट तेवढय़ाच प्रेमळही. बऱ्याचदा त्यांचे घरातल्यांशी वाद व्हायचे. मग अशावेळी आत्याबाई पंढरपुरात जाऊन खुशाल राहायच्या. घराच्या आठवणी भोवती जास्तच फेर धरू लागल्या की आत्याबाई पुन्हा गावी परत यायच्या. आत्याबाईंनी एकदा मला तांब्यांत कोंडलेल्या विठ्ठलाची गोष्ट सांगितली. तांब्यात बंद करून ठेवलेला विठ्ठल आत्याने पंढरपुरातल्या एका मठात पाहिला होता. त्याचं झालं असं : माणसात देव पाहणारा भागवतधर्म.. पण विठ्ठलाचं दर्शन घेण्याची अस्पृश्यांना परवानगी नव्हती. वारकरीविचाराला कलंक असलेली ही परंपरा होती. म्हणून साने- गुरुजींनी अस्पृश्यांना विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलं. गुरुजींच्या या प्रयत्नांना यशही आलं. अस्पृश्य दर्शनासाठी मंदिरात जाणार त्याच्या आदल्या दिवशीच एका महाराजांनी एक दिव्य प्रकार केला. महाराजांनी मंत्राच्या सामर्थ्यांनं विठ्ठलाचा आत्माच एका तांब्यात (कलशात) बंद केला. आत्माच काढून घेतल्यामुळं त्यांच्या मते आता मंदिरात फक्त दगडाची मूर्तीच उरलेली आहे. अस्पृश्यांच्या स्पर्शानं मूर्ती विटाळली, पण कलशातला आत्मा पवित्रच राहिला आहे. आजही तो कलश पंढरपुरातल्या कुठल्यातरी मठात आहे म्हणे. असे कुठे कुठे कोंडून ठेवलेले विठ्ठल ‘एलिझाबेथ एकादशी’सारख्या धक्क्य़ानं मुक्त व्हायला नक्कीच मदत होईल. म्हणजेच ज्याचं त्याला पंढरपूर गवसेल.
दासू वैद्य – dasoovaidya@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Stay at pandharpur

ताज्या बातम्या